प्रसंग सांगली जिल्ह्यातील एका गावात बऱ्याच वर्षांपूर्वी घडला होता. ते गाव म्हणजे विविधतेने नटलेले, डोंगर रंगाच्या सानिध्यामध्ये वसलेले एक छोटेसे गाव.. माडाची , आंब्याची, जांभळी ची आणि करवंदाची अश्या अनेक प्रकारच्या झाडांनी ते गाव व्यापले होते.. हिरवळीचा परिसर असल्याने वातावरण नेहमी अगदी आल्हादायक असायचे. काळ होता २००३-२००४ सालचा. सगळ काही सुरळीत चाललं होत. पण एक जागा होती त्या गावात. ओढ्या जवळची.. तिथे काही विचित्र घटना घडायच्या ज्या बद्दल खूप गूढ निर्माण झाले होते. त्या ओढ्याजवळ खूप घनदाट झाडी होती.

तिथे नेहमी सगळ्यांची येजा असायची.. म्हणजे बायका कपडे धुवायला ओढ्यावर यायच्या, जवळच्या शेतात गावकरी ये जा करायचे, लहान मूल तिकडच्या जांभळाच्या, चिंचेच्या झाडावरून जांभळे आणि चिंचा पडायला यायचे. सुरुवातीला त्या परिसरात कोणी असल्याची अनामिक चाहूल जाणवायची, एक वेगळाच आवाज ऐकू यायचा पण सगळ्यांना वाटायचे की भास असेल. पण हळू हळू हा प्रकार वाढू लागला. लहान मूल त्या भागात जाऊन आल्यावर तापाने फणफणत आजारी पडायची, उलट्या करायची. लोकांना आता चांगलीच धडकी भरायला सुरुवात झाली होती. कधी कोणी रात्री शेताला पाणी द्यायला गेले की पैंजण चा आवाज ऐकू यायचा. आता भर रात्री ओढ्या जवळ पैंजण घालून कोण फिरेल.? काही कळायला मार्ग नव्हता. घडणाऱ्या प्रकारामुळे गावात चांगलीच हवा झाली होती की ओढ्या जवळ भुताटकी आहे. पण कोणाला काही कळत नव्हते की असे का घडतेय. 

त्या दिवशी असाच एक प्रकार घडला. आमच्या शेजार चा एक व्यक्ती रात्री शेताला पाणी द्यायचा. इतके दिवस त्याला फक्त चाहूल जाणवायची आणि तो दुर्लक्ष करायचा. पण त्या रात्री पाण्याची मोटार सुरू करायला शेताच्या बांधावर गेला आणि अचानक त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज हळु हळु त्याच्या जवळ येत होता. अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते पण आवाज मात्र वाढतच चालला होता. त्याने बॅटरी च्या प्रकाशात आजू बाजूला पाहण्याचा प्रयत्न केला पण कोणीही दिसले नाही. तो घाबरून तसाच ओरडत घराजवळ आला. बाहेर आरडा ओरडा ऐकून आम्ही सगळे घरा बाहेर आलो.

तो आमच्याकडे धावत च घरी आला आणि माझ्या आजोबांना घडलेले सगळे सांगू लागला. आम्ही तेव्हा लहान होतो आणि सगळे ऐकत होतो. आजोबांनी आणि माझा घरच्यांनी त्याला कसे बसे शांत केले. पण या एका प्रसंगाने आम्हा भावंडांच्या मनात कुतूहल निर्माण केले की त्या जागेत नक्की असे काय आहे. कारण आम्हाला ही ओढ्या जवळ न जाण्याची सक्त ताकीद दिली होती. त्या रात्री आम्ही जास्त काही न बोलता गप चूप झोपून गेलो पण दुसऱ्या दिवशी आजोबांकडे हट्ट करू लागलो की त्या काकांना नक्की काय झाले होते, त्यांनी काय पाहिले होते, त्या ओढ्या जवळ भुताटकी आहे असे सगळे का म्हणतात, आम्हाला तिथे का जाऊ देत नाहीत.. आम्ही अगदी प्रश्नाचा भडिमार करायला सुरुवात केली. शेवटी नाईलाजास्तव त्यांनी आम्हाला सगळं उलगडून सांगायला सुरुवात केली. 

१९७० चा काळ असेल. सगळे जण मळ्यामध्ये शेती करायचे, जनावरे पाळायचे आणि आनंदाने राहायचे. सगळी कडे समाधानच वातावरण होत. माझ्या आजीची एक मैत्रीण होती, रत्ना नावाची. एन तरुणपणात च तिचा नवरा गेलेला. तेव्हा तिचे वय २९-३० असेल. ती आणि तिचा सहा वर्षांचा मुलगा दोघच राहायचे. त्यांचं खूप मोठे शेत होते आणि घरातली सगळी कामे करून ती स्वतः शेती करायची. एकटी असून देखील अगदी निर्भिड पणे काम करायची. तिच्या मुलामध्ये तिचा खूप जीव होता.

खूप जपायची त्याला. पण तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचा तिच्या जमिनीवर डोळा होता. ते तिला खूप सतावायचे, त्रास द्यायचे पण ती अगदी खंबीरपणे उभी राहायची, कोणालाही घाबरायची नाही. पण त्या नराधमांनी एक दिवस तिचा काटा काढायचे नक्की केले, तिला कायमचे संपवून तिची जमीन मिळवायची असे ठरवले. नेहमी प्रमाणे आवरून ती ओढ्याकडे असलेल्या तिच्या शेतात गेली. आपल्या मुलाला चिंचेच्या झाडाखाली बसवून हातात खुरपे घेऊन शेतात काम करू लागली. तितक्यात ते चार पाच जण ज्यांची शेत आजुबाजूलाच होती, तिच्या शेतात येऊन जमिनीसाठी वाद घालू लागले.

ती म्हणाली की जमीन माझी आहे, शेती मीच करेन, मी कोणाला का म्हणून देऊ.. हीच जमीन पुढे माझ्या मुलाला कामी येईल. माझ्या हक्काची माझा माणसांची आहे, ती मीच पिकवणार आणि खाणार. त्यांच्यात बराच वेळ वाद सुरू होता. आणि शेवटी तो विकोपाला गेला आणि हाणामारी वर आला. चिंचेच्या झाडाखाली बसलेले तो निरागस मुलगा घडत असलेला प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. बघता बघता तिने हातातले खुरपे उगारले आणि त्या लोकांनी काठ्या उगराल्या. ती एकटी बाई करणार तरी काय..? त्यांनी काठ्यानी तिच्यावर प्रहार करायला सुरुवात केली. तरीही ती विरोध करत होती. तो लहान मुलगा धावत आला आणि त्यांना विनवण्या करू लागला की माझ्या आई ला मारू नका हो.. सोडा तिला. त्यातल्या एकाने जोरात फटका देऊन त्या मुलाला ढकलून दिले पण तरीही उठून तो पुन्हा आपल्या आई ला वाचवायचा प्रयत्न करत राहिला.

तिला बरीच मारहाण केली ती रडत होती, ओरडत होती, मदतीसाठी हाका मारत होती पण कोणीही तिच्या मदतीला आले नाही. शेवटी मोठ्या दगडाने ठेचून तिला आणि तिच्या निरागस मुलाला त्या नराधमांनी जिवानिशी संपवले. नंतर बैलगाडीतून नेऊन पोत्यात भरून एका विहिरीत टाकून दिले. पोलीस केस झाली, त्यातला दोघांना फाशी ची शिक्षा झाली आणि बाकीचे निर्दोष सुटले.

रत्ना आणि तिच्या मुलाचा जिथे मृत्यू झाला, जिथे त्यांना हाल करून मारून टाकले ती जागा, ते शेत ओढ्याच्या अगदी जवळ होते. गावातल्या खूप कमी जणांना ही गोष्ट माहीत आहे की त्या जागेत अजूनही त्यांचा आत्मा अडकून पडलाय. ती जागा कोण्या नवीन व्यक्तीने विकत घेतली की असे प्रकार घडायला सुरुवात होते. बऱ्याच गावकऱ्यांना त्या ओढ्या जवळच्या परिसरात खूप चित्र विचित्र आणि भयानक अनुभव आले आहेत. अस म्हणतात की अगदी आजही रात्री अप रात्री त्यांच्या रडण्याचे, वेदनेने व्हीवळण्याचे आवाज ऐकू येतात. कधी कधी ती आपल्या मुलाला कडेवर घेऊन ओढ्या जवळ उभी दिसते. 

Leave a Reply