तरुण असताना बहुतेकांना एक वेगळाच जोश, काही तरी वेगळे करण्याची इच्छा असते. मग एखादी गोष्ट करू नये असे सांगितल्यावर मात्र त्यांना अजुन हुरूप येतो. पण नंतर असे काही होऊन बसते ज्याने आयुष्यभरासाठी शिकवण मिळते. असाच हा एक भयाण अनुभव.
अनुभव – दर्शन खैरनार
मी मूळचा मुंबईत राहणारा. पण मुंबई पासून बऱ्याच लांब एका इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मी एडमिशन घेतले होते. माझे एडमिशन इतरांपेक्षा बरेच लवकर झाले होते त्यामुळे मी तिथल्याच एका हॉस्टेल मध्ये शिफ्ट झालो. अजुन जास्त मुलं आले ही नव्हते. अर्धा जुलै महिना संपला. आम्हीच काय ते २४-२५ विद्यार्थी होतो. पण काही आठवड्यांनी हळु हळु नवीन एडमिशन होत गेले आणि मुलांची संख्या वाढत गेली. नवीन मित्र होऊ लागले. सुरुवातीचे काही दिवस खूप धमाल मस्ती केली. सर्व व्यवस्थित चालले होते. मला २ रूम मेट्स ही मिळाले सार्थक आणि विशाल. तसे तर त्या हॉस्टेल ला ४ मजले होते पण आम्हाला तिसऱ्या मजल्यावर रूम मिळाली होती. आमचे क्लासेस नियमित पणे सुरू झाले. सगळे काही नीट सुरू होते. ४ ते ५ दिवस उलटले असतील. माझ्या असे लक्षात आले की आमच्या वरचा चौथा मजला नेहमी रिकामा असतो. म्हणजे तिथे कोणीच राहत नाही. आणि कधी कोणी वर जाताना किंवा तिथून येताना ही दिसत नाही. मला जरा प्रश्न च पडला म्हणून मी सार्थक आणि विशाल ला या बाबत विचारले. पण त्यांना ही काही माहीत नव्हते.
म्हणून मग आम्ही ठरवले की या बाबत सिनियर स् ना विचारावे. त्याच दिवशी क्लासेस आटोपल्यावर आम्ही त्यांना हॉस्टेल जवळ भेटलो आणि ४ थ्या मजल्याबद्दल विचारपूस केली. त्यावर त्यांनी सांगितले की त्या मजल्यावर कोणी च जास्त नाही. तिथल्या सगळ्या खोल्या कायम बंद असतात. आम्हाला जास्त काहीच माहीत नाही पण आम्ही असे ऐकले आहे की त्या मजल्यावर च्याच शेवटच्या खोलीत काही तरी विपरीत घडले होते म्हणून ती खोली आणि बाजूच्या इतर खोल्या बऱ्याच वर्षांपासून बंद आहेत. त्या मजल्यावर फक्त कोपऱ्याला एक लाईट आहे, त्यामुळे नेहमी तिथे अंधार पसरलेला असतो. आम्ही त्यांचे असे बोलणे ऐकून एकमेकांकडे पाहू लागलो. तसे ते आमच्याकडे पाहत आम्हाला बजावत म्हणाले “तुम्ही कसला विचार करताय.. तिथे जाण्याचा प्रयत्न ही करू नका..” आम्ही त्यांना हो म्हंटले आणि आमच्या खोलीत आलो. पण सिनियर स कडून अशी गोष्ट ऐकल्यावर मात्र मला कमालीची उत्सुकता लागली होती. त्या मजल्यावर खास करून त्या शेवटच्या खोलीत काय असेल.
एखादी गोष्ट करू नये सांगितल्यावर ती गोष्ट करण्यातच खरी मजा आहे असा विचार येऊन गेला. आणि त्यात मला खूप कुतूहल वाटायचे अश्या गोष्टींबद्दल. त्या रात्री मी, सार्थक आणि विशाल जेवण उरकून खोलीत आलो. माझ्या डोक्यातून तो विचार जाताच नव्हता. मी त्या दोघांना विचारले ” आपण तिथे जायला पाहिजे.. आणि नक्की काय प्रकार आहे ते पाहायला पाहिजे.. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कॉलेज मध्ये आपले नाव होईल.. बोला काय म्हणतात..” तसे ते माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. विशाल आधीच जरा टरक्या होता म्हणून त्याने लगेच माघार घेतली. पण सार्थक मात्र माझ्यासोबत यायला तयार झाला. तसे रात्री सगळे झोपल्यावर आम्ही वरच्या मजल्यावर जाऊन नक्की काय आहे याचा सोक्ष मोक्ष लावायचा निर्णय घेतला. आम्ही रात्री ३ चा अलार्म लावला आणि झोपून गेलो. मला तर झोपही लागली नाही. ३ वाजता मी आणि सार्थक उठलो, टॉर्च आणि मोबाईल घेतला. एव्हाना विशाल ही उठला होता. आमच्यापेक्षा त्यालाच जास्त टेन्शन आले होते.
पण आम्ही त्याला सांगितले की कोणालाच या बद्दल सांगू नकोस. त्यावर अगदी घाबरून त्याने होकारार्थी मान डोलावली. हळूच आमच्या रूम चा दरवाजा उघडून बाहेर आलो. दबक्या पावलांनी आम्ही वर ४ त्या मजल्यावर आलो. आम्हा दोघांचे सगळ्यात जास्त लक्ष त्या शेवटच्या खोली कडे होते की त्या मजल्याच्या अगदी कोपऱ्यात होती. त्या दिशेला बराच अंधार ही होता. वर पोहोचल्यावर मी पुन्हा सगळीकडे आणि खालच्या मजल्यावर नजर फिरवली. आम्हाला इथे आल्याचे कोणी पाहिले तर नाही ना.. ही खात्री करून घेतली. टॉर्च च्याच प्रकाशात अगदी दबकत आम्ही त्या खोली जवळ जाऊ लागलो. माझ्या मनात भीती पेक्षा तिथे काय आहे हे जाणून घेण्याचे कुतूहल जास्त होते. काही मिनिटात आम्ही त्या खोली जवळ येऊन पोहोचलो. दरवाजा बंद होता. आम्ही दाराला कान लाऊन काही ऐकू येतंय का ते बघू लागलो. सुरुवातीची ४-५ मिनिट काहीच जाणवले नाही पण नंतर अचानक आतून वारा वाहण्याचा आवाज येऊ लागला. विशेष म्हणजे त्या रात्री सगळे काही अगदी शांत होते. त्यात वरच्या मजल्याच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या म्हणजे तसे बाहेरून दिसायचे.
त्यामुळे मी विचारात पडलो की हा आवाज नक्की कसला येतोय. तितक्यात सार्थक ने पाहिले की खोलीच्या बाजूला असलेल्या खिडकी ला एक फट आहे आणि त्यातून आत पाहता येतय. तसे तो आत काही दिसतय का ते पाहू लागला. तेवढ्यात अचानक तो हवेतच कंबरेतुन वाकला व खाली कोसळला. मी त्याला जेमतेम सावरले, तो घामाने संपूर्ण ओला चिंब झाला होता आणि भीतीने अक्षरशः थरथर कापत होता. मी त्याला धीर देत शांत करत दबक्या आवाजात विचारले “काय रे.. काय झाले.. तोल का गेला तुझा..” त्यावर तो जे म्हणाला ते ऐकून माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. तो म्हणाला “मी जेव्हा आत डोकावून पाहिले तेव्हा सुरुवातीला काही दिसले नाही कारण आत बराच अंधार होता. तरीही बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईट च्याच प्रकाशात धूसर से दिसत होते म्हणून मी आत संपूर्ण खोली न्याहाळू लागलो. मला समोरच्या भिंतीवर एक काळपट आकृती तयार होताना दी सू लागली. मी तुला हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तितक्यात तीच आकृती खोलीतल्या बेडवर बसलेली दिसली. तिचे फक्त पांढरे शुभ्र डोळे च दिसत होते. आणि बघता बघता अतिशय वेगात ती माझ्या दिशेने झेपावली आणि माझा तोल गेला.”
त्याचे असे बोलणे ऐकून आता माझा ही धीर सुटू लागला. तितक्यात एकदम सगळे काही शांत झाले. आणि आतून पावलांचा आवाज येऊ लागला. बुट घालून कोणी तरी चालतं य असा.. मी कानोसा घेऊ लागलो तसा आवाज वाढत गेला. आणि असे वाटू लागले की आत जे कोणी आहे ते आता कोणत्याही क्षणी बाहेर येईल. पण हे सगळे एवढ्या वर च थांबणार नव्हत. आम्हाला आधार असणारा त्या मजल्यावर चा दुसऱ्या कोपऱ्यात ला एक लाईट ही बंद झाला. लाईट गेली होती. मी ठरवले की तिथे जास्त वेळ न थांबता थेट आपल्या खोली कडे पळ काढावा तसे मी सार्थक ला खुणावले. पण त्याला काय झाले होते कुणास ठाऊक. मोहिनी घातल्या सारखे तो त्या खोली कडे एक टक बघतच होता. त्याला भानावर आणायचा प्रयत्न केला पण तो त्यात अडकला होता बहुतेक. शेवटी मी त्याचा हात धरून खेचला आणि त्याला घेऊन तिथून पळत सुटलो. काळीज भीती ने धड धडत होत. आम्ही कसेबसे आमच्या रूम वर आलो आणि आत शिरल्यावर मला अजून एक मोठा धक्का बसला.
सार्थक जो मघापासून माझ्या सोबत होता, ज्याचा हात धरून खेचून मी त्याला घेऊन आलो होतो तो चक्क विशाल सोबत रूम वर आधीच येऊन बसला होता. मी झटकन मागे वळून पाहिले पण मागे कोणीही नव्हते. मग मी ज्याचा हात धरून घेऊन आलो तो कोण होता..? मी घाबरून आमच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि आत आलो. आत शिरल्या शिरल्या सार्थक ने मला मिठी मारली आणि रडू लागला. मी मात्र प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत च राहिलो. मी न राहवून त्याला विचारले “तू माझ्या आधीच इथे कसा काय आलास.. आपण सोबत आलो आणि तू माझ्या मागे होतास..”. त्यावर तो म्हणाला “जेव्हा आपल्याला आतून चालण्याचा आवाज आला तेव्हाच माझा धीर खचला आणि मी तुला सोडून तिथून पळत सुटलो. पण तू माझ्या मागे का आला नाहीस.. मला कळून चुकले होते की जेव्हा मी पुन्हा त्या आवाजाचा कानोसा घेत होतो तेव्हा च सार्थक बहुतेक पळून गेला, आणि मागे वळून मी ज्याला भानावर आणायचा प्रयत्न केला, ज्याचा हात धरून धावत सुटलो तो सार्थक नव्हताच. हा सगळा विचार करून मेंदू बधीर व्हायची पाळी आली होती पण आम्हाला अजून बऱ्याच भयंकर गोष्टींना सामोरे जायचे होते.
तितक्यात कोणी तरी अतिशय जोरात आमच्या खोलीचा दरवाजा बड वू लागले. आम्ही जीव मुठीत धरून आत बसलो होतो. संपूर्ण ताकदीनिशी कोणीतरी दारावर प्रहार करत होते. आणि त्या नंतर एक वाक्य कानावर पडले ” ए चल बाहेर निघ..” आणि आमचा उरला सुरला त्राण ही संपला. कारण तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून माझाच होता. माझ्याच आवाजात बाहेरून कोणी तरी बोलत होत. सगळ्यात भयानक आणि विचित्र गोष्ट म्हणजे तो आवाज बाजूच्या इतर रूम मधल्या कोणालाच येत नव्हता. तो फक्त आम्ही ऐकू, अनुभवू शकत होतो. आम्ही तिघही एकमेकांचा हात धरून देवाचा धाव करू लागलो. बऱ्याच वेळानंतर तो आवाज बंद झाला आणि हॉस्टेल मधले लाईट ही आले. पुढचा एक क्षण ही वाया न घालवता आम्ही थेट सिनियर च्याच रूम वर गेलो. त्यांच्याकडे जाऊन एखाद्या लहान मुलासारखे रडू लागलो आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते आमच्यावर चिडून च म्हणाले “तुम्हाला कोणी सांगितले होते हिरो बनाय ला..?” ते म्हणाले की तुम्ही थांबा इथे आम्ही जाऊन बघून येतो. त्यातले ३-४ जण त्या मजल्यावर पाहायला गेले.
आम्ही त्यांच्याच खोलीत थांबलो होतो. साधारण १० मिनिटांनी ते परत आले. त्यांची ही अवस्था काही नीट दिसत नव्हती. ते म्हणाले की आम्ही त्या शेवटच्या खोली पर्यंत गेलो ही नाही. दुरूनच पाहिले तर त्या खोलीचा दरवाजा उघडा होता. या सगळ्या प्रकारात पहाटेचे ५.३० केव्हा होऊन गेले मला कळलेच नाही. आम्ही ठरवले की सकाळी हॉस्टेल रेक्टर कडे जाऊन घडलेला प्रकार सांगायचा पण जेव्हा आम्ही त्यांना या बद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले की अश्या अफवा बाहेर पसरवू नका, इथे राहायचे नसेल तर निघून जा इथून..” त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट जाणवत होत की त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण हॉस्टेल चे नाव खराब होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला काहीच खरे सांगितले नाही. साधारण आठवड्या भरा नंतर आम्ही दुसऱ्या सिनियर ला विचारले तेव्हा ती म्हणाली की या बद्दल सहसा कोणी जास्त बोलत नाही. पण तुम्ही केलेले उपद्व्याप पुन्हा करू नये यासाठी सांगतो. त्या मजल्यावर बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तिथं कोणी राहूच शकत नाही. कारण सुरुवातीला काहींनी प्रयत्न केले पण त्यांना विचित्र अनुभव येऊ लागले त्यामुळे मग ती रूम आणि ती मजला अगा पूर्णपणे बंद केला आहे.
आम्ही फुशारक्या मारायला गेलो खरे पण आम्ही सुदैवाने वाचलो त्यातून. मी नंतर त्या गोष्टी चा कधीच जास्त विचार केला नाही. तो अनुभव ही विसरायचा बराच प्रयत्न केला पण कधी कधी त्याची आठवण झाली की संपूर्ण प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. या प्रसंगानंतर मात्र मी असे हे धाडसी कृत्य करणे कायमचे बंद केले.