लेखिका – वर्षा पाटील

साधारण दोन अडीच वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. मी आणि माझे दोन मित्र मानस आणि सुमित असे आम्ही राजस्थानला फिरायला गेलो होतो. मला तिथले राजवाडे आणि किल्ल्यांची लहानपणा पासून खूप आवड होती. आजोबांकडून तिथल्या किल्ल्यांन बद्दलच्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्यात प्रामुख्याने भानगडचा किल्ला, चित्तोडचा किल्ला, अंबर आणि लालगडचा किल्ला त्याच बरोबर त्या जागेवर लोकांना आलेले भयानक अनुभव हे ही मी ऐकून होतो. राजस्थानला पोहोचल्यावर आम्ही तिथली सगळी पर्यटन स्थळे पाहिली. तिथले किल्ले, राजवाडे आणि त्यामागील इतिहास जाणून घेण्यात आम्हाला फार मज्जा वाटत होती. आम्ही तिथे एका हॉटेल मध्ये थांबलो होतो. आम्ही २ दिवस अगदी मनसोक्त फिरलो. तिसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवसाला निघणार होतो. त्या दिवशी दुपारी १२ ला चेक आउट करून आम्ही घरी जायला निघालो. येताना कार मध्ये आम्ही तिघे होतो, मी मानस आणि सुमित. त्या राज्याची सरहद लागे पर्यत बरीच रात्र झाली. रस्त्यावर फक्त आमची गाडी धावत होती. त्या व्यतिरिक्त एकही वाहन दिसत नव्हते. त्यात ती रात्र अमावस्येची होती त्यामुळे सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. आजू बाजूला भले मोठे वृक्ष आणि समोर अरुंद रस्ता. 

वस्ती चा परिसर मागे पडला आणि काही अंतर पुढे गेल्यावर मानस ला काही तरी दिसले. तसे तो म्हणाला ” अरे थांबा.. ते बघा काय आहे.. ?” तोच आम्हाला दूरवर गर्द झाडांच्या मागे एक राजवाडा असल्यासारखे जाणवले. मानस अगदी लहान मुला सारखा हट्ट च करू लागला की आपण तिथे जाऊ आणि तो राजवाडा बघू. एक तर तो राजवाडा आहे की अजुन काही हे ही माहीत नव्हत. पण मानस मात्र खात्रीने सांगू लागला की तो मोठा राजवाडा च आहे. आपण या साठीच आलो होतो आणि तो बघितल्याशिवाय जायचे नाही. आम्ही त्याला समजावले पण तो काही ऐकेल असे वाटले नाही. म्हणून शेवटी आम्ही गाडी त्या रस्त्याला वळवली.  आम्ही तिघे जण गाडीतून उतरलो, गाडी अलीकडेच पार्क केली आणि एक छोट्या पाऊलवाटेने त्या दिशेने जाऊ लागलो. जस जस आम्ही जवळ जात होतो तस तस तो राजवाडा भव्य, दिव्य आणि आकर्षक वाटत होता. आम्हाला वाटले त्या पेक्षा तो बराच आत होता. म्हणजे रस्त्यापासून बऱ्याच आतल्या भागात होता. काही मिनिटांनी आम्ही त्या राजवड्या जवळ आलो. जवळून पाहिल्यावर जणू स्वर्गात आल्या सारखे भासू लागले. त्या राजवड्याचे उंच उंच खांब त्यावर कोरलेले बारीक नक्षीकाम. पूर्णपणे सफेद रंगाचा तो राजवाडा होता. आत ठराविक अंतरावर जुन्या काळातले दिवे लावले होते, जे त्याचे सौदर्य अजुन खुलवत होते. त्याच्या बाजूला चोफेर झाडे लावली होती. समोर एक तलाव होता आणि त्या तलावात एक छोटीशी होडी सुद्धा होता.

मला एक गोष्ट खटकली. आमच्या तिघांशिवाय तिथे कोणीही नजरेस पडत नव्हते. मी म्हणालो “मानस.. पाहिलास ना.. चल आता..” पण तो मात्र अगदी मंत्रमुग्ध झाला होता. त्याला आता आत जाऊन पाहायचे होते. तो पुन्हा आमच्या मागे लागला आणि सांगू लागला “इतक्या लांब आलो तर असेच जायचे का..? आतून पाहिल्याशिवाय मला चैन मिळणार नाही.. तुम्ही दोघंही चला माझ्या सोबत. शेवटी नाईलाजाने आम्ही आत जायचे ठरवले. त्या भल्या मोठ्या दरवाज्यासमोर आलो पण तो बंद होता. तसे आम्ही कोणी दिसतेय का ते पाहू लागलो. तिघही वेगवेगळ्या दिशेला चालत गेलो आणि पाहू लागलो. पण तिघे खरंच एकही व्यक्ती दिसला नाही. आम्ही पुन्हा त्या दरवाज्याजवळ आलो आणि बघतो तर काय.. तो सताड उघडा होता. ही आमच्या साठी धोक्याची पाहिली घंटा होती पण आतले मोहक दृश्य पाहून आम्हा तिघांची पावले आपोआप आत गेली. 

तो राजवाडा अजूनच छान दिसत होता, रंगबिरंगी कंदील, भिंतीवर पूर्वजांची चित्र, मध्यभागी एक भल मोठ झुंबर होत. हे सर्व आम्हाला एका स्वप्ना सारखे भासत होते. आम्ही गेल्या दोन दिवसात बरीच पर्यटन स्थळे पाहिली, किल्ले, राजवाडे पाहिले पण असा, इतका सुंदर राजवाडा पहिल्यांदाच पाहत होतो. तेव्हा आम्हाला काय झाले होते माहीत नाही पण आम्ही रात्री तिथे थांबायचा विचार केला. आणि जवळ असलेल्या आलिशान सोफ्यावर जाऊन बसलो. तेवढ्यात सुमित म्हणाला “इतका छान राजवाडा इथे कोणीच का राहत नाही? कोणाची नजर आज पर्यंत ह्या राजवड्या वर पडली का नाही?”

इतक्यात विजेचा खटका पडल्याचा सारखा आवाज आला आणि क्षणात सगळे मृगजळ असल्याचे लक्षात आले. तो सुंदर राजवाडा आता एक भकास, खंडर वास्तू मध्ये परिवर्तित झाला.. क्षणार्धात झालेला कायापालट पाहून आम्ही तिघे भीतीने थंड पडलो. पांढऱ्याशुभ्र भिंतीची जागा आता काळ्याभोर जळालेल्या भिंतीने घेतली होती. आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहिले आणि समजून गलो की हा फक्त एक अभासा, एक मृगजळ निर्माण केलं गेलय. पण याचे कारण आम्हाला माहीत नव्हते. आम्ही तिघांनी दरवाज्याच्या दिशेने धाव घेतली पण जिथून आलो होतो तिथे दरवाजाच नव्हता. आता मात्र आम्ही पुरते अडकलो. इतके घाबरलो होतो की काही सुचत नव्हत. सुमित म्हणाला “इथे यायलाच ना नव्हते पाहिजे यार.. या मानस च्याच नादाला लागून इथे आलो आणि अडकलो.. आता काही आपले खरे नाही..” त्याचे बोलणे संपते न संपते तितक्यात एक विचित्र आवाज कानावर पडू लागला. जसे एखादे प्रवेशद्वार उघडते य. त्या राजवाड्यात एका विशिष्ट दिशेने वारा सुटला. कल्पना शक्तीच्या पलीकडचे काही तरी घडत होतं. आम्ही त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागलो आणि समोर एक आकृती तयार होऊ लागली. अस वाटले की ती आकृती दुसऱ्या एखाद्या जगातून आपल्या मानवी जगात प्रवेश करतेय. ती आकृती एका स्त्री चा आकार घेऊ लागली, तिचा पेहराव एका राणी सामान भासू लागला. आम्ही तिघे एकाच जागी स्तब्ध उभे राहून समोर घडत असलेला प्रकार एखाद्या स्वप्ना प्रमाणे पण उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. 

तितक्यात मला लक्षात आले की या राणी चे चित्र मी आधी राजवाड्यात ल्या भल्या मोठ्या भिंतीवर पाहिले आहे. त्या खाली हिरकणी हे नाव कोरले होते. बहुतेक तिचे नाव असावे. तीचं असली तरी तिची अवस्था अतिशय विचित्र होती. लाल भडक डोळे, हाताची नखे प्रमाणापेक्षा जास्त वाढली होती, तिच्या पायांकडे लक्ष गेले आणि धक्काच बसला. तिचे पाय जमिनीवर नव्हते. ती जमिनीपासून काही फूट अंतरावर तरंगत होती. तिचे हे भयाण रूप पाहून आम्ही इतके घाबरलो की होतो त्या जागीच उभे राहिलो जसे कोणी पायाला खिळे मारले आहेत. मी पाऊल उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण मला त्या जगातून हलता च येत नव्हते. सुमित आणि मानस ची अवस्था ही तशीच झाली होती. तोच ती मानस जवळ तरंगत आली आणि म्हणाली ” आलात तुम्ही..? मी कित्येक वर्ष तुमचीच वाट पाहत होते..”. तिचा तो आवाज ऐकून आमचे रक्त गोठल्यासारखे झाले. काय घडतंय ते समजण्याचा प्रयत्न करू लागलो. सुमित ने हिम्मत करून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि विचारले “राणी साहेब तुम्ही आम्हाला इथे का आणले..? तुमची काय इच्छा आहे..” त्यावर ती जोरात ओरडली ” ए चूप.. तुम्हाला नाही मी फक्त माझ्या राजवीर ला इथे आणले य.. गेली कित्येक वर्ष मी त्याची वाट पाहतेय.. इथेच.. याच राजवाड्यात.. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे..” 

बहुतेक ती मानस ला तिचा राजवीर समजू लागली. त्याला परत मिळवण्यासाठी तिने या रहस्यमयी राजवाड्याचे मृगजळ तयार केले होते.  ती या सगळ्यात आज यशस्वी झाली होती. जणू कित्येक वर्षांपूर्वीची इच्छा आज तिला पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला पण आता मानस ला यातून बाहेर कसे काढायचे हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा ठाकला होता. त्याचा जीव धोक्यात होता. ती राणी काय करेल याचा काही नेम नव्हता. सुमित ला काही गूढ विद्या, तंत्र मंत्र याची जाण होती त्यामुळे त्याला एक मार्ग सुचला. त्याने मानस ला हळूच कानात सांगीतले “घाबरु नकोस.. फक्त माझ्या इशाऱ्यांकडे लक्ष असू दे..”. इतके बोलून तो बाजूला झाला आणि त्याने राणी ला विचारले “आम्हाला बाहेर सुकलेल्या गवतावर बसून तुमचे लग्न पाहण्याची इच्छा आहे..”. असे म्हंटल्यावर तिने एके दिशेला इशारा केला आणि आम्ही तिथे पाहिले. अचानक एक दरवाजा तयार झाला आणि आम्ही घाबरत दबक्या पावलाने बाहेर जाऊ लागलो. मला कळत ना नव्हते की सुमित काय करणार आहे आणि आम्ही दोघं मानस ला आत ठेऊन बाहेर का जातोय. आम्ही बाहेर सुकलेल्या गवतावर जाऊन राजवाड्याकडे तोंड करून बसलो. ती समोरच उभी होती. लग्न होणार याचा तिला भरपूर आनंद झालाय हे तिच्या वागण्यावरून आम्हाला कळत होतं. खर तिला कशाचे ही भान राहिले नव्हते. 

याचाच फायदा घेऊन सुमित ने बसल्या बसल्या गवताची एक बाहुली बनवली आणि तिच्या गळ्याला एक धागा बांधला. हा धागा त्या राणी ने घातलेल्या वस्त्राचा होता. माहीत नाही सुमित ने तो कसा आणि कधी मिळवला. समोर काही अंतरावर मानस आणि राणी हिरकणी उभे होते. तिने हात पुढे केला आणि आम्ही पाहिले तर तिच्या हातात कुंकवाची डबी दिसले. तोच सुमित ने इशारा केला आणि मानस ने तिला कुंकू लावले. इथे आम्ही वेळ न गमावता त्या सुकलेल्या गवताच्या बाहुलीला मातीचा टीळा लावला. दुसऱ्या क्षणी राणी हिरकणीने हात पुढे केला आणि तिच्या हातात मंगळसूत्र दिसले. मानस ने तिला मंगळसूत्र घातले. इकडे आम्ही एक गवताचा हार त्या बाहुलीच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून घातला. तिने आपल्या शक्तीने आगीची ज्वाळ प्रकट केली आणि त्या दोघांनी त्या अग्नी भोवती फेरे घ्यायला सुरुवात केली. इथे आम्ही देखील त्या बाहुलीला सात वेळा गोल फिरवले. आणि पुढच्या क्षणी सुमित ने खिशातून लगेच लायटर बाहेर काढले आणि ती गवताची बाहुली पेटवली. जसा त्या बाहुली ने पेट घेतला तसे त्या राणी ला असह्य वेदना होऊ लागल्या. ती ओरडू, किंचाळू लागली. तसे सुमित ने मानस ला तिथून पाळायचा इशारा केला. तो ही त्या राजवाड्या बाहेर धावत आला. आम्ही तिघांनी तिथून पळ काढला. पटापट गाडीत येऊन बसलो, गाडी स्टार्ट केली आणि रस्त्याने सुसाट निघालो. मी मागे वळून पाहिले पण त्या जागेवर कोणताही राजवाडा नव्हता. 

Leave a Reply