संध्याकाळी काम आटपून घरी यायला निघत होतो तितक्यात वर्गमित्राचा फोन आला. ऐकून पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणत होता “तुझे बाबा गेले रे, तुझेच नाव घेत होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत”.. मी निशब्द झालो होतो. गेले 8 महिने सुट्टी नसल्यामुळे गावाला जाता आले नाही. माझे कामच तसे होते. रविवारी एका दिवसात गावाला जाऊन परत येणे जमायचे नाही. आणि सुट्टी मिळणं म्हणचे महाकठीण काम. पण आता मात्र कोणत्याही परिस्थितीत गाव गाठावच लागणार होतं. बाबा गेले सांगून सुद्धा मॅनेजर ऐकत नव्हता, कदाचित सुट्टी साठी खोट बोलतोय असे वाटत असावे त्याला. शेवटी कसे बसे पटवू देण्यात यशस्वी आणि सुट्टी मिळाली.

मिळेल ती ट्रेन पकडून तडक गावाला पोहोचलो. मित्र स्टेशनवर घ्यायला आला होता. येत असताना असंख्य आठवणीं दाटून आल्या होत्या. घरासमोर येऊन त्याने गाडी थांबवली आणि मी घराकडे नजर वळवली. माझ्या बाबांसारखे ते घर ही आता मोडकळीस आले होते. थोडी डागडुजी करूया असे बाबा नेहमी म्हणायचे पण आधीच पैश्याची चणचण म्हणून मी नेहमी ती गोष्ट टाळत गेलो. वरहंड्यात पाऊल ठेवले आणि शेजारच्या आजीने हंबरडा फोडला. नशीब आता तरी आलास तू, मला वाटले आता कधी दिसणार ही नाही या गावात’.. माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते, अश्रूंच्या धारा सतत माझ्या डोळ्यातून ओसंडून वाहत होत्या. मनातली चलबिचल कोणाला आणि काय म्हणून सांगू. आई लहानपणी च वारली. सांभाळ बाबांनीच केला. नातेवाईक असून नसल्यासारखे. त्यामुळे त्यांना फक्त मीच आधार होतो आणि मला ते..

दिवसभरात सगळे विधी आटपले. संध्याकाळ होत आली होती. गावातले लोक हळू हळू घरी जायला निघत होते. जेवायची वेळ झाली होती पण अजिबात इच्छा होत नव्हती. होणार पण कशी.. मित्र म्हणत होता की मी आणतो तुला जेवायला आणि रात्री इथेच झोपतो तुला खूप एकटे वाटत असेल. पण मी म्हणालो नको, जेवायची इच्छाच नाहीये रे, आणि एकटे राहायची सवय झालीये आता, मी झोपतो. मित्र थोड्या वेळ बसून त्याच्या घरी निघून गेला.

वाळवी लागून पोकळ झालेल्या जुन्या लाकडी बिछान्यावर मी पाठ टेकवली. बाहेर मंद वारा वाहत होता. मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक तुटलेल्या काचेच्या खिडकीतून आत येत होती. मनात असंख्य विचार होते, रडू आवरत नव्हते. तितक्यात मला हाक ऐकू आली “आलास का राजा, किती वाट पाहायला लावलीस”.. माझे हात थंड पडले कारण तो आवाज बाबांचा होता, अगदी स्पष्ट. एका क्षणासाठी मी सुखावलो पण दुसऱ्याच क्षणी वस्तुस्थिती लक्षात येऊन मी भानावर आलो आणि विजेचा झटका लागावा तसा मी हादरलो. बाबा तर आजच गेले, त्यांचे विधी ही मी स्वतः पूर्ण केले मग आता हे असे का होतंय. थोड्यावेळ मी कानोसा घेतला पण पुन्हा कसलाच आवाज ऐकू आला नाही. निव्वळ भास म्हणून मी स्वतःशीच पुटपुटलो आणि डोळे मिटले. 

काही तास उलटले असतील, जरी निद्रावस्थेच्या आहारी गेलो असलो तरी माझी झोप अगदी सावध होती. अचानक माझ्या हातावरून आणि डोक्यावरून कोणी तरी हळुवारपणे हात फिरवतेय असे वाटले. उबदार स्पर्श. मी खूप उठायचा प्रयत्न केला पण माझे हात पाय हालेनात. डोळे उघडायचे म्हणते तर ते ही जमेना. माझ्या जवळ नक्की कोण आहे हे मला पहायचे होते पण काही केल्या ते शक्यच होत नव्हते. तब्बल 20-25 मिनिट प्रयत्न केल्यानंतर मी हताश होऊन निपचित पडून राहिलो. जशी मी हालचाल थांबवली त्याच्या पुढच्याच क्षणी मला कानाजवळ हळुवार फुंकर घालावी तसे शब्द ऐकू आले “राजा, झालं गेलं विसरून जा, तुला कामामुळे यायला जमले नाही हे मी समजू शकतो, त्यासाठी आता पश्चाताप नको करुस, शेवटी विध्यात्याने उशीरा का होईना आपली भेट घडवलीच.. चल निघतो मी आता”.. हळू हळू आवाज दूर जात असल्याचे जाणवले आणि काही क्षणातच मला झोप लागली. 

सकाळी जाग आली ती मित्राच्या हाकेने. मित्राला रात्रीचा विचित्र अनुभव सांगितला. त्याला या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता पण माझ्या सांगण्याने तो इतका भारावून गेला होता की त्याला रडू कोसळले. तो म्हणाला ‘असेच असते, माणसाचा जीव एखाद्यात अडकून राहिला की ती व्यक्ती या भूतलावरून गेल्यावर ही तिची चाहूल जाणवत राहते जोपर्यंत ती गोष्ट त्या व्यक्तीला मिळत नाही… तुला पाहिल्यावर च ते इथून जाऊ शकत होते.. बरं झालं तू आलास आणि स्वतः बाबांचे सगळे विधी पार पडले. कदाचित त्यांची हीच शेवटची इच्छा होती जी तू नकळत का होईना पूर्ण केलीस.. मित्राचे बोलणे ऐकून अश्रूंच्या धारा वाहायला कधी सुरुवात झाली कळलेच नाही..

आपल्या माणसांना वेळ द्या, माणूस गेल्यावर आपल्याला त्यांची खरी किंमत कळते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि वेळ ही निघून गेलेली असते..

Leave a Reply