दाट जंगलात वसलेल्या एका छोट्या, शांत गावात एक प्राचीन, जीर्ण वाडा उभा होता. अस म्हंटले जायचे की या वाड्यात कोणी प्रवेश केला की तो बाहेर च जग कधीच पाहू शकत नाही. त्याला कारण ही तसच होत. वाड्याला असलेला गूढ इतिहास. त्या गावात आज पर्यंत बरीच लहान मूल गायब झाली होती. पण इतके सगळे असूनही मी आणि माझ्या मित्रांनी त्या वाड्यात जायचे ठरवले होते. माझ्याच एका मित्राने हा वाडा शोधून काढला होता. गेले काही महिने तिथे जाण्यासाठी सतत आमच्या मागे लागला होता. नाईट आऊट करायचे होते त्याला त्या वाड्यात. त्याच एकच मत होत की गावात बोलल्या जाणाऱ्या आणि या वाड्या बद्दल पसरवलेल्या सगळ्या गोष्टी अफवा आहेत. कदाचित याच फेटाळून लावण्यासाठी त्याने अट्टाहास केला होता.

आम्हा मित्रांना ही काही तरी थ्रील करायची भलतीच हौस. म्हणून मग मागचा पुढचा विचार न करता एक रात्र त्या वाड्यात घालविण्याचा निर्णय घेतला. आम्ही ६-७ मित्र. हे काही आमचे पाहिले नाईट आऊट नव्हते, या आधी ही अश्या बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो होतो त्यामुळे भीती वैगरे हा प्रकार आमच्या लेखी नव्हताच कधी. ठरलेल्या दिवशी मोठी फोर व्हीलर घेऊन पोहोचलो त्या गावात. संध्याकाळ झाली आणि हळु हळु अंधार पडायला सुरुवात झाली होती. प्रत्येकाच्या हातात फ्लॅश लाईट, खांद्यावर बॅग असे सगळे घेऊन आम्ही त्या वाड्याजवळ पोहोचलो. तो वाडा बाहेरून खूप आकर्षक दिसत होता. पाहूनच वाटत होते की जवळपास दोनशे अडीचशे वर्षांपूर्वी बांधला असावा. किंवा त्याहून ही जुना असावा. बऱ्याच वर्षांपासून पडीक असल्याने संपूर्ण वेलिंनी वेढला गेला होता. आम्ही काही वेळ बाहेर थांबून संपूर्ण वाडा पाहत उभे होतो. 

आभाळ दाटून आले होते त्यामुळे दुरून गड गडण्याचा आवाज आला आणि वाटले की कुठल्याही क्षणी पाऊस सुरू होईल. एक वावटळ उठली होती. त्या वाऱ्यामुळे वाड्या भोवती असलेल्या झाडांच्या फांद्या मध्ये सळसळ ऐकू येऊ लागली. हळु हळु वातावरण गूढ बनत चालले होते. आम्ही त्या वाड्याचा लाकडी गेट उघडुन आत प्रवेश केला. तसे थंडगार वाऱ्याची एक झुळूक अंगाला स्पर्श करून गेली. आम्हा सगळ्यांच्या मनात एक कुतूहल होते की आज ची रात्र कशी जाणार. फ्लॅश लाईट सुरू करून आम्ही त्या वाड्यात प्रवेश केला. एक मोठा लाकडी दरवाजा जो काळाच्या ओघात जीर्ण झाला होता. थोडासा आत सरकवून आम्ही सगळे त्या वाड्यात शिरलो. आतली हवा एक वेगळेच वातावरण निर्माण करत होती.

अंगाला त्रास होईल इतकी बोचरी थंडी जाणवू लागली. अस वाटू लागलं की कोणी तरी आपल्यावर सतत नजर ठेऊन आहे. प्रवेश केलेल्या पहिल्या खोलीत सगळे सामान झाकून ठेवले होते. ज्यावर खूप धूळ साचली होती. वाड्याच्या भल्या मोठ्या भिंतींवर बहुतेक तिथल्या पूर्वजांची चित्रे लावली होती. त्यांचे डोळे पाहिले आणि असे भासू लागले की याच त्या नजरा ज्यामुळे आपल्याला वाटतंय की आपल्यावर कोणी तरी सतत नजर ठेवून आहे. त्या फोटो मधल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असले तरीही ते साधे सुधे वाटत नव्हते. ते आम्हाला खास करून मला खूप अस्वस्थ करू लागले. माझ्या एका मित्राने फ्लॅश लाईट मारून एका धुळीने झालेल्या फर्निचर वरचे कापड बाजूला केले. तसे आम्ही प्रत्येक समान उघडुन पाहू लागलो की कुठे काय ठेवले आहे. 

जस जसे आम्ही आत जात होतो, एक एक सामान, फर्निचर पाहत होतो तस तसे आतील वातावरण बदलत जात होते. क्षणा क्षणाला थंडीचा जोर वाढत होता. अगदी गोठवून टाकणारी थंडी. तितक्यात एका मित्राने हाक मारली आणि इशारा करून एक लाकडी दरवाजा दाखवला. त्याकडे बघून वाटले की हा मार्ग नक्कीच तळघरात जात असावा. हा आमचा तोच मित्र होता ज्याने आम्हाला हा वाडा आणि नाईट आऊट बद्दल सुचवले होते. एके क्षणासाठी वाटून गेले की हा काही तरी लपवतोय आमच्या पासून. पण त्या वेळी काही विचारणे मला योग्य वाटले नाही. आम्ही सगळ्या गोष्टी तश्याच सोडून थेट त्या तळघरात जायला निघालो. दगडी पायऱ्या वरून उतरत आम्ही त्या तळघरात येऊन पोहोचलो.

तिथे अडगळीच्या सामानात नजर गेली ती एका डायरी वर. कारण ती डायरी खूप विचित्र भासत होती. जीर्ण झालेली पाने, साचलेली धूळ आणि त्यावर असलेले ते चिन्ह. जे या आधी मी कधीही पाहिले नव्हते. तो एक मित्र लगेच धावत गेला आणि डायरी च्या बाजूला बॅग ठेऊन आतून एक फडका काढला. हळुवार पणे डायरी पुसू लागला. मला पुन्हा जाणवले की हा नक्की काही तरी लपवतोय. त्याला जणू या डायरी ची माहिती असावी. आम्ही त्याच्या जवळ गेलो तसे त्याने डायरी उघडली. त्यात वेगळ्याच भाषेत काही तरी लिहिलं होत. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या त्या मित्राला ती भाषा अवगत होती. तो ती वाचू लागला आणि त्याचा अर्थ ही सांगू लागला. ती एका बाईची होती, जी शतका नु शतके या हवेलीत राहिली होती. कारण तिचे नाव, जन्म, मृत्यू आणि बरेच काही त्यात लिहिले होते. आता माणसाचे आयुमान जरी ६०-८० असले तरी ते या बाबतीत तीच सगळच वेगळं होत. त्या मित्राने पाहिली काही पानं वाचली आणि आम्हाला बऱ्याच भयानक गोष्टी कळल्या. 

तिच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्या आत्म्याला याच वाड्यात राहण्यासाठी एका पिशाच्चाची मदत कशी घ्यायची, त्या पिशाच्चाला किती आणि कसे बळी द्यायचे या सगळ्याचे गूढ विधी नमूद केले होते. आम्ही सगळे च घाबरलो आणि त्याला सांगू लागलो की तू आम्हाला नक्की कुठे घेऊन आला आहेस. हा सगळा काय प्रकार आहे. तुला ही भाषा कशी वाचता येते, काय आहे हे सगळे. पण तो म्हणाला की काही नाही होत, मला पुढे वाचू द्या काय लिहिले आहे. मित्राने पुढे वाचायला सुरुवात केली तेव्हा कळले की तिच्या अपेक्षा किती भयंकर आणि द्वेष पूर्ण आहेत. ज्या पद्धतीने तो सगळे वाचून आम्हाला अर्थ सांगत होता असे वाटत होते की तो एखादा मनोरुग्ण झालाय. आम्ही त्याला अडवू लागलो आणि सांगू लागलो की झाले तेवढे बस झाले, बंद कर ती डायरी. आम्हाला पुढे काहीच ऐकायचे नाहीये.

पण तो मात्र थांबायचे नाव घेत नव्हता. आम्हाला पुसटशी कल्पना ही नव्हती की तो हे सगळे कशा साठी करत होता. पण त्याची प्रचिती आम्हाला काही वेळातच आली. तो वाचत असताना अचानक एके क्षणी सगळ काही शांत झालं आणि एक गुर्गुरणारा आवाज कानावर पडला. आम्ही सगळे जागीच स्तब्ध झालो. हा कसला आवाज होता..? एकाने प्रश्न केला. पण त्याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. पुन्हा तसाच आवाज आला आणि या वेळेस त्याची प्रखरता जास्तच जाणवली. मी झटकन त्या आवाजाच्या दिशेने फ्लॅश लाईट मारला आणि आमचे उरले सुरले आवसान गळू नच पडले. एखाद्या घोरपडी सारखे, तीक्ष्ण नख असलेले काही तरी बाजूच्या भिंतीवर चिकटले होते. मी घाबरतच फ्लॅश लाईट हळु हळू करत चेहऱ्यावर नेला आणि ते किळसवाणे आणि तितकेच भयाण दृश्य नजरेस पडले. पांढरी फट्टक त्वचा, विस्फारलेला जबडा ज्यातून लाळी सारखा चिकट द्रव ओघळत खाली पडत होता आणि त्या जबड्यातून येणारा तो गुर गुरण्याचा आवाज. ते एक पिशाच्च होत.

असे वाटत होते की ते पिशाच्च कोणत्याही क्षणी आमच्यावर झेप घेईल. आम्ही सगळेच एक एक पाऊल मागे टाकत तळघरा तून बाहेर पडायला त्या जिन्याकडे जाऊ लागलो. पण तितक्यात त्या पिशाच्चाने त्या डायरी वर झेप घेतली. बाजूला उभा तो मित्र जणू मागच्या भिंतीवर फेकला गेला. आता मात्र सगळे जीवाच्या आकांताने धावत सुटले आणि पटापट त्या तळघरातल्या दगडी जिन्यावरून वर आले. तो आमचा मित्र मागे होता पण अगदी वेळेत तो वर धावत आला आणि त्यानेच तळघराचा तो दरवाजा जोरात बंद केला. आम्ही सगळेच मागे सरकलो आणि तितक्यात तो दरवाजा जोर जोरात धड धडू लागला. बघता बघता तो आवाज बाजूच्या भिंती मधून येऊ लागला आणि आम्हा सगळ्यांची चांगलीच तंतरली. माझे काळीज भीती ने धड धडत होत. आम्ही त्या मित्राला खूप बोलू लागलो आणि तिथून कसे बसे बाहेर पडलो. घडलेला प्रकार इतका भयंकर होता की कोणाला काहीच सुचत नव्हते. आम्ही थेट फोर व्हीलर मध्ये जाऊन बसलो आणि तिथून जायला निघालो. सहज म्हणून मी मागे वळून पाहिले तर तिथे एक बाई सदृश आकृती उभी दिसली जी आम्हाला जाताना एक टक पाहत होती. आम्ही तर थोडक्यात या भयानक प्रकारातून बाहेर पडलो पण तो वाडा आजही त्याच्या राक्षसी अस्तित्वा सह अनेक गुपित घेऊन उभा आहे आणि आपल्या पुढील भक्षाची वाट पाहत..

Leave a Reply