अनुभव – वालमिल पवार
मी छत्रपती संभाजी नगर मध्ये वास्तव्यास आहे. गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. माझ्या घराची इमारत दोन मजली आहे आणि मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. माझ्या घराच्या बाजूला काही वर्षांपूर्वी एक कुटुंब राहायचं. आई आणि २ मुले. त्यांना वडील नव्हते. मुलगा तरुण आणि बोलायला वैगरे चांगला होता पण त्याची मोठी बहीण मानसिक दृष्ट्या ठीक नव्हती. एके दिवशी अचानक बातमी कळाली की त्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आम्ही ती बातमी ऐकून अगदी सुन्न झालो होतो. पण त्याच वेळेस आमच्या भागात बोललं जात होत की त्या मुलाने आत्महत्या केली नाही तर त्याला कोणी तरी मारलं आहे. आता यात कितपत तथ्य होत ते कोणाला ही माहीत नव्हत.
नंतर वर्ष भराने मी शहरात राहायला गेलो आणि अधून मधुन गावातल्या घरी जायचो. त्या वर्षी मी काही दिवस वेळ काढून गावी गेलो होतो. एकटाच असल्यामुळे तिथल्या माझ्या सुमित नावाच्या मित्राला सोबत म्हणून घरी झोपायला बोलावले होते. त्या दिवशी आमच्या घराच्या इमारती मध्ये खालच्या मजल्यावर राहणारे कुटुंब ही कुठे तरी बाहेर गावी गेले होते. दिवसभर रिमझिम सुरू असलेल्या पावसाने रात्री मात्र खूप जोर धरला होता. तसे तर मुसळधार पावसाचा आवाज, वाऱ्यामुळे ऐकू येणारी झाडांची सळसळ मनाला एक वेगळाच आनंद देऊन जात होती. मी जेवण आटोपून मित्राची वाट बघत बसलो होतो. रात्री चे १०.३० झाले होते.
एव्हाना तो यायला हवा म्हणून मी त्याला फोन केला तेव्हा तो म्हणाला की वडिलांची तब्येत ठीक नाही त्यामुळे त्यांच्या जवळ थांबावे लागेल. मी त्याला म्हणालो की काही हरकत नाही, पाऊस ही खूप आहे त्यामुळे घरीच थांब. बराच वेळ झाला तरी मला आज काही झोप लागत नव्हती. घड्याळात वेळ पाहिली तर तास उलटून गेला होता, ११.३० वाजून गेले होते. वेळ घालवायला म्हणून मी मोबाईल वर कॉमेडी व्हिडिओ पाहत बसलो होतो. तितक्यात अचानक लाईट गेली आणि संपूर्ण घरात गडद अंधार पसरला. कदाचित पावसामुळे एखादी वायर वैगरे तुटली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला.
कारण अश्या वादळी वाऱ्याच्या पावसात या गोष्टी साहजिक असतात. खोलीतला पंखा ही बंद झाल्यामुळे बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा आवाज स्पष्ट जाणवू लागला. आता अंधारात मेणबत्ती आणि काडेपेटी शोधायला ही कंटाळा आला होता त्यामुळे मोबाईल ची टॉर्च सुरू करून तसाच बसून राहिलो. अर्ध्या पाऊण तासाने लाईट आले तेव्हा कुठे थोडे हायसे वाटले. पण बराच वेळ उलटून गेला तरीही आज काही मला झोप लागत नव्हती. मग उठून एक खुर्ची घेऊन खोलीतल्या खिडकी जवळ जाऊन बसलो. घराला लागूनच एक मोठं झाड आहे, खूप जून.
म्हणजे अगदी माझ्या जन्मापासून किंवा मला कळायला लागले तेव्हापासून. हिरव्यागार पांनानी भरलेलं. रस्त्यावरील खांबावर च्या लाईट मुळे हलकासा प्रकाश त्या झाडावर पडत होता. मी तेच दृश्य पहात बसलो होतो. तितक्यात मला कसला सा भास झाला. जसं कोणी मला आवाज देतय, हाक मारतय.. मला वाटले सुमित येऊन मला हाक मारतोय. मी पटकन उठून दार उघडले आणि खाली आलो. पण तिथे कोणीही नव्हतं. मी जरा दचकलो कारण माझ्या नावाने अगदी स्पष्ट हाक ऐकू आली होती.
मी पुन्हा वर आलो आणि दार बंद करून अंथरुणात येऊन पडलो. भास होता की खरंच कोणी हाक मारली ते कळले नाही. वेळ पाहिली तर १२.१५ होऊन गेले. डोळे बंद करून तसाच पडून राहिलो. डोळा लागणार तितक्यात जोरात दारावर थाप ऐकु आली. आता मात्र मी घाबरलो. सुमित येणार नाही असे बोलला होता त्यामुळे इतक्या रात्री ते ही मुसळधार पावसात येणं शक्य नाही हे माहीत होत. खालच्या मजल्यावर राहणार कुटुंब देखील बाहेरगावी गेलं आहे.. मग आता दारावर कोण असेल. उठून पाहू की राहू देऊ काही सुचत नव्हत. वाटलं की आपणच आजच्या दिवस सुमित च्या घरी जावं.
पण इतक्या रात्री त्याच्या घरी जाणं बरोबर वाटणार नाही म्हणून तो विचार तिथेच सोडून दिला. पाऊस कमी झाला तसा तो आवाज ही यायचा थांबला. वेळ पाहिली नाही पण २ वाजून गेले असावेत. मला टॉयलेट ला जायचं होत पण ते आमच्या घराच्या मागच्या बाजूला होत. मी दरवाजा उघडून बाहेर आलो आणि खाली उतरून मागच्या बाजूला चालू लागलो. मागे जाताना ते झाड वाटेतच लागायचं. जसे मी तिथून जाऊ लागलो तसे मला त्या झाडावर कसलीशी हालचाल जाणवली. मी घाबरून जागीच थांबलो. मला वर पहायची हिम्मत नव्हती पण तरीही माझे लक्ष आपोआप तिथे गेले. त्या झाडावर कोणी तरी बसलं होत. मी दचकून मागे सरकलो आणि पुन्हा निरखून पाहू लागलो. तेव्हा लक्षात आले की तो तोच मुलगा आहे ज्याने काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला त्या झाडावर बसलेले पाहून काळीज भीती ने धड धडू लागले. वाचाच बंद झाली. मी उलट्या पावली चालत पुन्हा घरात आलो..
थेट देवघर असलेल्या खोलीत गेलो आणि समोर जाऊन बसलो. काय पाहिले यावर विश्वास बसत नव्हता. मी प्रचंड घाबरलो होतो. देवाचे नाव घेऊ लागलो. त्यातच मला कधी झोप लागली ते कळले नाही. सकाळ झाली तेव्हा मला जाग आली. माझे आई वडील घरी आले होते. मी त्यांना सगळे काही सांगितले. त्यांनी ही चौकशी केली तेव्हा अजूनही बऱ्याच गोष्टी कळल्या. गावातल्या लोकांना तो आजही रात्री अपरात्री त्या झाडावर तर कधी झाडाखाली बसलेला दिसतो. हा सगळा भयानक प्रकार घडल्या नंतर मात्र आम्ही ते घर विकून दुसरी कडे राहायला गेलो.