अनुभव – सचिन खोरखेडे

आम्ही एकदा फॅमिली टूर अरेंज केली होती. माहूर गडावर जायचे ठरले. ऐन वेळी गाडी बुक करून आम्ही प्रवास सुरु केला. 

मजा मस्ती करत गाण्याच्या भेंड्या खेळत प्रवास चालू होता.

जळगाव हुन निघाल्यामुळे आम्हाला बराच वेळ लागणार होता. रात्र होत आली होती. ऐन वेळी गाडी बुक केल्यामुळे जो ड्रायवर मिळाला तो ही नवीनच होता. कदाचित त्याला इतक्या प्रवासाची सवय नसावी म्हणून तो पूर्ण थकून गेला होता. पण आम्हाला काही न बोलता ड्रायविंग करत राहिला. रात्रीचे 9 वाजून गेले. आम्हाला काही वेळा नंतर कळले की ड्रायवर नवीन असल्यामुळे त्याला परफेक्ट रूट ही माहीत नव्हता.

म्हणून आम्ही रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला रूट विचारला. आणि तिथेच आमची सगळ्यात मोठी चूक घडली. त्या माणसाने कुठून कसे जायचे हे सांगितले आणि आम्ही त्या प्रमाणे प्रवासाला सुरुवात केली. 

पुढे किती आणि काय विपरीत घडणार आहे, काय विचित्र बघायला मिळणार आहे याची आम्हाला कणभर ही कल्पना नव्हती. आम्ही त्याने सांगितलेल्या रस्त्याला लागलो तेव्हा साधारण 2 वाजले होते. काही अंतर पार केल्यावर आम्हाला त्या रस्त्यावर बाजार भरलेला दिसला. त्या गावातल्या घराचे दिवे चालू होते, माणसांची वर्दळ दिसत होती. आम्ही मात्र आश्चर्य आणि भीती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अनुभवत होतो. इतक्या रात्री कधी तरी असा बाजार भरू शकतो हेच पटत नव्हते. आम्ही नक्की काय पाहतोय कळेनासे झाले. ड्रायवर प्रमाणे आम्ही ही खूप थकलो होतो म्हणून जास्त विचार न करता थोडं थांबून चहा वैगरे घेऊन मग निघायचे ठरले.

एका लहान टपरीवर जाऊन आम्ही चहा मागितला. त्या व्यक्तीने आमच्या कडे पाहिले ही नाही. आणि मान खाली घालूनच आमच्या पुढ्यात चहा ठेवला. आम्ही मात्र त्या व्यक्ती कडे पाहतच राहिलो. सगळे उरकल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. काही मिनिटातच ते गाव मागे पडले. आम्ही गावाच्या वेशीवर आलो. तिथून जाताना रस्त्याच्या कडेला एक जोडपं दृष्टीस पडले. त्यांनी हात दाखवून आमच्याकडे लिफ्ट मागितली. आम्ही त्यांना विचारले की इतक्या रात्री तुम्ही कुठे निघाला आहात. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून आम्ही त्यांना वेड्यातच काढले. आम्ही आता मतदान करून आलो आहोत, आमचे गाव इथून पुढे 3 किलोमीटर अंतरावर आहे तिथे आम्हाला सोडा. हा काही तरी विचित्र प्रकार आहे असे समजून आम्ही त्यांना लिफ्ट न देताच पुढे निघालो. आता मात्र गोष्टी प्रमाणापेक्षा विचित्र घडत होत्या. 

काही वेळ प्रवास झाल्या नंतर आम्हाला एक मैदान लागले. त्या मैदानात हजारो लोक उभी होती, बाजूला काही गाड्या ही लागल्या होत्या. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे कोणीही आप आपसात एक शब्दही बोलत नव्हते होती ती फक्त स्मशान शांतता. अश्या ठिकाणी थांबण्याचा काही प्रश्नच उदभवत नव्हता. आता मात्र आम्ही कुठे ही न थांबता प्रवास करायचे ठरवले.

सकाळी साधारणतः 6 वाजता आम्ही बीड जिल्ह्यात येऊन पोहोचलो. तिथे एक ट्रक ड्रायवर शेकोटी घेत बसला होता. आम्ही त्याच्याजवळ जाऊन पुढचा मार्ग विचारला. त्याने कसे जायचे हे सांगितले आणि तुम्ही कुठून आलात हे सुद्धा विचारले. त्याला आम्ही म्हणालो की आम्ही जळगाव हुन आलो आहोत. तो ड्रायवर जरा बुचकळ्यात च पडला. आणि आश्चर्याने आम्हाला विचारू लागला की मग तुम्ही इथून कसे आलात. आम्ही ज्या रस्त्याने आलो तसे आम्ही त्याला सांगितले. काही क्षणासाठी तो विचारात पडला आणि मग म्हणाला की तुम्ही जे सांगताय असा कोणता रस्ताच नाहीये मी पहिल्यांदा च ऐकतोय. आम्ही एकमेकांकडे फक्त पाहतच राहिलो कारण आम्हाला सगळा प्रकार लक्षात आला होता. आम्ही जळगाव हुन निघालो होतो आणि माहूर गडावर जायचा रूट जळगाव, बुलढाणा, अकोला, यवतमाळ असा आहे. त्यामुळे आम्ही ज्या मार्गाने रात्रभर प्रवास केला होता तो मार्गच मुळात अस्तिवात च नव्हता.

Leave a Reply