अनुभव क्रमांक – १

गोष्ट साधारण २ वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा नववीत होतो. शाळा सुरू होऊन जवळपास ३ महिने झाले होते. आमचा नेहमी चा दिनक्रम ठरलेला असायचा. आम्ही मित्र मुद्दामून शाळेत लवकर जायचो आणि शाळेच्या मागच्या बाजूला भेटून टवाळक्या करायचो. म्हणजे मजा मस्ती करायचो तर कधी एखादा खेळ खेळायचो. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे घरून लवकर निघालो आणि शाळेत गेलो. मित्र ही लवकर आले होते. पण आज मात्र कोणाला शाळेत जायचं मन होत नव्हत. म्हणून आम्ही शाळेला दांडी मारून फिरायला जायचं ठरवलं. बहूतेक तीच आमची सगळ्यात मोठी चूक ठरली. 

आता पुन्हा मुख्य गेट मधून बाहेर पडलो तर सगळे पाहणार आणि कोणी हटकले तर कुठे चाललो हे ही सांगता येणार नाही. म्हणून आम्ही शाळेच्या मागच्या भिंतीवरून उड्या मारून शाळेच्या आवाराच्या बाहेर पडलो. आम्ही ठरवले की काही अंतरावर असलेल्या एका नदीवर पोहायला जायचे. लगेच सगळे रेल्वे स्टेशन ला गेलो आणि तितक्यात ट्रेन आली. ट्रेन मध्ये बरीच गर्दी असल्याने आम्ही चुकून लगेज च्याच डब्यात चढलो. कारण तिथे आम्हाला गर्दी कमी दिसली. ट्रेन सुरु झाली. आमची मजा मस्करी सुरूच होती. अर्धा तास झाला असेल. ट्रेन ही रडत पडत जात होती, बहुतेक सिग्नल मिळत नसावा. काही स्टेशन गेल्यानंतर एका स्टेशन वर एक माणूस आमच्या डब्यात चढला आणि दरवाज्याजवळ उभा राहिला.

आम्ही त्या डब्याच्या दुसऱ्या दरवाज्यात उभे होतो. काही वेळाने तो माणूस मोबाईल काढून एका दरवाज्या पासून दुसऱ्या दरवाज्याकडे फेऱ्या मारू लागला. बहूतेक काही तरी शोधत होता. पण खूप अस्वस्थ वाटत होता. मी त्याच्या कडे पाहत होतो. त्याला कळले की मी त्याला पाहतोय म्हणून तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला. मी मुद्दामून दुर्लक्ष करत बाहेर पाहू लागलो. पण त्याने मला खुणावून त्याचा मोबाईल दाखवला आणि कोणता तरी पत्ता विचारू लागला. खरं तर त्याने माझ्या अगदी चेहऱ्यावर समोर मोबाईल धरला होता. म्हणजे मला काही दिसत च नव्हते. मी जरा दचकलो आणि त्याचा हात बाजूला करायला गेलो. तितक्यात त्याने माझा गळा धरला आणि अतिशय चिडून म्हणाला “मी सांगतो त्या ठिकाणी घेऊन चल मला मुक्ती हवीय”.. 

सुरुवातीला तर मला काही कळलेच नाही तो काय म्हणतोय. त्याने ३-४ वेळा ते वाक्य पुन्हा म्हटलं तेव्हा माझ्या कुठे ते माझ्या लक्षात आलं. त्याने माझ्या गळ्यावर ची पकड घट्ट करायला सुरुवात केली. तसे मी म्हणालो अहो काय करताय.. मी झटापट करत ती पकड सोडवू लागलो. माझे मित्र ही त्याला माझ्या पासून दूर करू लागले. माझ्या एका मित्राने त्या माणसाला जोरात धक्का दिला तसा तो माझ्यापासून लांब झाला. तितक्यात पुढचे स्टेशन आले आणि आम्ही पटापट सगळे त्या स्टेशन वर उतरलो. खरं तर तिथे आम्हाला उतरायचे नव्हते पण त्या विचित्र माणसापासून दूर जायचे म्हणून आम्ही उतरलो आणि लगेच मागच्या डब्यात चढलो. 

गर्दी असल्यामुळे आम्ही दरवाज्यात च उभे होतो. काही वेळाने तो माणूस पुन्हा त्या लगेज डब्याच्या दरवाज्यात येऊन अगदी कडेला उभा राहिला. आम्ही सगळे त्यालाच पाहत होतो. त्याने मागे पाहिले आणि आमच्याकडे पाहत तो पुन्हा तेच म्हणू लागला “मला मुक्ती मिळणार नाही.. हा मोबाईल घ्या.. मला या पत्त्यावर घेऊन चला.. मला मुक्ती मिळणार नाही”.. आम्ही तर प्रचंड घाबरलो होतो. डब्यातले सगळे जण त्याला वाकून पाहू लागले. आणि बघता बघता त्याने चालू ट्रेन मधून खाली उडी घेतली. ते दृश्य पाहून माझे हृदय भीतीने अधिकच धडधडू लागले. मी त्या गर्दीतून वाट काढून डब्याच्या मधोमध येऊन उभा राहिलो. गेल्या १०-१५ मिनिटात नक्की काय झाले तेच कळले नाही. 

पुढच्या स्टेशन वर आम्ही सगळे मित्र उतरलो आणि तिथल्याच एका बाकावर शांत बसलो. आता कोणालाही नदीवर पोहायला जायची इच्छा नव्हती. काही वेळापूर्वी जे घडले होते ते डोक्यातून जात नव्हते. आम्ही सगळ्यांनी परतीची ट्रेन पकडली आणि घरी निघून आलो. या बद्दल आम्ही घरच्यांना कधीच काही बोललो नाही. आज या प्रसंगाला २ वर्ष उलटली. मी आता ११ वी मध्ये शिकतोय. त्या विचित्र घटने नंतर मी आज पर्यंत पुन्हा कधी ही शाळा किवा कॉलेज बंक केले नाही. 

अनुभव क्रमांक २ – चैतन्य पाटील

अनुभव याच वर्षीचा आहे. अगदी लॉक डाऊन होण्या आधी चा. आम्हा तीन जिवलग मित्रांचा ग्रूप. मी, मोहित आणि श्रावण. त्यातल्या श्रावण चे लग्न ठरले होते.  माझ्या गावापासून असलेल्या काही अंतरावर असलेल्या एका दुसऱ्या गावात तो राहतो. खरं तर जे घर आहे ते त्याच्या मामाचे. तो लहानपणापासून त्याच्या मामाच्या च घरी राहायचा. आता आपल्या जिवलग मित्राचे लग्न म्हणजे विषयच नाही. 

त्या गावात जायचे म्हंटले तर लवकर निघावे लागणार. म्हणून आम्ही तशी सगळी तयारी केली. आमच्या सोबत माझे अजुन दोन मित्र होते. आदल्या दिवशी हळद होती म्हणून आम्ही दुपारी निघालो. साधारण २ अडीच तासात आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. हळदीचा कार्यक्रम अगदी मनासारखा पार पडला. श्रावण खूप खुश होता. मित्र खूष मग आपल्याला अजुन काय हवे. सगळ्यांनी ड्रिंक वैगरे केले होते  आम्हाला तो राहायचा आग्रह करत होता पण आम्ही सकाळी लवकर येतो सांगून त्याचा निरोप घेतला. तिथून निघायला बराच उशीर झाला. आम्ही १.३० वाजता घरी जायला निघालो. 

मोहित ड्राईव्ह करत होता. त्याने जास्त ड्रिंक केले नव्हते म्हणून आम्ही त्यालाच ड्राईव्ह करायला सांगितले. गावाकडचा रस्ता असल्यामुळे विजेचे खांब असून नसल्यासारखे होते. मी मोहित ला म्हणालो की गाडी सावकाश चालव आपल्याला कसली घाई नाहीये. तो ही आरामात गाडी चालवत होता. तितक्यात समोरून सर्रकन एक जनावर आडव गेलं. तसे मोहित ने करकचून ब्रेक मारला. मी बाजूला वळून पाहिले तर ती एक मांजर होती. ती बाजूच्या झुडपात निघून गेली. आमची गाडी रस्ता सोडून थोडी खालच्या बाजूला आली होती. रिव्हर्स घ्यायला मागे पहावे लागणार म्हणून मी आणि माझा एक मित्र खाली उतरलो. म्हणजे मोहित ला रिव्हर्स घेताना नीट सांगता यावे. 

मी उतरून गाडी च्याच मागच्या बाजूला चालत आलो तितक्यात मला जाणवले की त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्मशान आहे. नकळत तिथे लक्ष गेले आणि दिसले की तिथे एक प्रेत जळतय. मी काही न बोलता मोहित ला गाडी रिव्हर्स घ्यायला मदत केली आणि गाडीत बसून तिथून निघालो. १५-२० मिनिट झाली असतील पुन्हा गाडी समोरून एखाद जनावर गेल्या सारखे वाटले आणि मोहित ने घाबरून ब्रेक मारला. यावेळेस त्याने गाडी कशी बशी सावरली. पण गाडी थांबल्यावर आम्हाला जे दिसले ते पाहून आम्ही प्रचंड घाबरलो. कारण आम्ही पुन्हा त्याच स्मशानभूमीच्या समोर होतो. 

पुढचा बराच वेळ आम्ही त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा येत होतो. यातून बाहेर पडायचे होते पण काही मार्ग सापडत नव्हता. मोहित ने गाडी चा वेग वाढवायला सुरुवात केली. आम्ही त्याला समजावून सांगू लागलो की गाडी चा वेग कमी कर पण तो त्याच्याच धुंदीत होता. आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी आलो आणि मोहित ने गाडीचा वेग अधिक च वाढवला. तितक्यात समोर रस्त्याच्या अगदी मधो मध एक बाई आणि दोन मुली उभ्या दिसल्या. वेगात असल्यामुळे मोहित ने स्टिअरिंग जोरात डाव्या बाजूला वळवले आणि गाडी रस्त्याच्या खाली उतरून एका झाडावर जाऊन जोरात आदळली. अपघात इतका भिषण होता की माझे डोके समोर आपटून मी जागीच बेशुध्द झालो. 

डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होतो. अपघात मोठा असला तरी देवाच्या कृपेने आम्ही सगळे मित्र वाचलो होतो. 

Leave a Reply