अनुभव – अंकिता उमते
गोष्ट जवळपास १२ वर्षांपूर्वीची आहे. माझे वडील लाईट डेकोरेशन चे काम करतात. त्यांना त्या वर्षी चिपळूण हून काही अंतरावर असलेल्या गावामध्ये एक ऑर्डर मिळाली होती. त्यांच्या सोबत त्यांचा मित्र राजेश ही असायचा. तो मूळचा तिथलाच.. ते दोघेही ऑर्डर मिळाल्यामुळे एकत्रच रात्रीच्या एस टी बस ने निघाले. पहाटे ४.३० ला बरोबर ते डेपोत पोहोचले. तिथून त्यांना आता त्या गावात जायचे होते. त्यामुळे चालत जाऊन एका बेंच जवळ जाऊन थांबले. ४.३० झाले असले तरीही अजून उजाडायला सुरुवात झाली नव्हती. तो परिसर ही बऱ्यापैकी सामसूम होता. तितक्यात च एक म्हातारा माणूस कुठून तरी चालत समोर आला आणि माझ्या वडिलांनी त्याला विचारले “आजोबा आम्हाला इथून पुढे एका गावात जायचे आहे तर पुढची एस टी कधी पर्यंत येईल..?” तसे ते म्हणाले “तुम्हाला त्या पुढच्या गावातल्या लग्नात जायचे आहे ना.. मी तुम्हाला घेऊन जातो चला..”. त्याने एका डोंगराकडे बोट दाखवत इशारा केला. अंधारात जास्त काही दिसत नव्हते पण तरीही त्या दिशेला डोंगर असल्यासारखा भासत होता. तो म्हातारा माणूस पुढे म्हणाला “त्या डोंगरावरून शॉर्ट कट आहे, १५ मिनिटात त्या गावात पोहोचवतो तुम्हाला..”. त्या इसमाचे असे बोलणे ऐकून त्यांना वेगळेच वाटले. कारण एस टी ने एक तास लागतो तर हा माणूस १५ मिनिटात कसा काय पोहोचवेल.
त्यांनी त्या इसमाकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. तितक्यात जोरात हॉर्न ऐकू आला. पाहिले तर एस टी आली होती. ते क्षणाचाही विलंब न करता एस टी मध्ये चढले आणि तासाभरात गावात पोहोचले. त्यांचा मित्र राजेश च्या घरी थांबले होते. तिथे त्याची आई राहायची. त्यांनी सकाळी पोहोचल्यावर जरा ४-५ तास झोप काढली आणि मग नंतर उठले. दुपारचे जेवण आटोपून घेतले आणि मग लग्नाच्या ठिकाणी जाऊन कामाला लागले. ऑर्डर पूर्ण करे पर्यंत संध्याकाळ झाली. रात्री हळद होती आणि मग जेवण तिथेच करून ते रात्री घरी निघणार होते. तिथून निघायला जरा उशीर झाला. घरी आल्यावर अंगणात गप्पा करत बसले होते. तितक्यात जाणवले की राजेश च्या घराच्या अंगणातून समोर बहुतेक तीच डोंगर दिसतो जो दुसऱ्या बाजूने त्या म्हाताऱ्या माणसाने दाखवला होता. तिथे त्यांचे लक्ष गेले कारण त्या डोंगरावर आग पेटलेली दिसली. तितक्यात राजेश म्हणाला “अरे वणवा लागला असेल..” तितक्यात त्याची आई म्हणाली “वणवा नाही तो छबिना आहे..” तसे वडिलांनी पटकन विचारले “छबिना म्हणजे काय..?”. तसे त्या म्हणाल्या “जशी देवाची पालखी निघते ना तशी पालखी आहे ती..”. माझे वडील राजेश ला म्हणाले “चल बघायला जाऊयात.”.
ते दोघेही जागेवरून उठले तसे त्या त्यांना उद्देशून अतिशय गंभीर आवाजात म्हणाल्या ” अशी तशी पालखी नाही ती.. भुतांचा छबिना निघाला आहे. ती भूत हातात मशाल घेऊन नाचतात.. आणि सर्वात पुढे भुतांचा राजा वेताळ असतो.” त्यांचे असे बोलणे ऐकून ते त्या डोंगरावरच्या आगी कडे पाहतच राहिले. पण ते इतक्यावरच थांबणार नव्हते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगरावर जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे उजाडल्यावर ते तिथे गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना एक साधी गवताची काडी सुद्धा जळलेली दिसत नव्हती. तो परिसर अगदी नेहमी सारखा वाटत होता. त्या माळरानावरून रून कोणी चालत गेल्यासारखे ही मुळीच वाटत नव्हते. त्यामुळे काल रात्री नक्की त्यांनी भुतांचा छबिना पाहिला होता. त्यात तो म्हातारा माणूस त्यांना त्या डोंगरावर जायला का सांगत होता या गोष्टीचा मात्र त्यांना उलगडा झाला नाही. या गोष्टीला जवळपास १२ वर्ष झाली पण आजही वडील ही गोष्ट सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाटून येते.