अनुभव – आकाश अहीवले
ही गोष्ट २०१५ ची आहे. माझ्या मित्राचा वाढदिवस होता. फेब्रुवारी महिना सुरू होता. आम्हा सगळ्या मित्रांनी शिर्डी ला जायचे ठरवले. गाडी माझीच होती त्यामुळे संपूर्ण प्रवासात मीच चालवणार होतो. एकूण ६-७ जण होतो त्यामुळे खूप मजा येणार होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास निघालो. नाशिक हायवे ने आम्ही निघालो होतो. मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हा बेत आखला होता आणि त्यात बऱ्याच दिवसांनी सगळे मित्र ट्रिप ला चाललो होते. जुन्नर पास झाल्यावर पुढे थोड्यावेळ विश्रांती घेण्यासाठी थांबलो कारण मी सतत ४ तास गाडी चालवत होतो. मग साधारण ११ च्या सुमारास शिर्डी ला पोहोचलो. साईबाबांचे दर्शन केले. तिथून एका मित्राचे गाव जवळच होते, तिथे जायचे ठरले.
खरे तर आम्ही थोड्या वेळ थांबून परतीच्या प्रवासाला लागणार होतो पण घाटातला रस्ता असल्याने आम्ही परत जाण्या ऐवजी अचानक मित्राच्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला. ते गाव शिर्डी पासून ८० ते ९० किलोमिटर होते. काही अंतर रस्ता चांगला होता पण नंतर कच्चा रस्ता लागला जो खूप अरुंद होता. म्हणजे समोरून एखादे वाहन आले तर बाजूने जायला दोन्ही वाहनांना रस्त्यावरून खाली उतरावे लागेल. त्यात त्या रस्त्याला स्ट्रीट लाईट नव्हत्या. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा नक्की काय आहे ते ही नीट दिसत नव्हते. थोडी फार खुरटी झाडी दिसायची अधून मधून. पण त्या व्यतिरिक्त काहीच नजरेस पडत नव्हते. या सगळ्यात भर म्हणजे आम्ही रस्ता चुकलो. हे सुद्धा त्याच मित्राने सांगितले ज्याच्या गावात आम्ही जात होतो. आमच्यात बोलणे सुरू झाले की आता काय करायचे कारण वस्तीचा परिसर ही दिसत नव्हता. काही अंतर असेच पुढे जात राहायचे ठरवले.
बऱ्याच वेळा नंतर रेल्वे फाटक लागले आणि तिथे एक गार्ड उभा दिसला. आम्ही गाडी थांबवून त्याला नीट पत्ता विचारून घेतला. त्याने सांगितल्या प्रमाणे आम्ही निघालो. विशेष गोष्ट म्हणजे त्या रस्त्यावर मला आमच्या गाडी शिवाय दुसरे एकही वाहन नजरेस पडत नव्हते. त्यामुळे जरा वेगळेच वाटत होते गाडी चालवताना. माझ्या गाडीत म्युझिक सिस्टिम नव्हती त्यामुळे एकदम शांत वाटत होते. पण एक गोष्ट चांगली होती की त्या निमित्ताने मित्रांचे बोलणे होत होते. अधून मधून एखादा विषय निघायचा आणि चांगलाच हशा पिकायचा. ज्याच्या गावी चाललो होतो तो मित्र माझ्या बाजूलाच बसला होता. त्याला काय वाटले माहीत नाही पण अचानक त्याने त्याच्या भागातल्या काही गूढ गोष्टी सांगायला सुरुवात केली.
रस्ता तसाही सामसूम होता त्यामुळे मी त्याच्या कडे जास्त लक्ष देत होतो आणि समोर लक्ष कमी होते. त्यात तो जे काही सांगत होता ते जरा वेगळेच वाटत होते. तितक्यात एक वळण आल्यासारखे वाटले आणि मी पुढे पाहिले तर तिथे रस्त्याकडे ला एक म्हातारा माणूस बसला होता. विचित्र गोष्ट ही होती की तो डोक्याला हात लावून कुठे तरी वर बघता होता. एक तर गडद अंधार.. गाडीच्या हेड लाईट शिवाय आजूबाजूला कोणताही प्रकाश नाही. त्यात या भागात वस्ती नाही. ते दृश्य मनात धडकी भरवू लागले. जसे आमची गाडी त्याच्या जवळून जाऊ लागली तसे तो एकदम हवेत तरंगत रस्त्याच्या मधोमध गाडी समोर आला. मी प्रसंगावधान राखत झटकन स्टिअरिंग वळवून गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि पुन्हा वर आणली. काय पाहिलं ते उमगलच नाही पण भीतीने सर्वांग मात्र शहारले. एव्हाना वळण ही संपले होते. त्यामुळे गाडी चा वेग इतका वाढवला की तशी १०० च्या वर नेला.
गाडी घेतल्यापासून मी वेग कधीच इतका वाढवला नव्हता. पण भीती च इतकी वाटत होती की त्या परिसरा पासून कधी एकदा लांब जातो असे झाले होते. माझ्या बाजूला बसलेला मित्र आणि गाडीत असलेले सगळे अगदी शांत होते. मित्राचे गाव येई पर्यंत कोणी एक शब्द ही बोलले नाही. रस्ता चुकल्यामुळे गाडी एवढी फिरली होती की पेट्रोल ही संपत आले होते. त्यामुळे मित्राने त्याच्या गावातल्या एका मित्राला पेट्रोल घेऊन थांबायला सांगितले होते. गावाच्या वेशी जवळ पोहोचलो तास तो मित्र नजरेस पडला आणि जीवात जीव आला. मित्राच्या घरी एक रात्र काढून दुसऱ्या दिवशी आम्ही आप आपल्या घरी निघून आलो. घडलेला प्रसंग भयानक आणि तितकाच विचित्र होता जो मीच नाही तर माझ्या सगळ्या मित्रांनी अनुभवला होता. पण त्या नंतर आम्ही कधीच तो विषय काढला नाही.