मी,माझी बायको वीणा अन आमची 1 वर्षाची मुलगी आर्या असा आमचा छोटासा परिवार.. माझा job हा फिरतीचा असल्याने मला वेगवेगळ्या शहरात शिफ्ट व्हावे लागत असे. त्याच कारणाने आम्ही नुकत्याच एका नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो होतो. सुरवातीचे काही दिवस सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि हळू हळू आम्ही नवीन घरात settle व्हायला लागलो.
फ्लॅट 2 bhk , तसा मोठा होता. पण का कुणास ठाऊक सुरवातीपासूनच मला एक वेगळीच शांतता भासत होती तिथे. खिन्न, निरस वाटायचा तो फ्लॅट. अस वाटायचं काही तरी अपुर्ण आहे त्यात. पण नंतर मी त्या गोष्टीकडे दूर्लक्ष केलं आणि जसं चालू आहे तसं चालू द्यायचं ठरवलं. कदाचित इथंच चुकलं माझं…..
एक दिवस असाच मी ऑफिस मधून घरी आलो आणि थोडा वेळ घरून काम करायचं ठरवलं. वीणा ने स्वयंपाक करून ठेवला होता. नेहमी प्रमाणे आम्ही जेवलो.
वीणा म्हणाली ” निलेश, मी खूप थकलीये रे आज. आर्या ने खूप त्रास दिला. खूप रडत होती ती आज. एकाएकीच रडू लागली. या आधी कधीच नव्हती रडली एवढं. कसं बस शांत करून झोपवलंय तिला. तू कर काम ऑफिस च मी जाते झोपायला.”
मी म्हणालो “तू कर आराम. आर्या उठली तर आवाज दे. मी आहे जागा. मी बघतो तिला. Good night!”
वीणा आर्या ला घेऊन बेडरूम मध्ये जाऊन झोपली आणि मी हॉल मध्ये बसून ऑफिसच काम करू लागलो. बराच वेळ झाला… सुमारे 12 वाजले असावेत. मी कामात व्यस्त असतानाच मला अंगाई गुणगुणल्याचा आवाज आला.(अंगाई स्त्री च्या मधुर आवाजातली…..).
आर्या उठली असावी म्हणून मी बेडरूम कडे जायचं ठरवलं. बेडरूम चा दरवाजा उघडला आणि अंगाई चा आवाज एकाऐकी बंद झाला.. पाहिलं तर आर्या शांत झोपली होती आणि वीणा हि….
मग अंगाई कोण गुणगुणत होत? कदाचित मला भास झाला असावा म्हणून मी स्वतःशीच हसलो आणि पुन्हा बेडरूम च दार लोटून घेतलं आणि हॉल मध्ये येउन काम करू लागलो.
पुढच्या क्षणी पुन्हा तसाच अंगाई गाण्याचा आवाज आला आणि मी दचकलो. laptop वर चालणारी बोटं एखाद्या चित्रात असावी तशी जागीच गोठली. मी स्तब्ध होऊन बेडरूम कडे लक्ष देत होतो. आता मात्र मी सावध झालो. जागेवरून उठलो आणि बेडरूम कडे जाऊ लागलो. मध्यरात्रीची ती भयाण शांतता फक्त तीनच आवाज भंग करित होते. घड्याळीची टिकटिक, माझा श्वास, आणि ती अंगाई……
मी हळूहळू पुढे जात होतो. मनात भीती तर होतीच पण त्याही पेक्षा जास्त संभ्रम होता.. मी बेडरूम जवळ आलो आणि बेडरूम च दार उघडलं.. जसं दार उघडलं तसा अंगाई चा आवाज बंद झाला..आणि सगळं चित्र अगदी तसंच जसं मी याआधी पाहिलेलं.
मी विचारातच दार बंद करून परत येण्यासाठी वळलो तसा पुन्हा तोच आवाज…. मी पटकन दार उघडलं आणि एखाद्या विजेचा झटका लागून दूर फेकल जावं तस मी दूर फेकला गेलो. मी जमिनीवर कोसळलो. कारण ज्या वेळी मी दरवाजा उघडून आत डोकावले अगदी त्याच वेळेला दरवाज्याच्या आतल्या बाजूने एका स्त्रीने माझ्याकडे डोकावून पहिलं.तिचा चेहरा खूप विचित्र होता. खूप पांढरट, डोळे खोबण्यातून आत गेलेले ,केस विखुरलेले. तिची शून्यातली नजर माझ्या डोळ्यात खोलवर रोवली गेली.
मी इतका घाबरलो कि भीतीने माझा आवाजही निघत नव्हता. काय करावं काही सुचत नव्हतं. आत वीणा आणि आर्या होत्या. मी होतं नव्हतं ते सगळं बळ एकवटून उभा राहिलो आणि पुन्हा बेडरूम च दार उघडून बघायचं आणि वीणा, आर्याला बाहेर आणायचं ठरवलं. मी उभा राहतच होतो तोच मला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. अंगाईचा….
आता मात्र माझी अवस्था बिकट झाली होती. मी थरथरत्या हाताने दरवाज्याच्या latch वर हाथ ठेवला आणि दरवाजा आत लोटला….
आतलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तीच स्त्री आता आर्यांच्या बाजूला पाय दुमडून बसली होती. तिचा हात आर्यांच्या केसांतून हळुवार फिरत होता. मी एखादं भयानक स्वप्न पाहतोय कि काय असं मला वाटत होतं. कारण एवढं सगळं घडत असताना वीणा आणि आर्या त्यापासून अनभिज्ञ होते. मी सगळा धीर एकवटून वीणा ला आवाज दिला आणि वीणा दचकून जागी झाली. तिने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले. मी आर्या कडे बोट दाखवून तिला खुणावलं. तिने आर्यकडे पाहिलं आणि पुन्हा माझ्याकडे पहात म्हणाली
काय झालं? का आवाज दिलास? आणि तू एवढा घाबरलेला का दिसतोय?
वीणा चे प्रश्न ऐकून असं वाटलं जसं तिने काही बघितलंच नाही. मी पुन्हा त्या स्त्री कडे पाहिलं. ती माझ्याकडे बघून हसत होती. मला कळून चुकल की तिचं अस्तित्व फक्त मलाच जाणवत होतं. हो,फक्त मलाच!!!
मी तिच्याकडे पहात असतानाच मला आर्याच्या रडण्याचा आवाज आला. आर्या जागी झाली होती आणि रडत होती. आर्याला रडताना पाहून त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले… ती रागाने माझ्याकडे पहात जोरात किंचाळली आणि दिसेनाशी झाली. तिची किंकाळी एवढी कर्कश्श होती की मी हाताच्या दोन्ही तळव्यांनी कान घट्ट झाकून घेतले.
काही सेकंदात वातावरण शांत झालं. पहाटेचे 4 वाजत आले होते. मी वीणा ला घट्ट मिठी मारली आणि झाला प्रकार तिला सांगितला. ते ऐकून वीणा इतकी घाबरली कि ती आर्याला एक सेकंदही तिच्या नजरेआड होऊ देत नव्हती. आम्ही लगेच तो फ्लॅट सोडायचा ठरवलं.
माझा मित्र सुरज ला फोन केला आणि “मला आताच्या आत्ता हा फ्लॅट सोडायचा आहे” असं सांगून माझ्यासाठी नवा फ्लॅट पाहायला सांगितलं. त्याने कारण विचारलं असता मी घडला प्रकार सांगितला. त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याने शोधाशोध सुरु केली आणि सुदैवाने आम्हाला दुसरा फ्लॅट मिळाला. आम्ही २ दिवस सुरज कडे राहून तिसऱ्या दिवशी सकाळी shifting करायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळपर्यंत shifting केलं.
सगळं सामान शिफ्ट झाल्यावर फ्लॅट लॉक करून चावी घरमालकाला द्यायची होती. मी फ्लॅट लॉक करत असताना मला कसला तरी आवाज आला. मी नीट लक्ष देऊन तो ऐकण्याचा प्रयत्न केला.. तो आवाज फ्लॅट मधून येत होता. तो आवाज दुसरं तिसरं काही नसून अंगाई होती…
मी ताबडतोब तिथून निघालो…
काही दिवसांनी कळलं की त्या फ्लॅट मध्ये एका महिलेचा तिच्या 2 वर्षाच्या मुलीसह रहस्यमयीरित्या मृत्यू झाला होता..
interesting