अनुभव – निखिल बानेकर

ही गोष्ट मला मला माझ्या वडिलांनी सांगितली होती. ते एका केमिकल कंपनी प्लॅन्ट मध्ये नोकरी करायचे. तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी कंपनी चे क्वार्टर स होते जे कंपनी पासून तसे लांब होते. गावातच घर असल्याने ते त्या क्वार्टर स मध्ये राहत नव्हते. ते कंपनी मध्ये रुजू होऊन अवघे दोन महिने उलटले होते. तितक्यात त्यांना एक बातमी कळाली की त्या क्वार्टर स मध्ये राहणाऱ्या लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे की आमच्या कॉलनी मधून आमची लहान मूल बऱ्याच वेळासाठी कुठे तरी जात आहेत किंवा त्यांना कोणी तरी घेऊन जातंय आणि बऱ्याच तासानंतर आणून सोडतय.

आणि लहान मुलांना विचारले तर ते सांगतात की एक आजी येते आणि चॉकलेट देते, एके ठिकाणी जंगलात घेऊन जाते आणि उद्या पुन्हा भेटायला सांगते. हा प्रकार थोडा विचित्र होता कारण खरंच अशी कोणी बाई असेल तर ती नक्की कुठे घेऊन जाते हे कोणताच लहान मुलगा सांगू शकत नव्हता. घडणाऱ्या घटना साध्या वाटत असल्या तरी त्या साध्या नव्हत्या. असेच दिवस पुढे सरकत होते. एके दिवशी माझे वडील मित्राच्या घरी गेले होते. मित्रांनी मिळून छोटीशी पार्टी ठेवली होती. रात्री उशीर झाला म्हणून मित्राने तिथेच झोपायचा आग्रह केला. वडील ही तयार झाले.

रात्री झोपायच्या वेळेस त्यांना मित्राच्या मुलाचा आवाज आला ” मला हवंय चॉकलेट पण मी तुझ्या सोबत बाहेर नाही येणार.. इथूनच दे.. आणि नाही दिलेस तरी मला उद्या मिळेलच ते.. ” तो घरात आतल्या खोलीत होता. आणि त्याचे असे बोलणे ऐकून वडील एकदम सावध झाले. त्यांनी पटकन त्याला बोलावले आणि विचारले “कोणाशी बोलत होतास..” पण तो काहीच बोलला नाही. वडिलांनी मित्राला सांगितले की मुलाला उद्या शाळेत पाठवू नकोस. त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यांच्या मित्राला या मागचे कारण माहीत नसल्याने तो जरा चकित झाला पण त्याने वडिलांचे बोलणे ऐकले.

दुसऱ्या दिवशी त्या मुलाला घेऊन एका बाहेरचे बघणाऱ्या माणसाकडे घेऊन गेले. त्याला दाखवले आणि विचारले की हा सगळा काय प्रकार आहे. त्याला बघताच तो माणूस म्हणाला की या मुलावर डाव साधलाय, नजर टाकली आहे. या जंगलात खूप गूढ गोष्टी आहेत त्यातलीच एक ही असे समजा. मी ही या बद्दल फक्त ऐकून होतो पण तुमच्यामुळे मला खात्री पटली. एका चेटूक करणाऱ्या म्हातारीने याच्यावर खुण केली आहे, आपण काहीच करू शकत नाही कारण ती जागा तिची आहे. एक करा आणि या मुलाला या भागापासून कायमचे दूर घेऊन जा आणि पुन्हा या गावात या भागात ढुंकून ही पाहू नका.

कारण हा जर तिच्या हाती पुन्हा लागला तर याला कोणीच वाचवू शकणार नाही. गावाजवळ चे ते जंगल खरंच खूप विचित्र होते. भरपूर लोक मरण पावली होती, काही लोक आत गेली ती पुन्हा कधीच आली नव्हती. त्यामुळे पोलिस ही जास्त काही कर शकत नाही नव्हते. वडिलांनी आणि त्यांच्या मित्राने ते गाव सोडायचा निर्णय घेतला. जवळपास १५ वर्षे उलटली. आम्ही सगळे मुंबई त राहायला आलो. काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टींचा विसर पडला. अधून मधून गावी जायचो. वडिलांचा ही त्यांच्या त्या मित्राशी जास्त संपर्क नव्हता. त्या वर्षी माझे वडील गावी गेले होते, गणेश चतुर्थी होती. घरात ही गणपती बसले होते. माझे वडील असेच बाहेर अंगणात बसले असताना दारात एक गाडी येऊन थांबली. पाहिले तर वडिलांचा मित्र आणि त्याचा मुलगा आले होते. 

त्यांना पाहून ते खूप खुश झाले. घरात येऊन त्यांनी दर्शन घेतले आणि गप्पा गोष्टी करत बसले. तितक्यात त्याने विचारले “काका तुम्ही जिथे काम करायचा ती कंपनी आता आहे की बंद झाली.. ” त्यावर वडील म्हणाले की ती कंपनी आता दुसऱ्या मोठ्या कंपनी ने विकत घेतली आहे. खूप बदल झाले आहेत पण सुरू आहे अजुन ही. तसे तो म्हणाला ” आता आपल्याकडे गाडी आहे, आपण एक राऊंड मारून येऊ.. मला पाहायचे आहे गावात काय काय बदलले आहे की अजुन ही गोष्टी तश्याच आहेत.. आमचे घर असलेली ती कॉलनी ही असेल ना अजुन.. मला ती बघायची आहे “.

वडिलांनी होकारार्थी मान हलवली. प्रसाद घेतला, गप्पा झाल्या आणि माझे वडील, त्यांचा मित्र आणि मित्राचा मुलगा असे तिघे कर मधून गावात फेरी मारायला निघाले.. कंपनी दाखवली, त्या कॉलनी जवळ गेले आणि तितक्यात गाडी बंद पडली. अगदी त्या जंगलाच्या भागासमोर.. ते तिघे ही काय बिघाड झालाय हे बघायला खाली उतरले. माझे वडील आणि त्यांचा मित्र बोनेट उघडून पाहत होते. तितक्यात तो म्हणाला ” अरे काका ती बघ आजी.. इतकी वर्ष उलटली पण अजुन ही आहे ही.. बघ मला बोलावतेय तिच्या जवळ..” त्या दोघांनी धावत जाऊन त्याला गाडीत बसवले आणि देवाचे नाव घेऊन गाडी सुरू करू लागले. गाडी काही सुरू होत नव्हती. तो विचारू लागला की अचानक काय झाले.. पण ते दोघेही त्याला काहीच सांगू शकले नाहीत. कारण त्या वेळी तो खूप लहान होता आणि या भयानक गोष्टी ची त्याला अजिबात कल्पना नव्हती. 

बऱ्याच प्रयत्नानंतर गाडी सुरू झाली तसे ते त्या भागातून बाहेर आले. इतकी वर्ष उलटली पण ती अजूनही त्याची वाट बघत होती.. 

Leave a Reply