अनुभव – प्रणाली घरत
मी नवी मुंबई मध्ये राहायला आहे. बी एस सी नर्सिंग च्या चौथ्या वर्षात शिकत आहे. हा अनुभव मला मे २०२२ मध्ये आला होता. आम्ही लास्ट इयर ला असल्यामुळे इनटर्न शिप एका दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये लागली होती. आमची ईव्हीनिंग शिफ्ट होती २ ते ८. त्या दिवशी आम्ही शिफ्ट संपवून निघत होतो. पण आम्हाला वॉश रूम ला जायचे होते. आम्ही वॉश रूम साठी ६ व्या मजल्यावर जायचो कारण त्या मजल्यावर कोणतेच पेशंट नव्हते. आम्हाला सांगितले होते की शक्यतो पेशंट नसलेल्या मजल्यावर वॉश रूम वापरायचे म्हणजे पेशंट ना गैरसोय होणार नाही. ८ नंतर निघताना मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघी त्या मजल्यावर गेलो. सगळे लाईट वैगर बंद होते. फक्त लिफ्ट जवळ चा एक लाईट सुरू होता. जिथून सरळ जाऊन पुढे वॉश रूम होते.
आम्ही दोघी ही जाऊन आलो आणि लिफ्ट साठी थांबलो होतो. तितक्यात मागून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आम्हा दोघींच्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. कारण त्या मजल्यावर एक ही पेशंट ऍडमिट नव्हता, सगळ्या रूम बंद होत्या. मग तो आवाज. आम्ही दोघींनी एकमेकांकडे पाहिले. माझी तर पावलं भीती ने जागीच खिळली होती. कारण NICU आणि labour वॉर्ड म्हणजे डिलिव्हरी रूम हे दोन्हीही ४थ्या मजल्यावर होते. मागे वळून पहायची हिम्मत नव्हती. माझे सर्वांग घामाने भिजले होते. तितक्यात लिफ्ट आली आणि आम्ही धावतच आत शिरलो, ग्राउंड फ्लोअर ला जाण्याचे बटन दाबले. दरवाजा बंद झाला आणि पुन्हा एकदा उघडला. आम्हाला वाटले की काही तरी तांत्रिक बिघाड झाला असेल. मी झटकन क्लोज चे बटन प्रेस केले, तसा दरवाजा बंद होऊ लागला आणि अचानक पुन्हा उघडला गेला.. लिफ्ट मध्ये असे तेव्हाच होते जेव्हा दरवाज्यात एखादा अडथळा येतो आणि सेन्सर कट होते.
असे बराच वेळ होत राहिले. काय करावे ते आम्हाला कळत नव्हते. तितक्यात हॉस्पिटल चे वॉचमन काका जिन्याने वर येताना दिसले. त्यांनी तो आवाज बहुतेक ऐकला असावा तसे पटकन त्यांनी फक्त हाताने इशारा केला की लिफ्ट मधून बाहेर या आणि पायऱ्या उतरून खाली जा. घाई करा.. आम्ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी जेव्हा हॉस्पिटल मध्ये आलो तेव्हा तिथल्या जुन्या स्टाफ ला रात्रीचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले की असा अनुभव इथे खूप जणांना आला आहे. पण कोणालाच माहीत नाही की हा नक्की काय प्रकार आहे. काही दिवसांनंतर आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये हा विषय निघाला तेव्हा मला कळले की आमच्या कॉलेज मध्ये जे कोणी त्या हॉस्पिटल ला इन टर्न शिप करायला गेले होते त्यांना असाच काहीसा अनुभव आला होता पण भीती मुळे त्यांनी या प्रकाराची कुठे ही वाच्यता केली नव्हती.