लेखक – वेद बर्वे

दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या सुट्टीतही मी आणि माझे आजोबा (माझ्या आईचे वडील) आमच्या तळेगावच्या घरी आलो होतो. पुणे आणि लोणावळ्याच्या मधोमध तळेगांव नावाचं एक शहर वजा गाव आहे. त्यादिवशी घराच्या बाल्कनीत मी, आजोबा आणि बिल्डींगमधले काही शेजारी गप्पा मारत बसलो होतो. भूत, पिशाच्च, अमानवीय शक्ती या विषयावर गप्पा सुरु होत्या. प्रत्येकजण आपापल्या गावातील रहस्यमय, भीतीदायक अनुभव सांगत होते. याआधी हे विषय कधीच न ऐकल्यामुळे मी खूपच उत्साहाने सारं काही ऐकत होतो. थोड्या वेळाने मात्र त्या गोष्टींची मला भीती वाटू लागली. गोष्टीतल्या भूत, पिशाच्च यांना माझ्या कल्पनाशक्तीने आकार द्यायला सुरुवात केली होती. जसजशा त्या शक्ती माझ्या डोक्यात आकार घेत होत्या, तशी माझी भीती अधिकच वाढत होती.

तिथे बसलेले एक काका म्हणाले, या वाईट शक्ती म्हणे माणसाचा पाठलाग करतात. भूतं, अतृप्त आत्मे हे कधी कुणाची पाठ धरतील याचा नेम नाही… आणि एकदा का ते एखाद्याच्या मागे लागले तर तो माणूस जिवंत वाचणं मुश्कील असतं. काका पुढे बोलू लागले…. मी ऐकलंय की काही आत्मे हे त्रास देणारे नसतात नसतात. फक्त त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी किंवा आपल्या हातून मुक्ती मिळावी यासाठी ते आपला पाठलाग करतात. एक मोठा श्वास घेत काका पुढे म्हणाले… पण काहीही असलं तरी या भयानक शक्तींचा पाठलाग वाईटच… त्या कधी आपला जीव घेतील….. त्यांचं वाक्य मध्येच तोडंत आजोबांनी विषय बदलला आणि हळूहळू गप्पा आवरत्या घेतल्या. त्यांचा या सर्वावर अजिबताच विश्वास नव्हता.

सूर्य आता मावळतीकडे झुलका होता. मी आणि आजोबा रेल्वे स्टेशनच्या एका बाकड्यावर निवांत बसलो होतो. मला लहानपणी थ्रू ट्रेन्स पाहण्याचं खूपच वेड होतं. त्यात स्टेशनवर संध्याकाळच्या वेळी लोकांची वर्दळ खूपच कमी असायची. त्यामुळे तळेगावला गेलं की रोज संध्याकाळी स्टेशनवर जाऊन गाड्या बघत बसायच्या, हा आमचा ठरलेला कार्यक्रम. आजही आम्ही इतर कामं आटपून स्टेशनवर येऊन बसलो होतो. तासाभरातच सगळीकडे मिट्ट काळोख पसरला. गावातले दिवे गेल्यामुळे अंधाराची तीव्रता अधिकच जाणवत होती.

आज माझं मात्र नेहमीसारखं उत्साही नव्हतं. दुपारी ऐकलेल्या भयाण, अनाकलनीय आणि गूढ गोष्टींचा मी अजूनही विचार करत होतो. सारखे तेच विचार डोक्यात घोळत असल्यामुळे स्टेशनवर वावरणारी तुरळक माणसंही मला भूत, पिशाच्चाप्रमाणे भासत होती.

अचानक माझं लक्ष समोरच्या प्लॅटफॉर्मवरील एका छोट्याशा खोली वजा केबीनकडे गेलं. तिथून येणाऱ्या बल्बच्या पिवळसर मंद प्रकाशामुळे परिसर खूपच गूढ वाटत होता. अचानक त्या केबीनमधून एक माणसासारखी आकृती बाहेर आली. त्या आकृतीच्या हातात एक लाल दिवा होता. लाल रंगाच्या दिव्यामुळे ती आकृती अधिकच भयाण दिसत होती. तिचा चेहरा दिसतो का हे बघण्याचा मी प्रयत्न करु लागलो. पण तितक्यात ती आकृती भराभर प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेला आली आणि अचानक रूळांमध्ये उडी टाकली. आता मी पुरता घाबरून गेलो होतो.

ती भयाण आकृती हळूहळू आमच्या दिशेने सरकत होती. तिच्यासोबत तो लाल दिवाही हिंदकोळे खात पुढे पुढे येत होता. माझ्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. अचानक त्या भयंकर आकृतीने आजोबांच्या दिशेने हात केला आणि त्याक्षणी अंगावर सर्रकन काटा आला. कोण आहे हे आकृती? त्या जगातील लोक आजोबांना ओळखतात? नाही नाही त्या विचारांनी अंगावर भीतीचा शहारा उमटला. तितक्यात ती आकृती आम्ही बसलेल्या प्लॅटफार्म चढून वर आली आणि माझ्या जीवात जीव आला. ….स्टेशन मास्तर होते ते. काय आजोबा काय म्हणता… त्यांनी आवाज दिला. हातात असलेल्या दिव्यावरची लाल रंगाची काच त्यांनी बाजूला सरकावली आणि त्याजागी हिरव्या रंगाची काच लावली. त्यावरुन तो कंदील सिग्नल असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी स्वत:लाच हसलो. तरीही भीती कायम होती कारण डोक्यात सुरु असलेल्या चित्र-विचीत्र विचारांनी माझ्या मनावर आणि मेंदूवर पूर्णपणे ताबा मिळवला होता.

इतक्यात थोड्या अंतरावरुन ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला. ट्रेन धडधडत वेगाने पुढे येत होती. इंजिनावरील हेड लाईटचा प्रकाश आजूबाजूचा अंधार चिरत होता. अचानक कुठूनतरी एक वृद्ध माणूस आला आणि रूळाच्या मधोमध जाऊन उभा राहिला. हे सगळं काय घडतंय कळायच्या आतच ट्रेनच्या इंजिनाची त्याला जोरदार धडक बसली. अतिशय भीषण आणि मेंदू सुन्न करणारं दृष्य होतं ते. आम्ही तिघेही जागीच खिळलो. बापरे! आता या आजोबांचा आत्मा भटकणार…तो लोकांचा पाठलाग करणार…त्यांचा जीव घेणार…मी पुन्हा एकदा त्या काल्पनिक जगात शिरलो होतो.

कुठून मरायला आला हा म्हातारा…. ड्युटी संपायच्या टाईमलाच यायचं होतं… स्टेशन मास्तरांच्या आवाजाने मी भानावर आलो. च्यामायला याच्या पोरा-बाळांनी याला रात्रीचा एकटा सोडला तरी कशाला.. याला कोण मुल-बाळं आहेत की नाही… वैतागलेले स्टेशन मास्तर गुरगुरत होते. बेवारस आहे वाटतं म्हातारा… आता याचं दिवस-कार्य कोण करणार?.. जाऊदे, आजोबा तुम्ही नातवाला घेऊन निघा आता, आम्ही निस्तरतो… असं म्हणत पुढच्या कारवाईसाठी स्टेशन मास्तर चालू पडले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत आजोबा स्वत:शीच पुटपुटले…. माझ्या हातात काही करण्यासारखं असतं तर मी यांच्यासाठी नक्की केलं असतं. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो….! आम्ही पुन्हा एकदा त्या माणसाकडे पाहून हात जोडले आणि परतीच्या वाटेला लागलो.

दिवे नसल्यामुळे बाहेर सगळीकडे मिट्ट काळोख होता. रस्त्यावर ठराविक अंतर सोडून असलेले किरकोळ स्ट्रीट लाईट्सही अर्धवट लुकलुकत होते. आजोबा आणि मी शांतच होतो. हातातली बॅटरी जशी वाट दाखवेल तसे आम्ही पुढे चालत होतो. एका चढणाच्या रस्त्याला आम्ही लागलो. मनातले काल्पनिक विचार आणि नुकत्याच पाहिलेल्या अपघाताचं वास्तववादी चित्र यांची सरमिसळ होत होती. अचानक आमच्या मागून कुणीतरी चालच येत असल्याचा आम्हाला भास झाला. मागून येणाऱ्याच्या चपलेचा कर्रकर्र असा आवाज येत होता. आवाज सौम्य असला तरी आजूबाजूला पसरलेल्या अंधाराच्या आणि शांततेतेच्या डोहात तो खूपच भीषण वाटत होता.

आजोबांनी एकाएकी माझा हात दाबला आणि दबक्या आवाजात म्हणाले मागे वळून बघू नकोस. मी आता अजूनच घाबरलो. अमानवी शक्तींवर विश्वास न ठेवणारे आजोबा असं का सांगतायत हे समजत नव्हतं. चढण मोठं असल्यामुळे अजून वरच्या बाजूचं काहीच नीट दिसत नव्हतं. आमच्या पाठीमागून येणारा तो चपलांचा आवाज आता स्पष्टणपणे ऐकू यायला लागला होता. भूतं आपला पाठलाग करतात….आणि मग जीव घेतात… दुपारी ऐकलेली ही वाक्यं अंगाचा थरकाप उडवत होती. चढणाचा रस्ता, रात्रीची वेळ, भयाण शांतता, टॉर्टचा प्रकाश बाजूला होताच पुन्हा पसरणारा महाकाय अंधार आणि पाठलाग करणारा चपलांचा तो आवाज… सगळंच गूढ आणि भयानक होतं.

आमचा पाठलाग करत असलेल्या ती व्यक्ती, आमच्यासोबत कधी काय करेल या भीतीने छाती धडधडत होती. तेवढ्यात पुन्हा एकदा लांबून ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि काळजात चर्रर्र झालं. मगाचच्या अपघाताचा प्रसंग डोळ्यासमोर आला आणि डोकं सुन्न झालं. अजूनही आम्ही चालतच होतो. आम्ही म्हणजे आम्ही तिघे… मी, आजोबा आणि तो.

आजोबांनी हळू आवाजत बोलायला सुरुवात केली. आता अगदी थोडाच रस्ता उरला आहे. मग आपण मुख्य चौकाच पोहचू. आपल्या मागे एखादा चोर आहे असं मला वाटतं. इथे लुटमारीचे असे प्रकार अनेकदा घडले आहेत. तो चोर आता योग्य संधीची वाट पाहत असावा, तू चालत राहा थांबू नकोस. आजोबांच्या बोलण्यातही आता भीती होती. चालता-चालता आजोबांच्या एका चपलेचा अंगठा तुटला. क्षणभर थांबून त्यांनी आपल्या चपला काढून हातात घेतल्या आणि आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. पण आम्ही थांबलो होतो तेव्हा तोही मागे थांबला होता. त्या विचीत्र पाठलागाने आता डोक्याला झिणझिण्या आल्या होत्या. तो जर चोर आहे तर मग इतकावेळ काहीच का करत नाहीये? प्रश्नांमागून प्रश्न पडत होते.

जीव मुठीत धरून शेवटी एकदाचे आम्ही चौकात येऊन पोहचलोच. चौकतले स्ट्रीट लाईट्स आणि माणसांची वर्दळ पाहून थोडासा धीर आला. चालता- चालता अचानक आजोबांना ठेच लागली आणि ते अडखळले. पायांचा बॅलन्स बिघडल्यामुळे त्यांचा तोल जाणार, इतक्यात एक माणूस धावत तिथे आला आणि आम्ही दोघांनी मिळून आजोबांना सावरलं. त्याचे माणसाचे आभार मानत आम्ही चार-पाच पावलं पुढे गेलो असू, तोच मागून त्याने हाक मारली. ओ… आजोबा तुमच्या चपला पडल्यात रस्त्यात…तेवढ्या घ्या उचलून… मगाशी पायातून निसटल्या वाटतं…

आजोबांनी काही वेळापूर्वी हातात चपला अजूनही त्यांच्या हातात तशाच होत्या. तोल जात असताना त्यांनी त्या घट्ट पकडून ठेवल्या असाव्यात. पण मग आमच्या मागे पडलेल्या त्या चपला कुणाच्या होत्या? ठिकठिकाणी फाटलेल्या आणि सुकलेले रक्ताचे डाग असलेल्या त्या चपला तिथे कशा आल्या?

आजोबांच्या चपला तर त्यांच्या हातात… मग या चपला… नक्कीच चोराच्या… पण मग ते रक्ताचे डाग…. मगाचचा तो रेल्वे अपघात… वृद्ध माणूस… ट्रेनची जोरदार धडक… अपघातात चपला फाटल्या… रक्ताने माखल्या… पाठीमागून येणारा आवाज या चपलांचा… म्हणजे तो माणूस… छे-छे पण तो तर मेला… तो पाठलाग का करेल… काय कारण असेल… एखादी अतृप्त इच्छा किंवा मुक्ती मिळेल अशी आशा… बापरे…. डोक्यात विचारांचे असंख्य वार होत होते. कल्पनाशक्ती आणि वास्तव यांचं घमासान युद्ध सुरु होतं.

….काही आत्मे त्रासदायक नसतात. त्यांची राहिलेली इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी… आपल्या हातून मुक्ती मिळावी यासाठी…….ते आपला पाठलाग करतात… काकांचे हे उद्गार, घडून गेलेल्या प्रसंगापेक्षाही आता जीवघेणे वाटत होते.

Leave a Reply