अनुभव – स्वप्नील
अनुभव २०१७ सालचा आहे. मी आणि माझे मित्र कल्पेश, आशिष आणि सुविर दर वर्षी वेळात वेळ काढून भेटत असतो. आप आपल्या जीवनात किती ही व्यस्त असलो तरीही आम्ही वर्षातून किमान २ वेळा तरी छोटेसे गेट टुगेदर करतोच. आणि जमलेच तर सूविर च्या घरी टेरेस वर भेटतो आणि नाईट आउट करतो. एकदा अश्याच एका रात्री सहज भूत, प्रेत, आत्मा यांचा विषय निघाला. तेव्हा आशिष ने तो सरळ हसण्यावर नेला आणि उडवून लावला. त्यावर कल्पेश जरा गंभीर झाला आणि आशिष ला विचारले “मित्रा तू मागच्या वर्षी दादा च्या घरी आला होतास आठवतंय का..?”. तसे त्याने लगेच म्हंटले “अरे सवाल.. खूप मस्त घर आहे ते.. मला तो एरिया, तिथले शांत वातावरण खूप आवडली होती.. अरे मी तर लग्नानंतर तिथेच घर बघायचा विचार करतोय..” तसे कल्पेश त्याचे बोलणे तोडतच म्हणाला “दादा आणि वहिनी आता तिथे राहत नाहीत, त्या घराचे सोड त्या भागातही पुन्हा राहायला जाणार नाही..” कल्पेश असे काय बोलतोय हे सगळेच टक लाऊन पाहू लागले. आम्ही सगळ्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली आणि त्याने सगळा प्रकार एक एक करत उलगडून सांगायला सुरुवात केली..
दादाचं लग्न होऊन १ वर्ष झालेले पण वहिनी च आणि आई च पटायचं नाही म्हणून दररोज भांडण व्हायची. म्हणून शेवटी त्या दोघांनी वेगळं रहायचा निर्णय घेतला. त्यांनी भाड्याची जागा शोधायला सुरुवात केली. जवळपास महिन्या भराने त्यांना एक जागा मिळाली जी त्यांच्या आवाक्यात होती. एजंट नी त्यांना घर बघायला बोलावले. आणि जागा बघायला मी, दादा आणि वहिनी असे तिघे गेलो. ती रूम तिसऱ्या मजल्यावर होती. रूम नंबर ३०१. आत गेलो आणि पाहिले तर अगदी स्वच्छ आणि नीट नेटके होते. सेमी फर्निषड असल्यामुळे महत्त्वाचे सगळे समान जसे की फ्रिज, एसी, गॅस शेगडी रूम मध्ये होते. दादाचे अर्धे प्रश्न याने सुटणार होते. त्यामुळे त्याने पुढील बोलणी सुरू केली. तो एजंट म्हणाला की घर मालक माझे काका च आहेत आणि ते बाहेर असतात त्यामुळे त्यांनीच मला सगळे पाहायला सांगितले आहे. जेव्हा एग्री मेंट चा विषय निघाला तेव्हा तो एजंट म्हणाला “तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका.. मी सगळे सांगतो ते तुम्हाला.. तुम्ही इथे कधीही राहायला येऊ शकता..” तेव्हा दादाच्या डोक्यात एकच गोष्ट होती ती म्हणजे राहत्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडायचे.
मी त्याला म्हणालो की गोष्टी कायद्या प्रमाणे होऊ दे, एग्रि मेन्ट होऊ दे काही दिवस जातील पण असे कोणाच्या सांगण्यावर जाऊ नकोस.. मात्र त्याने माझे काही ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी त्याने भाडे आणि डीपो झिट देऊन थोडे फार सामान तिथे नेले आणि संध्याकाळी तिथे राहायला ही गेले. सगळे सामान त्या रूम मध्ये असेल तरीही हॉल मध्ये पंखा नव्हता. म्हणून मग त्यांनी नवीन पंखा लाऊन घेतला आणि त्याच बरोबर ज्या गोष्टींची गरज वाटली त्या सगळ्या घेतल्या. २ दिवसांनी लगेच त्याने घरात एक पूजा ठेवली होती आणि बऱ्याच नातेवाइकांना आमंत्रण दिले होते. तेव्हाच आशिष ही आला होता, तुम्हा दोघांना यायला जमले नव्हते, नाही तर तुम्हाला ही ती रूम पाहता आली असती. पूजा झाली, सगळे काही सुरळीत सुरू होते. आठवडा व्हायला आला. दादा आणि वहिनी ला फक्त एक गोष्ट खटकत होती. तिथे राहायला आल्यापासून कोणीही शेजारी त्यांच्याशी बोलले नव्हते, किंवा विचारपूस करायला आले नव्हते. १-२ वेळा दादा आणि वहिनी सहज म्हणून त्यांच्याशी बोलायला गेले पण त्यांनी तोंडावर दरवाजा लाऊन घेतला. वहिनी ला हे सगळे खूप विचित्र वाटले. “हे कसले शेजारी आहेत जे आपल्या सोबत साधे बोलायला ही तयार नाहीत..” त्यावर दादा म्हणाला “मरू दे त्यांना.. त्यांच्यामुळे आपले काही अडतय का..? लक्ष नको देऊस..”
त्या रात्री ते दोघे ही गाढ झोपेत होते. अचानक दादा ला नळ सुरू असल्याच्या आवाजाने जाग आली. तो उठला आणि बेसिन जवळ आला. पण तिथे पोहोचे पर्यंत तो पाणी वाहण्याचा आवाज बंद झाला होता. त्याला आश्चर्य च वाटलं. कारण त्याला स्पष्ट आवाज ऐकू येत होता पण अचानक तो बंद झाला. तो पुन्हा बेडरूम मध्ये येऊ लागला तितक्यात त्याच्या मागे कोणी तरी असल्याची चाहूल त्याला जाणवली. तो झटकन मागे फिरला आणि मागचे दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला. एक काळपट सावली त्या मंद प्रकाशात त्याच्या समोर उभी होती. त्याने घाबरून पटकन लाईट लावण्यासाठी बटण दाबले आणि समोर पाहिले. समोर कोणीही नव्हत. त्याला कळलं नाही की आपल्याला भास होत आहेत की आपण जे पाहिले ते खरं होत. वहिनी गाढ झोपेत होती. त्याने बेडरूम मध्ये येऊन अलगद बेड वर अंग टाकले. मनात तोच विचार सुरू होता. जर भास असेल तरीही पाण्याचा आवाज येणं, अचानक तो आवाज यायचा बंद होणे, आणि ती सावली हा सगळा योगायोग कसा असेल. विचार करता करता त्याला झोप कधी लागली कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी ते दोघे ही आप आपल्या कामाला गेले. दादा मात्र संपूर्ण दिवस तोच विचार करत राहिला, त्याचे कशातही लक्ष लागले नाही.
तो काम संपवून जरा लवकरच घरी आला. वहिनी अजुन घरी आली नव्हती. घरात शिरल्यावर त्याला खूप अस्वस्थ जाणवू लागले. जस घरात तो एकटा नाहीये, अजुन कोणी तरी घरात आहे. ती जाणीव घाला अजुन अस्वस्थ करू लागली. कुठे तरी मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती. रात्री वहिनी घरी आली आणि दादा ला असे टेन्शन मध्ये पाहून काय झाले हे विचारू लागली. पण त्याने फक्त दमलो य असे सांगून विषय वाढवला नाही. काही दिवस उलटले असतील. त्या दिवशी वहिनी तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी नाशिक ला गेली होती. दादा ला सुट्टी मिळाली नाही म्हणून जाता आले नाही. घरात एकटे थांबायला त्याला जरा भीती वाटत होती. आई कडे जायला ही त्याला जीवावर आले होते. शेवटी एकच दिवसाचा प्रश्न आहे असा विचार केला आणि तो घरी थांबला. ऑफिस च काम करत बसला होता त्यामुळे झोपायला थोडा उशीर झाला. बेडवर येऊन झोपला आणि कामाच्या थकव्यामुळे काही क्षणात त्याला गाढ झोप लागली. बेडरूम मधला लाईट बंद होता पण बाहेरच्या स्ट्रीट लाईट चा मंद प्रकाश खिडकीतून आत येत होता. मध्यरात्र उलटून गेली असेल. तितक्यात त्याची झोपमोड झाल्यासारखी झाली, हलके डोळे उघडले. बेड च्या एका कडेला एक बाई त्याच्या कडे पाठ करून बसली होती आणि काही तरी पुटपुटत होती. तो खाडकन बेडवर उठून बसला आणि पुन्हा त्या दिशेला पाहिले. पण त्या रूम मध्ये मिट्ट काळोखा शिवाय दुसरे कोणीही नव्हते.
स्वप्न होते की खरंच कोणी बाई बसली होती. घाबरून त्याने रूम ची लाईट लावली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला. अचानक त्याच डोकं आणि मान खूप दुखू लागली. ती रात्र त्याने कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी कसाबसा तो ऑफिस ला गेला. अंग खूप जड झाल होते. दुपारी वहिनी परत आली. संध्याकाळी ऑफिस हून घरी परतत असताना त्यांनी बिल्डिंग च्या वॉचमन कडे थोडी विचारपूस केली. त्याला विचारले “आम्ही राहतो तिघे आधी कोण राहायचं आणि हे आमच्या तिसऱ्या मजल्यावर चे लोक असे विचित्र का वागतात.. तसेच आहेत की काही प्रोब्लेम झालाय..”. तो फक्त एकच वाक्य बोलला “मला माहित नाही”. पण हे बोलताना त्याने अजिबात नजरेला नजर मिळवली नाही आणि यामुळे दादा ला संशय आला. घरी आल्यावर त्याने वहिनीला सगळा प्रकार सांगितला. आणि जसे तो फ्रेश होऊन बेडरूम मध्ये गेला त्याचे डोके पुन्हा ठणकु लागले. काही मिनिट आराम म्हणून तो बेडवर जाऊन पडला तितक्यात वहिनी मागून आली आणि म्हणाली ” अरे तू लाईट चालूच ठेऊन गेला होतास सकाळी.. दिवसभर लाईट सुरू होता.” दादाने वेळ मारत “राहून गेले असेल बंद करायचे ” असे म्हंटले. तसे वहिनी म्हणाली “तू परत सिगारेट प्यायला सुरू केलीय ना..?” हे ऐकून तो जरा गोंधळात पडला.
“नाही ग.. मी सिगारेट सोडून जमाना झाला.. तुझी शप्पत..”. दादा तिला समजावत म्हणाला. “मग मागच्या बाल्कनी मधून वास कसा काय आला.. खर सांग मला..” वहिनी ने पुन्हा प्रश्न केला. आता मात्र दादा ला राहवले नाही. या आधी घडलेल्या सगळ्या घटना एक एक करून त्याने वहिनीला सांगितल्या. तिला हे ऐकून धक्काच बसला. कारण एरव्ही चेष्टा मस्करी करणारा व्यक्ती आज अतिशय गंभीर होऊन हे सगळे सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भय सगळे काही सांगून जात होते. “तू खूप दमला आहेस, आपण यावर उद्या बोलू..” असे वाहिनीने सांगून त्याला झोपवले. वहिनी या सगळ्याचा विचार करत झोपून गेली. रात्री चे जवळपास २ वाजले असतील. अचानक त्यांच्या दारावरची बेल वाजली. आता इतक्या रात्री कोण असेल..? दोघं ही खूप घाबरले. बाहेर जाऊन बघण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती. शेवटी दादा ने थोडे धाडस करून दरवाज्याच्या होल मधून बघण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर कोणीही नव्हत. वहिनी ला हे सगळे खूप विचित्र वाटलं कारण तिला अश्या या अमानवीय गोष्टींवर विश्वास नव्हता. त्या नंतर मात्र घराची बेल वाजली नाही.
काही दिवसांनी वहिनी ची आई तिच्या कडे राहायला आली. तेव्हा दादाने त्यांना या सगळ्या बद्दल सांगितले. त्यावर तिने घरी शांती करण्याचा उपाय सुचवला. दादा लगेच तयार ही झाला. तो सगळा कार्यक्रम रविवारी त्यांच्या हॉल मध्ये पार पडला. वहिनी ची आई सोफ्यावर बसली होती आणि तिच्या समोर ती पूजा चालू होती. हवन कुंडातून धूर येत होता. आणि त्या धुरात तिने असे काही पाहिले जे पाहून कोणालाही हृदय विकाराचा झटकाच आला असता. त्या धुरा मध्ये एका बाईचा चेहरा तयार झाला होता..
गृहशंती चा सगळा कार्यक्रम रविवारी त्यांच्या हॉल मध्ये पार पडला. वहिनी ची आई सोफ्यावर बसली होती आणि तिच्या समोर ती पूजा चालू होती. हवन कुंडातून धूर येत होता. आणि त्या धुरात तिने असे काही पाहिले जे पाहून कोणालाही हृदय विकाराचा झटकाच आला असता. त्या धुरा मध्ये एका बाईचा चेहरा तयार झाला होता.. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास च बसला नाही. मात्र तेव्हा तिने ते कोणालाही जाणवू दिले नाही. सगळे आटोपल्यावर आणि पाहुणे गेल्यावर तिने दादा ला आणि वहिनी ला बोलावले आणि घडलेला भयानक प्रकार सांगितला. त्यांचे बोलणे ऐकून दादा लगेच म्हणाला “मी बोललो होतो मा.. इथे कोणत्यातरी अदृश्य शक्ती चा वास आहे..”. पण वहिनी ने त्या दोघांची समजूत काढायला सुरुवात केली आणि सांगू लागली “तुम्हाला सारखा भास होतोय.. जर या घरात खरंच काही तरी आहे तर मला का दिसत नाही..”. गृहशांती केल्यानंतर त्यांना काही दिवस काहीच अनुभव आला नाही. पण दादाचं डोकं अधून मधून खूप दुखायचे.
शेवटी त्याने न राहवून डॉक्टरांना दाखवले, टेस्ट केल्या पण सगळे काही नॉर्मल. एका रविवारी वहिनी घरी एकटी होती. दादा ऑफिसच्या मित्रांसोबत बाहेर गेलेला. दुपार ची वेळ होती. दारा बाहेर तिला कसला तरी आवाज आला म्हणून तिने दार उघडले. बाहेर कचरा उचलणारा माणूस जिना धुत खाली येत होता. त्यांच्या मजल्यावर एकानेही दार उघडले नाही. त्यामुळे वहिनी म्हणाली की थांबा मी पाणी आणून देते, किती बादल्या हवेय पाणी. पण तो माणूस मागे बघत म्हणाला “नाही पाणी नको..” वहिनी ने दार लावले आणि सगळे सुरुवातीपासून आठवायला सुरुवात केली. त्या घरात काही तरी अमानवीय आहे हे मानायला तयार नव्हती. त्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांचा स्वभाव, दादा ला आणि तिच्या आई ला आलेला अनुभव मात्र तिला पचनी पडत नव्हता. तिने तिच्या पद्धतीने त्याचा छडा लावायचा ठरवला. ती हॉल मध्ये आली, दरवाजा दार खिडक्या घट्ट लावून घेतल्या आणि मोठ्याने ओरडुन विचारू लागली “ह्या घरात आता माझ्या शिवाय कोण आहे..? हिम्मत असेल तर समोर ये..” काही वेळ ती तशीच उभी राहून कसली चाहूल ऐकू येतेय का, काही दिसताय का ते पाहू लागली. नंतर हळु हळू संपूर्ण घरात फिरत ती हे एकच वाक्य बोलू लागली. पण तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
बऱ्याच वेळा नंतर तिने निष कर्ष काढला की या घरात काही नाहीये आणि दादा आणि तिच्या आई ला फक्त भास होत आहेत किंवा त्यांच्या मनाचे ते खेळ आहेत ज्याला काडीमात्र अर्थ नाही. आणि राहिला प्रश्न बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या इतर लोकांचा तर ते स्वभावाने च विचित्र आहेत. हा विषय तिने इथेच थांबवायचा ठरवला आणि टिव्ही वर सिरीयल पाहत बसली. तो दिवस तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी रात्री तीच अचानक डोकं दुखायला लागले. ती उठली, पाणी प्या यली आणि पुन्हा झोपून गेली. रूम मधला लाईट बंद होता पण बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईट मुळे रूम मधले अंधुक दिसत होते. पाणी प्यालयावर ती झोपली आणि तिला खूप अस्वस्थ वाटू लागले. श्वास कोंडू लागला. तसे तिने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून जोरात ओरडली. तिच्या आवाजाने दादा धडपडत उठला आणि लाईट लावली. त्याने वहिनी कडे पाहिले तर ती घामाने ओलीचिंब झाली होती, भीती ने थरथर कापत होती. तिला काहीच बोलता येत नव्हते कारण ती प्रचंड घाबरली होती. दादा ने कसे बसे तिला शांत केले. तसे ती रडू लागली आणि विनवण्या करू लागली की आपण इथे नको राहूया. दादा ने तिला विचारले की नक्की काय झालेय..
त्यावर ती म्हणाली “मी पाणी पिण्यासाठी उठले आणि पुन्हा झोपले तर मला खूप अस्वस्थ वाटू लागले. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मी सहज डोळे उघडुन समोर बघायचा प्रयत्न केला तर एक बाई केस मोकळे सोडून आपल्या बेड वर बसली होती.. तिच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते, ती एक टक माझ्याकडे बसली होती” हे सांगताना वहिनी ने बेडच्या एका कोपऱ्यात इशारा केला. दादा ने तिला खूप सावरण्याचा प्रयत्न केला पण ते घर सोडण्या शिवाय आता त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. ती रात्र त्यांनी कशी बशी काढली. सकाळी दादा ने त्या घराच्या एजेंट ला फोन केला पण तो काही त्याने उचलला नाही. काल रात्री च्या प्रसंगामुळे वहिनी ला ताप भरला होता त्यामुळे ती ऑफिस ला गेली नाही. त्यामुळे दादा ने देखील सुट्टी घेतली. इतक्या लगेच घर शोधणे शक्य नव्हते आणि वहिनी ला सोडून तो घर बघायला बाहेर ही पडू शकत नव्हता म्हणून त्याने मला फोन केला. घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. मी त्याला घरी यायला सांगितले, खूप समजावले पण त्याने काही ऐकले नाही. कारण परत आई वडिलांच्या घरी जायचे म्हणजे त्यांचे बोलणे, टोमणे ऐकावे लागणार.. असे त्याला वाटले असावे.
शेवटी मी २-३ जणांना फोन केला. माझा एक खास मित्र आहे जो काही कामानिमित्त बाहेर जाणार होता, मी दादा ला थोडे दिवस त्याच्या घरी राहायला सांगितले. सामान काही दिवस त्याच रूम मध्ये किंवा टेरेस वर ठेऊ असे ठरले. हे ऐकून दादा ला जरा बरं वाटलं. त्यांनी दुपारीच नवीन घर शोधायला सुरुवात केली. त्याच संध्याकाळी कपडे वैगरे घेऊन तो आणि वहिनी माझ्या मित्राकडे राहायला गेले. तिथे मित्राची आई घरी होती. जसे ते त्या घरी आले, दादा चे डोके दुखणे एकदम बंद झाले, अस्वस्थपणा थांबला, अनामिक भीती कुठे तरी नाहीशी झाली. वहिनी चा ताप देखील कमी झाला. तेव्हा मात्र दादाची खात्री पटली की त्या घरात घडणाऱ्या गोष्टी साध्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दादा ला एक फोन आला. घर भाड्याने देणाऱ्याचा फोन होता. घर पाहायला मी आणि दादा गेलो. भाडे थोडे जास्त होते पण घर ही तसेच होते. ते आम्हाला दोघानाही आवडले. व्यवहाराचे बोलणे झाले. आता ते सामान त्यांना जुन्या घरातून नवीन घरात आणायचे होते. मात्र आधीच्या एजेंट चा फोन लागत नव्हता. दुपारी त्याचा फोन आला. दादा ने सरळ सांगितले की आम्हाला इथे राहायचे नाही, आम्हाला डिपो झीट चे पैसे परत करा. त्यावर तो एजेंट चिडून वाद घालू लागला. तो ऐकत नाही हे समजताच दादा ने शिव्या घातल्या आणि त्या बाई चा सगळा प्रकार सांगितला. आणि हे ही सांगितले की आम्हाला फसवून तू हे घर भाड्यावर दिले, जर तू पैसे परत दिले नाही तर सगळी कडे या बद्दल सांगून टाकेन. त्या बाई चा विषय निघताच तो एकदम शांत झाला.
त्याने विषय न वाढवता पैसे परत द्यायला तयार झाला आणि उद्या घराची चावी घ्यायला येतो असे सांगून फोन ठेऊन दिला. पुढच्या २ दिवसात नवीन घराचे अग्री में ट बनवायचे ठरले. दुसऱ्या दिवशी दादा आणि मी सामान घ्यायला आलो. सामान तसे काही जास्त नव्हते त्यामुळे तासाभरात सगळे सामान टेम्पोत भरले. हॉल मधला पंखा काढायचा राहिलेला. तसे सोबत आलेल्या माणसाने स्टूल घेतला आणि त्यावर उभा राहून पंखा काढू लागला. दादा तिथे बाजूलाच उभा होता. जसा त्याने हुक मधून पंखा काढला अचानक स्टूल वाकडा झाला आणि तो माणूस खाली पडला. पंखा त्याच्या हातातून सुटून दादाच्या पायावर पडला. सगळी माणसे धावत आली आणि दादा ला उठवले. सगळे सामान आधीच टेम्पो मध्ये भरल्यामुळे घरात काहीच नव्हते. त्यामुळे दादा ला खाली लादिवर बसावे लागले आणि त्या जखमेवर रुमाल बांधला. तेवढ्यात त्या घराच्या समोर चा दरवाजा उघडला आणि एक वयस्कर बाई बाहेर आली. तिने दादा ला तिच्याकडे घेऊन यायला सांगितले. त्या बाई ने दादा च्या पायाला मलम पट्टी केली. निघायच्या आधी दादा ने त्या बाई ला विचारले “इतके दिवस आम्ही इथे राहत होतो तेव्हा तर तुम्ही आमच्याकडे ढुंकून ही पाहिले नाही मग आता हा शेजारधर्म कसा सुचला तुम्हाला..?”
त्यावर ती बाई जे म्हणाली ते ऐकून सगळेच सुन्न झाले. ती सांगू लागली “तुम्ही ज्या घरात राहता ते आधी माझेच घर होते. या मजल्या वरील ३०१ आणि ३०२ माझ्याच. मी आणि माझे पती इथे राहायचो आणि ही खोली भाड्याने द्यायचो. एकदा ही खोली एका जोडप्याला दिली. राहणी मानावरून ते मोठ्या घरचे वाटत होते. ती बाई एकटीच घरी असायची. नवरा बहुतेक नसायचाच. चांगल्या घरचे वाटले म्हणून राहायला दिले पण नंतर कळले की ती बाई खूप व्यसनी होती. खूप सिगारेट प्यायची आणि कधी कधी तर दारू पिऊन तमाशे करायची. एके दिवशी तिला कळले की तिच्या नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या बाई बरोबर काही तरी सुरू आहे आणि तो तिला फसवतोय. त्यांच्यात बराच वाद झाला आणि तिने हॉल मधल्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस केस वैगरे झाले. बरेच महिने ती खोली बंद होती. आमच्या कडे जेव्हा डागडुजी चे काम काढले म्हणून आम्ही काही दिवस तिथे राहायला गेलो. तिथे राहत असताना नेहमी माझे डोकं आणि अंग खूप दुखायचे. विचित्र भास व्हायचे. माझ्या पतीना देखील असाच त्रास व्हायचा. आम्ही वास्तू शांती केली, पूजा केली पण काही फरक पडला नाही. आम्ही जेव्हा पुन्हा आमच्या आधीच्या खोलीत राहायला आलो तेव्हा आमचे सगळे त्रास कमी झाले.
मात्र एके संध्याकाळी वॉचमन सोबत बोलत असताना माझी नजर त्या खोलीच्या खिडकी मध्ये गेली तेव्हा ती बाई मला त्या खिडकीत उभी दिसली. खोली बरेच महिने बंद होती. मला वाटले की मला भास झाला. पण काही दिवसांनी वॉचमन देखील बोलला की त्यालाही ती खिडकीत उभी दिसली. तेव्हाच आम्ही खोली विकून टाकायचे ठरवले. ज्याला ती खोली विकली तो माणूस इथे नसतो. त्याने ती जागा घेऊन सरळ भाड्याने दिली. मात्र इथे कोणताही भाडेकरू १ महिन्यांहून जास्त टिकत नाही. मागच्या वेळी मी एका भाडेकरू ला सांगितले आणि हे तो त्या माणसाला बोलला. तेव्हा त्याचा आणि माझ्या पतींचा खूप वाद झाला. म्हणून आम्ही या खोली बद्दल कोणाला ही सांगायला जात नाही. हे सगळे ऐकून दादा ला काय बोलावे तेच कळत नव्हते. ते तिथून बाहेर पडले. खाली एजंट भेटला. दादा तर त्याला मारायला च निघालेला पण मी त्याला कसे बसे थांबवले. त्याने मुकाट्याने सगळे पैसे दिले आणि चावी घेऊन तिथून निघून गेला. दादा ने सहज एक नजर वर त्या खोली कडे पाहिले. त्या खोलीत एका बाई ची पुसटशी आकृती उभी दिसली. त्या नंतर एक मिनिट ही आम्ही तिथे थांबलो नाही. या जगात चांगल्या गोष्टी आहेत तर वाईट गोष्टी ही नक्कीच असतील. विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.