सुन्न,एकाकी रात्र.साधी सुधी नाही बरं का, पावसाळ्याची रात्र.ढग सगळे भरून आलेले,कधीही कोसळेल पाऊस असेच वाटत होते.खोलीतला पंखा आपलं वारा द्यायचं काम करत होता पण तो वारा थंडीमुळे असह्य होतं होता.पंखा बंद करायला जायची खरं सांगायचं झालं तर हिंमत होत न्हवती.डोक्यात घोळत होतं.ती बाई,भसाड्या आवाजातली बाई,का ओरडत असेल आम्हाला?लॉकडाऊन म्हणून गच्चीवर खेळायला जातो तर तब्बल दहा दिवस ओरडतेय ती आम्हाला.आता काय पावसात जायचं खेळायला?
तसं यात काही नवल न्हवतं.
पण माझं आपलं भलतंच काही तरी खुळ डोक्यात आलं होतं.
त्यामुळेच मी झोपू शकत नव्हते आणि उठून पंखा तर अजिबातच बंद करू शकत नव्हते. शेवटी हिंमत करून उठलेच आणि दाणकन पुन्हा बेडवर आपटले.
समोर रक्त गोठवणारं दृश्य होतं. सिलिंगचा फॅन अर्धवट लटकत होता आणि माझ्या शरीरावर काहीतरी ओंगळवाणं,लिबलिबित काहीतरी पडलं होतं.मी हलू सुद्धा शकत नव्हते.
मी कसाबसा मोबाईल हातात घेतला आणि टॉर्च सुरू केला तर माझ्या अंगावर लोड पडला होता,फॅन व्यवस्थित त्याच्या जागेवरच होता पण का कसं माहीत नाही तो बंद झाला होता.
रात्रभर वरच्या फ्लॅटमधून धप,धप असे आवाज येत होते.त्यामुळेच झोप चाळवली गेली होती.
सकाळी उशिराच उठले.डोकं जड झालं होतं.
सकाळी वर पंख्याकडे पाहिलं तर माझी बोबडीच वळली. तिथे काहीतरी द्रव लागले होते.ओलेच होते ते अजून.मी जास्त विचार न करता तडक सगळं आवरलं आणि गच्चीवर गेले.
आत्ता दिवसा काही सापडणं अशक्य होतं.मी थोडीशी काय ती पहाणी केली.
आमच्या गच्चीवर एक खोली आहे.कधी अनाधी काळापासून बंद.तिथे बघू काही मिळतंय का या आशेने मी तिथे गेले.काही फोटोज काढले,वेगळे काही मिळाले नाही. पण का ते माहीत नाही पण त्या खोलीबद्दल मला एक वेगळे आकर्षण होते.
इनमिन दोन कपाटं, एक खिडकी आणि एक दरवाजा ज्यातून मी आत आले एवढेच काय ते आत आणि भरीला सगळी अडगळ.
मी सगळी गच्ची फिरले.ती बाई गच्चीवर येऊन गुपचूप माझे काय उद्योग चालू आहेत हे पहात होती.
मी बाहेर आल्या आल्याच ती मला दिसली.
ती माझ्याकडे खुनशी चेहऱ्याने पहात होती.
ती काहीतरी पुटपुटली आणि मला म्हणाली,
‘काल रात्री फक्त झलक दाखवलीये आता पुन्हा अजून काही चोंबडेपणा करशील तर या जगातून उठवीन मी तुला.’असच काहीसं बरळली आणि निघून गेली.
मी त्या खोलीचे फोटो पहात बसले होते.तसं काही खास न्हवतं पण मी त्या फोटोजमुळे समोहित झाले होते आणि ते फोटो मला त्या खोलीकडे खेचत होते.त्या खोलीत दिवसाही अंधार असायचा.
खरं तर या खोलीत आमच्या सोसायटीचं पहिलं ऑफिस होतं.पण नंतर ही खोली म्हणजे अडगळीचे धन होती.
माझं पूर्ण दिवस घरात लक्ष न्हवतं.मी त्या फोटोत असं काही पाहिलं होतं की मला तिथे गेल्यावाचून राहवत न्हवतं. दिसायला खोली साधीच होती पण फोटोतून ती खूप काही मला सांगून गेली होती.
तिथे अनेक शक्ती वास करत होत्या,त्या फोटोजमध्ये मला काहीतरी काळं पांढरं धुरकट दिसत होतं.चेहरे होते,अवयव होते की अजून काही माहीत नाही.तिथे गेल्यावर सकाळी मला जळक्या मांसाचा वास आला होता.
मी त्या फोटोत कपाटाखाली जाणारं एक भुयार पाहिलं होतं.
मला आता त्याची उत्सुकता लागली होती.
मला आठवतंय माझा भाऊ म्हणाला होता की आपली सोसायटी तयार होण्यापूर्वी इथे एक स्मशान होतं.
मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती. ती कदाचित त्या भुयारात जाऊन मिळणार होती.
आज त्या बाई कुठेतरी गेल्या होत्या आणि त्याचाच फायदा घेऊन मी त्यांच्या घरात शिरले.घरात आल्या आल्या माझ्या नाकात तोच वास शिरला.मी माझा फोन हातात घेतला आणि पटापट फोटो काढू लागला.सध्या मला कोणत्यातरी पॅरानॉर्मल सोसायटी ची सदस्य असल्याचं वाटत होतं.
घर पूर्ण नकारात्मक ऊर्जेने भरलं होतं. सगळीकडे अंधारच अंधार होता. आतल्या खोलीतून मला गुरगुरल्याचा आवाज येत होता. मी आत गेले. तसं तर आत काहीही न्हवतं पण माझ्या फोनने खूप काही टिपलं होतं.
मी पुन्हा घरी आले.रात्र झाली होती.मी झोपले होते. तशी झोप लागतच न्हवती.आता वरून पुन्हा धप,धप आवाज सुरू झाला होता.
मी माझा फोन बघितला.घोस्ट डिटेक्टरवर मला खूप काही सापडलं होतं. ते घर दुष्ट शक्तींनी भरलं होतं. त्या खोलीत तेच होतं जे त्या रात्री माझ्या अंगावर पडलं होतं.डोळ्यात अंगार,लिबलिबित शरीराचं धूड,त्याला डोकं नाहीच पण तरीही त्याच गुरगुरणं.
अगदीच अनाकलनीय……
ही बाई नक्की करतेय तरी काय?हे मला जाणून घ्यायचं होतं. खरं तर माझ्यातलं सगळं अवसानचं गळून पडलेलं.
कदाचित याची त्या बाईला कुणकुण लागली होती की काय माहीत नाही पण तो धप,धप आवाज आता जोरात यायला लागला होता.
कदाचित ते धूड आमच्या घरात आता शिरकाव करेल असच वाटत होतं.
रात्रभर तो धप,धूप,टेबल सरकवल्याचा,उड्या मारल्याचे आवाज येतच राहिले.
सकाळी निरिच्छेनेच उठले.रात्रभर जागरण झालं होतं.तो रात्रीचा प्रसंग आठवून अजूनही अंगावर काटा येत होता.
‘रात्री मी फोटो बघता बघताच झोपले.कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. कदाचित तो आवाज पागोळ्यांतून पडणाऱ्या पाण्याचा होता.डोळे किलकिले करून खोलीभर नजर फिरवली.आवाज स्वयंपाक घरातून येत होता. माझी हिंमत न्हवती पण मी स्वयंपाक घरात गेले.माझी बोबडी वळली. तिथे ती बाई उभी होती.काहीतरी करत होती.आई-बाबा का उठत न्हवते माहीत नाही जणू संपूर्ण जग काही काळासाठी थांबून गेलं होतं.आतून भांड्यांचा आवाज येत होता. मी धीर करून आत पाऊल ठेवले.त्या बाईची नजर माझ्याकडे गेली.ती इथे कशी आली होती माहीत नाही.पण समोरचं दृश्य भयानक होतं. सगळीकडे कणकेचा खच पडलेला होता.दिवा बंद होता.लाईट गेले होते की नाही माहित नाही पण देवघरातला दिवा सुद्धा बंदच होता.तेलाचा दिवा विजलेला होता.फोनच्या प्रकाशात ती बाई आणि तिने चालवलेले उद्योग मला दिसत होते.
ओट्यावर एका परातीत तिने कणिक मळलेली होती.
ती पाठमोरी होती त्यामुळे चेहरा काहीसा दिसत न्हवता.
मी तिच्या जवळ गेले.तिच्या हाताला काहीतरी लागलेले होते.ते नीटसे दिसत न्हवते पण ओट्यावरून खाली काहीतरी टपकत होते.जाडसर,ओला असा तो काळपट द्रव होता.ती बाई त्या कणकेची बहुदा बाहुली
बनवत असावी.मी माझ्या खोलीत पळून आले. अजून काही बघितलं असतं तर माझा नक्कीच निकाल लागला असता.’
त्यानंतर रात्रभर मी जागी राहिले.आता अंगाशी येण्याआधी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे हे मनाशी पक्कं केलं होतं.
सगळं एकटीनेच करणं भाग होतं.
मनाचा हिय्या केला आणि पुन्हा मी सकाळी त्या खोलीत आले.कुणालाही काही कळू न देणं हे माझ्या हिताचं होतं.
त्या खोलीचं दार सताड उघडच होतं. खोली साफ वाटत होती.
पण ही खोली कुणीही साफ करत नाही मग ही खोली साफ कशी?माझ्या मनात प्रश्न डोकावला.
मी कपाट उघडलं.त्यात बरीच कागदपत्रं होती.बरीचशी कुरतडलेली होती.अजून काहीच हाती लागलं न्हवतं.मी घोस्ट डिटेक्टर सुरू केलं.दिवसा खूप अडचणी येत होत्या.काहीतरी सिग्नल मिळत होते. अचानक बऱ्याच कावळ्यांचा कोलाहल ऐकू आला. एकदम सगळं अंधारल्यासारखं झालं.कुबट वास खोलीत भरलेला तो अजून वाढला.पावसाचे दिवस असल्याने सगळं चीक चीक झालं होतं.
मला ती कणकेची बाहुली त्या खोलीत सापडली ती सुद्धा अर्धवट खाल्लेली,कुरतडलेली होती.
मला आता चक्कर यायला लागली होती.
ती बाई छद्मी हसल्याचा आवाज मला आला.
बाहेर अचानक दिवसाची रात्र झाली होती.ढग दाटून आले होते. ती बाई बाहेर उभी होती. ते भुयार आता मला स्पष्ट दिसत होतं.ते कपाटाच्या खाली होते पण ते भुयार नक्की कुठे जाते आणि त्याचा माझा आणि त्या बाईचा संबंध काय हे कळत नव्हतं.
मी त्या खोलीच्या बाहेर आले.ती बाई तिथे न्हवती.
मी सुटकेचा निश्वास टाकला.
पण आता श्वास गुदमरायची पाळी माझी होती.समोर ते धूड उभं ठाकलं होतं. कदाचित त्या बाईने त्या पिशाच्चाला वश केलं होतं.
आता काहीच सुचत न्हवतं.मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरवात केली.ते धूड चवताळलं.
माझी शक्ती कमी पडत होती हे माहीत होतं पण आता इलाज न्हवता.मी त्या बाईला ढकलून सरळ घरी निघून आले.
मला धाप लागली होती.घरी आई-बाबा होते.त्यांना यातलं काहीही माहीत न्हवतं.
दिवसभर माझं लक्ष कशातच लागत न्हवतं.रात्री मी फोन काढला आणि खोलीचे आज काढलेले फोटो पाहिले.खोली आधीपेक्षा अधिक भयाण दिसत होती. पावसामुळे ओल आलेली,जळमटे, अडगळ,धूळ माती.अगदी जाड च्या जाड थर साठला होता धुळीचा.
फोटोत खोलीत अगदी गर्दी दिसत होती.कदाचित अतृप्त असावेत.
माझ्या अंगात कापरं भरलं होतं. बाहेर सगळीकडे पावसाळी धुकं पसरलं होतं.गार वारा अंगाला बोचत होता पण त्याही पेक्षा जास्त बोचत होती ती भीती!
एक अनामिक हुरहूर,अनभिज्ञ काहूर.
रात्रीची आता भीती वाटू लागली होती. हा खर नक्की थांबणार तरी कधी?आणि काय साध्य करायचंय त्या बाईला तेच कळत नव्हतं.
मला तिथे काही पानं सापडली होती.
ती आता वाचायचा प्रयत्न करायचा होता. कदाचित काहीतरी उत्तर मिळालं असतं.
आता तो आवाज येत न्हवता. सगळं काही शांत होतं. सगळं जग निद्रिस्त होतं.जाग होती ती फक्त मला आणि त्या शैतानाला!
अचानक मला गुरगुरल्याचा आवाज ऐकू आला.’वेळ आली’असं मनात म्हंटलं.
तो आवाज आई-बाबांच्या खोलीतून येत होता. मी दरवाज्याला कान लावला.तो आता अधिक स्पष्ट येत होता.मी दरवाज्याच्या फटीतून खाली वाकून बघीतलं.
मला दोन चमकणारे आग ओकणारे डोळे दिसले जे माझ्याकडेच बघत होते.मी तडक माझ्या बेडवर आले.
मला कशाचेच भान न्हवते.मी घामाने डबडबले होते.
आता मनाशी ठरवलं होतं सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच म्हणून.
काही कळायच्या आधीच माझी शुद्ध हरपली.
सकाळी बाराच्या सुमारास मी उठले.आई-बाबांना काही कळायचा प्रश्न न्हवताच. आज खूप थकल्यासारखं जाणवत होतं.काही कळत नव्हतं. थोड्यावेळासाठी मी सगळं काही विसरले होते.जणू मी एकटी एकांतवासात अगदी रमले आहे पण पुढच्याच क्षणी मला भीषण सत्याची जाणीव झाली.
रात्री काय झाले हे मला लख्ख आठवले.
मी आजसुद्धा घरी सगळं निरिच्छेनेच करत होते.
मला त्या खोलीत जायचे होते. ती खोली मला स्वतःकडे खेचत होती.आज जरा त्यातल्यात्यात ऊन होतं त्यामुळे जरा प्रसन्न वाटत होतं.
मी त्या खोलीत गेले.कुणीतरी मला बोलावून घेतलं होतं. ती मला काल मिळालेली पाने माझ्याबरोबरच होती.
त्या पानांमुळे मला भयाण सत्याची जाणीव झाली होती.
काल रात्री सगळं घडण्याआधी मी त्या पानांचा अर्थ लावला होता.
त्यावर काहीतरी लिहिलेले होते.स्पष्ट नाही पण भयानक होते जे काही होते ते.त्यावर काही अक्षरं होती.
‘मला बळी हवाय आणि तू तो मला मिळवून द्यायचा आहेस.तुला स्वप्नात येऊन मी सगळं काही सांगेन.ही सोसायटी माझ्या जागेवर बांधली आहे.इथे या सोसायटीच्या खाली आधी स्मशान होते आणि ती माझी जागा होती.मला याच स्मशानात गाडले गेले.तेव्हा ही सोसायटी न्हवती.पण कित्येक काळ इथे राहून मी या स्मशानाचे रक्षण करत होतो.आता मी या सोसायटीला नाहीसं करणार.करणी करणार……करणी.’
असंचं काहीसं लिहिलेलं होतं.
ते माझ्या फोनमधला पिशाच्चाचा फोटो,तिथे त्या खोलीत त्या पिशाच्चाच्या पायाच्या उलट्या खुणा होत्या.पण ते पाय जनावरासारखे वाटतं होते.तिथे त्या खुणांमध्ये रक्त मिसळले होते.
मी खोलीत प्रवेश केला होता.ते कपाट आतून कुणी जोरजोरात हलवावे तसेच हलत होते.पण आता ही करणी ती बाई का करतेय हे कळत नव्हतं कारण ती पानं खूप जुनी वाटत होती. पिवळी पडली होती ती आणि बऱ्याच प्रमाणात वाळवीची शिकार सुद्धा झाली होती.
मी त्या कपाटाकडे गेले.
त्या कपाटाचे दार उघडे होते.कुणीतरी मला काही कळण्याआधीच मला त्या कपाटात खेचून घेतले.ते कपाट न्हवतंच खंडर होतं. मला तिथे अस्पष्ट असा कुणाच्यातरी कुजबुण्याचा आवाज येत होता.
मी कान देऊन ऐकत राहिले.फोन घेतला आणि माझी बोबडीच वळली.प्रत्यक्ष एक आत्मा माझ्याशी बोलत होता. आवाज थोडा ओळखीचा वाटत होता.
जरा लक्षपूर्वक ऐकल्यावर मला कळलं तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून चार वर्षांपूर्वी मरण पावलेल्या माझ्याच आजीचा होता.
ती मलाच सांगत होती.
‘हे बघ साक्षी,आता त्या बाईचा बाहेर तांडव सुरू आहे. तो राक्षस पण तिथेच आहे.म्हणून मी तुला आत ओढले.त्या बाईची सासू करणी करायची.तिला अख्या सोसायटीला संपवायचे होते.का माहीत नाही पण त्या करणीचा जास्त मोठा प्रभाव आपल्या घरावर झाला.
तो शैतान आता तुझ्या जीवावर उठवलाय त्या बाईने.
ही तिची सून ती पण तिच्यासारखीच.तिची सासू गेली,पण मरतांना सुनेला सांगून गेली आणि करणीचा मंत्र देऊन गेली.मेल्यावर सुद्धा अशीच बसलीये सोसायटीच्या मानगुटीवर!’
मी हे सगळं आवक होऊन ऐकत होते.
अचानक मी त्या भुयारात गेले.म्हणजे कदाचित माझ्या आजीनेच मला तिथे पाठवलं.त्या भुयारातून तीन रस्ते जात होते.एक सरळ आमच्या घराकडे,एक त्या बाईच्या घराकडे आणि एक खंडरमध्ये.
आमच्या मागच्या बाजूला एक बंद घर होतं एका खोलीचं. विटांनी बांधलेलं होतं.बंदच होतं. बऱ्यापैकी जीर्ण झालेलं होतं. पत्र्यावरची ताडपत्री झिजून तिथे छोटी छोटी झाडं उगवलेली होती.काही विटा पडल्या होत्या.तिसरा मार्ग तिथेच त्या बंद घरात जात होता.
खरं तर आतून अजून मी ते घर पाहिलेलं न्हवतं. आज पहिल्यांदाचं पहात होते.
तिथे सगळं विचित्र समान पडलेलं,अर्धवट कुजका देह पडलेला,सुकलेलं रक्त पडलेलं.अर्थात तिथे बळी दिला गेलेला होता आणि बळी माझ्या मानलेल्या भावाचा होता जो आमच्याच शेजारी रहात होता.
समोर एक भग्न,अक्राळविक्राळ,उग्र मूर्ती होती.मी तिथे आले.तो राक्षस तिथेच होता.मला काहीच समजत न्हवते.त्या राक्षसाला रक्त हवे होते. तो आता माझ्या दिशेने येत होता त्याचं कापलेलं मुंडक त्याच्याच हातात घेऊन.त्याची जीभ रसरसत होती माझ्या नरडीचा घोट घेण्यासाठी.
मला प्रश्न पडला होता जर आजी मला सावध करत होती तर तिनेच मला या नरकात का ढकलले?
तेवढ्यात एक म्हातारी बाई तिथे प्रकट झाली. तिने माझ्या आजीचे घेतलेले रूप क्षणात पालटवले आणि विक्षिप्त,छद्मी हसू लागली.ती बाई सुद्धा तिथे आली होती.आता मला मार्ग कोणताच सापडत नव्हता. मी देवाचा धावा करत डोळे घट्ट मिटून घेतले.पुढे काय होतंय हे पहाण्यासाठी. मरण निश्चित होतं.
आता माझ्या शरीराला उष्णता जाणवत होती. अग्नीच्या ज्वालाचा आवाज येत होता.मी डोळे उघडले.ती बाई,ती म्हातारी समोर बळीची तयारी करत होत्या.दोघींच्या चेहऱ्यावर हसू होते,समाधान होते.खुनशी समाधान!
मी पुन्हा डोळे मिटले ते कदाचित न उघडण्यासाठीच……
मी डोळे किलकिले करून पाहू लागले मी सुरक्षित होते पण माझ्या समोर त्या बाईचाच छिन्नविच्छिन्न देह पडला होता.तिचे डोळे कुणीतरी काढून घेतले होते.
हात पाय दुसरीकडेच होते.ती म्हातारी बाई गायब झाली होती.समोर रक्ताचा सडा पडला होता.
हे असे उलटे फासे कसे उलटले ते कळायला अजूनही काही मार्ग न्हवता.
समोरचा अग्नी कुंड विजला होता.समोरची मूर्ती सुद्धा नाहीशी झाली होती.
मी आजूबाजूला बघत होते.काहीच सापडत न्हवते.
या सगळ्यात माझ्या भावाचा नाहक बळी गेला होता.
मी दुःखी अंतःकरणाने बाहेर पडायचा मार्ग शोधत होते. ते धूड सुद्धा कुठे दिसत न्हवते.
मी मार्ग शोधायला जाणार इतक्यात समोरून एक प्रकाशझोत आला आणि ते धूड प्रकट झाले.
माझ्या पोटात आता गोळा आला होता.
एकदा वाचले पण आता काय?नक्की काय चाललंय तेच कळत नव्हतं.
ते धूड माझ्या पुढ्यात ठाकले होते.
पण ते काहीच हालचाल करत न्हवते.त्याच्या डोळ्यात अंगार न्हवता.
त्याचं शरीर अर्ध माणसाचं होतं,त्वचा शरीरावर लोंबकळत होती.काहीतरी आवाज येत होता.
ते जे काही होतं ते शांत होतं. मी जराशी पुढे सरसावले.त्या तेजाने माझे डोळे मिटत होते.
माझ्या समोर एक तेजस्वी पुरुष उभा होता. पण त्याला डोकं न्हवतं.मी फोनमधून फोटो काढला तर तो तोच होता.तेच ते धूड लिबलिबित.
पण प्रत्यक्ष तो वेगळाच दिसत होता.
माझी भीती आता बरीचशी कमी झाली होती आणि मी धाडसाने पुढे आली होती.
त्या खोलीचं रूपांतर आता एका प्रशस्त खोलीत झालं होतं.
तो आता बोलू लागला होता.त्याचं शीर त्याच्या हातात होतं.
‘मीच सोडवलं तुला त्या हडळींच्या तावडीतून.मी त्यांच्यासमोर पिशाच्चाचं रूप घेऊन तुला घाबरवत राहिलो.पण त्या हडळींना अख्या सोसायटीचा नाश करायचा होता.ती पत्र,ते विधी सगळी त्यांचीच चाल होती.
‘या सगळ्याची सुरवात त्या रात्रीपासून झाली.
त्या विधी करत होत्या.चित्रविचित्र मंत्र म्हणत होत्या.
मी या सोसायटीचा रक्षक आहे.सोसायटीच्या रक्षणासाठी मला पिशाच्चाचं रूप घ्यावं लागलं.
त्या हडळी आपल्या या सोसायटीवर करणी करत होत्या.
मी पिशाच्च रुपात त्यांच्यासमोर प्रकट झालो आणि त्यांना वाटलं की पिशाच्च त्यांना वश झालंय.
त्याच भरात त्यांनी एका लहान निष्पाप मुलाचा माझ्याकर्वे बळी घेतला आणि आता या माझ्या हातून झालेल्या पापमुळे मी वर्षोनवर्षं इथे या मृत्यूलोकांत खितपत पडणार.’
मला वाईट वाटत होतं.तो पुरुष पुन्हा त्याच्या पिशाच्च रुपात प्रकट झाला.
सोसायटी वाचली होती पण त्या निष्पाप मुलाचा बळी गेला होता.मी इतकावेळ एका खंडरमध्येच अडकले होते याचे मला भानही न्हवते.
ते पिशाच्च आता माझे गुलाम झाले होते.
बाहेर भयंकर पाऊस पडत होता.कदाचित तोही सोसायटीत कुणाच्याही नकळत झालेल्या कहराला साफ करण्यासाठी बरसत होता.
समोरच्या काकू आकांतांडव करत होत्या.त्यांनी त्यांचा मुलगा गमावला होता.अर्थात हे कसं झालं या पासून त्याही अनभिज्ञ होत्या.
आता उर बडवून घेण्यावाचून काहीही करू शकत न्हवत्या.
ते पिशाच्च आता अदृश्य झाले होते.
वातावरण आता जरा प्रसन्न वाटत होते.
मी अचानक त्या खोलीत परत आले. त्या खोलीतली ती अडगळ तशीच होती जशी ती आधी होती.
ते भुयार आता कायमस्वरूपी नाहीसे झाले होते. ती पत्र,पानं जळून खाक झाली होती.
सगळ शांत झालं होतं.मी काही वेळ तशीच त्या खोलीत बसून राहिले.मला आजीची प्रकर्षाने आठवण येत होती.त्या बायकांच्या करणीमुळेच तिचाही बळी गेला होता.गच्ची आता दडपणातून मुक्त झाली होती.
मी गंम्मत म्हणून आता स्वतःचा फोटो काढला.
त्या फोटोतून ती बाई छद्मी हसत होती.