अनुभव – तेजल चोरगे
घटना साधारण २० वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा ७-८ वर्षांची असेन. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही दरवर्षी गावी जायचो. त्या वर्षी ही आम्ही नेहमी प्रमाणे गावी गेलो होतो. आमच्या गावचं घर तीन खोल्यांच. लहान कौलारू, शेणानं सारवलेला लांब व्हरांडा, त्याच्यापुढे मोठ अंगण, घराच्या समोरच्या बाजूला पसरलेले डोंगर. अगदी निसर्गाच्या सानिध्यात म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आजूबाजूला जेमतेम चार ते पाच घर. तेही सात ते आठ मीटर च्याच अंतरावर. त्यावेळी घरी फक्त माझे आजोबा राहत असत. आजी आदल्या वर्षी वारली होती. आम्ही गावी गेल्यावर माझ्या दोन आत्या आणि त्यांची फॅमिली असे सगळेच आम्ही काही दिवस एकत्र यायचो. घर अगदी भरून जायचं.
उन्हाळ्यात घरामध्ये खूप उकडायचं त्यामुळे आम्ही सर्व बाहेर व्हरांड्यात झोपायचो. त्यादिवशी आमच्या सगळ्यांची जेवण आटोपल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. माझा कधी डोळा लागला कळलेच नाही. मध्यरात्री अचानक मला जाग आली. दोन ते तीन वाजले असावेत. माझ्या शेजारी उजव्या बाजूला माझी आत्या झोपली होती. मी अचानक अंथरुणात उठून बसले आणि आजी बाजूला पाहिले तर सर्व गाढ झोपेत होते. माहीत नाही मला अचानक जाग का आणि कशी आली. मी जास्त विचार न करता पुन्हा अंथरूणात पडले आणि डोळे बंद करणार तितक्यात माझी नजर समोरच्या दिशेला गेली. अंगणाच्या पुढे एक कट्टा होता. त्या कट्ट्यावर कोणीतरी उभं होतं.
मी झोपेत असल्यामुळे मला नीट कळले नाही की खरंच कोणी उभे आहे की मला भास होतोय. पण मी नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. तिथे खरच कोणी तरी उभ होत. त्याचे फक्त डोळे चमकत होते. एक हात बाजूच्या खांबावर ठेऊन माझ्याकडे पाहत होत. कळत नव्हत नक्की कोण आहे. खांबावरचा उजेड असला तरी चेहरा नीट दिसत नव्हता. या आधी मी कधी भुता खेतांच्या गोष्टी कधीच ऐकल्या नव्हत्या. म्हणजे मी लहान होते म्हणून मला कधी कोणी सांगितल्या नव्हत्या. त्यामुळे समोर उभी असलेली व्यक्ती कोणीतरी वेगळीच आहे हे कळायला मला जरा वेळच लागला. ती कोण आहे हे बघण्यासाठी मी तिच्याकडे बघत होते. डोळ्यांवर ताण देऊन नक्की कोण आहे हे पाहण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण मग मला जरा अस्वस्थ वाटू लागले.
अचानक माझं अंग जड वाटू लागलं. मला काही हालचाल करता येईनास झालं. मला कोणी तरी जखडून ठेवलं होत. मी उठायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. साधं एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताही येत नव्हत. जोरात ओरडावसं वाटत होत पण माझ्या तोंडातून आवाज येईना. मी डोळे तिरके करून माझ्या बाजूला झोपलेल्या आत्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होते. या आशेने की कदाचित तिला जाग येईल आणि ती माझी यातुन सुटका करेल. पण तसं काही घडलं नाही. माझी नजर सारखी समोर जात होती. आणि ते जे काही होते ते माझ्याकडे बघत होते. माझी सुरू असलेली केविलवाणी धडपड ट्यूबलाइट च्या प्रकाशात जे काही होते त्याला स्पष्ट दिसत असावी. ते काहीही हालचाल करत नव्हते.
हळु हळु मला जाणवू लागले की जणू ते मला आपल्या वर मोहिनी घालण्याचा प्रयत्न करतेय. मी भीतीने संपूर्ण ओलीचिंब झाले होते. आपल्यावर आरूढ होतंय. एका क्षणी तरी मला असे वाटू लागले की मी खालून खेचली जातेय. माझा पाय खेचून ते मला घेऊन चाललेय. मला कळत नव्हते की मला हा भास होतोय की माझ्या सोबत हे खरच घडतंय. मी खरच खूप घाबरले होते. काय करावे, कोणाला सांगावे आणि कसे सांगावे मला काहीच कळेनासे झाले होते. मला फक्त एकच मार्ग दिसत होता. जर हे सगळे नजरेतून होत असेल तर.. ? कारण समोर जे आहे ते माझ्यापासून बरेच लांब आहे. कदाचित मी समोर पाहणे बंद केले तर मी यातून बाहेर पडू शकते.
मी देवाचे नाव घेतले आणि डोळे घट्ट बंद केले. मी ठरवले की आता काही झाले तरी डोळे उघडायचे नाही. माझ्या हृदयाची धड धड प्रचंड वाढली होती. मी या आधी इतकी भीती कधीच अनुभवली नव्हती. मनात नको नको ते विचार येत होते. डोळे बंद केलेत खरे पण आपण यातून सुखरूप बाहेर पडू शकू की नाही. या विचारातच मला झोप कधी लागली कळलेच नाही. सकाळी घरच्यांच्या आवाजाने जाग आली आणि झटकन अंथरुणात उठून बसले. रात्री घडलेला प्रकार एखाद्या चित्र फितिसारखा सर्रकन डोळ्या समोरून सरकून गेला. पण सकाळी थोडे भानावर होते म्हणून वाटले की काल रात्री जे घडले ते खरच घडले की माझे स्वप्न होते. काही कळायला मार्ग नव्हता. घरी सांगू की नको याच विचारात पडले होते.
शेवटी बराच विचार केल्यानंतर एका निष्कर्षाला येऊन पोहोचले की काल रात्री आपल्या सोबत घडलेला प्रकार म्हणजे एक स्वप्नच होत. म्हणून मी त्या बद्दल कोणाला न सांगण्याचा निर्णय घेतला. बरीच वर्ष उलटली. त्या नंतर अश्याच एका वर्षी आम्ही पुन्हा गावी गेलो. मी, माझी मोठी बहीण आणि माझे आजोबा जेवण आटोपून अंगणात गप्पा मारत बसलो होतो. वातावरण अगदी शांत आणि प्रसन्न वाटत होत. वर्षातून एकदा किंवा कधी दोनदा आम्ही गावी यायचो. तिथला निसर्ग रम्य परिसर, शांत वातावरण अगदी हवे हवे से वाटायचे. आमच्या गप्पा सुरू होत्या. बाहेर पडलेला अंधार बघत असताना माझी नजर त्या कट्ट्याकडे गेली. तसं मला बऱ्याच वर्षांपूर्वी घडले ला तो प्रकार आठवला.
एक विचित्र गोष्ट म्हणजे अजूनही मला सगळं जसच्या तस आठवत होतं. म्हणजे इतक्या लहानपणी च्याच आठवणी सहजा सहजी लक्षात राहत नाही. पण घडलेला प्रकार तो प्रसंग काही तरी वेगळाच होता म्हणून कदाचित मला सगळे नीट आणि स्पष्ट आठवत होते. आमच्या गप्पा चालू असतानाच मी तो सर्व प्रकार माझ्या आजोबांना सांगायच ठरवल. बोलता बोलता मी विषय काढला आणि आजोबांना सगळे सांगितले. माझे बोलणे ऐकुन माझ्या बाजूला बसलेल्या मोठ्या बहिणीने चक्क त्याचे वर्णन करायलाच सुरुवात केली. तिने केलेले वर्णन अगदी तंतोतंत जुळत होते. इतक्या वर्षानंतर मला कळले की जे घडले ते स्वप्न नव्हते.
तो प्रकार माझ्यासोबत खरच घडला होता. हे सर्व ती सांगत असताना मी तिच्याकडे आश्चर्याने बघत तिला विचारले हे सर्व तुला कसं कळालं, मी अजून पर्यंत तरी कोणाला सांगितलं नाही. आज मी पहिल्यांदा हे सगळे सांगतेय. तेव्हा ती बोलू लागली, त्या रात्री मला पण जाग आली होती. तुझ्या एका बाजूला आत्या झोपली होती आणि दुसऱ्या बाजूला मी होते. मला माहित नव्हते की माझ्या बरोबर त्या रात्री तू ही जागी होतीस. मी त्या जागेवरून उठून आपल्या आई कडे जात असताना तू नकळत माझा फ्रॉक एका हाताने घट्ट पकडून ठेवला होता. आणि मला मागे खेचत होतीस. ते ऐकून आता मला कळेना की एवढी मोठी गोष्ट मी कशी काय विसरून गेले की माझी मोठी बहीण सुद्धा त्या रात्री माझ्या बाजूला झोपली होती आणि ते सर्व अनुभवत होती.
त्या एका रात्री व्यतिरीक्त आम्हांला असा अनुभव पुन्हा कधीच नाही आला. पण का कोण जाणे अजूनही मला कधी कधी असं वाटतं की तो अनुभव मला पुन्हा नक्की येईल.