अनुभव – रोहन भारती

गोष्ट तशी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यातली आहे. गणेशोत्सवाचे दिवस होते. मी आणि माझा मित्र राजेश दोघे ही साई गर्जना या ढोल पथकात होतो. बाप्पा येण्याच्या दोन महिन्या आधीच आमचा ढोल वाजवायचा सराव सुरू असायचा. दररोज ७ ते ९ पर्यंत सराव करायचो. बघता बघता गणपती आले आणि आम्हाला सुपाऱ्या मिळायला सुरुवात झाली. ढोल पथकाची सुपारी म्हंटले की खूप लांब ही जावे लागायचे आणि मग साहजिक च घरी यायला खूप उशीर व्हायचा. आमची पहिली सुपारी एका नावाजलेल्या मंडळाकडून आली. आणि चांगली गोष्ट म्हणजे माझ्या घरापासून ते मंडळ १ ते दीड तासांवर होते.

इतक्या मोठ्या मंडळाकडून सुपारी मिळाली होती त्यामुळे लगेच तयार झालो. त्या वर्षाची पहिली सुपारी आणि ते ही नावाजलेल्या मंडळाकडून मिळाल्यामुळे सगळेच खूप उत्साहात होतो. पथक खूप मोठे होते. मुलींसाठी बस होती. आणि आम्ही मुलं आणि आमचे सर सगळे आप आपल्या दुचाकी वर होतो. ज्यांच्याकडे दुचाकी नव्हती त्यांना सर त्यांच्या चार चाकी मधून न्यायचे आणि इतकेच नाही तर सोडायला ही यायचे. आमच्या पथकातल्या ९-१० मुलांकडे आप आपल्या दुचाकी होत्या. माझ्या सोबत माझा मित्र राजेश होता. आम्ही वेळेवर पोहोचलो आणि नाश्ता वैगरे केला.

मग ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी संध्याकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ढोल वादन केलं. सुपारी मस्त पैकी पार पाडली. पहिलीच सुपारी म्हणून सगळ्यांनी अगदी जोशात ढोल ताशे वाजवले. १० नंतर सगळे आवरून तिथून निघायला थोडा उशीर झाला. आम्हाला जवळपास दीड तासांचा प्रवास करायचा होता. आम्ही ११.३० च्या सुमारास आमच्या पथकावर पोहोचलो. तिथे जेवण वैगरे आटोपले. तिथून माझे घर दुचाकी ने गेल्यावर २० मिनिटांवर होते. 

जेवण आटोपल्यावर सगळे जण आप आपल्या घरी जायला निघाले. मी राजेश ला त्याच्या घरी सोडून मग पुढे जाणार होतो. आम्ही गप्पा मारत निघालो. त्याला घरी सोडे पर्यंत पाऊण वाजला.. त्याचा निरोप घेत असताना तो मला म्हणाला ” नीट जा.. तुझ्या घरा कडचा रस्ता बरोबर नाही.. तुला वेगळे सांगायला नको की आपण काय ऐकून आहोत..” मी त्याला हो बोलून दुचाकी माझ्या घराच्या रस्त्याला घेतली. माझा भुतखेतांवर अजिबात विश्वास नव्हता त्यामुळे मी अगदी बिनधास्त होतो. माझ्या सोसायटी पर्यंत पोहोचायला साधारण १ किलोमिटर चे अंतर राहिले होते.

तितक्यात मला लक्षात आले की राजेश ने ज्या रस्त्याबद्दल सांगितले तो हाच रस्ता. सगळ्यांकडून ऐकलेल्या विचित्र गोष्टी मला आठवू लागल्या. मध्य रात्र उलटून गेली होती त्यामुळे रस्ता अगदी सामसूम झाला होता.. एकही वाहन नजरेस पडत नव्हते. पण माझ्या मनात अजूनही भीती वैगरे अजिबात नव्हती. रस्ता मोकळा असला तरीही मी दुचाकी चा वेग कमी ठेवला होता. तितक्यात मला रस्त्याकडे ला साधारण ६-७ वर्षांची मुलगी शाळेचे दप्तर घेऊन जाताना दिसली. अंधार असल्यामुळे नीट काही दिसत नव्हत.

आधी मला काही वेगळे जाणवले नाही पण नंतर लक्षात आले की रात्रीचा १ वाजत आला आहे आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावर ही लहान मुलगी एकटी कुठे चालली आहे. मदत करायचा उद्देशाने मी दुचाकी चा वेग अगदी कमी केला आणि तिच्या थोडे जवळ गेलो. तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागलो की कोणी ओळखीची मुलगी तर नाही ना. पण जसे तिच्या जवळ दुचाकी घेऊन गेलो तसे ते दृश्य पाहून मी जोरात ब्रेक मारला. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की मी नक्की काय पाहतोय. त्या मुली चे पाय.. मला काय करावे काही कळत नव्हते. भीतीने अंगातला त्राण च निघून गेला.

दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो पण ती सुरूच होत नव्हती. ती लहान मुलगी मात्र तिच्या धुंदीत पुढे जात होती. मी आहे याच तिला भान ही नव्हत. इथे माझी मात्र भीतीने पूर्ण गाळण उडाली होती. मी देवाचे नाव घेऊन दुचाकी सुरू केली आणि या वेळेस ती सुरू ही झाली. वातावरणात गारवा पसरू लागला. 

मी दुचाकी वेगात घेतली. ती मुलगी एव्हाना चालत थोडी पुढे निघून गेली होती. काही क्षणात मी तिला ओलांडून पुढे निघून गेलो पण तितक्यात माझ्या पाठीवर एक थंडगार स्पर्श जाणवला आणि माझ्या अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. राजेश ला तर मी काही वेळापूर्वी च घरी सोडून आलोय. मग आता माझ्या दुचाकी वर मागे.. ती मुलगी.. नुसत्या विचारा ने सर्वांग शहारले. मी प्रचंड घाबरलो होतो. मागे वळून पहायची हिम्मत नव्हती. मी वेगात दुचाकी चालवत राहिलो.

तितक्यात मला जाणवले की माझ्या कडे बघून रस्ता वरचे कुत्रे जोर जोरात भुंकत आहेत. असे म्हणतात की मुक्या प्राण्यांना अश्या अमानवीय गोष्टींची जाणीव लगेच होते. ते या गोष्टी पाहू शकतात. मी त्या कुत्र्या कडे पाहू लागलो आणि मला जाणवले की ते माझ्या मागच्या सीट कडे पाहून भुंकत आहेत. मला मागे वळून पाहायचे नव्हते पण तरीही हिम्मत करून मी बाजूच्या आरश्यातून तिरक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याची भीती होती तेच झालं होत. ती मुलगी माझ्या मागच्या सीट वर येऊन बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचे निर्विकार भाव मनात धडकी भरवू लागले. आज माझे काही खरे नाही असे वाटू लागले.

दुचाकी चा वेग वाढवला, गणपती बाप्पा चे नामस्मरण करू लागलो. बराच वेळ मी मागे बघितलेच नाही. रस्ता मोकळा असल्यामुळे मी सुसाट वेगात दुचाकी पळवत होतो. मला जाणवू लागले की मुलगी हळु हळू माझ्या जवळ येतेय. तितक्यात मला समोर माझी सोसायटी दिसू लागली. मी दुचाकी चा वेग अजूनच वाढवला आणि पुन्हा एकदा मनापासून देवाचे नाव घेतले. तशी ती मुलगी ते जे काही होत ते जोरजोरात ओरडत मागच्या अंधारात कुठे तरी दिसेनाशी झाली. सोसायटी गेट च्या बाहेर गाडी तशीच टाकून मी गेट उघडला आणि आत धावत सुटलो.

घरा पर्यंत धावतच आलो आणि जोर जोरात दार बड वू लागलो. माझ्या मोठ्या भावाने दरवाजा उघडला तसे मी आत झेपच घेतली. माझी अवस्था आणि चेहऱ्यावर ची भीती पाहून त्याला लगेच कळले की माझ्या सोबत काही तरी भयानक घडले आहे. त्याने मला विचारले देखील पण मी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. माझी आई ही गाढ झोपेत होती म्हणून मी कोणाला काहीच सांगितले नाही. दमल्यामुळे मी पडल्या पडल्या झोपून गेलो. डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती. रात्री घडलेला प्रकार पुन्हा आठवला तसा मी ताडकन अंथरुणात उठून बसलो. मी शांत राहणाऱ्यातला नव्हतो.

त्यामुळे तसाच बाहेर पडलो आणि त्या भागात राहणाऱ्या मित्रांकडे जाऊन चौकशी केली. तस मला कळलं की वर्ष भरापूर्वी लॉक डाऊन च्या वेळी ती घरा बाहेर खेळत असताना एका दुचाकी स्वाराने दारूच्या नशेत असल्यामुळे तिला उडवले होते. तो अपघात इतका भीषण होता की त्या मुलीने त्या रस्त्यावरच जीव सोडला होता. तेव्हा पासून तिचा आत्मा त्या जागेत अडकून पडलाय जो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देतो.

Leave a Reply