कुटुंबासोबत ट्रीप ला जाणं या सारखं दुसर सुख नाही. पण रात्रीचा प्रवास असला की अनोळखी रस्ता आवर्जून टाळावा. कारण कधी काय प्रसंग ओढवेल याची आपण कल्पना ही करू शकत नाही. असाच हा एक भयाण अनुभव.. 

अनुभव – अतुल ओव्हाळ 

गोष्ट २०१९ मधली आहे. माझ्या मामाच नुकताच लग्न झालं होत. लग्ना अगोदर आम्ही प्लॅन केले होता कि लग्न पार पडल्यावर संपूर्ण फॅमिली ला घेऊन कोकण ट्रीप ला जायचं. आधीच सगळे ठरल्यामुळे आम्ही सगळी तयारी करायला सुरुवात केली. आमचा प्लॅन असा होता कि 31st च्या पहाटे निघायचं, कोल्हापूर ला लक्ष्मी आई च दर्शन घ्यायचं आणि तिथूनच थेट कोकणात जायचं. सोबत माझे संपूर्ण कुटुंब होते. माझे आई वडील, मोठी बहीण, नुकताच लग्न झालेले जोडपे म्हणजे माझे मामा मामी, आणि मोठे मामा मामी, आजी, मावशी आणि त्यांचे मिस्टर. असे सगळे एकूण १४ लोकं. प्लॅन प्रमाण आम्ही सगळे निघालो. मावशीचे मिस्टर म्हणजे काका हे ट्रॅव्हल लाईन मध्ये आहेत म्हणून त्यांनीच रिसॉर्ट वैगरे बुक केले होते. आमचे कुटुंब मोठे असल्यामुळे आम्ही दोन गाड्या केल्या होत्या. एक गाडी मावशीच्या मिस्टरांची होती आणि दुसरी गाडी आम्ही भाड्यावर घेतली होती. ठरल्याप्रमाणे अगदी पहाटे निघायचं होत पण सगळे आवरून सगळ्यांची तयारी, सामान वैगरे घेईपर्यंत सकाळचे ६ वाजत आले. लग्नाच्या धावपळी नंतर खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. सगळे मस्त प्रवासाचा आनंद घेत होते. 

एक दोन वेळा काही मिनिट हॉल्ट घेऊन साधारण १२.३० पर्यंत आम्ही कोल्हापूर ला पोहोचलो. लक्ष्मी आई चं दर्शन घेतल. तिथेच अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेतला. बायकांनी थोडी शॉपिंग वैगरे केली आणि मग आम्ही सगळ्यांनी दुपारी कोकणचा रस्ता धरला. हसत खेळत, गप्पा मारत प्रवास सुरू होता त्यामुळे वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. आम्ही कोकणात प्रवेश केला होता त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न आणि आल्हाद दायक वाटू लागले. आम्ही बुक केलेलं रिसॉर्ट अजुन ३ तासांवर होत आणि जाताना वाटेत एक घाट लागणार होता. एव्हाना संध्याकाळ चे ६.३० वाजत आले होते. हळु हळु अंधार पडायला सुरुवात झाली. एक गाडी माझा मामा तर दुसरी गाडी मावशी चे मिस्टर चालवत होते. घाट लागण्याच्या काही वेळा आधी त्यांनी एक चहा ची टपरी बघून गाडी थांबवली. बराच वेळ गाडी चालवून थकल्यामुळे जरा विश्रांती घेतली. त्यांच्या सोबत आम्हीही चहा चा आस्वाद घेतला. अश्या रोड ट्रीप मध्ये टपरी वरचा गरम चहा म्हणजे स्वर्गसुख. जिथे थांबलो होतो तो भाग तसा जास्त वस्तीचा नव्हता. निवडक घर दिसत होती, जी एकमेकांपासून बरीच लांब होती. चहा पिता पिता मामा ने विचारले “हा रस्ता पुढे कसा आहे, लवकर कसे जाता येईल..” त्यावर तो म्हणाला “मुख्य रस्त्याने गेलात तर वेळ लागेल आणि घाटातून पुढे गेल्यावर एक शॉर्टकट आहे पण तिथे काम चालू आहे त्यामुळे सावकाश जा.. मध्ये कुठे गाडी थांबवू नका.. तुमच्या सोबत लेडीज आहेत म्हणून सांगतोय..”

आम्ही त्याचे आभार मानून चहा चे पैसे दिले आणि तिथून पुढच्या प्रवासाला लागलो. एका गाडीत मी, नवीन लग्न झालेले मामा मामी, माझी आई आणि मोठे मामा मामी होतो. आणि बाकीचे सगळे दुसऱ्या गाडीत होते. काही वेळात आमची गाडी घाटाच्या रस्त्याला लागली. आता अंधार गडद झाला होता. गाडीच्या हेड लाईट शिवाय आजूबाजूला जास्त काही दिसत नव्हत. तो घाटाचा रस्ता ही खूप लवकर सामसूम झाला होता. मला तर वाटले की रस्त्याने कोणी येते की नाही, की फक्त आम्हीच निघालो आहोत वेड्यासारखे इथून. कारण १०-१५ मिनिटांनी एखादी गाडी दिसायची. तश्या आमच्या गाड्या सोबतच होत्या. मावशी, आजी, माझे वडील वैगरे दुसऱ्या गाडीत होते आणि त्यांची गाडी आमच्या पुढे होती. त्या निर्मनुष्य रस्त्याला लागून बराच वेळ झाला होता. तितक्यात आम्हाला रस्त्याकडे ला एक एक फोर व्हिलर दिसली. जशी आमची गाडी पुढे गेली तसे त्या कार पुढे उभी असलेली लोक ही दिसली. एक बाई, १०-१२ वर्षांचा लहान मुलगा, त्याचे वडील. बहुतेक त्यांची कार काही तरी बिघाड होऊन बंद पडली होती. आता अश्या वेळी घाटात कोणाची मदत मिळणे कठीण होते. तसे माझी आई मामा ला म्हणाली ” बघ रे.. का थांबले त ते..” मामा ने त्यांच्या जवळ नेत गाडी थांबवली. तो माणूस कार चे बोनेट उघडून आत पाहत होता. मामा ने आमच्या गाडी ची काच खाली करत त्याला विचारले “कार बंद पडली आहे का..? काही मदत हवी आहे का तुम्हाला..?” त्यावर ती बाई म्हणाली “तुम्ही सगळे कुठे जात आहात.?” मामा म्हणाला “पुढे एका रिसॉर्ट कडे निघालो आहोत..”

मामाचे बोलणे चालू असताना मी समोर पाहिले तर आमची दुसरी गाडी ही पुढे थांबली. तितक्यात मला आमच्याच दुसऱ्या गाडीतून वडिलांचा फोन आला. तो फोन “गाडी का थांबवली?” हे विचारण्यासाठी होता. तसे मी म्हणालो की रस्त्याकडे ला एक फॅमिली आहे, त्यांची कार बंद पडली आहे तर विचारत होतो की काही मदत हवी आहे का..? तसे माझे वडील गंभीर आवाजात म्हणाले “अरे.. काय बोलतोय तू.. तिथे कोणीही नाहीये.. फक्त अंधार आहे तिकडे.. लवकर निघा तिथून..” तसे मी झटकन मामा ला म्हणालो ” चल उशीर होतोय आपल्याला..”. त्याने माझ्याकडे पाहीले आणि मी फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसे त्याला कळले की काही इथून निघायला हवे. त्याने गाडी चालू केली आणि आम्ही त्या भागातून पुढे निघालो. पण आमच्यापैकी एकालाही कल्पना नव्हती की त्या भयाण रात्री आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय. काही अंतर पुढे आल्यावर मामा ने मला विचारले तसे मी फोन वर झालेले बोलणे सांगितले. त्यावर तो म्हणाला “अरे अंधारात त्यांना काही दिसले नसेल सोड हा विषय..” बहुतेक तो ही हा विषय टाळायचा प्रयत्न करतोय असे मला वाटले. एवघे काही मिनिट झाले असतील एका वळण ओलांडून पुढे आलो आणि समोरचे दृश्य पाहून सगळेच हादरलो. 

तीच बाई, तोच लहान मुलगा आणि कार चे बोने ट उघडून आत पाहत असलेला तोच माणूस. माझ्या तोंडून नकळत फक्त एकच वाक्य बाहेर पडले “मामा हा काय प्रकार आहे..?”. या वेळेस आम्ही गाडी अजिबात थांबवली नाही. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. दोन्ही मामी भीतीने अगदी रडायलाच लागल्या. माझी आई त्यांना शांत करत होती. त्यांना ओलांडून पुढे आलो आणि आमच्या गाडीच्या हेड लाईटच्या प्रकाशात पुन्हा एकदा ते दिसले. फरक फक्त एवढाच होता की या वेळेस त्यांचे रूप पालटले होते. त्या तिघांचेही शरीर पांढरे फाट्टक पडले होते. त्या बाईचे डोके फुटून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे चे कपडे रक्ताने माखले होते. त्या लहान मुलाची ही अवस्था तशीच काहीशी होती. आणि तो माणूस.. त्याचे वर्णन न केलेले च बरे इतके भयाण दृश्य होते ते.. मी ओरडुन म्हणालो “तिथे कोणी बघू नका..” मामा ने गाडीचा वेग वाढवला आणि तिथून पुढे आलो. तितक्यात माझे लक्ष रियर व्ह्यू मिरर मध्ये गेले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघेही आमच्या गाडी मागे धावत येत होते. मी मामा ला सांगायला गेलो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला कळून चुकले की त्याने मागे आधीच पाहिले आहे. मी लगेच पुढच्या गाडीत वडिलांना फोन करून सांगितले की गाडीचा वेग अजिबात कमी करू नका..काहीही झाले तरीही.. 

घाट संपला आणि काही वेळानंतर ते तिघेही दिसेनासे झाले. तेव्हा कुठे आमच्या जिवात जीव आला आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. मुख्य रस्ता लागला. तिथे वाहनांची वर्दळ होती म्हणून आम्ही गाडी थांबवली. समोरून चालत येणाऱ्या माणसाची नजर आमच्यावर पडली. बहुतेक त्याच परिसरात राहणारा असावा. त्याने आमची विचारपूस केली तसे आम्ही त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला की तुम्ही थांबलात आणि चूक केलीत. म्हणून ते तुमच्या मागे लागले. त्या तिघांचा घाटात एका ट्रक ने चिरडून अपघात झाला होता. तेव्हा पासून रात्री अपरात्री ते त्या घाटात दिसतात. 

Leave a Reply