अनुभव क्रमांक – १ – प्रदीप आंचन
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एका कॉल सेंटर मध्ये जॉब करत होतो. माझी रोटेशनल शिफ्ट असायची. म्हणजे आठवड्याच्या हिशोबाने कधी डे शिफ्ट तर कधी नाईट शिफ्ट. दिवसा काम करायला मला खूप आवडायचे. कारण मला दररोज लवकर घरी जाता यायचे. डे शिफ्ट असली की मी ८-८.३० ला घरी पोहो चायचो. पण नाईट शिफ्ट असली की घरी यायला बराच उशीर व्हायचा. जवळपास १ वाजून जायचा म्हणून मी खूप वैतागायचो. मला रात्री काम करायला अजिबात आवडायचे नाही. पण माझा ही नाईलाज होता.
अश्याच एका दिवशी माझी नाईट शिफ्ट होती. ती संपल्यावर मी ऑफिस बिल्डिंग च्या खाली येऊन थांबलो. आम्हाला कंपनी कडून पीक अप आणि ड्रॉप ची सर्व्हिस मिळायची. आणि ड्रॉप कार साधारण १२ पर्यंत येऊन थांबायची पण त्या दिवशी कार बिघडल्यामुळे ड्राइव्हर ला कार घेऊन यायला सव्वा वाजला. मला माहित होते की त्या रात्री अमावस्या होती. त्यामुळे मला जरा अस्वस्थ वाटत होत. इतर दिवसांपेक्षा जरा वेगळे च वाटत होते इतके मात्र नक्की. त्याला कारणही तसेच होते. माझ्या परिसरात रात्री अप रात्री एक बाई फिरताना दिसते असे ऐकण्यात आले होते. आणि पैंजण चा आवाज ऐकू येतो.
आता मला असा अनुभव कधी आला नव्हता जरी मी नाईट शिफ्ट असताना रात्री उशिरा यायचो तरीही. त्यामुळे तशी चिंता नव्हती. पण आज सगळ्या गोष्टी अगदी जुळून आल्या होत्या. म्हणजे अमावस्या, घरी पोहोचायला उशीर आणि कारण नसताना वाटत असणारा अस्वस्थ पणा त्यामुळे का कोण जाणे नुसती कुणकुण लागून राहिली होती. साधारण १.३० ला आमची ड्रॉप कार निघाली आणि जवळपास अडीच च्याच सुमारास माझ्या वस्ती मध्ये पोहोचली. जिथं पर्यंत कार यायची तिथून माझे घर अवघ्या २-३ मिनिटांवर होते. अमावस्या असल्यामुळे परिसरात गडद अंधार पसरला होता. त्यात भरीस भर म्हणून माझ्या परिसरातील लाईट स ही गेले होते.
मी कार मधून उतरलो आणि माझ्या घराच्या दिशेने चालू लागलो. ते काही पावलांचे अंतर ही काही किलोमीटर सारखे भासत होते. एक अनामिक भीती दाटून येत होती. तितक्यात अजुन एक गोष्ट आठवली की ती बाई अमावस्येच्या रात्री लोकांना दिसली आहे. माझ्या डोक्यात पण कसले विचित्र विचार येत होते काय माहीत. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले. ८-१० पावले चाललो असेन आणि तितक्यात माझा मागून कोणी तरी चालत येतेय असे वाटले आणि काळजात अगदी धस्स झाले. त्यात पैंजण चा आवाज येऊ लागला आणि माझी चांगलीच तंतरली. सगळ्यात भयंकर म्हणजे माझ्या पवलांसोबत तो आवाज ही येत होता. मी एका क्षणी थांबलो तसे तो आवाजही थांबला. मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती.
मी पुन्हा चालायला सुरुवात केली. अगदी दबक्या पावलांनी चालू लागलो. पण मी जसे चालणे सुरू केले तसे तो आवाजही पुन्हा येऊ लागला. मी थांबलो की तो आवाजही थांबायचा. मी चालायला सुरुवात केली की तो आवाज पुन्हा यायचा. मला थोरा मोठ्यांनी सांगितलेले सगळे आठवू लागले की असे काही जाणवले तर मागे वळून पहायचे नाही. म्हणून मी देवाचे नाव घेत चालण्याचा वेग वाढवला. पुढच्या काही मिनिटात मी माझ्या घरी पोहोचलो. त्या रात्री घरी काही सांगितले नाही पण दुसऱ्या दिवशी मी आई ला घडलेला प्रकार सांगितला. आई म्हणाली की बरे झालेस तू मागे वळून पाहिले नाही. मी ही ऐकले आहे या प्रकाराबद्दल. तुझे नशीब चांगले होते म्हणून तू वाचलास.
त्या नंतर काही दिवसात मी दुसरा जॉब बघितला. खास करून जिथे मला नाईट ड्युटी करावी लागणार नाही. आणि मला हवा तसा जॉब मिळाला सुद्धा. त्या नंतर रात्री बाहेर पडायचा योग अजुन पर्यंत तरी आला नाही हे माझे भाग्यच असावं.
अनुभव क्रमांक २ – स्वप्नील घांगुर्डे
अनुभव माझ्या काकांसोबत घडला होता. हा प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी एका गावा ठिकाणचा आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु होते. काका सहज म्हणून त्यांच्या मित्रा कडे रात्री जेवायला गेले होते. त्यांचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. ते गाव काकांच्या गावापासून साधारण ५ किलोमीटर अंतरावर असेल. त्या काळी वाहनांची सोय ही तितकीशी नव्हती. आणि त्यात गावाचा परिसर म्हंटला की अगदीच कमी. रात्रीचे जेवण आटोपल्यावर ते गप्पा करत बसले. खूप दिवसांनी मित्रासोबत गोष्टी करत असल्याने वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. खूप उशीर झाला होता. ते मित्राला म्हणाले की मला निघायला हवे. मित्राने ही त्यांना राहायचा आग्रह केला पण बाजूच्याच गावात घर असल्याने ते घरी जायला निघाले.
संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. ते साधारण २ वाजता त्यांच्या घरी जायला निघाले. गावाच्या वेशी जवळ एक पडका पुल होता. अर्ध्या तासात ते गावाची वेस ओलांडून त्या पुलावर आले. आता अंधार अधिकच गडद झाला होता. कारण त्या भागात कोणतीही घरं किंवा वस्ती नव्हती. परिसर अगदी निर्मनुष्य होता. तो पुल ओलांडून ते पुढे गेले तसे त्यांच्या मागून कोणीतरी चालत येतंय असे त्यांना वाटू लागले. सुरुवातीला त्यांना वाटले की आपल्याला भास झाला असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले आणि ते आपल्या वाटेने चालत राहिले. पण हळु हळू तो आवाज त्यांच्या जवळ येऊ लागला. एका क्षणी न राहवून ते थांबले. तसा तो आवाज थांबला पण त्यांना पैंजण चा आवाज येऊ लागला.
इतक्या भर रात्री या निर्जन ठिकाणी कोण असेल हा विचार करत च त्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढला. त्यांच्या हृदयाची धड धड हळु हळु वाढू लागली होती. प्रत्येक क्षणाला तो आवाज त्यांच्या अधिकच जवळ येत होता. त्यांचे वेगाने चालणे सुरूच होते. आपल्या गावाच्या वेशीवर येऊन पोहोचले आणि तो आवाज यायचा ऐकाएकी बंद झाला. तसे त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण पुढच्या क्षणी त्यांना मागून आवाज ऐकू आला. कुठे चाललाय.. तो आवाज एका बाई चा होता. त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांना कळून चुकले होते की आपण अजुन या घेऱ्यातुन सुटलो नाही. ते होते त्या जागीच थांबले आणि त्यांना दुसरा आवाज ऐकू आला. कुठे चाललाय. प्रश्न तोच होता पण या वेळी आवाज एका पुरुषाचा होता.
आता आपले काही खरे नाही असा विचार करत ते सरळ धावत सुटले. तितक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. वाटेत एक ओहोळ लागायचा. तो अगदी तुडुंब भरून वाहत होता. त्यांना जरा विचित्र च वाटले की संध्याकाळी येताना त्यात इतके पाणी नव्हते आणि पाऊस ही नुकताच सुरू झालाय तरीही इतके पाणी कसे. ते जेमतेम तो ओढा पार करून पुढे आले पण आता समोरचा रस्ता ही पाण्यामुळे दिसेनासा झाला होता. ते अंदाज घेत एक बाजू धरून चालू लागले. आपल्या मागे सतत कोणी तरी अजूनही आहे याची चाहूल त्यांना पावलो पावली जाणवत होती. ते वस्ती च्या भागात पोहोचले तसा मागून एक काळीज पिळवटून टाकणारा आवाज कानावर पडला. माहीत नाही त्यांच्या मागे नक्की कोण होते.
पुढचे काही दिवस काका तापाने फणफणत होते. त्यांना नीट शुद्ध ही नव्हती. पण नंतर त्यांनी घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांना कळले की त्या भागात एका नाव विवाहित दाम्पत्याचा पुलाकडच्या पाण्यात बुडूनी मृत्यू झाला होता. ते आजही रात्री अपरात्री तिथून जाणाऱ्या लोकांना अडवतात.