अनुभव – विकास भिसे

ही घटना माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आई सोबत घडली होती. 

त्या काळी लग्न कमी वयात असताना च होत असत. आणि माझ्या आईचं लग्न ही कमी वय असतानाच झालं. माझा जन्म झाल्यानंतर बाळंतपणासाठी माझी आई माहेरी म्हणजेच माजेरी गावात आली होती. माझ्या आईचं गाव माजेरी. वरंधा घाटात बरोबर मध्यभागी वसलेलं गाव. मुख्य रस्त्याला लागूनच आहे.  तेव्हा घरी आई सोबत तिच्या बहिणी, तात्या म्हणजे माझे आजोबा, आजी असे सगळे एकत्र राहत असत. सगळं सुरळीत चालू होत. घरातले वातावरण ही प्रसन्न होते. पण साधारण ६ दिवसांनी विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली. 

माझ्या आईला रात्री १ नंतर विचित्र आवाज येउ लागला. तो आवाज खूप कर्ण कर्कश असल्यामुळे तिला झोपही लागत नसे. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं पण हळू हळू हे दर रात्री घडायला लागलं. हा आवाज पहाटे साधारण ४ वाजेपर्यंत येत असे आणि नंतर पुन्हा स्मशान शांतता पसरत असे. घरचे इतर लोक मागच्या खोलीत असल्याने त्यांना कदाचित तो आवाज येत नसावा. त्या रात्री आई ने नक्की काय प्रकार आहे ते पहायचे ठरवले. ती उठली आणि खिडकी जवळ जाऊन त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागली. त्या आवाजासोबत अजून एक हाक ऐकू आली “पोराला घेऊन बाहेर ये”.. ती प्रचंड घाबरली आणि पुन्हा खोलीत जाऊन दार बंद करून मला कुशीत घेतले आणि अंथरुणात पडून राहिली. 

त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा तेच घडले. पण या वेळी तो कर्ण कर्कश्य आवाज आणि हकांसोबत दगड फेकल्याचा आवाज येऊ लागला. घरा समोरच्या मोठ्या पारड्यात ती दगड पडत होती. त्या रात्री ती कशी बशी झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिने जाऊन पाहिले तेव्हा त्या पारड्यात एकही दगड नव्हता. शेवटी तिने तात्यांना म्हणजे माझ्या आजोबांना इतके दिवस घडत असलेला प्रकार सांगितला. ते तिला ओरडले पण नंतर शांतपणे समजावत म्हणाले की तू हे आम्हाला आधीच का नाही सांगितले. 
त्या दिवशी रात्री सगळे जण घरातल्या पुढच्या खोलीत झोपले.

मध्यरात्र उलटुन गेली आणि पुन्हा तो आवाज यायला सुरुवात झाली. आई ने तात्यांना पटकन उठवले पण त्यांना तो आवाज येत नव्हता. काही वेळानंतर पुन्हा दगडांचा आवाज येऊ लागला तेव्हा मात्र त्यांना खात्री पटली की हा काही तरी विचित्र प्रकार आहे. 

त्यांनी नीट कानोसा घेऊन तो आवाज ऐकायचा प्रयत्न केला आणि आपसूक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडला “पुंज्या”. ते पटकन म्हणाले अरे हा पूंज्या चा आवाज आहे. काही वर्षांपूर्वी हा खविसाच्या तावडीत सापडला होता. त्याच्याशी कुस्ती खेळायला गेला. त्या खविसाने याला मारून निर्वस्त्र करून याचे प्रेत पाण्याच्या झोता वरती टांगून ठेवल होत. पण हा पुन्हा का आलाय ?. तेव्हा आईने सांगितले की त्याला माझं बाळ हवंय. ते ऐकून तात्यांचा संताप अनावर झाला. ते घराबाहेर आले आणि त्याला खडसावून सांगितले “तुला ज्यांनी त्रास दिला त्यांना जाऊन छळ, माझ्या पोरीने काय वाकडे केले आहे तुझे”. तो पर्यंत पहाट होत आली होती. बघता बघता तो पुंज्या दिसेनासा झाला.

त्या रात्री नंतर त्याचा आवाज पुन्हा कधीच आला नाही. त्याने माझ्या आई ला त्रास का दिला याचे उत्तर मला कधीच मिळाले नाही. आज ही आईचे गावातले घर अगदी जसेच्या तसे आहे. मी तिथे गेल्यावर त्या घरात मला अजूनही शांत झोप लागत नाही.

Leave a Reply