अनुभव – सौरभ पवार

आपल्या आई वडिलांचे आपल्यावर नितांत प्रेम असते.. खासकरून माझ्या आजीचा माझ्यावर खूप जीव होता. लहानपणापासून माझे खूप लाड करायची. मी ७ वी मध्ये शिकत असताना माझी आजी मला कायमची सोडून गेली. तारीख २५ मे २०१४. आमच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आजी इतके लाड कोणीच करायचे नाही त्यामुळे आता आपल्याला आजीचे प्रेम पुन्हा कधीच मिळू शकणार नाही या विचाराने जीव तुटत होता. आजी जाऊन २-३ दिवस झाले होते. त्या दिवशी मी पहिल्या खोलीत मित्राशी बोलत बसलो होतो. उशिरा पर्यंत जागे होतो आम्ही. तो रात्री त्याच्या घरी निघून गेला आणि मी आत झोपायला गेलो. तितक्यात मला आतल्या खोलीतून जिथे आजी झोपायची तिथून कसलीशी हालचाल जाणवली. मी जरा दचकलोच. मी लाईट लाऊन आत जाऊन पाहिले पण तिथे कोणीही नव्हते.

मी लाईट बंद करून माझ्या खोलीत येऊन झोपलो. काही दिवस झालेल्या जागरणा मुळे मी थकून गेलो होतो त्यामुळे मला अगदी गाढ झोप लागली. पण पुन्हा कसल्याश्या चाहुलीने माझी झोपमोड झाली. डोळ्यांवर खूप झोप होती म्हणून मी अंथरुणातून उठलो नाही पण माझ्या कानावर एक हळुवार फुंकर घातल्यासारखे जाणवले आणि अक्षरशः एक वाक्य ऐकू आले “घाबरु नकोस मी आहे अजुन”. तो आवाज आजीचा होता. पण आजी तर काही दिवसांपूर्वी.. माझी झोप एका क्षणात उडाली. कसे शक्य आहे. मी विचार करतच अंथरुणात उठून बसलो. झोप लागत नव्हती. १-२ होऊन गेले असतील. मला वेळेचे भान नव्हते. तितक्यात माझी चुलत बहीण झोपेतून ओरडत च उठली. मी आणि घरातले सगळे तिच्या जवळ धावत गेलो. मी पटकन धावत जाऊन पाणी घेऊन आलो आणि तिला पाणी प्यायला दिले. आम्ही तिला शांत करत होतो.

पण ती धाप लागल्यासारखी करत होती. खूप घाबरलेली वाटत होती. काही मिनिटांनी ती जरा शांत झाली. पण तरीही तिच्या चेहऱ्यावरची भीती तसूभरही कमी झाली नव्हती. आम्ही तिला विचारले की तुला काही स्वप्न पडले का.. तू इतकी घाबरून ओरडत का उठलीस. तसे ती सांगू लागली. स्वप्नात आजी आली होती. मी तिच्याशी बोलत होते पण नंतर मला जाणवले की ती आपली आजी नाही. कोणी तरी आपल्या आजी चे रुप घेऊन आलेय. मला माहित नाही ते काय होते पण ते मला मारायला येत होते. माझा पाय पकडून चावत होते. तितक्यात आपली आजी आलो आणि मला तिने त्याच्यापासून दूर नेले. मी इतकी घाबरले होते की मी ओरडतच उठले. ती हे सांगताना सतत खिडकी जवळ पाहत होती. आम्ही तिला समजावू लागलो की तुला स्वप्न पडले असे काही नाहीये. पण त्या नंतर ती जे एक वाक्य बोलली ते ऐकुन माझी चांगलीच तंतरली.

ती दबक्या आवाजात म्हणाली “स्वप्नात जे दिसले ना ते बघा तिथे खिडकी वर बसलेय आणि माझ्या कडे पाहून हसतेय”. आम्ही सगळ्यांनी एका क्षणात तिथे पाहिले. पण तिथे कोणीही नव्हते. त्या रात्री आमच्या पैकी एकालाही शांत झोप लागली नाही. काही महिने सुरळीत गेले. पण माझ्या आयुष्यात अजुन एक वाईट घटना घडली. अतिशय वाईट. आजीला जाऊन ६ महिने झाले होते आणि माझ्या वरचे पितृछत्र हरपले. माझे वडील आजारी पडले आणि थोड्याच दिवसात ते ही गेले. आम्ही खूप एकटे पडलो. कश्यातच लक्ष लागतं नव्हत. एकाच वर्षी मी माझ्या वर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोघांनाही गमावलं होत. त्या वेळी वाटलं की कधी कधी आयुष्य आपल्याला खरच खूप कठीण प्रसंगाला सामोरं जायला भाग पाडत. मग तुम्ही त्याच्या साठी तयार असो किंव्हा नाही. नशीब कधीच कोणाला चुकत नाही. 

वडील गेल्या नंतर मी, माझी लहान बहीण आणि आई खरच एकटे पडलो होतो. माझी आत्या माझ्या घरापासून काही अंतरावर राहायची. वडील गेल्यानंतर ती आणि तिची फॅमिली आमच्या कडेच राहायला होते. तिसरा दिवस असेल. मी आणि माझा चुलत भाऊ झोपलो.होतो. अर्धा एक तास झाला असेल त्याला कसल्याश्या आवाजाने जाग आली. त्याने उठून पाहिले तर बेडरूम मध्ये काही तरी हालचाल जाणवली. सगळे गाढ झोपले होते. त्यामुळे आवाज कसला येतोय या विचाराने तो घामाने डबडब ला होता. तो घाबरून माझ्या बाजूला येऊन झोपला. मी अगदी गाढ झोपेत होतो. त्यामुळे मला घडत असलेल्या प्रकारची कल्पनाही नव्हती. घाबरल्यामुळे तो माझ्या जवळ येऊन झोपला होता. मला उकडत होत म्हणून मी त्याला ३-४ वेळा लांब ढकलल पण तो पुन्हा माझ्या जवळ येऊन झोपला तसे मी उठलो आणि त्याला ओरडलो. 

पण त्याची अवस्था पाहून मीच जरा दचकलो. तो भीतीने थरथरत होता. त्याला घाम फुटून तो अगदी ओलाचिंब झाला होता. मी त्याला आश्चर्याने विचारले “काय रे.. काय झालं?.. एवढा घाबरलेला का दिसतोय?”. तेव्हा तो म्हणला कोणी तरी आहे आतल्या खोलीत. कधी पासून हालचाल जाणवतेय. मला मामा चा आवाज ही ऐकू आला. त्याचे बोलणे ऐकून मी ही जरा शहारलो. त्याचा मामा म्हणजे माझ्या वडिलांचा आवाज त्याने ऐकला. पण हे शक्य नाही. मी त्याला समजावू लागलो की तुला भास झाला असेल. त्याला माझ्या जागेवर मी झोपवले आणि बाहेरच्या बाजूला मी झोपलो. साधारण दोन ते अडीच च्याच सुमारास मला आई आणि आत्त्याच्या आवाजाने जाग आली. मी त्याचे बोलणे ऐकू लागलो. त्या दोघांनाही वडिलांचा आवाज ऐकू आला होता म्हणून त्या दोघेही उठून बसल्या होत्या. 

काही वेळा नंतर मला ही त्यांचा आवाज येऊ लागला. हाक होती माझा नावाची. मी ही आता अंथरुणात उठून बसलो. नंतर पुन्हा आवाज येऊ लागला. ते कण्हत असल्याचा. मला जुने दिवस आठवले. वडिलांचा आपघात झाला होता तेव्हा त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली होती. तेव्हा रात्री त्यांच्या पायात गोळा आला पाय भरून आला की त्यांना खूप वेदना व्हायच्या तेव्हा ते असेच कन्हायचे. अगदी तसाच आवाज आत खोलीतून येत होता. आम्ही सगळे बाहेर अंथरुणात उठून बसलो होतो. भास तर नक्कीच नव्हता कारण आम्हा सगळयांना तो आवाज ऐकू येत होता. अही दिवस असेच चालू राहिले. रोज आम्हाला त्यांचा आवाज यायचा. कधी कधी तर असे वाटायचे की ते आमच्या सोबतच आहेत याचं घरात. पुढे त्यांचे कार्य झाल्यावर तो आवाज यायचा बंद झाला. 

आजही आजी आणि वडलांची आठवण आली की डोळ्यात पाणी तराळत…

Leave a Reply