लेखक – पंकज उबाळे

गोष्ट आहे मामाच्या गावाची…बराच लहान होतो..आणि मामाच गावी जायचं म्हंटल की आनंदाची सीमा नसायची..सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं…जिथे गोदावरी आपली वाटचालीस सुरुवात करते..सुंदर डोंगराच्या मुखातून आपला प्रवास चालू करते आणि आणि शेकडो सजीवांना जीवन प्रणाली देते…तेच माझ्या मामाच नाशिक जिल्ह्यातील गाव… कल्याण वरून नाशिक कडे निघालो.. ड्रायव्हर ने तंबाखू तोंडात टाकत आपल्या लाल परीचा ताबा घेतला…आणि कंडक्टर काका बसच्या खांबाला चिकटून तिकीट काढू लागले….सकाळची सूर्याची किरणे वातावरण प्रसन्न करत होती… माझे डोळे तर वर खाली होणाऱ्या वायरिंवर टिकून होते… बस ने सह्याद्रीच्या कुशीत प्रवेश घेतला झाडे..झुडपे..गाई बैल…आणि गावाकडचा परिसर बघून मनाला वेगळाच आनंद झाला होता…गावाला पोहचलो..मला काय अविस्मरणीय वेगळे बघायला मिळणार आहे..अनुभवायला मिळणार आहे ह्याची मला मुळीच कल्पना नव्हती..तेव्हा माझ्या इवल्याश्या मनात आयुष्यभर घर करून बसणारी घटना होणार होती याची मला कल्पना नव्हती….

माझे आजोबा…त्यांचं नाव नामदेव..पण सार गाव त्यांना नाम्या म्हणून हाक मारी…नामदेव बाबा म्हणजे पेहलवान माणूस…सफेद धोतर सफेद कुर्ता..आणि गांधी टोपी…असा त्यांचा पेहराव होता…कुस्तीचे फार मोठे शौकीन पण तेवढेच दिलदार आणि तेवढेच मजेशीर.. पण एक च खटकणारी गोष्ट. दारू आणि मांसाहाराच्या खूप आहारी गेलेले व्यक्ती.. त्या काळात कुठलेही दळण वळणाचे साधन नसल्यामुळे लोक बैलगाडी..किवा Atlas ची काळी सायकल घेऊन प्रवास करायचे…एके दिवशी ते तालुक्याला जायला निघाले…आता तालुक्याला गावातला माणूस चाललाय म्हंटल्यावर आजू बाजूचे सगळे आले आणि बाबाला म्हणायला लागले.. नाम्या माझा कोयता गण्या लोहाराकडे बनवायला टाकलंय तेवढं घेऊन ये…कोणी काय तर कोणी काय आणायला सांगत होत…मी कुठे गप्प बसणारा होतो मी सुधा त्यांना सांगितलं बाबा येताना मला आणि ताईला गोडी शेव घेऊन या…गोड हास्य करत त्यांनी होकारार्थी मान हलवली.. सगळ्यांचं निरोप घेऊन सायकल वर बसले आणि निघाले. पण तो प्रवास त्यांच्यासाठी खूप वेदना दायक होणार होता हे मात्र त्यांना माहीत नव्हत. 

खेळत असतानाच मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहिले. ते मला वेगाने दूर जाताना दिसले आणि हळु हळू माझ्या छोट्याश्या नजरेतून हरवून गेले. तालुक्याला पोहोचल्यावर त्यांनी बाजारात खरेदी केली, गावातल्या लोकांनी सांगितलेल्या काही लोकांचे काम केले. पण अजूनही काही जणांचे काम करायचे बाकी होते. हळू हळू सुरू आपल्या किरणांना पुन्हा बोलवत होता, तसे सूर्यकिरणे पृथ्वीचा निरोप घेऊ लागली. पाखरांचे थवे घराकडे जायला निघाले. पण बाबा मात्र अजुन सगळी कामे पूर्ण करण्यात गुंतले होते. ते परण्यासा ठी घाई करत होते. थोडे दडपण आले होतेच. रात्रीचा प्रवास आणि घाटाचा रस्ता.. सायकलच्या एका बाजूला मटणाची पिशवी आणि दुसऱ्या बाजूला दारूचा ड्रम घेऊन बाबा त्या अंधाराला चिरत निघाले. दिवसा प्रेमात पडणारा तो निसर्ग आता मात्र भयानक रूप घेत होता. भयाण शांतता. झाडांची ऐकू येणारी सळसळ. आजोबांना या सगळ्याची काहीशी सवय होती. प्रवास सुरू होता. आणि घाटाचा रस्ता लागला. ते गाणं गुणगुणत होते. 

कारण कोणी सोबत नसले की गाणं आपला मित्र होत. तितक्यात त्यांना आपला पाठलाग होतोय असे वाटू लागलं. अचानक झाडांची सळसळ ही वाढली. काही तरी विपरीत घडणार आहे अशी शंका मनात डोकावून गेली. बहुतेक त्यांना ज्याची भीती होती तेच झाले. मटणाचा आणि दारू चा वास त्याच्या पर्यंत पोहोचला. त्या भयाण रात्री बाबांनी जणू त्याला निमंत्रण च दिले होते. तितक्यात मागून एक आवाज कानावर पडला “थांब रे.. कुठे चाललास..”. आता मात्र त्यांना घाम फुटला कारण आवाज देणारा एक खाविस होता. त्यांना कळून चुकले की आता याच्या तावडीतून सुटणे फार अवघड आहे. ते काही न बोलता जीव मुठीत धरून पुढे जात राहिले.. तसे मागून पुन्हा आवाज आला “तुला ऐकायला नाही येत का.. आहेस तिथेच थांब..”. त्याच्या तावडीतून सुटण्याचा त्यांचा हा भाबडा प्रयत्न होता. कारण त्यांना ठाऊक होत की आता आपली सुटका नाही. आणि अचानक तो खवीस समोर येऊन उभा राहिला. बलदंड शरीर, अतिशय धिप्पाड आणि अती सामान्य उंचीचा.. हाता पायावर मोठे केस, लालबुंद डोळे आणि चेहऱ्यावर प्रचंड राग. 

तो माझ्याकडे पाहत म्हणाला “तुझी हिम्मत कशी झाली माझ्या वाटते यायची.. आता तुला सोडणार नाही.. ते पिशवी त जे काही आहे ते सगळे दे..”. त्यांना कळून चुकले होते की आपला काळ आणि वेळ दोन्ही आले आहे. याला हे सगळे दिले तरी मारेल आणि नाही दिलं तरीही. पण त्यांनी धीर सोडला नव्हता. त्यांनी बळ एकव टले आणि त्याला प्रत्युत्तर दिले “वाट सोड माझी.. नाही तर तुझा मुडदा इथेच गाडेन..”. असे बोलणे ऐकून त्या खविसाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती बाबांच्या अंगावर धावून गेला. एका हाताने बाबांना उचलून रस्त्याकडे ला फेकून दिले. दगडावर आपटल्या मुळे बाबांच्या पायाचे हाड मोडले. ते वेदनेने कणू लागले. दुसऱ्या बाजूला तो खावीस मटणाचे तुकडे असे खात होता जसे मागील ७ जन्मापासून भुकेला आहे. तितक्यात त्यांना त्यांच्या आई ने सांगितलेली गोष्ट आठवली. खविसाचा जीव त्याच्या शेंडी मध्ये असतो. ती आपल्या हातात आली की तो आपल्या ताब्यात येतो. ते होती नव्हती शक्ती एकवटून उठले, सोबत असलेला कोयता उचलला आणि त्या खाविसाच्या दिशेने चालत जाऊ लागले. पण तितक्यात त्याला बाबांची चाहूल लागली. तसे त्याने पुन्हा एक झेप घेतली आणि आपली धार धरत नखे मानेत घुसवली. पण बाबांनी तो प्रहार सहन करत कोयता त्यांच्या पोटात घातला. 

तसे काळया रंगाचे रक्तसदृष द्रव्य त्याच्या पोटातून बाहेर येऊ लागले. तो वेदनेने व्हीवळला आणि अचानक नजरे समोरून दिसेनासा झाला. बाबा उठले पण त्यांच्या अंगात आता त्राण राहिला नव्हता. पण इतक्यात त्यांची सुटका होणार नव्हती. पायाचे हाड तुटल्यामुळे होणाऱ्या वेदना आणि त्यात नखांचे वार झाल्यामुळे होणारा रक्त स्त्राव त्यांना सहन होत नव्हता. पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद होता. यासाठी की मी खविसाला हरवले य. त्याच्या तावडीतून मी स्वतःला सोडवले. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. अचानक रस्त्याच्या लगतच्या झाडी झुडुपातून एक सळसळ ऐकू आली. कोणी तरी त्यांच्या दिशेने वेगाने धावत येत होत. त्यांनी मागे वळुन पाहिले. तितक्यात त्याने बाबांच्या अंगावर झेप घेतली. एखाद्या चेंडू सोबत खेळावे तसे तो बाबांची धर फेक करू लागला. त्यांच्या सायकलचा तर त्यांनी एका क्षणात चुरा करून टाकला. बाबांनी मात्र आता त्याच्या पासून सुटण्याचे प्रयत्न करायचे सोडून दिले होते. आखाड्या मध्ये भल्याभल्यांना मातीत लोळवणारा नाम्या निस्तेज पडला होता. 

इथे मी माझ्या बाबांची वाट बघता बघता केव्हाचा निद्रेच्या आहारी गेलो होतो. पहाट झाली. माझ्या घरचे मात्र अवस्थ होऊ लागले आणि बाबा घरी आले नव्हते. सुर्य नुकताच आपला डोळ्यांच्या भुवया धर्तीवरच्याच सजीवांना दाखवायला लागला होता. आज्जी म्हणजे त्यांची आई रात्रभर झोपली नव्हती. तिला मनात वाटायचं की तालुक्याला गेलाय तिथेच राहणाऱ्या एका कडे थांबला असेल, रात्र काढली असेल म्हणून एव्हाना आला नसेल. पण काळाने बाबांना कोणत्या दरीत ढकलले आहे हे कोणालाही माहीत नव्हत. मण्या पाटील आपली जानवर घेऊन चरायला निघाला. त्याच माळ घाटाचा पलीकडं. बैलाला शिव्या हासडतं. मण्याला बाबाची सायकल दिसली. ती ही अगदी चुरा झालेल्या अवस्थेत. बाजूला रिकामा दारूचा ड्रम आणि मटणाची काळी पिशवी. मन्या मनात बोलला अर ही सायकल तर नाम्याची हाय…आणि बाजूला विखुरलेल्या अवस्थेत बाबांनी माझ्यासाठी आणलेली गोडी शेव पसरली होती. मन्या बाबांचा शोध घेत होता. बाजूच्या खड्यात बाबांचा देह बेशुद्ध अवस्थेत होता. 

मन्याने जनावर माळावर लावली. बाबाला खांद्यावर टाकलं आणि गावाकडे निघाला. आख्खे गाव गोळा झाले. रडा रड सुरू झाली. मी ही त्या आवाजाने जागा झालो. काल सकाळी गोड हास्य देऊन गेलेले बाबा आज निस्तेज होऊन अंगणात बेशुध्द होते. पण संकट अजुन गेलं नव्हत. डॉक्टर आठवड्याला एकदा गावाला यायचा. काय करावं म्हणून मग खालच्या वाडीचा भगत बोलावला. त्याने सांगितलं की यांचा सामना घाटात खविसाशी झालाय आणि त्यानेच हे असे हाल केलेत. दोन दिवस उलटले, त्यांच्या जखमा हळु हळु भरू लागल्या. काही दिवसात सगळे पूर्ववत झाले. त्यांना असे पाहून मला खरच आनंद झाला होता. पण त्या रुबाबदार देहावर खविसाने केलेल्या घावाच्या खुणा अजूनही आहेत. काही महिन्या नंतर ते पुन्हा तालुक्याला कामानिमित्त गेले. या वेळेस सायकल नव्हती. बैलगाडी घेऊन गेले. माझ्या लहान मनाला भीती वाटत होती त्यांना परत काही होणार तर नाही ना. पण सायंकाळ होत आली तसे माझ्या कानावर बैलगाडी चा आवाज कानावर पडला आणि मी धावत घराबाहेर आलो. 

बैलांच्या पागा सोडल्या आणि माझ्या हातावर एक कागदाची पुडी दिली. म्हणाले लाडाचा नातू हाय तू माझ्या लक्षात आहे तुला काय पाहिजे होत ते… आणि एक स्मित हास्य करून गोठ्यात बैलांना बांधायला गेले.. मी पुडी उघडली आणि त्यात गोडि शेव होती.. तिची चव अजूनही ओठावर तशीच आहे.. .प्रेमाने दिलेली.. आणि संकट झेलून दिलेली गोष्ट कोण विसरणार.. आजोबा आणि नातवाच नात काही वेगळंच असत….मायेनं..प्रेमानं.. भरलेलं.

Leave a Reply