अनुभव 1 – भूषण

आम्ही दर वर्षी गणपती च्या सणाला गावी जातो. गावी अगदी उत्साहात सण साजरा केला जातो, पालख्या वैगरे सजवल्या जातात. 

त्या वर्षी मी नवीनच बुलेट घेतली होती. पण जॉब असल्यामुळे हवी तशी नेमकी सुट्टी मिळाली नव्हती. घरचे सगळे काही दिवस आधीच गावाला निघून गेले. गणपती च्या 2 दिवस आधी मला जेमतेम सुट्टी मिळाली आणि मी बुलेट घेऊन गावाला जायचे ठरवले. उन्हाचा त्रास नको म्हणून मी रात्री साधारण 11 च्या सुमाराला निघायचे नक्की केले. जाताना माझ्या मित्राला राज ला विचारले आणि तो यायला तयार झाला. त्यामुळे मी ठाण्या मार्गे जाणार होतो. पण ऐनवेळी त्याने नकार दिला. मग शेवटी माझ्या कडे भाडोत्री म्हणून राहणाऱ्या पांडू ला घेऊन निघालो.

 माझे गाव माणगाव पासून थोड आतल्या बाजूला आहे. तिथे जायला पालीच्या रस्त्याने शॉर्ट कट आहे. त्यामुळे मी तिथून जायचे ठरवले. साधारण 3 तास प्रवास केल्यावर आम्ही एका धाब्यावर थांबलो. थोडे फार खाऊन घेतले आणि साधारण अडीच च्या सुमारास तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. तेवढ्यात पावसाची रीप रिप चालू झाली. पुढच्या 20-25 मिनिटात आम्ही पोहोचणार होतो त्यामुळे निश्चिंत होतो. पण अर्धा तास उलटून गेला तरी गाव दिसत नव्हते. काही वेळा नंतर मला जाणवले की हा रस्ता नेहमीचा नाही. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी वाढली होती. आणि आतल्या बाजूला दिसत असलेले भले मोठे वृक्ष रात्रीच्या त्या गडद अंधारात अगदी भकास वाटत होते. माझ्या मागे असलेला पांडू अगदी शांत बसून होता. 

मी काहीही न बोलता गाडी चालवत होतो. पण काही वेळातच मला अगदी विचित्र वाटू लागलं. सतत कसली तरी चाहूल जाणवू लागली. जसं आजूबाजूच्या झाडांवरून काही तरी सळसळत आमच्या बरोबर येतंय. मी धीर एकटवून पुढे लक्ष देत गाडी चालवत होतो. 1 तास उलटून गेला होता. भीती दाटत चालली होती. मी मुद्दामून पांडू शी संवाद साधू लागलो. इथल्या तिथल्या गोष्टी करू लागलो. पण पांडू मात्र hmm, ho या व्यतिरिक्त काहीही बोलत नव्हता. बहुतेक त्यालाही ती चाहूल जाणवायला लागली होती. आता मात्र मी भलताच तांतरलो. मी गाडीचा वेग वाढवायला सुरुवात केला तसे बाजूला जे काही होते त्याचा ही वेग वाढला. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेत अगदी वाऱ्याच्या वेगाने काही तरी आमच्या सोबत येत होत. मी कशी बशी हिम्मत एकटावून बाजूला वळून पाहिले पण झाडातून येणाऱ्या सळसली शिवाय काहीच दृष्टीस पडले नाही. पांडू ही निशब्द झाला होता त्यामुळे मी अजून घाबरलो. पण मी वेग कमी न करता गाडी तशीच चालवत राहिलो.

हळू हळू उजाडु लागले तसे मला हायसे वा टू लागले. काही वेळातच आम्ही पाली च्या मंदिरा जवळ पोहोचलो. मी मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडलो आणि बाहेरच्या आवारात डोळे बंद करून बसून राहिलो. मला झोप कधी लागली कळलेच नाही. सकाळी 8 वाजता पांडू ने उठवले तेव्हा जाग आली. त्याला मी ओरडलो की तुझ्या मुळे मी जास्त घाबरलो होतो तुला काल रात्री काय धाड भरली होती. तो म्हणाला की आपण ज्या रस्त्यावरून जात होतो त्याच्या दुतर्फा झाडी होती आणि त्यात मला सतत आकृत्या दिसत होत्या त्यामुळे मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. खर सांगायचं झालं तर माझ तुमच्या बोलण्याकडे लक्ष ही नव्हत.

त्याचे बोलणे ऐकल्यावर मी त्याला जास्त काही बोललो नाही. आम्ही ही गोष्ट घरी कोणालाच सांगितली नाही. येताना मी हिम्मत करून पुन्हा त्याच रस्त्याने आलो आणि निव्वळ 25 मिनिटात धाब्या जवळ येऊन पोहोचलो. त्या दिवशी आम्हाला चकवा लागला होता की अजुन काही हे माहीत नाही पण त्या 20 मिनिटाच्या रस्त्यावर आम्ही तब्बल 4 तास गाडी चालवत होतो हे मात्र नक्की. आजही त्या प्रसंगाची आठवण झाली की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

अनुभव 2 – मनिष वराडकर

घटना २०१० सालची आहे. काही कामानिमित्त मी आणि माझा मित्र नामदेव घाटकोपर हून वाशी ला जायला निघालो होतो. मारुती अल्टो कार होती माझ्या कडे. आम्ही रात्री च निघायचे ठरवले आणि जाण्यासाठी मुंबई मानखुर्द ईस्टर्न एक्सप्रेस वे वरून जायचे ठरले. जेवण वैगरे आटोपून निघायला अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. आम्ही हायवे ला लागेपर्यंत १.३० वाजत आले. एका बाजूला गर्द झाडी आणि दुसऱ्या बाजूला सुसाट जाणारी वाहने. गाड्यांची वर्दळ तशी नेहमी पेक्षा कमीच होती. मी आणि नामदेव गप्पा करत चाललो होतो. 

माझे लक्ष समोरच होते. अचानक काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक आकृती उभी दिसली. जस जशी गाडी जवळ येत गेली तशी ती आकृती स्पष्ट होत गेली. साधारण तिशी ओलांड लेला एक माणूस रक्ताने पूर्ण माखला होता. हाफ पँट, खाकी रंगाचा शर्ट पण पूर्ण फाटून लक्तर लोंबत होती. तो गाडीला हात करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. मी गाडी च वेग थोडा कमी केला आणि नामदेव ला खुणावून सांगितले “ए हा बघ, गाडीला हात करतोय.. जाम माखलाय रे रक्ताने”. मी रस्त्याच्या कडेला नेत गाडीचा वेग अजुन कमी केला आणि त्या माणसाकडे वळून पाहिले. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे फटक पडले होते. मी काहीही न बोलता गाडीचा वेग पुन्हा वाढवला.

तितक्यात नामदेव म्हणाला “काय फालतू बडबडतोय रे.. वेडा झालाय का.. आणि गाडी का स्लो केली होती आपण हायवे वर आहोत कळतेय ना?”मी चिडून नामदेव ला म्हणालो “तू बघितले नाही का ? तो माणूस कसला भयंकर होता. माणूस कसला माणूस नसेलच, डोळे बघितले का त्याचे.”नामदेव जरा वैतागत च म्हणाला “तुझ डोकं फिरलय का?.. कोण नव्हते तिकडे, कोणी दिसले नाही, मला घाबरवयचा प्रयत्न करू नकोस”.

मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो आणि तितक्यात काही अंतरावर पुन्हा तोच माणूस रस्त्याच्या अगदी मधोमध उभा दिसला. माझ्या गाडीचा वेग ८०-९० च्या आसपास होता. मी नामदेव ला म्हणालो “अरे हा बघ.. हा तोच माणूस जो मागे दिसला होता” त्यावर नामदेव घाबरतच म्हणाला “अरे कोण ? कोण दिसतंय तुला? गाडी थांबवू नको चालवत रहा..” 

मी गाडी त्याच्या जवळून कशी बशी काढली आणि सुसाट पळवत राहिलो. गाडी मध्ये खूप विचित्र जळका वास येऊ लागला जस एखाद्या जनावराला जाळल्यासारखा करपट घाण वास. नामदेव ला ही तो वास सहन होत नव्हता. म्हणून आम्ही दोघांनी गाडीच्या सगळ्या काचा खाली केल्या. आम्ही वाशी टोल नाका क्रॉस केला तसा वास हळू हळू कमी झाला. मी गाडी पुढून ऐरोली मार्गाने आणली  आणि कसा बसा प्रवास पूर्ण केला. लोक म्हणतात अस काही नसत पण ज्यांना अनुभव येतो तेच समजू शकतात किती भयानक प्रकार असतो. 

Leave a Reply