अनुभव – अथर्व पेरवी

ते उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. त्याच महिन्यात आमच्या शेजारी राहणाऱ्या दादाचे लग्न ठरले होते. त्यामुळे माझे सगळे कुटुंब लग्नाला जाणार होते. नवरी मुलगी शेजारच्या गावातली च होती. पण आम्ही पोहोचे पर्यत बराच उशीर झाला. पोहोचल्यावर कळले की लग्नाचा विधी आटोपला आहे आणि फोटो ग्राफर त्यांचे फोटो काढतोय. जेव्हा पहिल्यांदा मी त्या मुलीला पाहिले तेव्हा मी जरा विचारात च पडलो. त्याला कारण ही तसेच होते. लग्नाच्या दिवशी साधारणपणे नवरी मुलगी खुश आणि उत्साही असते पण तिच्या बाबतीत तसे नव्हते. तिच्या चेहऱ्यावर उदास आणि अधून मधुन रागाचे भाव जाणवत होते. मला वेगळेच वाटले. पण मी फारसे लक्ष दिले नाही आणि कोणाला विचारण्याच्या भानगडीत सुद्धा पडलो नाही.

शेजारचे गाव फारसे लांब नसल्यामुळे तिथून ते आमच्या गावापर्यंत चालतच वरात आणण्याचे ठरले. लग्नासाठी उपस्थित गावातील सर्व माणसे, नातेवाईक, मित्रमंडळी मस्त बँजो वर नाचत नाचत येत होते. पण या सगळ्यात ती मुलगी एकदम शांत होती. जस तिच्या आस पास घडणाऱ्या गोष्टी तिला कळतही नसाव्यात. त्यामुळे मी मात्र अजूनही गोंधळात होतो की ती मुलगी का अशी शांत आहे, तिला काही अडचण असेल का?, घरच्यांच्या दबावाखाली तर लग्न करत नसेल ना ? नाना तऱ्हेचे विचार माझ्या मनात येऊ लागले. तेवढ्यात मला माझ्या वडिलांचा फोन आला.

मला भेटायला माझे मित्र आले होते म्हणून त्यांनी मला घरी बोलावले होते. मी त्या वरातीतून निघून लगेच घरी आलो आणि मित्रांसोबत गच्ची वर गप्पा करत बसलो.. वरात अगदी हळू येत असल्यामुळे बराच वेळ लागणार होता हे मला ठाऊक होत म्हणून मी काही वेळ थांबून तिथून निघून आलो होतो.  रात्रीचे ८:३० झाले होते. मित्रांसोबत गप्पा झाल्यावर ते आपापल्या घरी निघून गेले. मी मात्र एकटाच गच्ची वरच्या खाटेवर निवांत पडून होतो. दिवसभराच्या धावपळीमुळे थोडा थकवा जाणवत होता. त्यामुळेच की काय माझा डोळा लागणार इतक्यात मला पुन्हा बँजोचा आवाज येऊ लागला.

माझ्या लक्षात आले की वरात आता घरी पोचली आहे. मी गच्चीवरून खाली आलो आणि घरी सांगितले की मी शेजारी दादा कडे जाऊन येतो पण जेवायची वेळ झाल्यामुळे मला घरच्यांनी जाऊ दिले नाही. मग मी ही जास्त विचार न करता जेवून झोपून गेलो. सकाळी उठलो, नाश्ता केला आणि घरातून बाहेर पडलो. मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचा बेत होता. पण जसे घरातून. आहेर पडलो तसे शेजारच्या लग्न घरातून मला आवाज येऊ लागला. कोणी तरी जोर जोरात बोलत होत. काय झाले पाहायला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा कळले की दादा चे वडील खूप रागात बोलत होते.

थोड्याच वेळात मला घडलेल्या गोष्टीची जाणीव झाली. नवरी मुलगी घरातून पळून गेली होती. तितक्यात माझ्या डोळ्यांसमोर कालचे प्रसंग तरळू लागले. तिचे वागणे, हावभाव.. मी तिथेच उभा राहून सगळे पाहत होतो. दादा त्यांच्या घरी फोन करत होता. त्यांनी तिच्या आई वडिलांना बोलावून घेतले. काही वेळात तिच्या घरचे लोक आले. त्यांना या बद्दल काहीही माहीत नव्हते.. जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांचा पायाखालची जमीनच सरकली. त्या मुलीचा मामाही सोबत आला होता.

त्याने सगळे काही खूप धीराने घेतले. सगळ्यांना खूप समजावले. नंतर तिच्या आई वडिलांना धीर देत रिक्षात बसवले व ते तिथून निघून गेले. जे झाले ते खूप धक्कादायक होते. तिच्या घरच्यांनी व गावकऱ्यांनी संपूर्ण दिवस त्या दोन्ही गावात आणि आजूबाजूच्या भागात खूप शोधा शोध केली पण ती सापडली नाही. तो दिवस तसाच निघून गेला.

मला घरच्यांनी सांगितले होते की आता शेजारी काही बघायला किंवा विचारायला जाऊ नकोस. ते बरे दिसणार नाही. त्यामुळे मी सुद्धा तो विषय सोडून दिला. त्या दिवशी आम्ही मित्रांनी नदीवर पोहायला जायचे ठरवले होते. आमच्या इथे उन्हाळ्यामध्ये विहिरीला पाणी असते पण थोडे खाली आणि खराब असते म्हणून मी पोहणार नव्हतो. पण तरीही मी मित्रांसोबत गेलो. सगळ्यांनी पटापट विहिरीत उड्या मारल्या आणि पोहू लागले. मी वरून सगळे पाहत होतो.

थोडी का होईना पण माझीही पोहायला जायची इच्छा होत होती. पण मी बाहेर च होतो. माझा एक मित्र सनील डुबकी मारून पाण्याखाली गेला. मी त्याच्याकडे पाहतच होतो. दीड दोन मिनिट झाले तो खालीच होता. मला वाटले की त्याला सवय असेल पण नंतर मला थोडी का होईना पण भीती वाटली की कारण तो जरा जास्तच वेळ पाण्याखाली होता. मी मित्रांना हाक मारून सांगणार तितक्यात तो पाण्याबाहेर बाहेर आला. जोर जोरात श्वास कोंडल्यासरखा करू लागला. तो प्रचंड घाबरला होता. आम्ही या आधी त्याला असे कधीही पाहिले नव्हते.

अक्षरशः भीती ने थर थरत होता. मित्रांनी त्याला पकडून ठेवले आणि विचारू लागले की काय झाले. पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्या कापऱ्या आवाजात तो एकच वाक्य म्हणाला ” सगळ्यांनी पाण्याच्या बाहेर निघा..” त्याला असे बोलताना पाहून काही तरी भयानक प्रकार आहे हे सगळ्यांनीच ओळखले. तसे सगळे घाई घाईत वर आले. सनिल विहिरीतून बाहेर आल्या आल्या घराच्या दिशेने पळू लागला. तसे आम्ही ही त्याच्या मागे धावू लागलो. पण पोहत असल्यामुळे आणि नंतर लगेच धावल्यामुळे त्याला जोरात धाप लागली तसे तो रस्त्यावर थांबला. 

तो अजूनही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. आम्ही सगळे त्याला घरी घेऊन आलो. पाणी वैगरे दिले. नंतर तो जे काही बोलला ते ऐकून आमची बोलतीच बंद झाली. तो सांगू लागला ” आम्ही पोहत असताना मी सहज एक डुबकी मारून पाण्या खाली गेलो. तर काही हिरव्या रंगाचं चमकताना दिसलं. बाहेरून येणाऱ्या उजेडा मुळे ते अधिकच चमकत होत. म्हणून मी त्या दिशेने अजुन थोडे आत गेलो. आणि मला समजले की ती एक बाई आहे. ती चमकणारी गोष्ट तिच्या हिरव्या बांगड्या होत्या. डोळे सत्ताड उघडे होते जे माझ्यावरच रोखले आहेत असे वाटत होते. माझा श्वास कोंडू लागला, मी बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागलो पण मी इतके घाबरलो होतो की मला पाण्या बाहेर येत नव्हत..”

त्याचे बोलणे ऐकून मला कालचा प्रसंग आठवला.. नवरीचे अचानक घरातून पळून जाणे आणि आज सनील ला हा अनुभव. मी माझ्या मित्रांना समजावले आणि हा प्रकार आम्ही घरच्यांना सांगितला. त्या नंतर गावातील माणसे, तिचे आणि दादा चे नातेवाईक सर्वजण गोळा झाले. पोलिस चौकशी झाली, पोलिसांसोबत आलेली माणसे विहिरीत उतरली. अगदी तळाला जाऊन शोध झाला. आणि त्याच विहिरीतून त्या मुलीचे प्रेत बाहेर काढले गेले. ते प्रेत विहिरीच्या खाली कुठे तरी एका मोठ्या दगडाखाली अडकले होते. इतका वेळ पाण्याखाली राहिल्यामुळे तिचे प्रेत पूर्णपणे पांढरे फत्तक झाले होते.

आमचा संशय खरा ठरला. ती तिच मुलगी होती. प्राथमिक अंदाज असा बांधला गेला की तिला लग्न मान्य नसल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी. पण खरे कारण कळू शकले नाही. मुलीचे आईवडील अंत्यविधीसाठी तिला त्यांच्या घरी घेऊन गेले. असा हा विचित्र प्रकार मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. पण या प्रकारा नंतर मात्र भयानक गोष्टींची सुरुवात झाली. 

मला त्या विहिरीजवळून जाताना खूप भीती वाटायची म्हणून मी त्या रस्त्याला जायचेच सोडून दिले. काही अवधी उलटला आणि नंतर भीती कमी होत गोष्टींचा विसर पडू लागला. पुन्हा सगळे पूर्ववत झाले. आमच्याकडे ३ गायी होत्या. मी त्यांना त्या विहिरीच्या परिसरात चरायला घेऊन जायचो. सुट्टीच्या दिवसात हाच माझा दिनक्रम असायचा. त्या भागात २-३ तास त्यांना चरायला सोडायचे आणि मग त्या विहिरीतून पाणी काढून त्यांना पाजून घरी घेऊन यायचे. नेहमी प्रमाणे त्या दिवशी ही मी गायींना घेऊन गेलो होतो आणि तेव्हा जे घडले ते मी उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.

गायींचे चरून झाले होते आणि मी त्यांना विहिरीतून पाणी काढून देत होतो. दोन गायींचे पाणी पिऊन झाले तसे त्या घराच्या दिशेने निघून गेल्या. राहिलेली एक गाय पाणी पीत होती म्हणून मी थांबलो होतो. नंतर आम्ही दोघं ही घराकडे जायला निघालो. पण तेवढ्यात मला माझ्या मागून कसला तरी आवाज आला. कोणीतरी गाणे गुणगुणत आहे असे वाटले. मी जरा दचकलोच. कारण त्या परिसरात दुसरे कोणीही नव्हते. माझी पावलं जागीच थिजली. मी मागे वळून पाहणार इतक्यात माझी गाय जोरजोरात हंबरडा देत धावत निघून गेली. काही तरी विचित्र घडतंय हे कळायला मला वेळ लागला नाही.

या भागात थांबायला नको असा विचार करून मी चालण्याचा वेग वाढवला. तसे मागून येणारा आवाज वाढू लागला. घडलेला प्रसंग काळाच्या ओघात मी विसरून गेलो होतो पण त्या आवाजाने मला पुन्हा तो प्रसंग आठवला आणि सर्वांग शहराल. आता मात्र मी कसलाही विचार न करता धावत सुटलो. आवाजाची तीव्रता क्षणोक्षणी वाढत चालली होती. मी धावतच राहिलो आणि सरळ घर गाठले. ही घटना मी घरी कोणालाही सांगितली नाही.

पण काही दिवसांनी असे अनुभव गावातील इतर लोकांनाही येऊ लागले. आणि माझ्यासोबत जे घडले तो भास नव्हता याची मला खात्री पटली. रात्री १० नंतर त्या विहिरी जवळून चित्र विचित्र आवाज यायचे.. हा प्रकार वाढतच चालला होता. म्हणून मग गावकऱ्यांनी तिथे काही विधी करण्याचे ठरवले. त्या नंतर ते आवाज येणे फक्त काही काळासाठी थांबले. सुरुवातीला आम्हाला वाटले की ते जे काही होत ते त्या जागेतून मुक्त झाले असेल, निघून गेले असेल. पण मुळात तसे झालेच नव्हते. अगदी आजही रात्री अपरात्री तिथून विचित्र आवाज येतात. इतकेच नाही तर विहिरीच्या कठड्यावर कोणीतरी बसलेले दिसते. 

Leave a Reply