अनुभव – अक्षय गुरव

मी राहायला मुंबई ला आहे. मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचा बेत ठरला होता. आमचं गाव मुंबई पासून साधारण १८० किलोमिटर अंतरावर आहे. आमचं सगळ ठरलं होत की गावी जाऊन मस्त मजा करायची. त्या रात्री च निघालो आणि सकाळी लवकर गावात पोहोचलो. प्रवास झाल्यामुळे काही वेळ आराम केला आणि नंतर जेवण वैगरे आटोपून घरा बाहेर पडलो. गावातल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलो. सोबत माझा भाऊ ही होता. ३-४ दिवस असेच गेले आणि इतर शहरात राहायला गेलेले मित्र ही गावाकडे येऊ लागले. मग काय.. सकाळी क्रिकेट आणि नंतर संध्याकाळी गावातल्या पारावर बसून गप्पा मारायच्या. आमचा हा दिनक्रम ठरलेला असायचा. आम्ही सगळे मित्र लहान होतो. तेव्हा अंधार पडायच्या काही वेळ आधी आम्ही जवळच्या आमराईत जायचो.

आमच्यात पैजा लागायच्या की आम राईत अगदी आत जाऊन एखाद्या मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ उभे राहायचे आणि टॉर्च मारून दाखवायची. आता हे करण्यासाठी एक तर अंधारात जावे लागायचे आणि वयाच्या मानाने ते वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते. जो पैज जिंकेल त्याला जमलेले पैसे किंवा मग बिस्कीट वैगरे मिळायचे. गावातल्या सगळ्या मित्रांना जवळच्या आमराईत ल्या सगळ्या वाटा माहीत होत्या त्यामुळे ते सहज जाऊन दिलेली पैज पूर्ण करून यायचे. रोज बघता बघता एक दिवस आमराईत जाऊन पैज पूर्ण करण्याची वेळ माझ्यावर आली. माझे बहुतेक बालपण मुंबई त गेले असले तरीही मी घाबरण्याऱ्यातला नव्हतो. त्यामुळे मी मागे हटलो नाही. तसे ही मित्रांमध्ये हसू करून घेण्याचा माझा अजिबात विचार नव्हता म्हणून मी तयार झालो. त्यांनी माझा हातात टॉर्च दिली. 

एका मित्राने माझ्या सोबत येऊन लांबूनच मला मार्ग सांगितला आणि म्हणाला की इथून काही अंतर सरळ चालत गेलास की एक मोठे झाड दिसेल, ज्याच्या खाली दोन मोठी दगड आहेत. तिथे जाऊन त्या दगडावर चढ आणि आमच्या दिशेने टॉर्च मारून दाखव. जर तू हे केलेस तर पैज जिंकशिल. मी त्याला हो म्हणालो आणि त्या आमराईचे कुंपण ओलांडून आत गेलो. मला माहित होत की माझे मित्र मागून मला पाहत असतील म्हणून मी न घाबरता सांगितल्या प्रमाणे चालत राहिलो. आत खूप च अंधार होता. आंब्याच्या गर्द झाडामुळे जस जसे आत चालत गेलो तसे अंधार आणखी गडद होऊ लागला.

चंद्राचा प्रकाश असूनही ही जाणवत नव्हता. दोन तीन मिनिटांच्या पायपिटी नंतर मला ते मोठे झाड आणि त्या खाली दोन दगड दिसली. मी पटकन जाऊन एका दगडावर उभा राहिलो आणि मित्रांच्या दिशेने वळून टॉर्च दाखवली. तिथून ही त्यांनी पैज पूर्ण झाल्याचा इशारा केला तसे मी खुश होऊन पुन्हा यायला निघालो. आता मी एकदम निर्धास्त होतो कारण मला दिलेली पैज पूर्ण झाली होती. मी परत येताना मला खूप जोराची लघवी आली म्हणून मी एका झाडाकडे जाऊन उभा राहिलो तसे वर कसलीशी सळसळ जाणवली. मी त्या दिशेला टॉर्च फिरवत वर पाहिलं आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. कारण त्या झाडावर कोणी तरी बसल होत. ते जे काही होत त्याच्या पायांवर माझ्या टॉर्च चा प्रकाश पडत होता. मी हिम्मत करून हळु हळू टॉर्च चेहऱ्याकडे नेऊ लागलो आणि ते दृश्य पाहून भीती ने माझी बोबडीच वळली. एक बाई सदृश आकृती झाडाच्या फांदीवर बसली होती. तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या जगातून मी आर पार पाहू शकत होतो. काही वेळ कळलेच नाही की मी काय पाहतोय. 

पण तितक्यात अचानक माझ्या नावाने हाक ऐकू आली. बहुतेक माझ्या मित्रांनी हाक दिली असावी. मी एकदम भानावर आलो आणि कसलाही विचार न करता तिथून पळ काढला. जसे मी बाहेर धावत आलो मित्र मला विचारू लागले की इतक्या जोरात पळत यायला काय झालं. पण मी त्यांना काहीच न बोलता थेट घरी आलो आणि झोपून गेलो. संपूर्ण रात्र मला झोप लागली नाही कारण सतत ते भयाण दृश्य डोळ्यांसमोर येत होत. सकाळी घरी विचारले की त्या आमराईत काही आहे का.. मी काल तिथे गेलो होतो आणि मला.. मी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा मला घरी खूप ओरडले पण नंतर समजावत खरे कारण सांगितले. त्या आमराईतल्या एका मोठ्या झाडाला गळफास घेऊन एका बाई ने आत्महत्या केली होती. तेव्हापासून ती तिथेच भटकते. जो कोणी तिला प्रतिसाद देतो तो दुसऱ्या दिवशी खूप आजारी पडतो. सगळे ऐकल्यावर मी अगदीच सुन्न झालो होतो. काय बोलावं काय सांगावं काही कळत नव्हत. कारण मला त्याच झाडाखाली ती बाई सदृश्य आकृती दिसली होती. या एका प्रसंगानंतर मात्र मी असे चित्र विचित्र खेळ खेळायचे कायमचे सोडून दिले. 

Leave a Reply