मी राहायला नाशिक ला आहे. हा अनुभव माझ्या नंडेच्या नवऱ्याला २०१९ मध्ये आला होता. ते एका प्रायव्हेट कंपनी मध्ये कामाला आहेत. प्रत्येक वर्षी कंपनी कडून त्यांची ट्रीप जाते. तशीच त्या वर्षी ही गेली होती. त्यांचा सहा जणांचा ग्रुप होता. गुजरात मध्ये एके ठिकाणी ट्रीप चे ठिकाण ठरले होते. जाताना त्यांनी हॉटेल वैगरे बुक केले. तिथे पोहोचल्यावर हॉटेल वर थोडी विश्रांती घ्यावी आणि मग पुढचा कार्यक्रम करायचा असे ठरले. पण त्यांना प्रवासाचा खूप त्रास होत होता. त्यांना बऱ्याचदा वाटून गेले की अर्ध्या रस्त्यातून परतून घरी जावे. त्यांची स्वतःची देवावर खूप श्रध्दा आहे म्हणून कदाचित पुढे येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल लागली असावी. त्यांनी मित्रांना सांगितले की मला खूप अस्वस्थ वाटतंय, उगाच मनावर कसले तरी दडपण आलंय पण त्यांच्या मित्रांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. काही तासांच्या प्रवासानंतर ते बुक केलेल्या हॉटेल वर आले. दोन रूम होत्या. त्यामुळे प्रत्येकी ३ जण. जेवण वैगरे तिथेच हॉटेल मध्ये आटोपून झोपायला रात्रीचा दीड वाजला. 

त्यांना रूम मध्ये आल्यापासून अजुन अस्वस्थ वाटत होत. कसे तरी करून ते झोपायचा प्रयत्न करत होते. त्यांना झोप लागते न लागते तितक्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांना वाटले की बाजूच्या रूम मध्ये राहायला आले असतील त्यांचा आवाज येत असेल. पण तो आवाज हळु हळू करत वाढू लागला. रडण्या सोबत ओरडण्याचा ही आवाज येऊ लागला. ते तिघे ही बेड वर उठून बसले आणि एकमेकांकडे पाहू लागले. भीती वाटणे साहजिक होते. त्या तिघांना ही ते विचित्र रडण्याचे आवाज येत होते. पण बघता बघता तो आवाज आता अगदी जवळून त्यांच्याच रूम मधून येऊ लागला. त्यांच्या बेड मधून. ते झटकन तिथून लांब झाले. ते जे काही होत ते बेड मध्ये असल्या सारखे भासत होते. तितक्यात आतून आवाज येऊ लागला. कोणीतरी धडपड करत बाहेर येण्याचा प्रयत्न करून लागले. त्या तिघांच्याही हृदयाची धड धड त्या आवाजासोबत वाढत चालली होती. तसे त्यातल्या एकाने हिम्मत करून रूम चे दार उघडले आणि ते तिघे ही बाहेर पडले. 

तिथेच त्यांना एक केअर टेकर भेटला. त्याला विचारले की तुम्हाला आमच्या रूम मधून किंवा बाजूच्या कोणत्या रूम मधून रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला का.? त्यावर तो म्हणाला की नाही, तुम्हाला बहुतेक भास झाला असेल. नंतर त्यांनी जाऊन बाजूच्या रूम मध्ये जिथे त्यांचेच मित्र होते तिथे जाऊन चौकशी केली. पण ते म्हणाले की आम्हाला असा कसलाही आवाज आला नाही. सगळ्यात विचित्र म्हणजे त्यांची रूम आमच्या रूम ला लागूनच होती. शेवटी ते नाईलाजाने पुन्हा त्यांच्या रूम वर आले. पण जसे त्यांनी दार लावले तसे ते आवाज पुन्हा येऊ लागले. ते इतके घाबरले होते की त्यांना हृदय विकाराचा झटका येतोय की काय असे वाटू लागले. भीती मुळे काहीच सुचत नव्हते. ते दत्त गुरूंचे मोठे भक्त आहेत, त्यांना खूप मानतात. ते देवाचा धावा करू लागले. तितक्यात त्यांना कानाजवळ एक वाक्य ऐकू आले “हनुमान चालीसा बोल..”. तसे त्यांनी जोरजोरात हनुमान चालीसा बोलायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य.. अवघ्या काही मिनिटांत ते विचित्र आवाज थांबले. काही वेळानंतर त्यांना झोप लागली. रात्री स्वप्नात दत्त गुरू दिसले, म्हणाले “तुम्ही घाबरु नका.. मी तुमच्या सोबत आहे.

तसे लगेच ते उठले. घड्याळ्यात वेळ पाहिली तर ४ वाजले होते. त्यांनी तयारी केली आणि पहाटेच त्या रूम मधून बाहेर पडले. मित्रांच्या रूम वर येऊन त्यांना म्हणाले की चला आपण आत्ताच निघू. पण त्यांचा एक मित्र बाथरूम मध्ये गेला होता तो बराच वेळ झाला तरी बाहेर च आला नाही. हे त्याला बोलवायला गेले तसे तो खूप ओरडायला लागला. त्याला काय झाले हेच कळत नव्हते. तो आतून ओरडायला लागला की कडी उघडतं नाहीये, कोणी तरी धरून ठेवली आहे असे वाटतेय. बऱ्याच प्रयत्नानंतर कडी उघडली. ते ६ जण त्या हॉटेल मधून बाहेर पडले. नुकताच उजाडायला सुरुवात झाली होती. बाहेर आल्यावर ते एका चहाच्या टपरीवर आले. तो चहावाला त्यांच्याकडे एक टक बघतच होता. तसे त्यांच्यातल्या एकाने विचारले “असे काय बघताय तुम्ही..?”. त्याने जे काही सांगितले त्यांनतर आम्हाला सगळा प्रकार कळला. तो म्हणाला की तुम्ही त्या हॉटेल मध्ये का राहायला गेलात..चौकशी केली नाही का आधी..? ते हॉटेल हौंटेड आहे. जे त्या हॉटेल मध्ये थांबतात ते परत येत नाहीत. तिथे बरेच खून झाले आहेत. प्रत्येक वेळी बातमी बाहेर जाऊ देत नाहीत.. 

Leave a Reply