अनुभव क्रमांक १ – 

हा अनुभव आपल्या चॅनल च्याच एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. 

मी तेव्हा साधारण १२ वर्षांची असेन. आम्ही नुकताच आमचे राहते घर विकून एके ठिकाणी नवीन घर घेतले होते. आमच्या शाळा सुरू असल्यामुळे लगेच नवीन घरी राहायला जाणे शक्य नव्हते. पण आमचे राहते घर ज्यांनी विकत घेतले होते त्यांना मात्र लगेच राहायला यायचे होते. म्हणून मग माझ्या आई वडिलांनी तिथेच जवळ एक रूम भाड्याने घ्यायचे ठरवले. कारण शाळेतून नाव काढून दुसऱ्या शाळेत टाकायचे म्हंटल्यावर बराच वेळ लागणार होता, त्यात पुन्हा वर्ष वाया घालवून चालणार नव्हते. म्हणून ते वर्ष संपे पर्यंत आम्ही त्याच भागात एक रूम भाड्याने घेतली. पुढच्या २ दिवसात सगळे सामान वैगरे शिफ्ट करून आम्ही तिथे राहायला गेलो. मी आधी म्हंटल्यावर प्रमाणे वयाने खूप लहान होते. पण काही गोष्टी कळण्यासाठी वयाची मर्यादा येत नाही. 

तिथे राहायला गेल्यावर मला खूप विचित्र वाटायचं. तेव्हा वाटले की नवीन घर आहे, सवय नाहीये म्हणून असे जाणवत असेल. आणि हळु हळू सवय झाली की मग काही वेगळे वाटणार नाही. आमच्या शाळा चालूच होत्या. मी तशी अभ्यासात खूप हुशार होते. पण माझे अजिबात लक्ष ला गा यचे नाही. शाळा, अभ्यास अगदी नकोसे वाटू लागले. एरव्ही नियमित अभ्यासाला बसणारी मी आता मात्र नुसती बसून असायचे. याच कारणामुळे बाबांचे मला ओरडणे सुरू झाले. हळु हळु घरातले वातावरणच बदलू लागले. रोज सकाळ, संध्याकाळी घरात शुल्लक कारणावरून भांडणे होऊ लागली. जी या आधी घरात कधीही व्हायची नाहीत. आणि या सगळ्यात खरा खेळ माझ्यासोबत होत होता. त्या घरात मला नीट झोपच लागायची नाही. जेव्हा मी झोपायचा प्रयत्न करायचे तेव्हा मला सतत कोणी तरी आजू बाजूला असल्याची अनोळखी चाहूल जाणवायची. 

अभ्यासाला बसले की वाटायचे बाजूला कोणी तरी आहे. स्वयंपाक घरात काही काम करत असेल की वाटायचे दरवाज्याकडे कोणी तरी उभे आहे. खुप प्रयत्न करून मी लवकर झोपायचा प्रयत्न करायचे. पण रोज सगळे झोपले की भर रात्री मध्येच जाग यायची आणि मी उठून बसायचे. मी रोज रडून आई ला म्हणायचे की ते बघ बाबा उठून बसले आहेत आणि मला मारणार आहेत. माझ्याकडे रागात बघत आहेत. पण तिथे कोणीही नसायचे. आई मला समजावून सांगायची की कोणीही नाहीये तिघे, शांत पणे झोप. माझ्या बाजूला माझा भाऊ झोपायचा पण तो लहान होता. तिथे माझी एका मुलीशी मैत्री झाली होती, तिचे नाव होते मयुरी. आम्ही एकत्र खेळताना नेहमी तिला सांगायची की समोर कोणी तरी बसले आहे, जा बघून ये. पण कोणी कधीच माझ्या वर विश्वास ठेवत नव्हत. 

आम्ही जवळपास ९ महिने त्या रूम मध्ये राहिलो. शेवटी वर्ष संपले तसे घेतलेल्या नवीन घरात आम्ही एकदाचे शिफ्ट झालो. आमच्या सोबत माझी मैत्रीण सुद्धा आली होती काही दिवस राहायला. नंतर काही दिवसांनी तिचे वडील माझ्या नवीन घरी गणेश पूजनासाठी येणार होते आणि मग जाताना ती त्यांच्या सोबत जाणार होती. पूजेच्या दिवशी सगळे घरी आले होते. मस्त दिवस होता तो. सगळे गप्पा करत बसले होते. गप्पांच्या ओघात काकूंनी म्हणजे मयुरीच्या आईने एक प्रश्न विचारला “तुम्ही ज्या रूम मध्ये राहिलात तिथे तुम्हाला काही त्रास नाही झाला ना..?”. त्यावर माझी आई जरा गोंधळली. आई ने त्यांना विचारले की तुम्ही असे का विचारताय.?. त्यावर काकू सांगू लागल्या “त्या रूम मध्ये फक्त तुमचे कुटुंब इतके महिने राहू शकले. तिथे अजुन कोणीही इतके दिवस इतके महिने राहू शकले नाही त्या रूम मध्ये. किंवा त्याने राहू दिलं नाही असे म्हंटले तरी चालेल..”

आई आणि मी आम्ही दोघीही घाबरलो च हे सगळे ऐकून. आईने घाबरतच विचारले “तुम्ही हे काय बोलता य, कोणी राहू दिलं नाही..?” त्यावर काकू सांगू लागल्या “ती एका वृद्ध जोडप्याची रूम होती. ते तिथेच राहिले नेहमी. मुलं वैगरे नव्हती त्यांना. ती आजी नेहमी सांगायची की आपण गावी जाऊन राहू आणि ही रूम भाड्यानी देऊ. पण ते आजोबा अगदी शेवटपर्यंत कोणाचे ही ऐकले नाहीत. ते नेहमी म्हणायचे “हे माझे घर आहे, माझ्या घरात कोणीही राहिलेले मला अजिबात आवडणार नाही.. कसे राहतील, माझे घर खराब करतील, काहीही झाले तरी माझ्या घरात कोणी राहायचे नाही”. काही महिन्यांनी आजाराने ते तिथेच त्या रूम मध्ये गेले. त्या नंतर आजी ने ती रूम भाड्याने देऊन गावी निघून गेली. पण कोणताही भाडोत्री तिथे १ महिन्या पासून जास्त राहू शकला नाही. किंवा त्याला राहू दिले नाही. काकूंनी सांगितल्या नंतर मात्र मला आणि माझ्या आई ला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. मला होणारे ते भास नव्हते तर..

अनुभव क्रमांक – २ – संतोष

हा भयानक किस्सा माझ्या मावशी सोबत घडला होता. तिचे लग्न होऊन साधारण ७ वर्ष झाले असतील. घरात तिच्या सासुशी तिचे पटायचे नाही म्हणून त्यांनी दुसरी कडे रहायचा निर्णय घेतला. तिला ५ वर्षांची मुलगी होती. अगदी लहान सहान कारणावरून त्यांच्यात खटके उडत होते म्हणून त्यांनी त्याच शहरात भाड्याने एक रूम घेतली आणि तिथे राहायला गेले. ते दोन खोल्यांचे घर होते. मालक बाजूलाच दुसऱ्या एका घरात राहायचे. राहायला जाऊन काही दिवस झाले. एके दिवशी मावशी घरात एकटीच होती. तसे तिला घरातून कोणी तरी हाक दिल्याचा भास झाला. ती एकदम दचकली. हिम्मत करून तिने आत जाऊन पाहिले. पण साहजिकच तिच्या शिवाय घरात दुसरे कोणीही नव्हते.

ती पुन्हा बाहेरच्या खोलीत येऊन बसली. पण तितक्यात आतून भांडी पडल्याचा आवाज येऊ लागला. तिने घाबरून काकांना फोन केला पण त्यांनी भास असेल म्हणून दुर्लक्ष करायला सांगितले. त्या घराला पत्र्याचे छत होते. त्या दिवशी रात्री यायला काकांना जरा उशीरच झाला. माऊशी आणि तिची छोटी मुलगी घरी जेवण आटोपून झोपायची तयारी करत होत्या. तितक्यात त्यांना जाणवू लागले की घराच्या छतावरून कोणी तरी चालत जातंय. ती प्रचंड घाबरली पण तिने ती भीती दाखवली नाही. कारण तिची लहान मुलगी अजुन घाबरली असती. ती तिला घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण तितक्यात तिची लहान मुलगी खिडकीकडे बोट दाखवत म्हणाली “आई, तिकडे बघ खिडकीबाहेर कोणी तरी उभे आहे”. तिने झटकन खिडकीच्या दिशेने पाहिले. पण तिला तिथे कोणीही दिसले नाही. कसे बसे करून मावशीने तिला त्या रात्री झोपवले. 

त्यांनतर ती मावशीला नेहमी सांगायची की खिडकी बाहेर कोणी तरी उभे आहे पण तिला काहीच दिसायचे नाही. नंतर तिला तिच्या लहान मुलीची काळजी वाटू लागली. एके दिवशी माझी आजी तिला सहज म्हणून भेटायला गेली. ती येणार होती याची तिला कल्पना ही नव्हती. ती बाथरूम मधून अंघोळ करून बाहेर आली आणि आपल्या आईला सोफ्यावर बसून चहा पिताना पाहून आश्चर्य चकित झाली. तिने विचारले “काय ग आई.. तू कधी आलीस.. आणि आल्यावर लगेच स्वतःच चहा करून घेतलास का.. थांबायचे ना माझ्यासाठी.. मी अंघोळ करून येतच होते, मी करून दिला असता ना चहा..” आजी तिचे असे बोलणे ऐकून विचारातच पडली. तिला कळत नव्हते की ही अशी ही वेड्या सारखे काय बडबड ते य. 

तिने जरा रागातच सांगितले “तुझ डोकं ठिकाणावर आहे ना.. तूच दार उघडुन मला आत बसायला सांगितलेस आणि तूच मला चहा आणून दिलास..”. आजीचे ते बोलणे ऐकून मावशी निशब्द झाली. कारण आजीला घरात यायला सांगून चहा देणारी ती नव्हतीच. तिच्या जागी दुसरेच कोणी तरी होते. आजीला तिने या बाबत काहीच सांगितले नाही. मी जरा विसरले असे सांगून तिने वेळ मारून नेली. आता घडत असलेल्या गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या म्हणून तिने काकांना सांगून बाहेर चौकशी करायला सांगितली. तेव्हा कळले की ती ज्या रूम मध्ये राहत होती तिघे घर मालकाच्या तरुण मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आणि त्या आत्महत्येचे कारण कोणालाही माहित नव्हते. या खोलीत कोणताही भाडेकरू ३ महिन्या पेक्षा जास्त राहत नाही पण ते तब्बल ६ महिने तिथे राहिले होते. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पुढच्या काही दिवसात ती रूम रिकामी केली आणि दुसरी कडे राहायला गेले.  

अनुभव क्रमांक ३ – ऋतुराज

ही घटना माझ्या जवळच्या व्यक्ती सोबत घडली होती. त्यांच्या कुटुंबात ३ जण होते, आई, बाबा आणि त्यांचा नुकताच नोकरी ला लागलेला मुलगा. ते राहत होते त्या शहरात त्यांचे घर होते पण ते स्टेशन पासून बरेच आतल्या भागात होते. जेव्हा त्यांचा मुलगा जॉब साठी ट्रेन ने प्रवास करू लागला तेव्हा घरापासून स्टेशन पर्यंत जायला एकही वाहन मिळायचे नाही. म्हणून त्यांनी शहराच्या पूर्वेला स्टेशन पासून अगदी जवळ एखादी रूम भाड्यावर मिळतेय का ते पाहायला सुरुवात केली. बरीच विचारपूस केल्या नंतर त्यांना रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर एका बिल्डिंग मध्ये फ्लॅट रिकामा मिळाला. फ्लॅट चा मालक दुसरीकडे राहायला गेला होता आणि विचारपूस केल्यावर कळले की तो फ्लॅट काही वर्षांपासून बंद च आहे. त्यात भाडे ही अगदी शुल्लक होते. त्यांनी जास्त विचार न करता तो फ्लॅट भाड्यावर घेतला आणि तिथे राहायला गेले.

परिसर तसा छान होता. आजुबाजुला इतर बिल्डिंग होत्या. त्या बिल्डिंग च्याच दोन्ही विंग मागच्या बाजूला होत्या. तिथेच पार्किंग साठी थोडी जाग होती आणि नंतर त्या बिल्डिंग ची भिंत म्हणजे कंपाऊंड ची भिंत होती. एक गोष्ट फक्त वेगळी होती. त्यांचे दार उघडले की समोर एक मोठे पिंपळाचे झाड होते. ते राहायला येऊन ३-४ दिवस झाले होते. सुरुवातीला सगळे काही सुरळीत वाटले पण नंतर खरा प्रकार घडायला हळु हळु सुरुवात झाली. त्या दिवशी आई ला एक विचित्र स्वप्न पडले. ती त्या फ्लॅट च्याच दारात उभी आहे आणि समोर च्याच झाडाखाली एक व्यक्ती उभा आहे. तो कोण आहे ते मात्र तिला दिसले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने निव्वळ स्वप्न असेल असा विचार करून दुर्लक्ष केलं. पण नंतर रोज रात्री तिला अशीच स्वप्न पडू लागली. नेहमी ती दरात उभी असायची आणि समोरच्या झाडाखाली एक व्यक्ती उभी दिसायची. जस जसे दिवस सरत होते तसे तिला जाणवले की स्वप्नात का होईना पण ती व्यक्ती हळु हळू आपल्या घराजवळ कदाचित माझ्या जवळ येतेय.

एके रात्री तिला जे वाटत होते ते खरे ठरले. त्या रात्री ती अतिशय गाढ झोपली होती आणि तिला पुन्हा तेच स्वप्न पडायला सुरुवात झाली. पण एक गोष्ट वेगळी होती आणि तितकीच भयानक होती. या वेळेस ती बेड वर झोपली होती आणि ती व्यक्ती तिच्या खोलीत उभी होती. ती त्याचा चेहरा पाहण्याचा खूप प्रयत्न करत होती पण ते शक्य होत नव्हते. काही वेळा नंतर तिने प्रयत्न करायचा सोडून दिला आणि तिला गाढ झोप लागली. अशी स्वप्न पडत असली तरी तिने घरी काहीच सांगितले नव्हते. पण त्या रात्री स्वप्नात जे घडले त्या नंतर मात्र तिने घरी सगळे सांगितले. त्या रात्री ती व्यक्ती येऊन तिचा गळा दाबत होती. सकाळी उठली तेव्हा तिला जाणवले की तो प्रकार तिच्या स्वप्ना पुरता मर्यादित नव्हता कारण तिच्या गळ्यावर बोटांचे ठसे जाणवत होते. तिने या स्वप्नाबद्दल घरी सांगितले आणि तिला जे कळले त्यामुळे ती अजून घाबरली. तिच्या सारखीच स्वप्न तिच्या नवऱ्याला आणि मुलाला ही पडत होती. 

पूढच्या काही दिवसात त्यांनी तो फ्लॅट सोडला. जेमतेम महिना भर ते तिथे कसे बसे राहिले. पण जाताना त्यांनी सगळी कडे चौकशी केली. त्या बिल्डिंग च्याच बाजूला एक जुनी चाळ आहे. तिथल्या एका तरुण मुलाने कर्जाला कंटाळून गळफास घेतला होता. आणि तो गळफास त्याने त्या फ्लॅट समोरच्या झाडाला लटकून घेतला होता. तो फ्लॅट असण्याचे, तो घर मालक दुसरी कडे जाऊन राहत असल्याचे हेच एक विचित्र कारण होते.

Leave a Reply