लेखक – प्रथम शहा

उन्हाळ्यचे दिवस होते. मनोजच्या वार्षिक परिक्षा संपल्या होत्या. दरवर्षी प्रमाणे मनोज व त्याची आई त्याच्या आजोळी जाणार होते. त्याच्या आईने सामान वगैरे पॅक केले व सकाळच्या बसने ते मनोजच्या आजोळी निघाले. प्रवास अगदी नीट पार पडला आणि दुपार पर्यंत ते त्या गावी पोहोचले. ते गाव अगदीचं लहान होते. त्या दिवशी उन्हाचा जोर ही खूप जाणवत होता. त्या गावी बस-स्टॅड वगैरे असे काही नव्हते. एका नेहमीच्या ठरलेल्या कोपऱ्यावर बस येत असे व जेमतेम प्रवासी नेत व सोडत असे. त्या जागे पासून अगदी काही पावलांवर त्याचे आजोळ होते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत मनोज त्याच्या आजी-आजोबांच्या घरी पोहोचला. आजीला चाहूल लागताच आनंदाने बाहेर आली आणि मनोज ला जवळ घेत गालावर एक गोड मुका दिला. आजी आणि नातवाचे नातं अगदी गोड असत तस त्यांचं ही होत. जितके आई वडील जीव लावत नसतं तितके आजी आजोबा जीव लावत. त्यांना तिथेच थांबायला लाऊन ती पटकन आत गेली आणि एक भाकरीचा तुकडा हातात घेऊन आली. त्या दोगांवरून तो तुकडा ओवाळून दूर टाकून दिला. आणि मग त्या दोघांनाही आत बोलावलं.  मनोज दरवर्षी गावी यायचा म्हणून त्याची गावातल्या बऱ्याच मुलांशी गट्टी जमली होती. जसे तो गावात आला आहे याची खबर मिळाली तसे साऱ्या मित्रांनी त्याच्या घरी मोर्चा मिळवला. आजी आजोबा दोघेही खूप खुश होते म्हणून त्यांनी खाऊ, चॉकलेट सगळ्यांना दिले. 

संध्याकाळ ची वेळ झाली होती. सूर्य मावळतीला आल्यामुळे त्याचा पिवळा रंग आता हलकासा केशरी होऊ लागला होता. जवळपास ७ वाजायला आले होते. उन्हाळ्याच्या महिन्यात दिवस तसा बऱ्यापैकी मोठा असतो म्हणून अजूनही बरच उजेड होता. घरात स्वयंपाकाची लगबग सुरू झाली. शहराच्या तुलनेत गावाकडचे वातावरण वेगळेचं असते. जेवणाची तयारी, जेवणं हे जरा लवकरचं आटोपते. तासाभरात सगळे जेवण तयार झाले. आणि मग ८.३० पर्यंत साऱ्यांचे जेवण ही आटोपले. मनोजचे आजोबा त्याला म्हणाले, ” बाळ मनोज, चल उठ, आता झोपी जा “. प्रवासामुळे मनोज खूप थकला होता. तो ताबडतोब आपल्या खोलीत गेला व आईच्या शेजारी झोपी गेला. पडल्या पडल्या त्यांना गाढ झोप लागली. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. 

काही वेळात नळाला पाणी आले तसे आजूबाजूच्या घरातली लोक नळावर जमली. मनोज उठून लगेच मदत करायला म्हणून पाणी भरायला घराबाहेर पडला. तसा स्वभावाने तो खूप मनमिळाऊ आणि आज्ञाधारी होता. आपल्या आजी आजोबांना त्रास नको म्हणून सकाळीच उठून ती पाणी भरायला आला. त्यांचा संपूर्ण दिवस आजी आजोबांची मदत करण्यात गेला. संध्याकाळी ६ वाजता त्याने आजीला विचारले ” ए आजी आजी ! अगं मला क्रिकेट खेळायचंय गं! खूप दिवस झाले मी मोकळ्या मैदानावर खेळलो नाहिये.”. तसे आजी जरा दबक्या स्वरात म्हणाली, ” हो बाळा, खुशाल खेळ, पण खेळून झाल्यावर थेट घरी ये , उशीर करु नकोस , आणि त्या मैदानाजवळ एक जुने बंद पडलेले सिनेमा गृह आहे. काहीही झाले तरी तिकडे तर फिरकुही नकोस.”.

त्याने होकारार्थी मान हलवली. तसे आजी म्हणाली “नुसते हो नाही.. मी मग सांगितले ते लक्षात ठेव..” आजीने परवानगी दिल्यामुळे त्याचा आनंद पोटात मावेनासा झाला. त्याने हसत हसत आजीला मिठी मारली व चेंडू आणि बॅट घेऊन तो मित्रांना बोलवायला गेला. ते मैदान घरा पासून तसे बरेच लांब होते. जायला जवळपास २० मिनिट लागत. त्याच्या सोबत त्याचे ५-६ मित्र होते. मजा, मस्ती करत ते काही वेळात त्या मैदानावर पोहोचले. त्यातल्या एका मुलाने म्हणजे अभय ने मैदानात स्टॅम्प साठी एक दगड उभा केला. ते सगळे मित्र म्हणजे राम, मोहन, वैभव, प्रतीक, अभय आणि मनोज सगळे खेळायला सज्ज झाले. मनोजला असे खेळायला कधीच मिळत नसे. त्यामुळे तो अगदी मनसोक्त खेळत होता. आणि त्याच्या सोबत त्याचे मित्र देखील गोंधळ करत, ओरडत खेळाचा व सुट्टीचा आनंद लुटत होते. पण त्यांना कुठे माहित होत की या खेळामुळे ते एका मोठ्या संकटात सापडणार होते आणि इथून पुढे गोष्टी भयानक वळण घेणार होत्या. तास दीड तास खेळून झाल्यावर आता अंधार पडायला सुरुवात झाली. अभय ला लक्षात येताच तो पटकन म्हणाला ” ए, चला आता बस झालं.. घरी जाऊ..”.  त्याचा स्वभाव त्याच्या नावाच्या अगदी उलय होता. ” काय रे अभय, बरं ठीक आहे , चल लास्ट बॉल टाक! मग आपण थांबू ” जरा वैतागून मनोज म्हणाला. ” बरं ” असे म्हणत अभयने बॉल टाकला व मनोजने तो एवढ्या जोरात मारला कि, तो त्या सिनेमागृहाचे कुंपण ओलांडून आत निघून गेला.

सगळ्यांनी मनोज कडे पाहिले तसे तो पटकन म्हणाला “” अरे…! काय बघताय.. बरं चला आपण बॉल शोधून मग घरी जाऊ ” मनोज म्हणाला.

 ” नको, राहूदे तो बॉल तिकडेचं, आपण निघू ” मोहन कापऱ्या आवाजात म्हणाला.

” गावात या पडक्या सिनेमागृहाविषयी फार भयानक चर्चा चालतात.” रामने त्याच्या ह्या वाक्यातून भीती दर्शवली.

” अरे , काय रे तुम्ही , असं काही नसतं. चला.. काही नाही होत.. जर आपण आज बॉल शोधला नाही तर आपला उद्याचाही डाव खोळंबेल. काही नाही होणार, आपण पटकन जाऊन बॉल घेऊन येऊया.” मनोज ला आजीने सांगितलेल्या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडला होता. गावातल्या एकाही मुलाची तिथे या वेळी जाण्याची इच्छा नव्हती. पण मनोजच्या हट्टापायी सर्व मित्र त्या सिनेमागृहाच्या दिशेने वळाले. कंपाऊंड च्या भिंती अगदी मोडकळीस आल्या होत्या. त्यावर चढून त्यांनी पटापट आत उड्या घेतल्या. वेळ न घालवता सगळे बॉल शोधू लागले. तितक्यात अभय ला बॉल सापडला आणि तो पटकन म्हणाला ” मिळाला मला.. चला आता आपण जाऊया.. इथे जास्त वेळ नको थांबायला..” त्याच्या आवाजातली भीती सगळ्यांनीच हेरली. त्यावर प्रतीक ही बाहेरच्या बाजूला जात म्हणाला “बऱ्याच लोकांना इथे विचित्र किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात..”. ते सगळेच बाहेर पडणार तितक्यात मनोज अगदी बिनधास्त होऊन म्हणाला ” काय रे तुम्ही पण, हे असं काही नसतं, हे सिनेमागृह बऱ्याच वर्षांपासून बंद आहे, कोणीतरी नक्कीचं मस्करी करत असणार.. बरं मी तुमची शंका दुर करतो, चला आपण आतमध्ये जाऊ”.

ते सिनेमागृह बरच जून व पडीक होत. आजूबाजुला वाळलेली व जळकी झाडे होती. त्यामुळे ते मुळातचं भयावह होत. कुठूनतरी मध्येच वडाच्या पारंब्या त्या सिनेमा गृहाच्या भिंतीना बिलगल्या होत्या. त्याचे दार व खिडक्या बंद होत्या आणि धुळीने माखल्या होत्या. मनोजने त्या दाराला सहज धक्का दिला, तसे ते उघडले गेले. मुलांनी एकमेकांकडे पाहिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती असली तरी कुतूहल ही तितकेच होते. कोणी काहीही न बोलता कुतुहलापोटी आत शिरले. आतले वातावरण अतिशय गुढ होते. मनोज व त्याच्या मित्रांना वातावरणात अचानक गारवा जाणवू लागला. 

“बघा! काही आहे का इथे, उगाच घाबरता तुम्ही सारेजण ” अगदी हसत मनोज म्हणाला.

तेवढ्यातचं त्यांना विचित्र हसण्याचा आवाज आला. तसेच सारेजण दचकले. “मी म्हणालो होतो, नको इथे यायला, चला पळा ” हळू आवाजात पण भित्र्या स्वरात अभय म्हणाला.

या विचित्र हसण्यामुळे सगळे चांगलेचं घाबरले होते म्हणून सर्वांनी त्या दरवाज्याकडे धुम ठोकली. परंतू तितक्यातचं ते दार जोरात अपोआप बंद झाले. आत सर्वत्र अंधार पसरला. मुलांचा आरडा – ओरडा सुरू झाला, काहीजण तर रडू लागले. मनोज जोरजोरात दरवाजा वाजवत ओडू लागला “वाचवा ! वाचवा ! ” त्या अंधाऱ्या पडीक सिनेमा गृहात आता ही मुले चांगलीचं अडकली होती. आरडा-ओरडा सुरुचं होता तितक्यात त्या जागेत आपोआप लाल लाईट्स लागल्या. त्या लाल दिव्याच्या मंद प्रकाशात मनोज व त्याचे मित्र रडणे आवरात एकमेकांकडे पाहू लागले. काय होतंय ते पाहू लागले. डोळ्याची पापणी लवते न लवते तोचं रामचे पाय कोणीतरी घट्ट आवळलेले त्याला जाणवले. त्याने जोरात किंकाळी फोडली व सर्व मित्र भितीने इकडे तिकडे पळू लागले. त्याने जोरात झटका दिला तसे त्याचे पाय आता हलके भासू लागले. तोच सारे मित्र एकत्र आले व त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले. मनोजला त्याची ही चूक आता चांगलीचं कळाली होती. सगळ्यांची नजर एका कोपऱ्यात स्थिरावली आणि त्यांनी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहिले. अनेक विक्षिप्त सावल्या जोरजोरात हसतं त्या मुलांच्या दिशेने चालून येत होत्या. त्यांनी पुन्हा आरडा ओरडा सुरू केला, सुदैवाने मनोजला मागच्या बाजूस एक फट दिसली. मनोजने क्षणाचाही विलंब न करता , साऱ्या मित्रांना त्या फटीकडे इशारा केला. मनोजने इशारा करताचं सारे मित्र त्या फटीतून बाहेर पडले. बाहेर आल्यावर लगतच्या रस्त्यावरुन सरळ घराकडे धावत सुटले. 

सगळे ओरडत रडत मनोजच्या घरी आले. तोच त्याच्या आईने व आजीने सर्वांना धीर दिला, प्रेमाने कुरुवाळले व मिठीत घेतले. आणि शांत करायचा प्रयत्न करू लागल्या. सर्व मुलांना चांगलाचं घाम फुटला होता. या सगळ्या गोंधळामुळे, गोंगाटा मुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. 

“काय रे मनोज, काय झालं एवढा का घाम आलाय आणि रडायला काय झालं तुम्हा सर्वांना?” मनोजच्या आईने प्रश्न केला. तसे मनोजने घडलेला सारा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला.

आजीने जोरात आपल्या कपाळाला हात मारला व म्हणाली, ” मोठे विघ्न टाळले, कोणी सांगितल होत हा आगाऊपणा करायला, तिथे जायला मी मनाई केली होती ना!”

“का ते सिनेमागृह इतक्या वर्षांपासून बंद आहे? काय रहस्य आहे त्याचं? ” मनोजच्या आईने घाबरत आणि मनोजचे डोळे पुसतचं प्रश्न विचारला.

“अगं! काही वर्षांपूर्वी त्या सिनेमागृहात शॉर्ट सरकीट मुळे मोठा अपघात झाला होता. आज लागून अनेक लोकांचे त्यात जीव गेले. त्या घटनेनंतर ते असेच पडून आहे. अनेक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणे, त्या जागेजवळ हसण्याचे वगैरे भास होतात. कैक जणांच्या अतृप्त आत्मा त्या सिनेमा गृहात च अडकून पडल्या आहेत. या अशा गोष्टींमुळे शक्यतो कोणी तिकडे फिरकत नाही”. आई उठली आणि मनोज व त्याच्या मित्रांची मीठ-मोहरीने नजर काढली. मनोजलाही आता आपल्या चुकीचा पश्चताप झाला होता. त्याने घरातील सर्वांची तसेच मित्रांची माफी मागितली व पुन्हा तो असा आगाऊपणा कधीचं करणार नाही असा त्याने कानाला खडा लावला.

Leave a Reply