लेखक – विनीत गायकवाड

हा अनुभव माझ्या आत्याला त्या कॉलेजमध्ये असताना आला होता.  माझ्या आत्याचे नाव जेसी आहे. जेसी आत्या कॉलेजच्या ‘स्काऊट अँड गाईड’ च्या संघामध्ये सहभागी होत्या. त्याच निमत्ताने त्यांना जागोजागी कॅम्पिंगसाठी जावे लागायचे.

१९९७-९८ चे वर्ष असेल. हिवाळ्याचे दिवस होते जेव्हा त्यांच्या ट्रीपचे वेळापत्रक प्रकाशित झाले. त्यांच्या गटाच्या मुलींसाठी ठिकाण ठरवण्यात आले होते. तिथल्याच एका ‘व्हॅली  साईड’ म्हणजे दरी कडेला असलेल्या रिसॉर्टमध्ये दोन दिवसांचे बुकिंग झाले. पुढच्या पाच दिवसात पूर्व तयारी करून त्यांची साठ मुलींची पलटण रवाना झाली. प्रवास तसा पहाटेच सुरू झाला होता पण रस्त्यात बस खराब होणे, बसचा टायर पंचर होणे, नाष्टा-जेवण करायला उशीर होणे इत्यादी कारणांमुळे त्यांना महाबळेश्वरला पोहचता पोहचता संध्याकाळ झाली.

डोंगराळभाग असल्यामुळे आता पर्यंत अंधारही पडला होता. तेव्हा लवकरात लवकर रिसॉर्टमध्ये चेक इन करून जाम बसवायचा असा त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या कॉलेजच्या मॅडमचा उद्धेश होता.

रिसॉर्टच्या एका खोलीत पाच मुलींच्या राहायची व्यवस्था केली गेली होती. खोली आईस पाईस असल्यामुळे कुणालाही तसा त्रास नव्हता तरी सगळं स्थिर होऊ पर्यंत रात्रीचे साडे आठ वाजून गेले होते.

रिसॉर्टच्या पटांगणात शेकोटी पेटवून सगळ्या मुली जमल्या.

शेकोटी भोवती विविध खेळ उरकून जेवणाचा कार्यक्रम पार पडला. कोळश्याच्या चुलीवर तयार केलेल्या मटण आणि कोल्हापुरी हंडीवर सर्वांनी ताव मारला.

पुढचा तास भर गाण्यांच्या भेंड्यांची मेहफील जमली. नव्वदच्या दशकापासून ते मागे सत्तरच्या दशकापर्यंतच्या सगळ्या लोकप्रिय हिंदी गाण्यांची हजेरी लागली. गाणी आटोक्यात येताच भुतांच्या गोष्टींचे किस्से सुरू झाले.

“माझ्या काकांनी हे पाहिले”..”माझ्या मामांनी ते बघितले”..”माझ्या मावशीला हे दिसले”, असे अमानवीय अनुभवांचे किस्से त्या चटचट करणाऱ्या शेकोटी भोवती रंगून सांगितले जात होते.

रिसॉर्टचा बाहेरचा परिसरही आता शांत झाला होता. निळ्या चंद्रप्रकाशात दऱ्या खोऱ्यातुन येणाऱ्या वाऱ्याची झुळूक अंगावर सरसरून काटा आणत होती. जसा जसा पारा खाली पडू लागला तसे काही हात अंगाभोवती शाल आणि स्वेटर आणखीन घट्ट आवळू लागले. गारवा जास्त वाढत आहे हे जाणवताच त्यांच्या मॅडमने सगळ्यांना गप्पा आवरत्या घ्यायला सांगितले. ज्या मुलींनी भुतांच्या गप्पा जास्तच मनावर घेतल्या होत्या त्यांनी सर्वात आधी आपल्या खोलींकडे धूम ठोकली त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या मुली आणि सगळ्यात शेवटी त्यांच्या मॅडमने आपल्या खोलीकडे प्रस्थान केले.

जेसी आत्या आणि त्यांच्या मैत्रिणीही आपल्या खोलीकडे आले. खोलीत अंधार होता. ट्युबलाईटचे  बटन दाबून आत्या त्यांच्या खाटेकडे वळाल्या. त्यांची खाट खिडकी शेजारी होती. थंडी असल्यामुळे त्यांनी खिडकी बंदच ठेवली होती. पूर्ण दिवसाचा थकवा होता म्हणून त्यांना झोपही लगेच लागली. बाहेर पेटवलेली शेकोटी त्या गर्द थंडीत विझू लागली होती.

काही तास लोटले असतील. आत्या गाढ झोपेत असताना त्यांच्या कानावर एका जुन्या चित्रपटाचे गाणे दबक्या स्वरात पडले. झोपेमुळे त्यांना ते आतापर्यंत ऐकू गेले नसावे पण ते गाणे सतत चालू असल्यामुळे जेसी आत्यांची हलकी झोपमोड झाली. त्या झोपेतच होत्या तेव्हा तो आवाज किंचितसा स्पष्ट झाला. त्यांनी हात चाचपडत शेजारी असलेली उशी कानावर ठेऊन दाबली पण त्या गाण्याचा मंद स्वर तरीही ऐकूच येत होता.

“इतक्या रात्रीचं कोणी गाणं लावलंय..रेडिओ बंद करा की”, जेसी आत्या अर्ध्या झोपेतच खेकसत म्हणाल्या.

एवढं बोलूनही गाणं सुरूच राहिलं. आता मात्र त्यांना राहावलं नाही. त्या बिछान्यातून उठणार इतक्यात त्या खोलीच्या काळोखातुन त्यांच्या चार मैत्रिणींचे चेहरे अचानक त्यांच्या समोर आले. जेसी आत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्यांची किंकाळी फुटणार इतक्यात त्यांच्या एका मौत्रिणीने त्यांचे तोंड दाबले. आपल्या चौघ्या मैत्रिणी आपल्या खाटेजवळच बसलेल्या आहेत असे आत्यांना जाणवले.

“शांत हो जेसी..काहीच बोलू नकोस”, त्यांची एक मैत्रीण हळू आवाजात म्हणाली.

जेसी आत्याला काही कळेनाच की काय झाले तरीही होकार्थी मान हलवत त्यांनी त्या मैत्रिणीला खुणावले. तोंडावरची पकड सैल झाल्यामुळे त्यांनी एक लांब श्वास सोडला.

“काय झालं?..किती वाजलेत..तुम्ही अजून झोपल्या का नाहीत?”, आत्यांनी त्या चौघींना विचारले.

“शsss…आम्ही सगळ्या पण झोपेलेलोच होतो पण ते गाणं ऐकून उठलो”, घाबरलेल्या आवाजात त्यातली एक जण म्हणाली.

“मग लाईट लावा कि बघू ना कोणी लावलंय गाणं इतक्या रात्रीचं”, आत्या म्हणाल्या.

“नाही..लाईट नको..ही भानगड थोडी विचित्र वाटत आहे..खिडकी न उघडता फटीतूनच बाहेर बघ”, ती मैत्रीण बिचकत म्हणाली.

“बरं”, म्हणत जेसी आत्यांनी खिडकीच्या फटीतून बाहेर पाहिले आणि पुढच्या काही क्षणातच त्यांची झोप उडाली.

रिसॉर्टच्या शेजारच्या बंगल्यातून गाण्याचा आवाज येत होता. बंगल्याच्या खिडक्या मोठमोठाल्या होत्या आणि आत अंधुक पिवळा प्रकाश होता. पण सर्वात भयानक दृश्य हे होते कि एक केस मोकळे सोडलेल्या बाईची सावली गाण्याच्या तालावर या खोलीतून त्या खोलीत ये जा करत होती. हे पाहून जेसी आत्याचे डोळे पांढरे फटक पडले.

त्यांनी घाबरत आपल्या मैत्रिणीकडे पाहिले. अंधारात कुणाचेच चेहरे स्पष्ट दिसत नव्हते तरीपण सगळेच घाबरले आहेत एवढे सर्वांना कळून चुकले होते.

“मॅडमला सांगायचे का?”, जेसी आत्यांनी सगळं बळ एकवटून आपल्या मैत्रिणीला विचारले.

“एवढ्या रात्री? नको..खूप गोंधळ होईल सगळ्यांचा आणि मॅडमचं डोकं माहित आहे ना ..त्या ताबडतोब ड्रायव्हरला परत जाण्यासाठी बस काढायला सांगतील”, मैत्रिणीने पुढच्या गोष्टींचा विचार करत सांगितले.

“मग काय करायचे?”, आत्याने पुढचा प्रश्न प्रस्तुत केला.

“सध्या काहीच नको..ही रात्र जाऊ दे..उद्या काहीतरी कारण सांगून खोली बदलून घेऊ”, दुसऱ्या मैत्रिणीने सुचवले.

सगळ्यांनी एक लांब श्वास टाकत संमती दर्शवली. खिडकी बाहेरचे  गाणे मंद स्वरात सुरूच होते –

‘तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा..मेरा साया..मेरा साया..’

दुसऱ्या दिवशी पाच मुली सोडून सगळ्या जणी कॅम्पसाठी उत्साही होत्या. आणि का नाही होणार, सर्वांच्या झोपा ज्या चांगल्या झाल्या होत्या मात्र या पाच जणींनी रात्र कशी ढकलली ते त्यांचे त्यांनाच माहीत होते.

सकाळी खोलीतून बाहेर येताना त्यांनी भीतभीतच शेजारच्या बंगल्याकडे पाहिले. तो बंदच होता. तिथे कोणी राहत असेल असा अंदाज बांधनणेही अवघड होते कारण तिथून कोणीच येता जाता दिसले नाही.

इथे, रिसॉर्टच्या एका मोकळ्या भागातच कॅम्पिंगचे तंबू उभारण्यात आले होते. ‘स्काऊट अँड गाईड’ च्या काही कसरती आणि ‘ड्रिल’ म्हणजे अपघातसमयी मदतीसाठी करायच्या कामांची  रंगीततालीम पार पाडण्यात आली. कॅम्पिंगच्या औपचारिकता पूर्ण होताच जेसी आत्या आणि त्यांच्या मैत्रिणींनी त्यांच्या मॅडमशी खोली बदलण्याबद्दल विचारपूस केली. काहीतरी क्षुल्लक कारण देऊन त्यांनी खोली बदलून ही घेतली. नवी खोली दुसऱ्या बाजूला असल्यामुळे त्या रात्री त्यांना काहीही ऐकू आले नाही.

सकाळी जेव्हा त्या आपल्या खोलीतून बाहेर निघाल्या तेव्हा रिसॉर्टच्या खालच्या माळ्यावर मुलींची खूप गर्दी जमली होती. विचारपूस केल्यावर हे माहीत झाले की त्यांच्या मुलींच्या संघापैकी एकीला काल रात्री चक्कर आली आणि ती बेशुद्ध अवस्थेत जिन्यावर सापडली. 

बाकी जणींनी तिला तसेच तिच्या खोलीत उचलून ठेवले आणि आता तिच्या शुद्दीवर येण्याची सगळे वाट पाहत होते. जेसी आत्या आणि त्यांच्या मैत्रिणींना कदाचित याची कल्पना आली की तिला नेमका काय अनुभव आला असेल पण तरी त्या काहीच बोलल्या नाहीत. डॉक्टर ही आता पर्यंत तपास करून गेले होते आणि त्या मुलीचा रक्तदाब कमी झाला आहे हे कारण सांगून तिला आराम करू द्या हे सुचवले. मॅडमने त्या दिवशीचे औपचारिक कार्यक्रम आणि पर्यटनाचे नियोजन रद्द करत सर्वांना रिसॉर्टमध्येच राहायला सांगितले. ज्या मुलींना महाबळेश्वर फिरून खरेदी करायची हौस होती त्यांची मात्र निराशा झाली.

ठरल्याप्रमाणे रिसॉर्टमधून दुपारपर्यंत चेक आऊट करायचे होते पण झालेल्या घटनेमुळे मॅडमने रिसॉर्टच्या मॅनेजरला विनंती करून काही तास वाढवून घेतले.

साधारण दुपारच्या एक दीडच्या सुमारास त्या मुलीला जाग आली. जाग येताच ती मोठ्याने रडू लागली. मॅडमने काय झाले विचारता तिने सांगितले की रात्री ती दुसऱ्या मैत्रिणीच्या खोलीकडे अतिरिक्त चादर आहे का पाहायला जात असताना तिला रिसॉर्टच्या शेजारून एक गाणे ऐकू आले. ती गाण्याच्या आवाजाच्या दिशेने जाऊन पाहू लागली. आवाज शेजारच्या बंगल्यातून येत होता. तिने जिज्ञासा पोटी आणखीन पुढे जाऊन पाहिले तर तिला शेजारच्या बंगल्यातल्या खिडकीत एक हडळ केस मोकळे सोडून उभी असलेली दिसली. त्या दोघींची नजरानजर होताच ती हडळ विक्षिप्तपणे हसली. ती ते दृश्य पाहताच भीतीने  हादरून गेली. जीव मुठीत धरून ती कशी बशी धावत परत रिसॉर्टकडे आली पण जिना चढता चढता तिला अचानक चक्कर आली आणि त्यापुढचे तिला काहीही आठवेना.

हे सगळं ऐकताच मॅडमने ताबडतोब मॅनेजरला बोलावून घेतले आणि झालेला प्रकार सांगितला.

मॅनेजर मात्र शांत होता. त्याने सर्व ऐकून घेतले. सगळे ऐकून झाल्यावर तो म्हणाला,

“मॅडम, ज्या बाईला बेबीने पाहिले ती हडळ नसून साधारण बाईच आहे. आमचा हा रिसॉर्टचा प्लॉट आधी त्यांचाच होता. त्या बाईंचे पती सैन्यात मोठ्या पदावर होते. एके दिवशी सीमेवरच्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. तेव्हा पासून त्या बाईंच्या मनावर खूप गंभीर परिणाम पडला. पती जिवंत असताना त्यांच्या सोबत ज्या गाण्यांचा आस्वाद त्या घ्यायच्या, पतीच्या मृत्यू नंतरही त्याच गाण्यातून त्यांच्या सोबत त्या जगण्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांच्यासाठी तो वेळ तिथेच थांबला होता. त्या बाई दिवस रात्र त्या बंगल्यातच असतात, क्वचितच बाहेर येतात, त्यामुळे त्यांच्या बंगल्याचीही अवस्था थोडी विचित्र वाटते. तरी आम्हाला कल्पना नव्हती की रिसॉर्टचे गेस्ट त्या बंगल्याजवळ जातील. असो, काही हरकत नाही. बेबीला आणखीन काही वेळ आराम करायचा असेल तर करू द्या. फक्त ही गोष्ट बाहेर कुठे बोलू नका, रिसॉर्टच्या प्रतिष्ठेचा विषय आहे.”

मॅडमने होकार्थी मान हलवली. जेसी आत्यांनी आणि त्यांच्या मैत्रीणींनी एकीमेकीकडे पाहिले. आपण उगाच घाबरलो असे चेहऱ्यावर भाव देत त्या परत आपल्या खोलीकडे गेल्या.

पुढच्या तासाभरात बस पुन्हा एकदा मुलींनी भरली आणि परतीच्या प्रवासाला निघाली.

गाडीत येताना जेवढा धिंगाणा झाला होता, जाताना मात्र तेवढीच शांतता होती.

मधल्या सीटवर जेसी आत्या आणि त्यांच्या मैत्रिणी हळू आवाजात गप्पा मारत होत्या.

“मॅडमला भूताखेतांवर विश्वास आहे वाटतं..झालेला किस्सा ऐकून त्यांनी कसे लगेच मॅनेजरला बोलावून घेतले”, जेसी आत्यांची एक मैत्रीण म्हणाली.

“हो ना..दुसरं कोणी असतं तर हिचीच समजूत काढली असती की जाऊ दे.. असं काही नसतं म्हणून”, जेसी आत्या म्हणाल्या.

त्यांच्या या गप्पा सुरूच होत्या. सर्वात पुढच्या सीटवर बसलेल्या मॅडम आपला चष्मा नीट करत स्वतःशी पुटपुटल्या,

“आता यांना काय सांगू की, मी पण त्या बाईला रात्री फिरताना पाहिले होते..”

Leave a Reply