अनुभव – जिग्नेश पुजारी
घटना २०१५ साल ची आहे. माझ्या शेजारी राहणाऱ्या एका दादाच लग्न नुकताच लग्न झालं होत. खरं तर ३ वर्ष झाले त्याला मुलगी पाहत होते पण त्याच कुठे जुळत नव्हत. पण त्याला मनासारखं स्थळ मिळालं आणि त्याने लग्न केलं होत. लग्न गावीच झालं. मला त्याच्या लग्नाला जाता आले नाही पण असे कळले की लग्न अगदी धूम धडाक्यात पार पडलं. वहिनी ला घेऊन तो घरी राहायला आला त्याला काही दिवस झाले होते. वहिनी खूप साधी होती. स्वभावाने खूप चांगली होती. साधारण २-३ महिने सगळे व्यवस्थित चालू होते.
आमच्या भागात रात्री १.३० वाजता तासा भरासाठी पाणी यायचे त्यामुळे नाईलाजाने रोज रात्री किंवा निमान एक दिवसा आड तरी रात्री पाणी भरायला उठायला लागायचे. मीच रात्री उठायचो. त्या रात्री ही मी उठलो आणि पाण्याचे ड्रम वैगरे घेऊन पाणी भरायला खाली गेलो. तेव्हा आनंद दादाच्या घरी धावपळ चालू होती. मला सुरुवातीला वाटले की पाणी भरायची घाई चालू असेल पण नंतर जाणवले की गोष्ट काही तरी वेगळीच आहे. मी दादाला विचारले तसे तो म्हणाला की अरे ही घरातून बाहेर कुठे तरी निघून गेलीये. मला काही कळलेच नाही म्हणून मी त्याला पुन्हा विचारले “काय बोलतोय दादा.. मला काही कळले नाही”. तसे तो म्हणाला “अरे तुझी वहिनी घरात नाहीये आम्ही आपल्या घराच्या आसपास ही पाहिले पण कुठे सापड त नाहीये, गेला अर्धा तास आम्ही सगळे तिला वेड्यासारखे सगळी कडे शोधतोय, इतक्या भर रात्री कुठे गेली काय माहीत”.
त्याचे बोलणे ऐकून मी ही जरा घाबरलो च. कारण रात्रीचा १.३० वाजून गेला होता आणि अश्या वेळी वहिनी कुठे गेली असेल. पण मी भानावर येत पटकन म्हणालो दादा तू काळजी नको करुस वहिनी असेल इथेच कुठे तरी. चल आपण आपल्या गल्लीत एकदा पाहून येऊ. आम्ही दोघेही घरातून बाहेर पडलो. आमच्या गल्लीत आलो आणि समोर चे दृश्य पाहून जागीच स्तब्ध झालो. मी दादा चा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने खुणा वून समोर पाहायला सांगितले. त्याने ही तिथे पाहिले. आमच्या पासून काही अंतरावर एका झाडाखाली वहिनी बसली होती. ती त्या झाडाकडे अगदी टक लाऊन बघत होती. मला तिचे असे इतक्या रात्री अश्या ठिकाणी असणे खूप विचित्र वाटले. दादा पुढे गेला आणि तिला विचारले “काय ग.. इथे काय करतेय.. तुला वेळ काळ काही कळते की नाही तिकडे आम्ही सगळे तुझी शोधाशोध करतोय”.
दादाने तिचा हात पकडुन तिला उठवले तसे तिने जोरात हात झटकला आणि त्याच्याकडे अतिशय रागात पाहू लागली. तो पुढे काही म्हणणार तितक्यात ती म्हणाली “सोड मला..”. तिचा तो पुरुषी घोगरा आवाज ऐकुन माझी तर बोलतीच बंद झाली. हे असले काही मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत अनुभवत होतो. मी हिम्मत करून फक्त एकच वाक्य म्हणालो “दादा काय झालंय वहिनीला”. त्याने माझ्या प्रश्नाचे काहीही उत्तर दिले नाही त्यावरून मी समजून गेलो. ती आत पाय झटकत होती आणि त्या जागेवरून हलायला ही तयार नव्हती. शेवटी दादाने तिला खेचतच घरी आणले. घरात आल्यावर तिला देवघरा समोर बसवले तसे ती एकदम शांत झाली. तिचे विचित्र वागणे अगदी एका क्षणात थांबले.
दादा मला म्हणाला की तू जा घरी आणि पाणी गेले नसेल तर भरून घे. तसे मी ठीक आहे म्हणत खाली गेलो. थोडे पाणी भरले आणि मग पाणी गेले तसे मी माझ्या घरी आलो. घडलेला प्रकार खूप विचित्र होता. कारण या आधी मी असे कधी ही अनुभवले नव्हते. वहिनीचा तो आवाज , तिचा चेहरा, तिची ती क्रूर नजर सगळे डोळ्या समोर येत होते. त्या रात्री मला काही झोप लागली नाही. पुढचे काही दिवस व्यवस्थित गेले. मला ही या गोष्टीचा हळु हळु विसर पडला. माझी बी कॉम् ची शेवटच्या वर्षाची परीक्षा चालू होती. एक दिवसा आड पेपर असायचा. त्या दिवशी मी दुपारी १ वाजता जेवण आटोपून अभ्यास करत बसलो होतो.
तितक्यात अचानक मला एक जोराची किंचाळी ऐकू आली. ती किंचाळी सचिन दादाच्या बहिणीची होती. त्या दिवशी मी घरात एकटाच होतो आणि त्यात तो आवाज ऐकुन मी प्रचंड घाबरलो. जास्त विचार न करता मी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या दारात पोहोचल्यावर जे पाहिलं त्यावर काही क्षण माझा विश्र्वासच बसला नाही. काही दिवसांपूर्वी ची ती रात्र, तो प्रसंग एखाद्या चित्रफिती सारखा नजरें समोरून निघून गेला. वहिनी पुन्हा तश्याच अवतारात बसली होती. मोकळे केस, चेहऱ्यावर क्रूर हास्य, समोर जेवणाचे ताट होते. दोन्ही हातांनी ताटतला भात कालवत होती. तिच्या आवाजातली घर घर अगदी स्पष्ट जाणवत होती.
तिची सासू म्हणजे आनंद दादाची आई तिचे ते भयानक रूप पाहून एका कोपऱ्यात च स्तब्ध झाली होती. तितक्यात वहिनी दोन्ही हातानी भात खाऊ लागली. तिचे ते असे खाणे अतिशय किळसवाणे वाटत होते. हा सगळा प्रकार पाहून माझ्या हृदयाची धड धड नकळत वाढली होती. खाता खाता ती विचित्र घोगऱ्या आवाजात हसत होती. हा अगदी तोच आवाज होता जो मी त्या रात्री वहिनीच्या तोंडून ऐकला होता. एव्हाना गल्लीतली माणसं गोळा झाली. घडत असलेला प्रकार पाहून बोलू लागली. ही बाधित दिसतीये. हे काही तरी बाहेरचे आहे. लवकर इलाज नाही झाला तर हीचे काही खरे नाही.
त्यातल्या एकाने लगेच आनंद दादाला आणि त्याच्या वडिलांना फोन करून यायला सांगितले. वहिनी ची अवस्था पाहवत नव्हती. ताटात ला भात खाता खाता कधी अंगावर टाकत होती तर कधी लादीवर टाकून हाताने चोळत होती. पण हे सगळे इतक्यावरच थांबणार नव्हते याची मला कल्पना नव्हती. ती अचानक दोन्ही हातांवर आणि घुडघ्यावर उभी राहिली. आणि तशीच झपाझप हात पुढे सरकवत जवळच्या मोरीत घुसली. आम्ही सगळे जण खिडकीतून हा भयानक प्रकार पाहत होतो. ती पुन्हा बाहेर आली आणि आमच्या कडे पाहू लागली. तिची ती क्रूर नजर मला अजूनही लक्षात आहे. ती आमच्याकडे पाहून जोरात ओरडली आणि बाजूचे ताट घेऊन जोरात खिडकीवर भिरकावले. तसे आम्ही सगळे खिडकी पासून लांब सरकलो.
दादाची आई मोठ्याने रडू लागली. तिला कळत नव्हत की नक्की काय करायचंय. जमलेली सगळी माणसं बोलू लागली की वहिनीला पकडा आणि बांधून ठेवा. आता तिथे जमलेल्या मध्ये मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं तरणी पोर होतो. तसे तिथल्या बायकांनी आम्हाला पुढे जाण्यास सांगितले. आमची तर हिम्मत च होत नव्हती. पण कसे बसे धाडस करून मी आणि माझा मित्र पिंट्या आम्ही आत घरात शिरलो. तशी ती आमच्या कडे वळली आणि म्हणाली “आल्या पावली परत जा.. नाही तर दोघांनाही मारून टाकेन”.. इतके बोलल्यावर तिने भाताच्या भांड्यातला कालथा आमच्या दिशेने भिरकावला. तसे आम्ही घाबरून पुन्हा मागे सरकलो. आम्हाला जर तो लागला असता तर कपाळमोक्ष नक्कीच झाले असते.
कोणाचीही पुढे जायची हिम्मत होते नव्हती. तितक्यात दादा आणि त्याचे वडील आले. ते बघताच वहिनी त्यांच्याकडे पाहून अतिशय विक्षिप्त हसली आणि जमिनीवर लोळायला लागली. तितक्यात दादाच्या आई ने विचारले “कोण आहेस तू.. का माझ्या सुनेच्या मागे लागली आहेस”. तसे वहिनी एकदम शांत झाली. आम्हाला वाटले की ती बरी झाली. पण ती पुन्हा विचित्र आवाजात हसू लागली. आणि म्हणाली “मी हिला आणि तुझ्या पोराला दोघांना घेऊन जाणार. दोघांना संपवणार.. ” तो किळसवाणा आवाज ऐकुन मी प्रचंड घाबरलो. पण अचानक ती म्हणाली “आता मी जातोय.. पण पुन्हा येईन.. हिला घ्यायला”.. वहिनी अतिशय जोरात किंचाळली आणि बेशुध्द पडली.
तिला होणाऱ्या वेदना त्या आवाजातून अगदी स्पष्ट जाणवल्या. थोड्या वेळातच वहिनी शुध्दीवर आली. तिला काही क्षणापूर्वी घडलेले काहीही आठवत नव्हते. ती विचारू लागली की काय झाले, सगळे आपल्या घराजवळ का जमलेत, मला असे काय पाहताय. यापुढे काय घडले ते मला माहित नाही कारण मी माझ्या घरी निघून आलो होतो. पुढे दादाच्या घरी काही तरी बोलणे झाले आणि ते वहिनीला तिच्या माहेरी घेऊन गेले. तिला घेऊन जाताना मी खिडकीतून पाहिले होते. तिचे हात पाय बांधून तिला गाडीत बसवत होते. साधारण ६ महिन्यांनी वहिनी पुन्हा सासरी आली. ती अगदी ठीक वाटत होती.
तिच्या माहेरी काय झाले ते मी कधी दादा ला किंवा कोणालाही विचारले नाही. या घटनेला ५ वर्ष झाली. सगळे नीट सुरळीत चालू आहे. गेल्या ५ वर्षात पुन्हा असा प्रकार पुन्हा कधीच घडला नाही. आणि पुन्हा कधीही घडू नये अशीच देवाकडे प्रार्थना करतो.