लेखक – श्रीधर देशपांडे

दुपार संपून दिवस आता संध्याकाळ कडे झुकत चालला होता. आम्हाला सगळी कामं आटोपून दुसऱ्या गावी देव दर्शनाला जायचं होतं. आणि मग दर्शन घेऊन पुन्हा आमच्या गावी पर ता य चे होते. 

पण सगळी कामं संपायला बराच वेळ लागला आणि आम्हाला उशीर झाला. पुढचे ठिकाण काही दूर नव्हते. १०-१५ मिनिटांत पोहोचू शकतो. असं म्हणून निघालो. गावापासून थोडेच दूर गेलो असू – नसू गाडी पंक्चर झाली, म्हणून परत आलो, गॅरेज मधे पंक्चर काढलं आणि निघालो. पण ह्या गडबडीत पोहोचायला बराच उशीर झाला. दर्शन वगैरे घेतलं, आणि मागच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसलो.

डिसेंबर महिना होता, संकष्टी चतुर्थी होती. चंद्रोदय तसा उशिराने होणार होता. संध्याकाळी मस्त थंड हवा सुटली होती. मधूनच दिसणाऱ्या लाटा जणू समुद्राचे गीत गात होत्या. नुकताच झालेल्या सूर्यास्त, त्याची पसरलेली लालिमा आणि अथांग समुद्र, भव्यतेची एक वेगळीच व्याख्या सांगत होते. मन प्रसन्न करुन टाकणाऱ्या त्या हवेत अजुन वेळ घालवावा वाटत होतं, पण रात्र होत होती आणि लवकर घरी जायला हवं होतं. ७:३० वाजता तिथून निघालो. लवकर जायचं म्हणून आम्ही शॉर्टकट रस्ता धरला. चैतन्य ला ह्या भागातील बरीच माहिती होती.

बराच वेळ गाडी चालवल्यानंतर आम्ही अजून मुख्य रस्त्याला लागलो नव्हतो. सूर्य कधीचा अस्ताला गेला होता आणि अंधाराची चादर धरेवर पसरली होती. चैतन्य ला मी म्हणालो, ” चल माघारी जाऊया, तिथेच राहू आणि सकाळी लवकर निघू”. पण त्याला चैन पडत नव्हती. तो म्हणाला,” नको आता माघारी बिघारी, पुढे कुणाला तरी रस्ता विचारू, आपलाच एरिया आहे, घाबरु नकोस”. मी बरं म्हणालो, आणि त्याच्या गप्पा ऐकत बसलो. नशीब गाडीत पेट्रोल फुल केलं होतं.

मी घड्याळात बघितलं, ८:३० झाले होते. रस्त्यावर कुठल्याच प्रकारची वर्दळ दिसत नव्हती. गाडी नुस्ती फुफाट्यात धुरळा उडवत चालली होती.

आमच्या गप्पा पण आता संपल्या. आम्ही डोळ्यात बोटं घालून कुणी दिसतंय का ते पाहू लागलो, पण सगळीकडे नुसता अंधार साचून राहिला होता. दूरपर्यंत कुठेही प्रकाशाचा मागमूसही नव्हता. आमची गाडी तेवढी शांततेचा भंग करत चालली होती. चैतन्य सुद्धा आता गाडी हळू चालवत इकडे तिकडे बघत होता. तो जरा गोंधळला होता, मी त्याला विचारलं काय झालं, रस्ता बरोबर आहे ना? पण त्यानं नुसती मान डोलावली, त्याचा अर्थ मला समजला… आम्ही रस्ता चुकलो होतो! बराच वेळ कच्च्या रस्त्याने गाडी चालवून सुद्धा मुख्य रस्ता दिसलाच नाही.

आणखी थोडे पुढे गेल्यावर २ रस्ते फुटलेले दिसले, आणि तिथेच १ म्हातारा हातात काठी घेऊन इकडे तिकडे बघत उभा होता. आम्हाला गाडीच्या प्रकाशात तो दिसताच जरा बरं वाटलं. पटकन आम्ही त्याच्या जवळ नेऊन गाडी थांबवली. पण ते म्हातारं काही आमच्याकडे बघत नव्हतं. त्याला जरा नम्रपणे आम्ही रस्ता विचारला, त्याने नुसता डावा हात उचलून रस्ता दाखवला आणि स्वतः उजवीकडे चालू लागला, जणू आम्हाला रस्ता दाखवणे एवढंच काम त्याला होतं.

आम्ही जरा खूश झालो की आता थोड्या वेळात पोहोचू. त्या आनंदात चैतन्याने बाईक जरा वेगात पळवायला सुरुवात केली. पण पुढच्या काही क्षणांतच त्याला गाडीचा वेग आवरता घ्यावा लागला. सगळे दगड आणि गोटे लागत होते. रस्ता काही दिसत नव्हता. असं वाटलं थोडा असेल खराब , पण पुढेही सगळा दगड धोंड्यांचा रस्ता. “म्हाताऱ्याने गंडवल रे आपल्याला” चैतन्य वैतागून म्हणाला.

” अरे असेल रस्ता पुढे”, मी म्हणालो.

” बघ जरा समोर”, चैतन्य.

मी पुढे बघितलं सगळीकडे जंगलच दिसत होतं. आम्ही कोकणातल्या एका जंगलात रस्ता चुकून आलो होतो. आता इथून बाहेर पडायचं अवघड काम होतं. प्रचंड भीती दाटून आली होती. कोकणातल्या भुतांच्या गोष्टी आठवल्या, पण आमचा त्यावर कुठला विश्वास! त्याहून आम्हाला भीती वाटली ती इथल्या श्र्वापदांची. तिथे अस्वलांचा वावर होता म्हणे, आणि त्यांनी कित्येक लोकांना मारल्याच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. तसेच कोकणातल्या भुताखेतांच्या गोष्टी पण मी ऐकून होतो. पण हे सगळं थोतांड असतं. पण फिरून फिरून विचार तिथेच येत आणि अंगावर काटा येई. आम्ही ठरवलं आता न बोलता गाडी चालवायची, रस्ता येईल तेंव्हा येईल पण आता थांबायचं नाही.

अंधार दाट झालेला आणि आभाळ भरून आल्यासारखं वाटत होतं. गाडी नुस्ती आदळत आपटत चालली होती. आजूबाजूला लहान मोठी झाडं, समोर दगड एवढंच गाडीच्या प्रकाशात दिसत होतं. आता प्रचंड भीतीने दोघांनाही ग्रासून टाकलं होतं. रातकिड्यांची किरकिर एव्हाना सुरू झाली होती. कुठून तरी बेडकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. आम्ही खरोखरच एखाद्या आटून गेलेल्या ओढ्यामधून जात होतो. नुसते गोल गोटे आडवे येत होते. त्यातून गाडी चालवणे म्हणजे एक दिव्यच होते.

आम्ही अगदी त्रासून गेलो. 

घड्याळात ९ वाजले होते. माझ्या एकदम लक्षात आलं, आम्ही इतका वेळ प्रवास करत आहोत, पण नऊच कसे काय वाजलेत? बराच वेळ फिरत होतो आम्ही. माझं लक्ष आजूबाजूला गेलं, पण अंधार इतका गडद होता की काहीच दिसत नव्हतं. समोरच्या प्रकाशात जे काही दिसत होतं तेवढच. जरा लक्ष देऊन पाहिलं, अरे हे उंच झाड मघाशी पण दिसलं होतं. असतात एकसारखी झाडं जंगलात, पण ते झुडूप …. ते पण मघाशी पाहिलंय, आणि तो दगड पण.. मोठ्या ठोकळ्या सारखा आहे, मघाशी पहिला होता. मी चैतन्य ला हे सांगितलं, पण त्याला आधीच हे समजलं असणार बहुतेक. तो मला शांत बसायला सांगत होता. तो चांगलाच भ्याला होता. त्याच्या बोलण्यातला कंप मला लगेच जाणवला. 

थोडा वेळ गेल्यावर मला समजून चुकलं आपण सारखं सारखं एकाच वाटेने जात आहोत. आता तर डोकं चक्रावून गेल्यासारखं झालं. हे जंगल भोवती फिरल्यासारख वाटू लागलं. खरं तर अशावेळी देवाचा धावा करणं अपेक्षित होतं, पण भीतीने बुद्धीवर मात केली होती, सगळीकडे फक्त अंधार दिसत होता, समोर आणि मनात. एकदा, दोनदा, तीनदा…. तीच वाट, तीच झाडी, तेच दगड.. वातावरणही सारखं बदलत होतं. मधेच थंडी वाजायची, ती वाढत जायची आणि अचानक गरम झळा बसू लागत. मधेच वारा बंद होऊन जायचा, मधेच भरारा सुटायचा. आता तर ओठ शुष्क पडत होते. घशातले शब्द घशातच विरून गेले. वारा थांबला. वातावरण एकदम कुंद झालं. 

अशातच कुणाचा तरी चिरका आवाज कानात अगदी जवळ ऐकू आला, ” खंय चल्लस सायबानु, माका पण घेऊन चला”. मी झटकन मान वळऊन मागे पाहिलं. पण अंधारशिवाय काही दिसत नव्हतं. मी चैतन्य ला विचारलं, ” तू काही ऐकलं का रे?”

” नाही, तू पण ऐकू नकोस, मागे पाहू नकोस, काही बोलू नकोस, गप्प रहा”. त्याचा तो स्वर ऐकून मला आता आणखी भीती वाटू लागली होती. आता पुढे काय होणार काही कळत नव्हतं.

हा रस्ता संपेल का? ही रात्र किती वेळ अशीच राहणार? चंद्र कधी उगवणार? आपण नेमके चाललोय कुठे? एकाच जागी फिरत होतो आम्ही. 

विचारांचा कल्लोळ माजला असताना चैतन्य ने गाडी थांबवली. त्याने माझ्या मांडीवर हात मारून दुसऱ्या हाताने समोर पहायचं इशारा केला. गाडीच्या दिव्याचा उजेड जिथवर जात होता त्याच्या पुढे एक पांढरट आकृती एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात होती, अतिशय संथ लयीत. आम्ही दोघे तिकडे बघत असतानाच बाजूच्या झुडपातून ख्याक असा आवाज आला. दोघेही ताडकन उडालो. परत गाडी सुरू केली. चैतन्य जीव तोडून गाडी चालवत होता.

थोडा वेळ गेला असेल, गाडीला कुणीतरी ओढल्यासारखा वेग कमी झाला, कितीही वेग वाढवायचा प्रयत्न केला तरी वेग वाढेना.

तो आवाज परत आला. चैतन्य घाबरला होता, त्याच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरून समजून येत होतं. तो हळूच म्हणाला ” चकवा”. एवढा एकच शब्द त्याने उच्चारला आणि मी एकदम थरारून गेलो. पायातले त्राण निघून गेले, डोकं आता फुटेल की काय असं वाटून गेलं.

आता आपण ह्यातून सुटणार नाही हे स्पष्ट झालं होतं. चकव्यात अडकलो होतो आम्ही. नुसते फिरत होतो एकाच रस्त्याने, दिशाहीन होऊन. माघारी जायची पण काही सोय नव्हती. मघाशीचा तो म्हातारा ह्या सगळ्याला कारणीभूत होता. चैतन्य ने त्याला यथेच्छ शिव्या घातल्या. त्याही त्या वातावरणात विरून गेल्या. काहीही करून बाहेर पडायला हवं म्हणून दात खाऊन तो गाडी चालवत होता.

एक जोराचा झटका बसला, आणि गाडी बंद पडली. दोघे खाली उतरलो, एकमेकांकडे पाहिलं. दोघे जाम घाबरलो होतो. १०-१० वेळा किक मारली असेल दोघांनी, गाडी सुरू होईना. आता तिथे असं थांबणं धोक्याचं होतं. बरेच प्रयत्न करुन झाले. गाडी सुरू नाहीच झाली. आम्ही भीतीने, श्रमाने, भुकेने अगदी अर्धमेले झालो होतो. थंडीच्या दिवसांत घामाने निथळून निघालो होतो. ती भयाण शांतता शरीरात काट्यासारखी टोचत होती.

आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो पण काही दिसत नव्हतं. चैतन्य म्हणाला, ” चल अप्पा, आता चालत जाऊ, जे होईल ते होईल”. पण मला समजत नव्हते, कुठल्या दिशेला जायचं? मी त्याला सांगितलं, ” इथेच थांबू, चालण्याचे त्राण आणि इच्छा माझ्यात नाहीत”.

आम्ही खाली बसलो. मागून कुणीतरी चालत येतंय अस वाटलं. तिकडे बघायची आमची काही हिम्मत होत नव्हती. आता चैतन्य च्या कानापाशी आवाज आला, ‘खंय चल्लस सायबानु…’. खाडकन दोघे उभे राहिलो. गाडी पण कुठे दिसत नव्हती आता. ” अरे आपण गाडी जवळच बसलो होतो ना? कुठे गेली?” 

” अप्पा पळ आता”

दोघे एकमेकांचे हात धरून पळत सुटलो. वाट फुटेल तिकडे नुसते पळत होतो. मागून तो आवाज येतच होता. पण मागे वळून पाहण्याइतकं धाडस दोघांच्यातही नव्हतं. जिवाच्या आकांताने पळत होतो आम्ही. ना रस्ता दिसत होता, ना गाव, ना घरे. आता फक्त पळत राहणे आमच्या हातात होते. आणि अचानक धप्प असा आवाज आला, चैतन्य ठेच लागून पडला होता, आणि मी त्याच्या अंगावरून समोर पडलो. 

आता हळूहळू ग्लानी येते असं वाटू लागलं होतं. तोच समोर लक्ष गेलं. पूर्वेकडून चंद्राचा लाल गोळा वर येत होता. आकाशातले मळभ आता हटू लागले होते. वातावरणातील गरमी कमी कमी होऊन, एक स्निग्ध थंडावा जाणवत होता. थंड हवेची एक झुळूक आमच्या अंगावरून गेली आणि साचलेली भीती क्षणात दूर झाली. मी चैतन्य कडे बघितलं, तो पण उठून बसत होता.

चंद्राचं शीतल चांदणं अवघ्या धरतीवर पसरलं होतं. आजूबाजूची झाडं जणू आनंदाने नाचू लागली होती.दुरून मंदिरातील घंटेचा आवाज अस्पष्ट ऐकू येत होता. समोर आमची गाडी तशीच उभी होती. आम्ही गाडीजवळ गेलो. एका किक मधे गाडी सुरू झाली. हेडलाईट च्या प्रकाशात आडवा गेलेला रस्ता दिसत होता. आम्ही लगेच मुख्य रस्तावर आलो, आणि आमच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तिथेच कुठल्याशा मंदिरातील आरतीचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता,

‘ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ..’

Leave a Reply