अनुभव – अनुश्री निंबरे

अनुभव माझ्या आईला आला होता आणि तिने मला सांगितला. गोष्ट साधारणतः ३२ वर्षांपूर्वीची आहे. नवरात्री चे दिवस होते. एके संध्याकाळी सहज म्हणून माझी आई आजीला भेटायला तिच्या घरी गेली होती. बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यात इतका वेळ निघून गेला की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. पाहता पाहता ७.३०-८ होऊन गेले. आई च्याच जेव्हा लक्षात आले की उशीर झालाय आणि घरी पोहोचेपर्यंत अजुन उशीर होणार आहे तेव्हा ती आजीचा निरोप घेऊन जायला निघाली. त्यावर आजी तिला म्हणाली की एकटी जाऊ नकोस, सोबत दादाला म्हणजे माझ्या मामा ला घेऊन जा. तो तुला घरी सोडून मग येईल. पण आई तिला म्हणाली की राहू दे, जाईन मी.. पहिल्यांदा कुठे आली आहे आणि सवय आहे मला, रोजचाच तर रस्ता आहे. तसे आजी तिला काळजीपोटी म्हणाली “तस नाही ग.. आज अमावस्या आहे म्हणून म्हंटले..”.

पण आईला अश्या गोष्टी कधीच पटायच्या नाहीत. तिचा या सगळ्यांवर विश्वास नव्हता. ती आजीच्या म्हणण्याकडे कानाडोळा करून घरी यायला निघाली. त्या काळी आम्ही चाळीत राहायचो. आमच्या घराकडून येणारा रस्ता एका शेतातून जायचा. तो भाग तसा दलदलीचा होता. आई तिथून चालत घरी यायला निघाली. वाट तशी सामसूम होती. थोड्यावेळात ती घरी येऊन पोहोचली. आल्यावर तिने जेवण केले आणि घरातली काम आटोपली. आई बाबा दोघेही कामावर जायचे. त्यामुळे जेवण उरकल्यावर ते दोघेही लवकर झोपायचे. बाबांना घरून लवकर म्हणजे पहाटेच घरून निघावे लागायचे. ते पहाटे ४.३० लाच घरून बाहेर पडायचे. ते गेल्यावर आई थोडा वेळ आराम करून मग पुढच्या रोजच्या तयारीला लागत असे. त्या दिवशी ही पहाटे बाबा साडे चार, पावणे पाच च्याच सुमारास कामाला निघून गेले. त्यांना डबा वैगरे करून दिला आणि ती थोड्या वेळा साठी अंथरुणात येऊन पडली. 

आज दिवसभरात काय काय कामे करायची याचा विचार करत होती. एरव्ही पेक्षा आज तिला जरा वेगळेच वाटत होते. एकदम शांत. कारण शेजारी राहणाऱ्या काका काकूंच्या घरी रोजच्या कामाची खटपट एव्हाना सुरू व्हायची. दूधवाला सायकल घेऊन दूध टाकायला यायचा पण आज या सगळ्यांचा कसलाच आवाज नव्हता. सगळे काही एकदम शांत आणि भकास वाटत होते. ती पहाट रोजच्या सारखी नव्हती. काही तर वेगळे जाणवत होते तील त्या दिवशी. आई हाच विचार करत भिंतीकडे वळून कुशीवर झोपली होती. तितक्यात तिला तिच्यामागे डोक्याकडून पायापर्यंत समांतर चालण्याचा आवाज येऊ लागला. एक वेगळीच चाहूल जाणवली. कोणीतरी पायघोळ वस्त्र घालून चालताना जसा आवाज येतो तसा तो आवाज होता. काहीसा वेगळाच. आई ला वाटले की कोणी चोर वैगरे तर शिरला नाही ना घरात. हे पाहण्यासाठी गी दुसऱ्या कुशीवर वळायला गेले तेवढ्यात ते जे कोणी होते ते आईच्या शेजारी येऊन थांबले. तिचे सर्वांग शहारले. 

आई दुसऱ्या कुशीवर वळायचा प्रयत्न करून लागली पण.. पण तिला अजिबात वळता येत नव्हते. तिच्या मागे जे काही होत त्याने तिला जखडून ठेवले होते. तिला वेगळाच स्पर्श जाणवला, अगदी गरम जसा एका जिवंत माणसाचा असतो तसा.. तिच्या मनात एव्हाना भीतीने काहूर माजवले होते. तिने मनात दत्त गुरूंचा धावा सुरू केला आणि संपूर्ण ताकदीनिशी दुसऱ्या बाजूला वळली. पण तिच्या मागे कोणीही नव्हते. तिने अंथरुणात त्या भागावर हात फिरवला तर ती बाजू उबदार झाली होती. म्हणजे काही क्षणापूर्वी तिथे कोणी तरी होत पण ते तिला दिसलं नव्हत. तिने उठून घरातले सगळे दिवे लावून संपूर्ण घर तपासले. पण तिला काहीच विचित्र किंवा वेगळे दिसले नाही. घराचे दार, खिडक्या सगळे बंद होते. वस्तू जागच्या जागी जश्याच्या तश्या होत्या. सगळे काही नीट वाटत असले तरी मनात एक वेगळीच कुणकुण लागून राहिली होती. आई ने तयारी केली आणि लगेच आजीकडे जायला निघाली. 

तिने आजीला सगळा प्रकार सांगितला. आजी जराही वेळ न घालवता सकाळीच जवळच्या दत्त मंदिरात गेली आणि तिथल्या पुजाऱ्यांना भेटून घडलेला प्रकार सांगितला. आई दिवसभर आजी कडेच थांबली. त्याच संध्याकाळी आजीने माझ्या बाबांना तिथे बोलवून घेतले. त्यांना कल्पना नव्हती की नक्की काय घडले आहे. ते गेल्यावर आजीने त्यांच्या हातात दोन पुड्या दिल्या. त्यात देवाचा अंगारा होता. ती त्यांना सांगू लागली “एक पुडी तुमच्या घरात ठेवा आणि एक तुमच्या जवळ. आज रात्री तुम्ही तुमच्या घरात झोपू नका. आणि हो अजुन एक अतिशय महत्त्वाचे. आज तुम्ही कोणाच्या घरी जाणार आहात किंवा तुम्ही रात्री घरी राहणार नाही याचा त्या घरात असताना उल्लेख करू नका. बाबांच्या मनात खूप प्रश्न होते पण त्यांनी आजीने सांगितल्या प्रमाणे केले. त्यांनी एक पुडी आई जवळ दिली आणि दुसरी घरी ठेऊन आले. निघताना घरातल्या सगळ्या खिडक्या दरवाजे बंद करून निघाले. 

त्या रात्री ते दोघेही आजीकडे च झोपले. ती रात्र अशीच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बाबा आमच्या घरी परत आले तेव्हा आईला किचनची खिडकी उघडी दिसली. आई चकित झाली कारण निघताना सगळे दरवाजे खिडक्या नीट बंद केल्या होत्या. आईने हा सर्व प्रकार आजीला सांगितला. त्यावर आजीने तिला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या. ती म्हणाली “तुला त्या संध्याकाळी एकटी जाऊ नकोस असं सांगून सुद्धा तू निघालीस आणि त्या दलदलीजवळून जाताना तू एका आत्म्याच्या घेऱ्या त आलीस. ती एका अतृप्त पुरुषाची आत्मा होती. तू जर मला वेळीच येऊन सांगितले नसतेस तर त्या आत्म्याने तुझा ताबा घेतला असता आणि मग मात्र गोष्टी हाताबाहेर गेल्या असत्या. पण दत्त गुरूंची कृपा की तसे काही झाले नाही. तुला त्यांनी माझ्याकडे येण्याची आणि मला पुजाऱ्यांकडे जाण्याची सद्बुद्धी दिली म्हणून तू वाचलीस. आणि हो.. तुझ्या घराची खिडकी तुला उघडी दिसली कारण ते तुझी घरून बाहेर निघून गेले. त्या दिवसानंतर मात्रआईचा अशा गोष्टींवर विश्वास बसला..

Leave a Reply