ती गडद आणि वादळी रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. रोहिणी आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी एक खेळ खेळण्याचा निर्णय घेतला होता. असा एक खेळ जो न खेळण्याचा सल्ला त्यांना बऱ्याच जणांनी दिला होता. खासकरून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी. पण साहसी आणि तरुण असल्याने त्यांनी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि तो जीवघेणा खेळ खेळायचा निर्णय घेतला. खेळाचे नियम सोपे होते: प्रत्येकाने त्याचे नाव कागदाच्या तुकड्यावर लिहून एका भांड्यात ठेवायचे. घरातील सर्व दिवे बंद करायचे, फक्त एक मेणबत्ती लावायची आणि तो खेळ सुरू करायचा. मिड नाईट मन ला बोलवण्याचा. जर तो आला तर त्याला अंधारात घरभर भटकाव लागत. त्याने आपल्याला शोधले तर ती मेणबत्ती विझते. आणि तसे झाले तर १० सेकंदाच्या आत ती पुन्हा पेटवावी लागते आणि जर नाही पेटवली तर मात्र तो एकाला तरी घेऊन जातो. जेव्हा त्यांनी सगळे मांडून खेळायला सुरुवात केली तेव्हा तो खेळ खूप मजेशीर वाटू लागला. ४ ते ५ जण होते ते. रोहिणी च्या एका मित्राने तर विनोद करायला सुरुवात केली आणि त्यांच्यात चांगलाच हशा पिकला. पण जसजशी रात्र होत गेली तसतसे गोष्टी अधिक भयावह होऊ लागल्या. रोहिणी च्या रिकाम्या खोलीतून कोणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला. तिने तिरक्या नजरेने पाहिले पण अंधार असल्यामुळे नीट काही दिसत नव्हते. तितक्यात तिला जाणवले की त्या खोलीतून एक काळपट सावली बाहेर येत आहे. तिने तिच्या मित्र मैत्रिणीना खुणावून सांगितले पण त्यांना तिथे काहीही दिसले नाही. रोहिणी ला मात्र काही भयानक घडणार आहे याची कुणकुण लागली. तशी ती सावध झाली. 

काही कळणार तितक्यात “मेणबत्ती विझली”. खोलीत गडद अंधार पसरला. रोहिणी जागेवरच थिजली. टेबल वर ठेवलेली काडे पेटी चाचपडत शोधू लागली. तिच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. तितक्यात हाताला काडीपेटी लागली. पटकन एक काडी काढून पेटवू लागली पण भीतीमुळे तिचे हात इतके थरथरत होते की तिच्या हातून ती खाली निसटली. तिने दुसरी काडी काढायचा प्रयत्न केला पण तिच्या हातून ती काडे पेटी उलट उघडली गेली आणि सगळ्या काड्या खाली जमिनीवर पडल्या. ती खाली वाकली आणि तितक्यात तिच्या कानात कोणी तरी कुजबुजले.. 

“मी तुला शोधले रोहिणी..” 

तो आवाज ऐकून ती जोरात किंचाळली आणि धावत सुटली. पण अंधारात तिला काही दिसेना. ती एका टेबलावर आदळली आणि खाली पडता पडता तिने स्वतःला सावरले. तिच्या हातावर कसला तरी थंडगार स्पर्श झाला आणि तो स्पर्श ” मिड नाईट मान ” चा आहे असे समजून ती पुन्हा जोरात कीचाळली. तिच्या मित्र मैत्रिणींना एव्हाना सगळे कळून चुकले होते. ते सगळेच रोहिणी सोबत असलेला प्रकार पाहून घाबरून गेले होते. पुढचे काही तास त्यांच्या सोबत जे घडणार होते ते खूप भयानक असणार होते. कारण आता ते मिड नाईट मान सोबत त्या घरात अडकून पडले होते. त्यांनी घरातून बाहेर पडायचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न असफल ठरू लागले. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी ही कानात कोणी तरी कुजबुज ल्याचा आवाज यायचा. पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते. तो गोंधळ, गडबड, धावाधाव अचानक थांबली आणि सगळे काही शांत झाले. रोहिणी च्या रिकाम्या खोलीतून पुन्हा एकदा चाहूल ऐकू येऊ लागली. ते सगळे तिच्या खोलीकडे एक टक पाहू लागले. तो बाहेर येत होता. खोलीतून नाही तर त्या खोलीच्या भिंती मधून. लाल भडक डोळे, तीक्ष्ण सुळ्या सारखे दात.. ७-८ फूट उंच. त्याच्या श्वासा सोबत एक विचित्र आवाज कानावर पडत होता. ते भयाण दृश्य पाहून त्यांची वाचाच बंद झाली. त्या सगळ्यांनी घाबरून दरवाज्याकडे धाव घेतली. रोहिणी मात्र खिडकी कडे धावली कारण दरवाजा आधी ही उघडला गेला नव्हता. पण ना दरवाजा उघडत होता ना खिडकी.. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांचा धीर सुटू लागला. ते सगळेच थकून गेले होते. 

ते रडू लागले, दयेची भीक मागू लागले पण तो.. तो फक्त त्यांच्या वेदनांवर हसू लागला. रात्र पुढे सरकत होती. हळु हळु रोहिणी आणि तिच्या मित्र मैत्रिणींना भोवळ येऊ लागली. त्यांना वाटू लागले की आपल्या शरीरातला प्राण जणू कोणी ओढून नेत य. पण त्यांच्यातल्या एकाने खूप प्रयत्न करून मेणबत्ती पेटवली. तो जसा अचानक दिसला तसा च तो निघून ही गेला. पण ही त्या रात्री घडणाऱ्या गोष्टींची फक्त सुरुवात होती. ते एकत्र येऊन रडू लागले, गेले काही तास आपल्या सोबत नक्की काय घडले हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. घडलेल्या भयानक प्रसंगातून सावरत नाहीत तितक्यात त्यांच्या दारावर धापा पडू लागल्या. ते एकमेकांकडे पाहू लागले. पुन्हा तोच असेल या भीती ने कोणीही जागचे हलत नव्हते. पण तो दार वाजवण्याचा आवाज प्रत्येक क्षणाला वाढत चालला होता. शेवटी रोहिणी ने तिची हिम्मत एकवटली आणि दाराकडे निघाली. दाराला हळूच दोन्ही हात लाऊन छोट्या होल मधून बाहेर पाहिले. तिचे काळीज भीतीने धड धडत होते. सुरुवातीला अंधारा शिवाय तिला काहीच दिसले नाही पण तितक्यात दारावर एक जोरदार धडक बसली. तो आवाज ऐकून जणू तिचे रक्तच गोठले. तिला कळायला वेळ लागला नाही की हा काही तरी वेगळा प्रकार आहे, कदाचित मिड नाईट मान पेक्षा भयानक. दबक्या पावलांनी ती मागे सरकू लागली पण तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिच्या मैत्रिणी लगेच तिच्या जवळ धावत आल्या आणि तिला विचारू लागल्या की काय झाले. काय पाहिलेस तू.. रोहिणी च्या तोंडून जेमतेम शब्द बाहेर पडत होते. ती कापऱ्या आवाजात च म्हणाली ” तो मिड नाईट मान नाही.. हे काही तरी त्याहून भयानक आहे..” 

खर तर रोहिणी ला बाहेर काही तरी दिसले होते जे तिला कोणालाही सांगायचे नव्हते. दारावर प्रहार होऊ लागले. बाहेर जे काही होत ते आत येण्याचा प्रयत्न करत होत. तितक्यात बाहेरून कोणा व्यक्तीचा आवाज आला आणि अचानक दार वाजण्याचा आवाज ही बंद झाला. आता आवाज होता तो बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरींचा. ते बाहेर जे काही होत ते निघून गेलं की नाही याची खात्री करण्याचं धाडस कोणीही करत नव्हत. ते सावरत च होते तितक्यात घरातून कुत्सित पणे हसण्याचा आवाज येऊ लागला. त्या हसण्यातून द्वेष, राग आणि अनामिक सुडाची भावना स्पष्ट जाणवत होती. इतक्या वेळ जे बाहेर होत आता ते घरात आलंय हे ऐकून त्यांच्या शरीरातला त्राण च संपला. आता मात्र त्यांनी आरडा ओरडा सुरू केला. त्यांना हे ही माहित नव्हत की आपला आवाज बाहेर जातोय की नाही. त्यांना जाणीव होऊ लागली की आपण भीतीच्या डोहात बुडत चाललो आहोत आणि हे सगळे आपल्या अंता बरोबरच थांबेल. जेव्हा त्यांना वाटले की आता सगळे मार्ग बंद झाले आहेत तेव्हा त्यांना शेजारच्या आजोबांचा आवाज ऐकू आला. तो आवाज अस्पष्ट आणि दुरून आला.. ” हिम्मत हारु नका.. आपण एकत्र प्रयत्न केल्यास या शक्तीला पराभूत करू शकतो..” . त्यांना आश्चर्य वाटले की शेजारच्या आजोबांना आमच्यावर आलेल्या संकटा बद्दल कसे कळले. परंतु त्यांच्या त्या एका वाक्याने अंगात बळ आले आणि उरली सुरली शक्ती त्यांनी त्या भयानक प्रकाराला पराभूत करण्यावर केंद्रित केली. 

त्यांनी घरात शोधा शोध सुरू केली. सगळ्यांनी हाताला लागेल ते हत्यार उचलले. पण रोहिणी ला ते सापडले.. पोट माळ्याच्या विसरलेल्या कोपऱ्यात लपलेला एक जीर्ण झालेला ग्रंथ. तिला कळत नव्हते की आपण या ठिकाणी का शोध घेतला. आणि हा ग्रंथ. पण तो ग्रंथ जसा हातात घेतला तसे तिला एक वेगळीच ऊर्जा जाणवली. ती काय करत आहे हे तिला ही समजत नव्हत. पण तिने त्या ग्रंथांची पाने उलटायला सुरुवात केली आणि त्यातले शब्द उच्चारू लागली. त्याच सोबत ते जे काही होत ते ओरडायला लागल. वाईट शक्तीची लाट मागे सरकू लागली. जणू स्वप्नवत हे सारं काही घडत होत. बऱ्याच वेळाने तो आवाज शांत झाला तसे तिने उच्चारण थांबवले. आपल्या आजूबाजूला पाहिले तर ते घराच्या पहिल्या खोलीत एका रिंगणात होते. ते सगळेच एकमेंकाकडे आश्चर्याने पाहू लागले. आपल्या सोबत काय घडले हेच त्यांना कळत नव्हते. रोहिणी ने जाऊन घराचा दरवाजा उघडला आणि तो सहज उघडला ही गेला. समोरच्या घरातले आजोबा तिथेच बाहेर उभे होते. त्यांनी फक्त स्मित हास्य केलं जणू त्याला माहीत होत की ते सगळे यातून सुखरूप बाहेर पडतील. काही महिने उलटले. रोहिणी आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी या घटने बद्दल कधीच वाच्यता केली नाही. रोहिणी ने घर बदलले. पुढे सगळे जण आप आपल्या वाटेला लागले. त्यांना माहीत होत की शेवटच्या श्वासा पर्यंत ते मिड नाईट मान चा प्रसंग स्मरणात राहील. अनेक वर्षांनंतर रोहिणी ला एक पत्र आले. साहजिकच या काळात कोण पत्र व्यवहार करत म्हणा. त्यामुळे ती ही जरा गोंधळली. 

ते त्या आजोबांचे होते. ज्यांचे निधन झाले होते. जाण्या आधी त्यांनी हे पत्र लिहून ठेवले होते. आणि त्यांच्या निधनानंतर च रे रोहिणी ला मिळणार होते. त्या पत्रात मिड नाईट मान बद्दल आणि त्याच्या मागोमाग येणाऱ्या त्याच्याहून ही भयानक गोष्टी बद्दल सगळ काही लिहिलं होत. ते वाचून ती शहारली. ते आजोबा रक्षक होते. अश्या वाईट शक्तींपासून रक्षण करणारे. पण ते गेल्या नंतर आता सगळी माहिती आणि त्या वाईट शक्तीचा पराभव कसा करायचा हे फक्त रोहिणी ला माहीत होत. त्यामुळे इथून पुढची वाटचाल खडतर असणार होती. कारण त्यांची जागा आता रोहिणी घेणार होती..

Leave a Reply