अनुभव – वेदांत सोलकर

मी एका ऍनिमेशन कंपनी मध्ये काम करतो. काही दिवसांपासून कामाचा ताण जास्त झाल्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला. माझा मित्र झेवियर कामानिमित्त पुण्याला शिफ्ट झाला होता. तिथे तो एकटाच राहायचा. त्यामुळे मी आणि माझ्या एका राज नावाच्या मित्राने त्याच्याकडे जायचे ठरवले. कारण त्याच वेळी राज ने नुकतीच नवीन बाईक घेतली होती. त्यामुळे आमचा लाँग राईड चा बेत ठरला. शुक्रवारी दुपारी आम्ही बाईक घेऊन प्रवासाला सुरुवात केली. रात्री साधारण ९.३० च्या सुमारास त्याच्याकडे पोहोचलो. फ्रेश वैगरे झालो, जेवण आटोपले आणि मस्त गप्पा गोष्टी सुरू झाल्या. बऱ्याच दिवसांनी असे समोरा समोर आल्यामुळे मजा मस्ती चालू होती. तितक्यात राज ने विषय काढला की उद्याचा काय प्लॅन आहे. तसे झेवियर म्हणाला की आपण उद्या पहाटे ताम्हिणी घाटात जाऊ, मस्त बाईक राईड करू, एन्जॉय करू. मी ही रोजच्या रूटीन ला कंटाळलोय, या धकाधकीच्या जीवनात थोडे बाहेर निसर्गाच्या सानिध्यात राहू म्हणजे अगदी फ्रेश वाटेल. ठरल्या प्रमाणे मी, राज आणि झेवियर तिघही दोन बाईक घेऊन उजेडायच्या आत घराबाहेर पडलो. घाटातील ती रम्य सकाळ, हिरवागार परिसर, अंगाला स्पर्शून जाणारी थंडगार हवा मन सुखावून जात होती. 

खूप प्रसन्न वाटत होत. आम्ही अधून मधून काही स्पॉट ला थांबून फोटो ही काढले. तिथे थोड्यावेळ घालवल्यानंतर आम्ही जवळच्या एका बीच वर जायचे ठरवले. थंडीचा महिना असल्यामुळे बाईक चालवताना गारवा जाणवत होता.. सुमारे ३:०० वाजे पर्यंत आम्ही बीचवर पोहोचलो. तिथे संध्याकाळ होई पर्यंत खूप मजामस्ती केली. निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतला. आता मात्र अंधार पडू लागला होता. तसे झेवियर म्हणाला; चला आता निघायला हवे आपल्याला, परतीचा प्रवास करायचा आहे.. उगाच काळोखातून प्रवास करणे धोक्याचे ठरायला नको. त्यावर राज म्हणाला “अरे काही नाही रे, आपण इथे एन्जॉय करायला आलो आहोत ना मग एन्जॉय करू.. जाऊ आरामात घरी.. काय लगेच निघायची घाई करतोय.. तसे ही आपल्याला निवांत असा वेळ पुन्हा कधी मिळणार आहे..”. त्याचे म्हणणे ऐकून आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो. साधारण दीड पावणे दोन तासा नंतर आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. हळूहळू थंडीचा जोर ही वाढू लागला होता. बराच वेळ गाडी चालवत असल्याने आम्ही खूप थकलो होतो आणि भूक ही लागली होती. तेवढ्यात झेवियरला थोड्याच अंतरावर एक ढाबा दिसला. तसे त्यांना आम्हाला इशारा केला आणि आमच्या बाईक जवळ येत म्हणाला “अरे तो बघा समोर, एक ढाबा दिसतोय.. तिथे जाऊन जेवण करू, मला माहितीये तुम्हाला ही भूक लागली आहे ते..”. त्याने आमच्या मनातले अचूक ओळखले. 

दोन्ही बाईक त्या ढाब्याच्या दिशेने वळल्या. जेवण आटपेपर्यंत आम्हाला १०:३० वाजून गेले. पण अगदी मनसोक्त पोट भरून जेवलो. आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो.. काही वेळाने आम्ही एका फाट्याजवळ आलो तसे झेवियर ने गाडी थांबवली.. 

मी त्याला विचारले “काय रे काय झाले, इथे का थांबलास..?” 

त्यावर तो म्हणाला “आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ, या घाटातून नको..” 

तसे मी जरा हसतच विचारले “का बरं अस! हा रस्ता का नको?”.त्यावर तो जरा गंभीर होत म्हणाला “मी सांगतोय म्हणून; मी सांगतो त्या रस्त्याने जाऊ.. तुम्हाला काही माहीत नाही इकडचं.” 

त्याचे असे बोलणे ऐकून राज वेतागतच म्हणाला, “अरे यार! आपण सकाळी याच घाटातून तर आलो.. मग ओळखीच्या रस्त्याने गेलो तर लवकर घरी जाऊ”.

मी ही राजच्या म्हणण्याला होकार दिला आणि त्याचे न ऐकता आम्ही आलेल्या घाटाच्या रस्त्याने बाईक पुढे घेतली.

पहाटे येताना घाट जेवढा निसर्गरम्य वाटत होता तस आता मात्र काहीच दिसत नव्हत. रात्रीचा गडध अंधार आणि आमच्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश, या व्यतिरिक्त आजुबाजूस काहीच नजरेस पडत नव्हतं. घाटाच्या सुरवातीला आमच्यासोबत ३-४ वाहने सोबत होती म्हणून त्या भयाण अंधारात प्रवास करण्यास थोडा धीर मिळत होता. पण नंतर ती ओव्हरटेक करून पुढे निघून गेल्यामुळे काही वेळाने फक्त आमच्या दोन बाईक च रस्त्यावर होत्या. त्या निर्मनुष्य घाटात आमच्या शिवाय कोणीच दिसत नव्हत. इतकी शांतता पसरली होती की आजुबाजूच्या लहानसहान कीटकांचा किरररर् आवाज ही कानावर पडत होता. ती शांतता अगदी जीवघेणी वाटू लागली. झेवियर ची बाईक पुढे, मी आणि राज त्याच्या मागे बाईक चालवत होतो. तितक्यात अचानक झेवियर ने बाईक स्लो केली आणि आमच्या बाजुला आला. हेल्मेटची काच वर करुन एका हाताने समोर इशारा करत काहीतरी बडबडू लागला. मला त्याचे बोलणेच कात नव्हते. पण मी जेव्हा त्याच्याकडे पहिले तेव्हा दिसले की तो अक्षरशः भीतीने घाबरून घामाने ओलाचिंब झालाय. मी ही बाइकचा वेग कमी करत त्याला विचारू लागलो “काय रे.. अस का वागतोयस.. काय झालं?” पण तो आमच्याकडे न पाहता समोर पाहून हातवारे करत काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता. 

तसे राज त्याला म्हणाला “झेवियर बाईक रस्त्याकडे ला घे..” पण तो काहीच ऐकत नव्हता आणि बाईक चा वेग ही कमी करत नव्हता. काही मिनिट असेच चालू राहिले आणि नंतर एके क्षणी त्याने कचकन ब्रेक मारून बाईक थांबवली आणि समोर काळोखाने व्यापून टाकलेल्या निर्जन रस्त्याकडे अगदी टक लाऊन पाहू लागला. त्याला थांबलेले बघून आम्ही ही शेवटी बाईक थांबवली. दोघंही बाईक वरून उतरून त्याच्या जवळ गेलो आणि विचारू लागलो “काय झालं..? समोर काय पाहतोय..? आता तरी सांगशील का..?”. पण त्याचे आमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो आमच्या प्रश्नांना उत्तरच देत नव्हता. एक वेगळ्याच ग्लानीत निघून गेला होता तो. त्या भयाण अंधारलेल्या घाटात आम्ही दोघं त्याला भानावर आणायचा प्रयत्न करत होतो. काही वेळ असाच निघून गेला. आता मात्र माझ्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या होत्या. तेवढ्यात अचानक झेवियर जोरात ओरडला “ती मला बघतेय.. ती मला घेऊन जाईल, ती मला घेऊन जाईल..” 

मी दचकून त्याला विचारले “कोण, काय बोलतो आहेस तु?”. त्याला पुढे काही विचारणार तोच त्याने घाई घाईत बाईक सुरू केली आणि अतिशय वेगाने निघून गेला. 

मी आणि राज एकमेकांकडे पाहू लागलो. नेमक घडलेला प्रकार काय होता काहीच कळत नव्हत. याला अचानक काय झालं, असा विचित्र काय वागतोय. त्यात तो इतक्या वेगात गेला की आम्हाला त्याची काळजी वाटू लागली. अश्या घाटाच्या रस्त्याला वेडी वाकडी वळण असतात, त्यात थंडीच्या दवा मुळे रस्ता ओलसर झाला होता. आम्हीही वेळ न घालवता आमच्या बाईकवर बसून त्याचा पाठलाग सुरू केला. पण तो इतक्या वेगाने गेला होता की तो आम्हाला दिसेनासा झाला. आता मात्र मी आणि राज दोघच टी रस्त्यावर होतो. नक्की काय झालं असेल, त्यानं असं काय पाहिलं असेल की इतके घाबरून तो निघून गेला. मनात बरेच प्रश्न होते. पण त्याहून ही विचित्र होते ते त्या घाटातले वातावरण. आजूबाजूचा भयाण परिसर, गर्द झाडी, गडद अंधार मनात वेगळीच शंका निर्माण करत होती. आमची बाईक राज चालवत होता. काही अंतर पुढे गेल्यावर अचानक राज ही बाईक चालवता-चालवता स्लो झाला. मी लगेच विचारलं “काय झालं..?”. तर तो म्हणाला “अरे! ती बाई सारखा रास्ता क्रॉस करतेय, आपल्या बाईक समोरून..” मी घाबरतच पुढे बघितलं पण मला तिथे कोणीच दिसत नव्हत. समोर होता तो फक्त मिट्ट काळोख आणि त्याला चिरत जाणारा आमच्या बाईकच्या हेड लाईट चा प्रकाश.. मी त्याला काही सांगणार इतक्यात माझं लक्ष बाईकच्या साइड मिरर मध्ये गेलं आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला.  

मागे रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी दिसली. मी राजच्या खांद्यावर हात ठेवत त्याला भानावर आणले आणि म्हणालो “पटकन बाईक स्टार्ट कर आणि निघ इथून.. आणि मागे वळून पाहू नकोस..” त्याने बाईक वेगात घेतली आणि मी असे सांगितल्यामुळे त्याने मागे पाहायला साइड मिरर मध्ये पहिलेच. त्यांनतर त्याने अतिशय वेगात घेतली. आम्ही काय पाहिले ते आम्हालाच कळतं नव्हत. पण ते साधं नव्हत. एक दीड किलोमिटर चा पल्ला पार केल्यानंतर आम्हाला एक ढाबा दिसला. तिथे लोक असतील या विचाराने थोडा धिरही आला. आम्ही तिथे बाईक पार्क करून आत धावत आलो पण आतले चित्र काही वेगळेच होते. बाहेरून नीट दिसत असलेला ढाबा आतून मात्र विचित्र होता. संपूर्ण रिकामा. डाव्या बाजूला एक खोली होती आणि दार बंद होते. कदाचित आत कोणी असेल हे पाहायला मी खोलीचा दरवाजा आत लोटला. आणि समोरचे दृश्य पाहून काळीज भीतीने धडधडू लागले. कारण आत तीच बाई जमिनीवर बसून आमच्याकडे पाहत होती. ते भयाण दृश्य पाहून माझी वाचाच बंद झाली. राज मात्र जागीच उभा राहून अगदी सुन्न झाला होता. मी त्याला ओढतच बाहेर आणले, कसे बसे बाईक वर बसवले आणि मी बाईक वेगात घेतली.  बरेच अंतर पार केल्यानंतर पुढे आम्हाला घाट समाप्त झाल्याचा बोर्ड दिसला तसे थोडे हायसे वाटले पण अजूनही वस्तीचा परिसर दिसत नव्हता. 

तिथून पुढे काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी दिसली. तिथे पाहतो तर काय.. झेवियर बाईक लाऊन उभा होता. त्याला पाहून आम्ही लगेच बाईक टपरीजवळ थांबवून धावत त्याच्या जवळ गेलो आणि प्रश्नाचा भडिमार सुरू केला. त्यावर त्यानेही त्याच बाईच वर्णन सांगितलं जी आम्हाला सुद्धा दिसली होती. सुरू असलेली आमच्या चर्चा ऐकून टपरीवरच्या आजोबांनी आम्हाला येऊन विचारले. काय रे पोरांनो इतके घाबरले का आहात तुम्ही, काय झालं? त्यावर त्यांना सगळं घडलेला प्रकार सांगितला. त्यावर ते म्हणाले की पोरांनो सुदैवाने वाचलात तुम्ही. त्या घाटात काही महिन्यांपूर्वी बाईक वरून जाणाऱ्या एका दाम्पत्याचा अपघात झाला होता. त्यात एका बाईच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्याच रस्त्यावर तिचा जागीच मृत्यू झाला. बऱ्याच प्रवाशांकडून तिचा अनुभव ऐकला आहे. देवाची कृपाच म्हणायची तुम्ही सुखरूप आलात ते. गरज नसेल तर पुन्हा असा रात्रीचा प्रवास करू नका..” इतक बोलून ते निघून गेले. आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. पुढच्या काही तासात आम्ही रूमवर येऊन फ्रेश झालो पण कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत. त्या रात्री कोणीच झोपल नाही. हा अनुभव आयुष्यभर सगळ्यांच्या मनात राहील एवढं मात्र नक्की.

Leave a Reply