२००४ साली आम्ही १३ मित्र एका किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलो होतो. दुपारी सगळे एकत्र निघालो आणि संध्याकाळी साधारण ७ वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात येऊन पोहोचलो. पहाटे ट्रेकिंग ला सुरुवात करायची असल्याने आम्ही तसा बेत आखुनच निघालो होतो. त्या गाव ८ वाजत नाहीत तोपर्यंत सगळीकडे शुकशुकाट व्हायला सुरुवात झाली होती. आम्ही जवळच असलेल्या शाळेच्या आवारात मुक्काम करायचे ठरवले. त्या परिसरात लाईट असून नसल्यासारखी होती. 

रात्री मुक्काम करायचे असल्याने येताना आम्ही सगळे जेवणाचे साहित्य घेऊनच आलो होतो. आमच्यातले काही जण चूल पेटवण्यासाठी आसपासची लाकडे गोळा करू लागली. काही वेळात चूल पेटवून आम्ही जेवण करायला घेतले. आमच्या गप्पागोष्टी, चेष्टा, मस्करी चालूच होती. दिवाळी नुकताच झाल्यामुळे काहींनी उरलेला फराळही आणला होता. आणि जेवण होई पर्यंत आमच्यातील ३-४ मुलं शाळेपासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवर फराळ खात बसले होते. साधारण तासाभरानंतर जेवण तयार झाले तसे आम्ही त्यांना हाक मारून जेवायला बोलावले. 

एव्हाना १० वाजत आले होते. आम्ही सगळे जेवण उरकून शाळेच्या आवारात अंथरूण टाकून झोपायची तयारी करू लागलो. आमच्या गप्पा सुरू असल्यामुळे ११ वाजून गेले तरी कोणाला झोपायची इच्छा होत नव्हती. पण नंतर हळू हळू वातावरणात बदल जाणवायला सुरुवात झाली. का कोण जाणे पण आम्ही एखाद्या घेऱ्यात अडकलो आहोत असे वाटू लागले. नक्की सांगता येणार नाही पण वातावरणातला बदल अगदी प्रकर्षाने जाणवू लागला. 

तितक्यात आम्हाला बाजूच्या झाडीतून कंदील दिसू लागला. पण त्या कंदील सोबत कोणतीही व्यक्ती दिसत नव्हती. त्यामुळे नको ते भास होऊ लागले होते. आमच्यात कुजबुज चालू झाली की काही तरी विचित्र भास होत आहेत, झाडीतून कंदील दिसतोय का वैगरे. पण आम्ही एकमेकांना समजावत एकाच ठिकाणी झोपायचा प्रयत्न करू लागलो. आम्हाला वाटले की गावातले कोणी असेल. अंधार गडद होऊ लागला तसे आम्ही पुन्हा शेकोटी पेटवली आणि झोपायचे सोडून अजुन गोष्टी सुरू केल्या. आमच्यातले काही जण शाळेच्या आवारात च मस्त झोपूनही गेले. साधारण १२.३० वाजले असतील. तितक्यात त्याच समोरच्या झाडीतून काहीशी हालचाल ऐकू आली. आम्ही सगळे जीव मुठीत धरून त्या दिशेने पाहू लागलो.

बघता बघता त्या झाडीतून अमच्यातलाच एक जण चालत बाहेर आला. आम्ही आश्चर्याने पाहतच राहिलो. तसे मी म्हणालो “अरे हा, इथून कुठून आला”.. काय रे.. कुठे गेलेलास आणि त्या झाडीतून कुठून आलास?..” माझे बोलणे ऐकल्यावर सुद्धा तो काहीही न बोलता मान खाली घालून आमच्या पासून थोडा लांब बसला. आम्हाला काही उमगलच नाही. तसे आमच्यातला एक जण म्हणाला “जाऊ दे रे त्याला.. जास्त नाटक करतोय तो.. लक्ष नका देऊ त्याच्याकडे”. तसे आम्ही गप्पा पुन्हा सुरू केल्या. काही मिनिटानंतर तो उठला आणि आम्हाला उलटे रिंगण घालू लागला. अमच्याभोवती उलट फिरून २ फेऱ्या मारल्यावर एक मित्र उठला आणि त्याला अडवले. पण त्याच्या कडे बघून त्याने जोरात ओरडला. तो आवाज इतका असह्य करणारा होता की आम्ही आमच्या कानावर हात ठेवले. तो आवाज ऐकून आमच्यातले झोपलेले धडपडत उठून धावत आमच्याजवळ आले. 

त्याचा स्वतःवर ताबा नव्हता. तो कोणालाच आवरत नव्हता. त्याचा आवाज ही बदलला होता. आम्ही सगळे बरेच घाबरलो होतो. त्याला दोघा तिघांनी मिळून पकडले आणि कसे बसे शाळेच्या मैदानातून आतल्या बाजूला आणले. तसे आधीच्या मुलाने त्याला जोरात एक मुस्काटात लगावली. त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काही तरी मंत्र म्हणू लागला. तो बहुतेक हे सगळे जाणून होता. तो जस जसे मंत्रोच्चार जोराने म्हणू लागला जसे त्या मुलाच्या अंगात जे काही होते ते बोलू लागले “मी एक भोई हाय.. त्या काळी पालख्या उचलायचे काम करायचो.. मला फसवून मारून पाण्यात फेकून दिले व्हते.. मला ह्यो व्हिरीवर बसलेला घावला, आन मी ह्याला धरला”..

तसे मंत्र थांबवत त्याने झटकन विचारले “मग जाण्याचे काय घेणार”. तसे तो पाण्याची मागणी करू लागला. मी पाण्याची बाटली दिली तसे संपूर्ण बाटली काही सेकंदात संपवून टाकली आणि पुन्हा पाणी मागू लागला. तसे आम्ही अजुन ४-५ पाण्याच्या बाटल्या काढून दिल्या. त्याने बघता बघता त्याही संपव ल्या पण त्याची तहान काही भागेना. पुन्हा तो पाणी मागू लागला. आता काय करणार ?.. 

तिथूनच जवळ एक पाण्याचा हापसा होता. पण तिथे जायला कोणीही धजावत नव्हतो. सगळेच खूप घाबरले होते. शेवटी मी तयार झालो तसे माझ्यासोबत अजुन एक जण तयार झाला. आम्ही अंधारातच चाचपडत तिथपर्यंत गेलो. जवळची झाडी वाऱ्यामुळे सळसळत हलायची तसे अंगावर काटे यायचे. योगायोगाने तिथे एक बादली होती. ती भरून आम्ही त्याच्याजवळ आलो. आल्या आल्या त्याने उडी मारली आणि तोंड बादलीत घातले. आमच्या नजरे देखत त्याने संपूर्ण बादली काही सेकंदात रिकामी केली. त्या पाठोपाठ आणखी एक बादली तशीच रिकामी केली. आणि त्यानंतर शांत आला आणि म्हणाला “मला पाणी न्हाय मिळालं नव्हं मारताना”. त्याचे हे वाक्य ऐकून आमची बोलतीच बंद झाली. 

त्याला आम्ही झोपवयचा प्रयत्न करत होतो पण तो मध्येच उठायचा आणि मटण वैगरे मागायचा. ती रात्र आम्ही तशीच काढली. पहाटे त्याची त्याच हापश्यावर अंघोळ घालून गावातल्या एका जागृत देवीच्या मंदिरात नेले. तिथला अंगारा लावला. तसा तो थोडा शांत झाला. सगळे नीट वाटत होते म्हणून आम्ही गड चढायला सुरुवात केली. तो सोबतच होता. अधून मधून काही तरी विचित्र बड बडायचा. संध्याकाळी गड उतरताना तो शेवटी ओरडलाच “चकवा हाय.. चकवा!”. खरेच झाले. उतरताना हाकेच्या अंतरावर गाव दिसत असून चकवा लागला. गाव नजरेसमोर दिसत होते पण आम्हाला वाट काय दिसत नव्हती. 

अंधार पडायला सुरुवात झाली होती. पण आम्हाला काही वाट सापडत नव्हती. शेवटी आम्ही काठीच्या मशाली करून गावकऱ्यांना हाका मारून मदतीसाठी बोलावू लागलो. तसा एका व्यक्तीने आमचा आवाज ऐकला आणि आम्हाला तिथून बाहेर काढले. शहरात आल्यावर त्याला पुन्हा एके ठिकाणी घेऊन गेले आणि त्याचे ते उतरवण्यात आले. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी एकाला त्याच विहिरीवर झपाटले होते. त्यावर उपाय केल्यावर ते निसटले आणि परत त्याच विहिरीवर आले. तिथे हे ४ जण गेले आणि त्यातला याला त्याने पुन्हा धरले”.

ते जे काही असेल, पण अश्या गोष्टी असतात हेच खरे.. हे मला या अनुभवानंतर कळले. 

https://youtu.be/jCi7pVjli7U

Leave a Reply