अनुभव – वेदांत शहाणे

घटना २०१९ ची आहे. आम्ही एका नवीन फ्लॅट मध्ये राहायला आलो होतो. आम्ही म्हणजे माझे आई वडील आणि दोन भाऊ असे एकूण पाच जण. आमचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता आणि दुसऱ्या मजल्यावर एक दवाखाना होता. त्यात त्या बिल्डिंग ला लिफ्ट नव्हती त्यामुळे जिने चढून जावे लागायचे आणि मध्ये दुसऱ्या मजल्यावर तो दवाखाना लागायचा. संध्याकाळ झाली की त्या मजल्यावर पूर्ण अंधार असायचा म्हणून जरा विचित्रच वाटायचे. का कोण जाणे पण तिथले लाईटस नेहमी बंद असायचे. कधी कधी तर असे वाटायचे की आपल्या सोबत कोणी तरी आहे म्हणून मी जरा धावतच जायचो. 

मी या बद्दल घरी बोललो होतो पण सगळ्यांना वाटायचे की मी कारण नसताना घाबरतो. त्या दिवशी मी आणि माझे वडील बिल्डिंग च्या खाली जेवण आटोपून शतपावली करत होतो. तिथे एक मेडिकल स्टोअर मधले काका कधी नव्हे ते आमच्याशी बोलू लागले आणि विचारले की तुम्ही बिल्डिंग मध्ये नक्की कुठे राहता. तसे माझ्या वडिलांनी सांगितले की आम्ही तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅट मध्ये रहायला आलो आहोत. तसे ते काका म्हणाले की तुम्ही तो फ्लॅट कसा काय घेतला ? तुम्ही घ्यायला नव्हता पाहिजे तो फ्लॅट !. त्यांचे बोलणे ऐकून मी जरा दचकलोच. तितक्यात माझ्या वडिलांनी त्यांना विचारले “का हो.. असे का म्हणताय?”.

त्यावर ते काका सांगू लागले. हा फ्लॅट गेले बरेच वर्ष बंद होता. सुरुवातीला या फ्लॅट मध्ये एक कुटुंब राहायचे. आई, वडील आणि त्यांची दोन मुलं. दोघांची लग्न झाली होती. पण काही महिन्यात त्यातल्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या नंतर त्यांनी हा फ्लॅट सोडून दिला आणि दुसऱ्या ठिकाणी रहायला गेले. हा फ्लॅट असाच पडून होता काही महिने. कोणी भाडेकरू ही मिळत नव्हता. पण नंतर ६-७ महिन्यांनी २ मुलांनी हा फ्लॅट भाड्यावर घेतला. दोघेही शिक्षण घेत होते. पण ३-४ महिने झाले आणि त्यातला एक मुलगा अचानक गेला. चौकशी केल्यावर कळले की त्याला पोटाचा कसला तरी आजार झाला होता. 

त्या नंतर हा फ्लॅट साधारण दोन ते अडीच वर्ष बंद होता. आणि आता इतक्या वर्षानंतर तुम्ही घेतला. जरा सांभाळून रहा. घरी आल्यावर आमचे पुन्हा या विषयावर बोलणे झाले. आम्ही सगळे जरा घाबरलो च होतो. त्या नंतर मात्र आम्हाला दिवसेंदिवस विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली. एका रात्री मला घरी यायला उशीर झाला. मी जिना चढत वर येत होतो. तितक्यात मला माझ्या मागून कोणी तरी येतंय असे वाटले आणि मी काही क्षणासाठी थांबलो. तसे मागचा आवाज ही थांबला. मी पुन्हा चालायला सुरुवात केली आणि मागून मला पुटपुटण्याचा विचित्र आवाज ऐकू आला. मी मागे वळून पाहिलेच नाही आणि सरळ धावत घरात शिरलो. 

त्या नंतर काही दिवसांनी आई ला ही अतिशय भयानक अनुभव आला. आई घरी एकटी होती. जेवण करायला म्हणून ती किचन मध्ये गेली आणि जेवणाची तयारी करू लागली. तितक्यात टॉयलेट जवळ च्याच रिकाम्या जागेत ठेवलेल्या वॉशिंग मशीन वर फटका मारण्याचा आवाज आला. आई एकदम दचकली. घरी कोणी नसताना इतक्या जोरात आवाज येणे खूप विचित्र होते. असे भयानक अनुभव तिला नेहमी येत राहिले. तिला असले काही जाणवले की ती राम रक्षा स्तोत्र म्हणायला लागायची. 

पण त्या रात्री जे घडले ते कल्पना शक्तीच्या पलीकडचे होते. माझा लहान भाऊ यश रात्री खूप जागरण करायचा. त्याचे युट्यूब वर चॅनल आहे त्यामुळे लाईव्ह स्ट्रिमिंग करायला तो त्या रात्री ही खूप उशिरा पर्यंत जागा होता. आम्ही सगळे एकाच खोलीत झोपलो होतो आणि अगदी गाढ झोपेत होतो. साधारण ३ वाजले असतील. भूक लागली म्हणून यश उठला आणि स्वयंपाक घरात जाऊन मॅगी बनवू लागला. बनवून झाल्यावर तो तिथेच धक्क्यावर खायला बसला. स्वयंपाक घरातला लाईट चालू होता पण पेसेज लाईट चालू नव्हता. त्यामुळे समोरच्या बेडरूम पर्यंत थोडा प्रकाश जात होता. अचानक त्याचे लक्ष समोर बेडरूम च्याच दाराजवळ गेलं. 

तिथे कोणी तरी उभ होत. तो काहीच न बोलता फक्त पाहतच राहिला. साधारण ८ फूट उंच माणूस त्या दाराच्या कडेला उभा राहून आत पाहत होता. माणूस होता की अजुन काही हे त्याला कळण्याच्या पलीकडचे होते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो निरखून पाहू लागला तसे त्याला कळले की आत झोपलेल्या माझ्या मोठ्या भावाकडे तो पाहत होता. किती तरी वेळ यश तसाच बसून राहिला. तो प्रचंड घाबरला होता. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. बऱ्याच वेळा नंतर ते जे काही होत ते हळु हळू अदृश्य होत गेलं. जसं ते दिसे नास झालं तसे यश उठला आणि कसा बसा बेडरूम मध्ये येऊन झोपला. 

दुसऱ्या दिवशी त्याने सगळ्यांना रात्री घडलेला जीवघेणा प्रसंग सांगितला. तेव्हा मात्र माझ्या वडिलांनी इतक्या दिवसाचे मौन सोडले. ते म्हणाले की आपण हा फ्लॅट लवकरच सोडतो य. मला माझ्या स्वप्नात एक व्यक्ती आला होता. तो मला चिडून सांगत होता की हे घर सोडून निघून जा. मी त्याला सांगितले की आम्ही नाही राहणार इथे, आम्ही जातोय इथून. इतके दिवस मला वाटतं होते की हे फक्त स्वप्न आहे पण नाही. मी चुकत होतो. आपण हा फ्लॅट सोडतो य. अजुन कोणाला कसलाही त्रास मी होऊ देणार नाही. पण शहरात असल्यामुळे आम्हाला दुसरा फ्लॅट च मिळत नव्हता. आम्ही प्रत्येक रात्र भीतीपोटी जागून काढत होतो. 

भरीस भर म्हणून काही कारणाने दुसऱ्या मजल्यावर चा दवाखाना ही बंद झाला. भीतीच्या सावटाखाली आमचे जगणे चालू होते. नुसते खाली जाऊन यायचे म्हंटले की दहा वेळा विचार करायला लागायचा. फ्लॅट मिळत होते पण आम्हाला भाडे परवडण्यासारखे नव्हते म्हणून आम्ही नाईलाजाने तिथे राहत होतो. शेवटी सगळी विघ्न दूर व्हावीत आणि वास्तूत कोणता दोष असेल तो निघून जावा आम्ही घरात एक पूजा करून घेतली. त्या नंतर हळु हळू भीती कमी होत गेली. आधी जसे वाटायचे तसे अजिबात वाटतं नव्हते. एक वेगळीच प्रसन्नता आली होती घरात आणि वातावरणात. आई ने घरात हनुमानाचे फोटो लावले. त्या नंतर आम्हाला पुन्हा असे अनुभव आज पर्यंत कधीच आले नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही अजूनही त्याच फ्लॅट मध्ये राहतोय.  

Bhaykatha

Leave a Reply