अनुभव क्रमांक – १ – अनिकेत मेस्त्री

अनुभव माझ्या काकांसोबात घडला होता. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा माझे काका एका बँजो पार्टी मध्ये बंजो वाजवायचे. त्यांच्या मित्रांचा ग्रुप होता.. कधी कोणाच्या हळदी ला किंवा लग्नामध्ये बेंजो वाजवण्याची ऑर्डर मिळाली की ते जात असत., अशीच एकेदिवशी माझ्या काकांच्याच गावच्या मित्राच्या लग्नामध्ये बेंजो वाजवण्याची ऑर्डर आली. मित्राचे च लग्न असल्यामुळे बेंजो वाजवून मस्त मग आपण स्वतः ही नाचायच, मजा करायची असा बेत ठरला. ते आणि त्यांचे ४ – ५ मित्र मुंबईहून गावी जायला निघाले. ते एक दिवस आधीच गेले होते. गावी पोहोचल्यावर दिवसभर मस्त गाव फिरून त्यांनी खूप एन्जॉय केले. आणि नंतर त्यांच्या नवऱ्या मित्राला भेटले. मित्रासोबत जुन्या,लहानपणीच्या गोष्टी झाल्या.  

संध्याकाळी हळदी चा कार्यक्रम होता. वेळेत सगळे सुरू झाले. नाचगाणी , बेंजो वाजवणे, हळद लावणे सर्व काही मस्त चाललं होतं. जवळपास दोन अडीच तास वाजवून झाले होते. सगळे नाचून ही बरेच थकले होते. त्यामुळे त्यांनी थोडी विश्रांती घेतली. इतक्यात काका आणि त्यांच्या मित्रांनी कुठेतरी जाऊन मस्त पेग मारुया असा प्लॅन केला. त्यांचे सर्व मित्र यासाठी पटापट तयार झाले. मित्राच्या घरापासून काही अंतरावर एक रस्ता लागतो. त्या ठिकाणी कोणी जात नाही. अगदी गर्द झाडीचा भाग आहे. त्या झाडीच्या भागात रस्त्याला लागून ३ भली मोठी झाडे आहेत. आणि त्याच भागात भुताटकी चे प्रकार चालतात असे गावातल्या लोकांकडून त्यांना कळले होते. 

पण नेमकं तिथे च जाऊन पिण्याचा कार्यक्रम करण्याचं ठरलं. पुढच्या काही मिनिटात सर्व काही सामान बाहेर काढलं दारू ची बाटली, ग्लास, चकण्याला फरसाण. ५ मिनिटात ते त्या झाडीच्या भागात पोहोचले. एकाने बसायला म्हणून पटापट जमिनीवरचा पालापाचोळा बाजूला करून जागा केली आणि सर्व मित्र प्यायला बसले.५-१० मिनिट झाली असतील. तसे त्यांच्यातला एक मित्र उठला आणि लघवी करायला थोडे आतल्या भागात गेला. तो जिथे लघवी करायला उभा होता तिथे समोरच त्याला झाडी मध्ये कसलीशी हालचाल जाणवली. तो निरखून त्या दिशेने पाहू लागला. तो तिथून मागे वळणार तितक्यात माणसाच्या जवळपास दुप्पट उंचीची एक पांढरट आकृती त्याच्या समोर उभी राहिली. तो त्या आकृती कडे पाहतच राहिला. भीतीने त्याची वाचाच बंद झाली होती त्यामुळे त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. इतक्यात डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ती आकृती त्याच्या समोरून नाहीशी झाली.

तो घाबरून मित्रांच्या दिशेने धावतच सुटला. त्यांच्याजवळ येऊन घडलेला प्रसंग सांगू लागला. पण सगळ्यांनी त्याला मस्करीत घेतले आणि त्याची खिल्ली उडवू लागले. त्यातला एक जण म्हणाला “तुला जास्त चढली आहे भावा.. बस इथे.. जास्त टेन्शन घेऊ नकोस.” तरीही तो त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्यातल्या एकानेही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी पुन्हा पिण्याचा कार्यक्रम चालू केला. अवघे २-३ मिनिट झाले असतील. तितक्यात त्यांना समोरच्या झाडामागे असलेल्या झुडुपात कसला तरी आवाज आला. सगळ्यांनी त्या दिशेने पहिले आणि आत एक वेगळीच सळसळ जाणवली. अंधार असल्यामुळे नीट काही दिसत नव्हते. पण ती सळसळ हळु हळु झाडीतून सरकत झाडावर जाणवू लागली. तसे त्या सर्वांनी आपली नजर झाडावर फिरवली. वरचे भयाण दृश्य पाहून त्यांची एका क्षणात उतरली. कारण त्या मित्राने वर्णन केलेली ती पांढरट आकृती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सर्र सर्र करत सरपटत जात होती. 

माझ्या काकाला तर कळतच नव्हते की आपण हे काय पाहतोय. ते सगळे धडपडत उठले आणि तिथून पळ काढला. काका सर्वांना धावतच सांगू लागला की मागे वळून पाहू नका. मागून खूप किळसवाणा आवाज कानावर पडत होता. ते सगळे अगदी जिवाच्या आकांताने पळत होते. त्यांच्यातल्या एका मित्राने मात्र हिम्मत करून मागे वळून पाहिले. तीच आकृती पाठलाग करत होती. त्यांच्या वेगा पेक्षा अतिशय जोरात ती त्यांच्या दिशेने पुढे सरकत होती. धावत नव्हती पण तरंगत येत होती. तो मित्र ओरडतच म्हणाला “धावण्याचा वेग वाढवा, ते जे काही आहे ते आपल्या पाठलाग करतेय..” ते सर्व जण त्या ठिकाणापासून बऱ्याच लांब आले आणि मागून एक किळसवाणा आवाज पुन्हा कानावर पडला. ते जे काही होत त्याची हद्द संपली असावी बहुतेक. 

ते सगळे धापा टाकत च हळदीच्या मंडपात आले आणि घडलेला सगळा प्रकार कथित केला. त्यावर त्यांचा मित्र त्यांच्यावर चिडतच म्हणाला “तुम्हाला कोणी सांगितलं होतं तिथे जाऊन प्यायला.. संध्याकाळ नंतर तिथे कोणीही जात नाही.. गावातील बऱ्याच लोकांना तिथे असे अनुभव आले आहेत..”. सगळ्या कार्य क्रमाचा बट्या बोळ झाला. आम्ही सरळ आमच्या खोलीवर गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा ज्या मित्राने मागे वळून पाहिले होते त्याला खूप ताप भरला होता. त्याला दवाखान्यात घेऊन जावे लागले. आजही कधी आम्ही गावी गेलो की तो प्रसंग काका आम्हाला आवर्जून सांगतात. ते तिथे कधीही जात नाहीत आणि आम्हाला सुद्धा संध्याकाळ नंतर तिथे जाऊ देत नाहीत. 

अनुभव क्रमांक – २ – निरंजन जाधव

ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितली होती. माझे गाव कोकणात आहे. माझे वडील व त्यांचे तीन मित्र रमेश, सोपान आणि गणेश गावी राहायला गेले होते. एके दिवशी त्यांनी सहज म्हणून शिकारीला जायचा बेत आखला. शिकारी साठी सगळी तयारी केली व रात्रीचे जेवण वैगरे उरकून सुमारे ११.३० च्याच सुमारास ते घरा बाहेर पडले. साधारण अर्ध्या तासात ते अगदी घनदाट जंगलाच्या परिसरात आले. येताना मोठ्या प्रकाशाची बॅटरी ही सोबत होती. त्यात त्यांनी सोबत त्यांच्या कुत्र्यांना ही घेतले होते. ते ४ जण हळु हळू जंगलाच्या आत शिरू लागलो. रातकिड्यांचा किर्र आवाज कानावर पडत होता. अधून मधून एखाद्या झुडू पातून अचानक सळसळ ऐकू यायची. त्यांच्यातला सोपान थोडा भित्रा होता. 

ते जवळपास १ वाजेपर्यंत रानात फिरले पण त्यांना काहीच हाती लागले नाही. शेवटी वैतागून ते पुन्हा परतीच्या मार्गाला लागले. ते अजून त्या घनदाट जंगलाच्या परिसरातून बाहेर पडले नव्हते. तितक्यात त्यांच्या सोबत असलेले कुत्रे अचानक थांबून भुंकू लागले. त्यांना काहीच कळत नव्हत की नक्की काय झालंय. ते तिन्ही कुत्रे एका विशिष्ट ठिकाणी पाहून भुंकत होते. त्यांनी बॅटरी चा प्रकाश तिथे मारून काही दिसतंय का ते पाहिले पण तो भाग झाडी झुडपांचा होता. त्यात त्यांना वेगळे असे काही च जाणवले नाही. त्यांनी कुत्र्यांना खेचत तिथून घेऊन जायचा प्रयत्न केला पण ते जागचे हलत ही नव्हते. त्यांना काही तरी दिसत होते एवढे मात्र नक्की. बऱ्याच वेळ हा प्रकार चालू राहिला. नंतर एके क्षणी सगळे काही शांत झाले आणि त्यांना चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. आता हा प्रकार काही तरी वेगळाच आहे हे कळायला त्यांना वेळ लागला नाही. त्यात तो विचित्र आवाज हळु हळू वाढत चालला होता. 

अजून क्षणभर ही न थांबता त्यांनी सरळ तिथून पळ काढला. पण इतक्यात सगळे थांबणार नव्हते. तो आवाज त्यांचा पाठलाग करू लागला. तितक्यात गणेश ने काही तरी पाहिले आणि अतिशय घाबरत म्हणाला “जोरात पळा इथून.. नाही तर आपले काही खरे नाही..” ते अगदी जिवाच्या आकांताने पळू लागले. जवळपास २० मिनिटांनी ते गावाच्या वेशीवर येऊन पोहोचले तसे तो आवाज मागे पडला आणि आमच्या जिवात जीव आला. त्यांनी गणेश ला विचारले की तू असे का बोललास, तुला काही दिसले का..? त्यावर तो म्हणाला की आपण धावत असताना माझे लक्ष वाटेतल्या एका झाडावर गेले. तिथे एक बाईसदृष्य आकृती बसल्यासारखे जाणवले म्हणून मी तुम्हाला तसे बोललो. त्याच वेळी सांगितले नाही कारण सोपान अजुन घाबरला असता.  त्या दिवशी घरी येऊन सगळे झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सोपान ला ताप भरला होता. त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि देवाचा अंगारा ही लावला. त्या नंतर आम्ही असे रात्री शिकारी साठी त्या जंगलात जाण्याचा विचार डोक्यातून कायमचा काढून टाकला. 

Leave a Reply