अनुभव – ऋतुराज पवार

ही गोष्ट साधारण ४ वर्षांपूर्वीची आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या होत्या. त्या काळी आमच्या भागात खूप चोऱ्या व्हायच्या त्यामुळे घर बंद ठेऊन जायला कोणीही धजावत नसे. पण माझ्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका कुटुंबाला गावी जावे लागले. जाण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी मला विनंती केली की तू आणि अजुन १-२ मित्र आमच्या घरी झोपायला जाल का.? आम्ही काही दिवसांसाठी बाहेर जाणार आहोत. मी त्यांना हो म्हटलं. तसे ही मित्रांसोबत रात्री नाईट आऊट होईल काही दिवस असा विचार करत मी मनातल्या मनात खूष झालो. 

ते सगळे जण पहाटे गावी जायला निघाले आणि जाताना मला घराच्या चाव्या देऊन गेले. दिवसभरात मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करून कळवले की पुढचे काही दिवस आपण एका घरात नाईट आऊट करणार आहोत. मी त्यांना पत्ता पाठवला आणि म्हणालो की जेवण उरकून रात्री त्या पत्त्यावर भेटायचे. पहिल्या दिवशी कॅरम खेळायचा बेत आखला. सगळे एकदम उत्साहात होतो. रात्री अगदी उशिरा पर्यंत कॅरम खेळत आमच्या गप्पा सुरू होत्या. नकळत भुताच्या गोष्टींचा विषय निघाला. आता प्रत्येक ग्रुप मध्ये एक तरी जण असतोच ज्याचा अश्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसतो तसा आमच्या ग्रुप मध्ये ही होता. 

आमच्या जवळपास सगळ्या गोष्टींवर तो हसत होता आणि मस्करित घेत होता. आमच्या एरिया मध्ये असे बोलले जायचे की रात्री अपरात्री एक बाई फिरते आणि पैंजणा चा आवाज ऐकू येतो. आमच्यातल्या तो मित्र हसतच म्हणाला “काय फालतू गोष्टींवर विश्वास ठेवता तुम्ही”. आम्ही त्याला तेव्हा काहीच बोललो नाही. साधारण ३ च्याच सुमारास आम्हाला झोप असह्य होऊ लागली म्हणून आम्ही सगळे आवरून तिथेच अंथरूण करून झोपलो. तो मित्र ही माझ्या बाजूला झोपला होता. डोळा लागतो न लागतो तोच कसल्याश्या आवाजाने जाग आली. तो आवाज पैंजण चा होता. घराबा हेरून येत होता. आम्ही सगळे उठून त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो.

तो आवाज घराजवळ येत अगदी दाराशी येऊन थांबला. तसे तोच मित्र उठला आणि जाऊन दार उघडले. समोर कोणीही नव्हते. तो दारातून काही पाऊले पुढे जाऊन पाहू लागला पण त्या भागात त्याला कोणीही दृष्टीस पडले नाही. तसे त्याने दरवाजा बंद केला आणि आत येत म्हणाला “कोणी नाहीये रे.. कोणी दिसले ही नाही.. तुम्ही उगाच काही ही बडबड ता.” आम्ही त्याच्याकडे पाहतच राहिलो कारण आम्हा सगळ्यांना तो आवाज अगदी स्पष्ट आला होता तरीही हा सरळ दुर्लक्ष करत होता. मी काही बोलणार तितक्यात माझ्या एका मित्राने मला अडवले आणि इशारा केला की जाऊदे झोप आता.

दुसऱ्या दिवशी सगळे आप आपल्या दिन क्रमाला लागले. आम्हाला अजुन ३-४ रात्री तिथे काढायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मित्र पुन्हा रात्री झोपायला तिथे गेलो. त्या रात्री पासून जे सत्र सुरू झाले ती अतिशय भयानक रूप घेईल याची आमच्यापैकी एकानेही कल्पना केली नव्हती. आम्ही त्या रात्री ही गप्पा गोष्टी करत उशिरा झोपलो. माझा डोळा लागला असेल तितक्यात मला माझ्या डोक्या पाशी कोणी तरी बसल्याचे जाणवले. मी झटकन उठून पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. मी कोणाला काहीही न बोलता झोपून गेलो. मला काही वेळाने पुन्हा कसलीशी चाहूल जाणवली. असे वाटले की स्वयंपाक घरातून आम्हाला कोणी तरी पाहतेय. 

मी हळूच त्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न केला पण अंधार असल्यामुळे तिथे खरच कोणी आहे की नाही हे कळत नव्हतं. मी डोक्यावरून चादर घेऊन झोपून गेलो. तिसरा दिवस उजाडला. आम्ही त्या दिवशीही त्यांच्या घरी झोपायला गेलो. त्या रात्री जे घडले ते अतिशय भयंकर होते. आम्ही नेहमी प्रमाणे गप्पा गोष्टी करून उशिरा झोपलो. पण त्या रात्री आम्ही जसे झोपी गेलो तसे घरात कोणीतरी चालत असल्याची चाहूल जाणवू लागली. मला तर धडकीच भरली. हळु हळु तो आवाज आमच्या अगदी जवळ येऊ लागला तसे आमच्यातला तोच मित्र पुन्हा ताडकन उठला आणि त्याने लाईट लावले. पण आमच्या शिवाय त्या घरात दुसरे कोणी ही नव्हते. 

तो आम्हाला काहीतरी बोलायला जाणार तितक्यात त्याला कोणी तरी एकदम जखडून ठेवल्या सारखे झाले. बघता बघता त्याचे डोळे संपूर्ण पांढरे फटक पडले. त्यांच्या तोंडून जे उद्गार निघाले ते त्याच्या आवाजात नाही तर एका बाई च्याच आवाजात. “तुम्ही जे केले ते चुकीचे केले. याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार”. आम्ही समोर घडत असलेला प्रकार त्याची ती अवस्था धड धडत्या काळजाने पाहत होतो. कोणालाही काहीच सुचत नव्हते की आता काय करायचे. माझा तर मेंदूचं बधीर व्हायची वेळ आली होती. त्याचा स्वतःवर ताबा नाही हे तर कळले होते पण आता पुढे काय करायचे. तितक्यात आमच्यातला एक जण म्हणाला “याला लवकरात लवकर जवळच्या मंदिरात घेऊन जाऊ”. तसे मी म्हणालो “अर् एवढ्या रात्री..” पटकन दुसरा मित्र म्हणाला “पहाट झाली आहे, वेळ बघ ४.३० होऊन गेलेत”.

उशिरा झोपल्या मुळे मला वेळेचे भान राहिले नव्हते. आमचे बोलणे चालू असतानाच जवळच्या मंदिरातून पहाटेच्या आरतीचा घंटानाद ऐकू आला तसे एका तीव्र झटक्यासर्शी तो खाली कोसळला. काही क्षणात त्याला शुद्ध आली आणि तो म्हणाला “या घरातून बाहेर निघा सगळ्यांनी नाही तर आपले काही खरे नाही”. आम्ही सगळे त्याला घेऊन बाहेर आलो. मी येताना घर नीट बंद केले. घराबाहेर आल्यावर आम्ही त्याला विचारले काय झाले होते तुला..? तुझी अवस्था आम्हाला पाहवत नव्हती. तसे तो म्हणाला “मी उठून लाईट लावली तेव्हा मला कोणीही दिसले नाही पण क्षणभरासाठी माझ्या समोरून एक बाई वाराच्या वेगाने माझ्या दिशेने आली आणि नंतर माझा स्वतःवर चा ताबा सुटला. 

मला ती सेकंद भरा साठी दिसली. संपूर्ण जळाली होती. पण पुढे काय झाले. मला नीट आठवत नाहीये. मी खाली जमिनीवर पडलो होतो ते मला आठवतेय. आम्ही त्याला काहीच बोललो नाही आणि आप आपल्या घरी गेलो. आमच्यातले दोघे त्याला आधी घरी सोडून आले आणि मग ते त्यांच्या घरी गेले. त्या नंतर च्याच रात्री मात्र आम्ही त्या ठिकाणी झोपायला गेलो नाही. जेव्हा त्या घरातले लोक गावावरून परत आले तेव्हा मी त्यांना घडलेला सगळा प्रकार अगदी सविस्तर सांगितला. त्यांना मी हा सगळा काय प्रकार आहे ते विचारू लागलो. 

पण त्यांनी आमची माफी मागितली आणि झाले गेले विसरून जायची विनंती करू लागले. आम्हाला सांगू लागले की याची कुठेही वाच्यता करू नका. आम्ही त्यांच्यावर खूप दबाव टाकून नक्की काय आहे ते सांगायला त्यांना भाग पाडले. तेव्हा त्यांनी सगळी गोष्ट सांगितली. त्या घरात आम्ही येण्याआधी एक कुटुंब राहायचं. त्या नवरा बायको मध्ये खूप वाद व्हायचे. एकदा त्यांच्यातला वाद अगदी विकोपाला गेला आणि त्या बाई ने अगदी टोकाचे पाऊल उचलले. तिने स्वतःला जिवंत जाळून घेतले. त्या नंतर काही महिन्यांनी तिचा नवरा ही डोक्यावर परिणाम होऊन गूढ रित्या मेला. आम्ही त्या बद्दल कधी बोलत नाही म्हणून आम्हाला त्यांचा कधी त्रास झालं नाही. तुम्ही बहुतेक त्यांच्याबद्दल बोलला असाल. आम्ही त्यांचे बोलणे अवाक होऊन ऐकतच राहिलो. 

पुढे त्यांनी ही ते घर सोडून दिले. आजही त्या घरात कोणीही राहत नाही. कदाचित ती अजुनही तिथेच आहे.. त्याच घरात.. 

Leave a Reply