अनुभव – राजीव सावंत
प्रसंग २०१७ साल चा आहे. मी सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. मला तीन बहिणी आहेत आणि त्या पैकी एक बहिण ही बेंगलोर येथे राहायला आहे. तिचे लग्न झाले आहे आणि तिला आठ वर्षांचा एक गोंडस मुलगा आहे. त्याच नाव अविनाश. दर वर्षी प्रमाणे २०१७ सालच्या रक्षाबंधन निमित्ताने मी तिच्याकडे बेंगलोर ला गेलो होतो. सकाळी ८ च्या दरम्यान रेल्वे बेंगलोर स्टेशन ला पोहोचली. मला ९ ची बस होती ज्याने मी ताई च्या घरी गेलो. ताई चे पती म्हणजे माझे भाऊजी यांना सरकारी नोकरी आहे म्हणून त्यांना राहायला सर्का कडून क्वार्टरस् मिळाले होते. त्या दिवशी मी पोहोचलो तेव्हा भाऊजी कामावर निघून गेले होते.
अविनाश ही शाळेत गेला होता. गेल्यावर मी अंघोळ वैगरे करून फ्रेश झालो आणि सोफ्यावर बसलो होतो.. ताई ने माझ्यासाठी छान इडली , डोसा चा नाश्ता बनवला होता. मी अगदी पोट भरून नाश्ता केला. १० वाजले होते. ताई आत स्वयंपाक घरात होती. मी सोफ्यावर बसून टिव्ही पाहत बसलो होतो. तितक्यात मला जाणवले की माझ्या समोरून सर्रकन वाऱ्याच्या वेगात कोणी तरी धावत गेलं. ते इतक्या वेगात गेले की मला कळले च नाही. त्या क्वार्टर स् ना म्हणजे घरांना २ दरवाजे आहेत. एक मुख्य दरवाजा आणि मागच्या बाजूला स्वयंपाक घराला लागून एक दुसरा दरवाजा. आणि हे दोन्ही दरवाजे समोरा समोर आहेत.
त्यामुळे ते जे काही होत ते अतिशय जोरात माझ्या समोरून गेलं. सुरुवातीला मला वाटले की माझा भास असावा म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण नंतर जेव्हा नाश्ता करून मी आत गेलो तेव्हा ताईला सहज म्हणून विचारले. त्यावर ती म्हणाली की स्वयंपाक करत असताना तिला ही कधी कधी या दारातून त्या दाराकडे कोणी तरी वेगात धावत गेल्याचा भास होतो. मला थोड विचित्र वाटलं. पुढचे २ दिवस मी तिथेच राहिलो पण ते दोन्ही दिवस अगदी सुरळीत गेले. म्हणजे त्या दोन दिवसात मला कसलाही भास वैगरे झाला नाही. नंतर मी मुंबई ला घरी परत आलो. साधारण १५ दिवस झाले असतील.
त्या दिवशी मी ऑफिस मध्ये होती आणि मला ताई चा फोन आला. ती खूपच घाबरलेली वाटत होती कारण तिच्या आवाजातून भीती स्पष्ट जाणवत होती. मी तिला समजावत म्हणालो ” ताई शांत हो.. बस एके ठिकाणी आणि मग सांग मला काय झालं ते..” त्या नंतर जे तिने मला सांगितले ते ऐकून मी खूपच अस्वस्थ झालो. ती मला सांगू लागली ” मी रोज संध्याकाळी ६ च्या सुमारास बाहेर भाजी वैगरे आणायला जाते. मी अविनाश ला विचारले पण तो मला म्हणाला की त्याला यायचे नाहीये आणि टीव्ही व कार्टून पाहायचे आहे.
मी त्याला ठीक आहे म्हंटल आणि बजावून सांगितले की कुठे ही बाहेर जाऊ नकोस आणि मी घरी येई पर्यंत टिव्ही पाहत इथेच बस. इतके सांगून मी घराबाहेर पडले. अविनाश घरी एकटा आहे म्हणून मी घाई घाईत भाज्या आणि घरातले सामान वैगरे घेतले. त्याला असे एकट्याला ठेऊन आल्यामुळे माझे चित्त लागत नव्हते. घाई करत मी अवघ्या २०-२५ मिनिटांत घरी आले. दार उघडले तर अविनाश पहिल्या खोलीत नव्हता. टीव्ही तसाच सुरू होता. मी त्याला हाक मारत घरात आत गेले. तर आतल्या खोलीत बेड जवळ एका कोपऱ्यात अविनाश हुंदके देत रडत बसला होता. तो खूप घाबरला होता. कारण त्याचे रडणे साधे नव्हते. असे वाटले की त्याला कोणत्या तरी गोष्टीची खूप च भीती वाटतेय.
मी त्याला जवळ घेऊन विचारले ” काय रे काय झाले रडायला..?” त्यावर तो म्हणाला ” आई तू बाहेर गेलीस तेव्हा मी केस विंचरायला आरशा समोर उभा राहिलो तर मला रडण्याचा आवाज आला. मग मला जाणवलं की मागे कोणी तरी येऊन उभ राहील आहे. मला वाटले की तू आलीस पण मी वर चेहरा पाहिला तर दुसरच कोणी तरी होत. एक खूप उंच बाई उभी होती माझ्या मागे. तिचे केस पण खूप लांब होते. ती रडत रडत माझ्या जवळ येत होती आणि तिचे तोंड एकदम मोठे करून उघडले होते..
मी खूप जोरात ओरडुन इथे कोपऱ्यात येऊन बसलो. तेव्हा ती निघून गेली. मला खूप भीती वाटली म्हणून मी रडत होतो..” अविनाश चे असे बोलणे आणि वागणे पाहून मला वाटलं की तुझ्याशी बोलून मन मोकळे करावे. म्हणून मी तुला फोन केला. मी ताई शी कशी बशी समजून काढून फोन ठेवला. त्या नंतर ताई ने त्या क्वार्टरस मध्ये राहणाऱ्या इतर लोकांकडे चौकशी केली तेव्हा कळले की त्यांना ही असे विचित्र अनुभव येत आहेत. त्या क्वार्टर स मध्ये बऱ्याच वर्षापासून राहणाऱ्या एका बाई ने या मागचे खरे कारण सांगितले. २-३ वर्षांपूर्वी तिथं एक जोडपं राहायचं. काही ना काही कारणामुळे त्यांच्यामध्ये दररोज भांडण व्हायचं.
एके दिवशी रागाच्या भरात तिच्या पतीने तिला मारून पंख्याला लटकवले. आणि स्वतः वर आळ येऊ नये म्हणून पोलीस स्टेशन ला जाऊन तिने आत्महत्या केली असे भासवले. पण पोलिसांनी खूप चौकशी केल्यावर त्याने स्वीकारले की मीच तिला ठार मारले आहे. हे सगळे ऐकल्या नंतर ताई ने एका मंदिरात जाऊन पुजाऱ्याला सगळा प्रकार सांगितलं त्यांनी ताई ला काही धागे दारात आणि घरात बांधायला दिले. त्या नंतर ताई ला असा अनुभव कधीच आला नाही. २०२० मध्ये भाऊजी ची बदली झाल्यामुळे त्यांनी ते क्वार्टरस सोडून दिले आणि दुसरी कडे राहायला गेले.