अनुभव – सानिका

अनुभव माझ्या आईचा आहे जेव्हा माझा नुकताच जन्म झाला होता. अनुभव मला आई ने सांगितला. मला एक मोठी बहीण आणि भाऊ आहे. मे २००५ मध्ये माझा जन्म झाला आणि आई इस्पितळात दाखल होती. सगळे जवळचे नातेवाईक मला आणि माझ्या आई ला भेटायला येत होते. सकाळी १०.३० च्या सुमारास माझ्या आईची माऊशी मला बघून गेली. दिवस असाच सगळ्यांना भेटण्यात गेला. त्या रात्री आई ला झोप लागत नव्हती म्हणून ती तशीच बेड वर पडून राहिली होती. तिचा बेड खिडकी शेजारी होता. त्या काळी ते इस्पितळ अगदी साधे होते त्यामुळे जास्त सुविधा नव्हत्या. त्यामुळे माझी आजी खाली च बेड जवळ झोपली होती. माझ्या आई ला साधारण १२ ला झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली होती.

दीड दोन तासानंतर तिला कसलीशी चाहूल जाणवली. तिने डोळे उघडुन पाहण्याचा प्रयत्न केला तर तिला जाणवले की मावशी दरवाजा उघडून आत आली आहे. ती काही वेळ भिंती जवळ उभी राहिली. आणि नंतर बेड जवळ येऊन बसली. आई ने तिला विचारले ” मावशी एवढ्या रात्री..? आई झोपली आहे माझ्या जवळ, पप्पा नी पाठवले का तुला..?” पण तिने काहीच उत्तर दिले नाही. फक्त एक वाक्य म्हणाली ” तुला तीन मुले आहेत, मला एकही नाही.. मला तुझ एक मूल दे.. मी घेऊन जायला आली आहे..” इतकं म्हणून ती मला उचलून घ्यायला पुढे सरकली.

हे बघताच माझी आई माझे बाळ म्हणत जोर जोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून खाली झोपलेली आजी उठली तशी मावशी दिसेनाशी झाली. कारण ती माझी मावशी नव्हतीच. तीच रूप घेऊन दुसरच कोणी तरी त्या खोलीत मला न्यायला आले होत. आई ला कळून चुकले की या जागेत काहीतरी विचित्र आहे.दुसऱ्या दिवशी सकाळी आई ने काऊंटर वर विचारलं की हॉस्पिटल रात्रीच्या वेळी बंद करत नाहीत का. कोणी वॉचमन वैगरे नसतो का. त्यावर तिला एका नर्स ने विचारले की काही झालेय का.? तसे आई ने रात्री घडलेला प्रसंग सांगितला.

त्यावर ती नर्स आई ला बाजूला घेऊन आली आणि सांगू लागली ” इस्पितळाच्या मागे एक झाड आहे, जे मागच्या बाजूच्या रूम मधल्या खिडकीतून दिसते. त्या झाडाला एका बाईने गळफास घेऊन आत्महत्या केली होती कारण तिला बाळ होत नव्हत. तिच्या घरचे तिला बरेच बोलायचे, मारायचे तिचा छळ करायचे म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असे सगळी लोक म्हणतात. इथे येणाऱ्या बाळंतीण झालेल्या स्त्रियांना असे भयानक अनुभव येतात. आईला कळले नाही की तिने जे अनुभवले ते खरंच होते की तो फक्त एक भास होता.

Leave a Reply