अनुभव क्रमांक – १ – रुपाली कुलकर्णी
मी कोल्हापूर ला राहते. अनुभव काही वर्षांपूर्वीचा पण याच महिन्यातला आहे. २ मार्च चा. आम्ही नेहमी घरचे मिळून अधून मधून फॅमिली ट्रीप काढत असतो. वर्षातून काही वेळा तरी अश्या ट्रीप होतातच. त्या वर्षी ही आम्ही सगळे घरचे मिळून पन्हाळ्याला जायचा बेत आखला होता. अंतर काही लांब नव्हते. अवघ्या एक दीड तासाचा प्रवास. बरेच जण असल्यामुळे फोर व्हीलर आणि बाईक दोन्ही घेऊन आम्ही जाणार होतो. कारण सगळ्यांना फोर व्हीलर मध्ये बसता येणार नव्हते. आम्ही दुपारी २ च्या सुमारास घरून निघालो आणि साधारण तासाभरात तिथे पोहोचलो. खूप धमाल, मजा मस्ती केली. संध्याकाळ झाली तरी सुद्धा तिथून निघायची कोणाची इच्छा नव्हती. त्यामुळेच की काय पण आम्हाला निघायला खूप उशीर झाला. अंधार पडायला सुरुवात झाली होती. सगळे जण जाऊन फोर व्हीलर मध्ये बसले. मी आणि माझी माऊशी आम्ही बाईक वरून येणार होतो. मध्ये घाटाचा रस्ता लागणार होता त्यामुळे थोडी कुणकुण लागून राहिली होती पण घरचे सगळे फोर व्हीलर मधून च येणार होते, आणि सोबतच असणार होते त्यामुळे काळजी करण्यासारखे काही कारण नव्हते. मागच्या वर्षी आलेल्या मुसळधार पावसाने तो रस्ता बऱ्यापैकी खचला होता. त्यामुळे मग आम्ही मागच्या रस्त्याने आलो. तेव्हा रात्रीचे ९.३० झाले असतील. घाटाचा रस्ता होता, त्यात तो खचला होता म्हणून बाईक अगदीच हळु चालवत होतो. आमच्यासोबत असलेली फोर व्हीलर बाईक पेक्षा साहजिकच वेगात असल्याने थोडी पुढे निघून गेली. घाटाची वळणे असल्यामुळे त्यांना ही दिसले नाही की आम्ही बरेच मागे राहिलो आहोत.
अश्याच एका वळणावर कडेला एक बाई उभी दिसली. तिच्याकडे पाहून वाटले की बहुतेक रस्ता चुकली आहे आणि जाण्यासाठी एखादे वाहन बघतेय. आम्ही बाईक थांबवून तिला विचारले की कोण तुम्ही, इथे काय करत आहात, रस्ता चुकला आहात का..? काही मदत हवी आहे का..?. पण ती आमच्याकडे कोणतेही हावभाव न देता फक्त एकटक पाहत होती. ती एक एक पाऊल मागे टाकू लागली. आधीच ती अगदीच कडेला उभी होती. अगदी चार पाच पावलांवर. ती मागे जाते पाहून मी दचकले आणि सांगितले ” अहो आम्ही तुमची मदत करण्याच्या उद्देशाने बाईक थांबवली आहे.. घाबरु नका..” पण ती मागे मागे जातच राहिली आणि बघता बघता तिने आमच्या डोळ्यांसमोर त्या दरीत उडी घेतली. आम्ही तो जीवघेणा प्रकार पाहून भीती ने थर थर कापू लागलो. मावशी मला जोरात ओरडली, लगेच गाडीवर बस. मी ही धड धाडत्या काळजाने गाडीवर जाऊन बसले. मी तिला विचारू लागले ” मावशी अग काय पाहिले आपण.. त्या बाई ने आपल्या डोळ्यांसमोर दरीत उडी घेतली.. “. पण मावशी काहीच बोलली नाही. ते वळण ओलांडून पुढे आलो तसे जाणवू लागले की मागून बाईक खेचली जातेय. मी मागे वळून पाहिले पण कोणीही दिसत नव्हते. इतके काही चढण नव्हते तरी सुद्धा बाईक पुढे जात नव्हती. तितक्यात मागून बाईच्या आवाजातले एक वाक्य कानावर पडले “माझ बाळ मला परत द्या, नाही तर मी तुम्हाला जाऊ देणार नाही..”
काय घडतंय काही कळत नव्हतं. कोणीच दिसत नव्हत पण आवाज मात्र स्पष्ट दिसत होता. आम्ही दोघीही स्वामी समर्थांचे नाम स्मरण करू लागलो. मी घाबरून बाईक चा वेग वाढवला पण रस्ता इतका खराब होता की माझा बाईक वरचा ताबा सुटला आणि बाईक जोरात स्लीप झाली. तो अपघात इतका भीषण होता की आम्ही दोहीही रस्त्यावर आपटून घासत गेलो आणि जागेवरच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर कळले की आम्ही घरी आहोत. बराच वेळ आम्ही आलो नाही म्हणून आम्हाला शोधत ते पुन्हा उलट मार्गे आले होते. आणि त्या घाटात त्यांना आम्ही बेशुधआवस्थेत सापडलो. आम्ही त्यांना घडलेला प्रकार सांगितला नाही. पण नंतर काही महिन्यांनी आम्ही पुन्हा तिथे गेलो तेव्हा आजूबाजूला विचारपूस केल्यावर कळले की एका व्यक्तीने त्याच्या बायकोला ती गर्भवती असताना दरीत ढकलून दिलं होत. तेव्हा पासून ती आपल्या बाळा साठी त्या भागात फिरते, गाड्यांचा पाठलाग करते. आम्ही बहुतेक चांगले नशीब घेऊन आलो होतो म्हणून आम्ही तिच्या तावडीतुन सुटलो.
अनुभव क्रमांक – २ – यश सोनवटकर
प्रसंग मार्च २०१६ चा आहे. जवळपास ७ वर्षांपूर्वीचा जो माझ्या मामाच्या मित्रा सोबत घडला होता. सुट्ट्या लागल्या की मी मामा कडे राहायला जायचो. त्या वर्षी ही परीक्षा संपली आणि मी त्याच्याकडे राहायला गेलो. त्याला आणि त्याच्या मित्रांना ट्रेकिंग ची खूप आवड आहे. त्यामुळे ते दर महिन्याला कुठे ना कुठे ट्रेकिंग ला जात असतात. असेच एकदा ते ट्रेकिंग ला गेले होते आणि तिथून परतत असताना असे काही घडले जे खूप भयानक होते. त्याच्या ट्रेकिंग करणाऱ्या मित्रांचा पूर्ण एक ग्रुप होता. आप आपल्या वेळी टू व्हीलर घेऊनच फिरायचे. असेच एकदा ट्रेकिंग वरून घरी येत होते. वाटेत घाट लागणार होता. त्यांच्या कडे ३ बाईक होत्या आणि त्यावेळी फक्त ५ जण गेले होते. त्यांच्यातला एक राजेश नावाचा मित्र होता. ज्याला खूप मस्ती करायची सवय होती. त्याच्या या स्वभावामुळे त्याच्या सोबत कोणी बाईक वर ही बसायचे नाही. त्या रात्री ही तो एकटाच बाईक वर होता. ते जेव्हा घरी यायला निघाले तेव्हा याची पुन्हा मस्ती सुरू झाली. बाईक वेडी वाकडी, अतिशय जोरात तर कधी हात सोडून चालवणे सुरू झाले. मामा ने व त्याच्या मित्रांनी त्याला बजावून सांगितले की घटातली वळणे आहेत, नीट बाईक चालव.. उगाच अनर्थ नको. त्यात रात्रीची वेळ आहे. पण तो यांचे ऐकणाऱ्यातला नव्हता. ते बोलायला लागले म्हणून त्यांना मागे टाकून हा सुसाट पुढे निघून गेला.
मामाच्या मित्रांनी त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण तो मात्र वेड्यासारखा घाटाच्या वळणातून बाईक सुसाट नेत अगदी दिसेनासा झाला. बऱ्याच वेळा नंतर जेव्हा मामा आणि त्याचे मित्र पुढे गेले तेव्हा तिकडचे दृश्य पाहून हादरून गेले. त्यांचा तो मित्र झाडाला आपटून जबर जखमी झाला होता. त्याच्या बाईक चे जवळ जवळ २ तुकडे झाले होते. त्यावरून झालेला अपघात किती भीषण होता याची प्रचिती येत होती. तो तर बराच रक्तस्त्राव होऊन कधीच बेशुद्ध झाला होता. त्याला जेमतेम उचलून त्यांनी दवाखान्यात नेले. त्याच्यावर वेळेवर उपचार झाले म्हणून तो वाचू शकला नाही तर त्याचे काही खरे नव्हते. ती रात्र त्यांनी तिथेच दवाखान्यात जागून काढली. सकाळी जेव्हा शुद्धीत येऊन त्याने जे सांगितले ते ऐकून सगळेच सुन्न झाले. तो म्हणाला की तुम्हाला मागे टाकून मी सुसाट वेगात पुढे जात होतो तेव्हा अचानक एक माणूस माझ्या बाईक सोबत अती प्रचंड वेगात पळत होता. माझ्या बाईक चा वेग ताशी ८० किलोमिटर होता आणि अगदी त्याच वेगात तो पळत होता. ती भयाण प्रकार पाहून माझा बाईक वरचा ताबा सुटला आणि मी त्या झाडावर जाऊन जोरात आदळलो. त्या आघाताने मी जागीच बेशुद्ध पडलो. त्या पुढचे मला काहीच आठवत नाही. डोळे उघडले ते इथे बेड वर.. हे सगळे सांगत असताना माझा मामा त्याच्या समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चे भय सगळ काही सांगून गेलं. की त्याने जे काही पाहिले ते खूप भयानक होत. त्याचे बोलणे ऐकून ते सगळेच घाबरून गेले होते. त्याचे नशीब चांगले म्हणून सगळे मित्र वेळेत तिथे पोहोचले नाही तर खूप मोठा अनर्थ झाला असता.