लेखक – विवेक चौघुले

माझे आई-बाबा काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले होते. आता घरी कोणी नसणार त्यामुळे मित्रांना बोलवून रात्री जागून मुवी वैगरे पहायचा प्लॅन केला. तसे पटापट मित्रांना फोन केला आणि सगळा प्लॅन सांगितला. माझ्या खास ३ मित्रांना मी बोलावले होते. जेवण वैगरे आटोपून साधारण १० वाजता मित्र येणार होते. मी स्नॅक्स वैगरे आणून ठेवले होते. १० वाजत नाहीत तोपर्यंत माझे तिघेही मित्र घरी हजर झाले. रात्री कोणीही झोपायचे नाही असे ठरले होते. आमची मजा मस्करी चालू होती. माझ्या घरी हॉल मध्ये आणि बेडरूम मध्ये दोन एल ई डी टिव्ही होते त्यामुळे नक्की कोणत्या टिव्ही वर मूवी पहायचा या वायफळ गोष्टीवरून वाद चालला होता. शेवटी सगळ्यांनी मिळून हॉल मध्ये बसायचा निर्णय घेतला.

साधारण ११.३० ला आम्ही मूवी पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला मजा मस्करी सुरूच होती पण विषय गंभीर असल्याने नंतर आम्ही अगदी मन लावून पाहायला लागलो. साधारण १.३० किंवा २ वाजले असावेत. मी वेळ पहिली नव्हती पण मूवी संपत आला होता त्यावरून वेळेचा साधारण अंदाज बांधला. मी कोल्ड ड्रिंक ची दुसरी बॉटल आणायला म्हणून उठलो आणि किचन मध्ये गेलो. येताना मला बेडरूम मध्ये कसलीशी चाहूल जाणवली आणि कुजबुज ऐकू आली. मी जरा दचकलोच. आमच्या चौघांशिवाय घरी कोणीही नव्हते. आणि माझे तिघेही मित्र हॉल मध्ये बसले होते. मी बेडरूम कडे वळणार तितक्यात माझा एक मित्र हॉल मधून आला आणि झटकन बेडरूम च्याच दिशेने गेला. 

काही सेकंदात तो तिथून परत आला आणि माझ्या कडे पाहत म्हणाला “काय रे काय झालं.. असा काय उभा आहेस चल.. तुझ्या साठी आम्ही मूवी पॉज करून ठेवलाय”. मी काहीही न बोलता त्यांच्यात जाऊन बसलो. क्षणभरा पूर्वी जे जाणवले ते खरे होते की फक्त भास होता. मी जरा गोंधळलो होतो. बहूतेक झोपेमुळे असे होत असावे असे वाटून गेले. पुढच्या १०-१५ मिनिटात मूवी संपला आणि पुन्हा बेडरूम मधून आवाज आला. यावेळी कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येत होता. कोणी तरी मस्करी करत खिदळत हसते आहे असा. आता मात्र मी उठलो आणि बेडरूम कडे चालत जाऊ लागलो. मला पाहायचे होते की हा नक्की काय प्रकार आहे. आधी झाला तो भास असेल तर मग आता या क्षणी इतका स्पष्ट आवाज कसा येतोय. 

बेडरूम चा दरवाजा अर्धा बंद होता. त्यामागून अंधुक चा प्रकाश जाणवत होता. लाईट तर बंद होती मग हा प्रकाश कसला आहे ते कळत नव्हते. मी हिम्मत करून प्रश्न केला “कोणी आहे का आत?”. पण आतून काहीच उत्तर आले नाही. म्हणून मी हाताने हळुवार पणे दरवाजा आत ढकल ला. समोरचे दृश्य पाहून माझ्या काळजात अगदी धस्स झाले. माझे ते ३ मित्र आत बेडरूम मध्ये बसून तिथल्या टिव्ही वर तोच मूवी पाहत होते. तो पडणारा अंधुक प्रकाश टिव्ही चा होता. एका क्षणासाठी कळलेच नाही काय पाहतोय ते. पण पुढच्या क्षणी मी भानावर आलो. भीतीने अंगावर शहारे येत होते. जर हॉल मध्ये ते तिघे बसलेत तर मग इथे हे कोण आहेत.

मी हा प्रकार समजायचा प्रयत्न करतच होतो तितक्यात त्यातला एक जण मला म्हणाला “काय रे? कोणी होत का बाहेर?”. मी काही बोलणार तितक्यात हॉल मधून अगदी तसाच म्हणजे त्याच मित्राचा आवाज कानावर पडला “काय रे? कोणी आहे का आत?”. आता मात्र माझे डोके सुन्न झाले. मी काही पाऊले मागे सरकलो आणि पुन्हा समोर पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. मी कसलाही विचार न करता धावत घरातून बाहर पडलो आणि शेजारच्या काकूंकडे गेलो. इतक्या रात्री मला पाहून त्याही करार घाबरल्या होत्या. मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला तसे ते मला धीर देऊन समजावून सांगितले की तुला भास झाला असेल. त्यांना माझ्या चेहऱ्यावरची भीती पाहून काही तरी जाणवले असावे म्हणून त्या मला म्हणाल्या की तू घाबरु नकोस मी येते तुझ्या सोबत घरी. 

आम्ही दोघं घरी आलो तर घरी कोणीही नव्हते. मला वाटलं की मित्रही मला घाबरून पाळताना पाहून माझ्या पाठोपाठ त्यांच्या घरी निघून गेले असतील. काकूंनी मला धीर दिला आणि म्हणाल्या की काळजी करू नकोस आमच्या घरी झोपायला चल. तसे ही मला आता एकटे राहायची अजिबात हिम्मत नव्हती म्हणून मी त्यांच्या सोबत त्यांच्या घरी झोपायला गेलो. पहाटे माझा फोन वाजला तसे मी कोणाचा आहे ते न पाहताच उचलला आणि बोलू लागलो. समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मी खाडकन जागा झालो आणि अंथरुणात उठून बसलो. कारण माझ्या त्या तीन मित्रांचा बाईक वरून ट्रिपल सीट येताना काल रात्री च अपघात झाला होता आणि त्यात ते तिघेही जागीच गेले होते. 

Leave a Reply