अनुभव – शुभम

ही घटना माझ्या दीपक नावाच्या मित्रा सोबत घडली होती. आम्ही दोघं ही कुही तालुक्या पासून साधारण ८ किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात राहायचो. जवळपास ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. गणपती विसर्जनाला एक दिवस राहिला होता. गावाचा परिसर असल्यामुळे लोक जेवण वैगरे सगळे आटोपून ९ वाजताच झोपून जायचे. आणि ९.३० पर्यंत सगळा परिसर सामसूम व्हायचा. गणपती बसल्यामुळे कधी काही खेळ किंवा कार्यक्रम असला तरीही १२ जास्तीत जास्त. १२ नंतर गावातल्या रस्त्यांवर अगदी शुकशुकाट पसरलेला असायचा. दीपक च्या मामा कडे गणपती असायचे त्यामुळे रोज तो तिथे जायचे.

तस पाहिलं तर दीपक च आणि त्याच्या मामा च घर जवळच होत पण फरक एवढाच होता की दीपक चे घर गावाच्या एका टोकाला होते तर मामा चे घर तोली म्हणून संबोधल्या जाणाऱ्या परिसरात होते. त्या दिवशी तो आपल्या मामाच्या घरून आपल्या घरी यायला निघाला. रात्री चे ११ वाजून गेले होते. १०-१२ मिनिटांचा रस्ता होता आणि येताना गावाच्या चौकातून यावं लागायचं. वातरवण अगदी शांत होत आणि संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेले होते. रस्त्यावर साधे चिट पाखरू ही नजरेस पडत नव्हते. तो चौकात चालत आला. तिथे एक दोन तीन दुकान आणि काही खोल्यांची एक लहानशी चाळ होती.

तो आपल्याच धुंदीत चालत जात होता. जसा तो चौकात आला तसे अचानक गावातले लाईट गेले. रस्त्यावर असलेल्या खंबावरचा लाईट ही बंद झाला. गावातल्या काही घरांमध्ये इन्व्हर्टर आणि चार्जिंग च्या बॅटरी असल्यामुळे तिथून येणारा पुसटसा प्रकाश रस्त्यावर पडत होता. त्याच प्रकाशात त्याला जाणवले की त्या एका दुकानासमोर कोणी तरी बसले आहे. तो त्या दिशेने थोड पुढे चालत गेला. तर त्याला दोन मुली बसलेल्या दिसल्या. 

गावातल्या वाटत नव्हत्या त्यामूळे त्याला वाटले की गावात कोणाकडे पाहुण्या म्हणून आल्या असतील. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तो वळून चालू लागला तश्या त्या दोघी उठून उभ्या राहिल्या आणि दीपक सोबत चालू लागल्या. त्याला वाटलं की या नक्कीच गावात नवीन असणार आणि एकट्याने जावे लागू नये म्हणून कोणाची सोबत मिळावी यासाठी थांबल्या असणार. म्हणून त्याने एक प्रश्न केला ” गावात नवीन आहात का..? कोणाकडे पाहुण्या आला आहात ?” पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.

आधीच जेमतेम उजेड असल्याने चेहरा ही नीट दिसत नव्हता त्यामुळे काही कळायला मार्ग नव्हता. आपल्या सोबत दोन जणी चालत आहेत एवढेच जाणवत होते. पुढच्या रस्त्यावर खूपच अंधार होता म्हणून त्याने मोबाईल काढला आणि त्याच्या फ्लॅश लाईट च्या प्रकाशात तो चालू लागला. तितक्यात एक कुत्रा समोरून धावत येऊन त्याच्या बाजूला पाहून जोर जोरात भुंकू लागला. दीपक ला वाटल की नक्कीच त्या नवीन मुलींकडे पाहून भुंकत असावा. त्याने त्या कुत्र्याला हकलायचा प्रयत्न केला पण त्याचे भुंकणे वेगळेच भासत होते.

तो कुत्रा जात नाही म्हंटल्यावर त्याने एक दगड उचलून भिरकावला तसा तो कुत्रा निघून गेला. घाबरु नका गावातले कुत्रे पाळीव च आहेत, ते चावत नाहीत हे सांगायला तो मागे वळला तर मागे त्या मुली दिसल्या नाहीत. त्याला वाटल की कुत्रा अंगावर धावत आला म्हणून त्या उलट निघून गेल्या असाव्यात. तो तसाच पुढे चालत राहिला. तितक्यात त्याला मागून कसलीशी चाहूल जाणवली.. एक हलकीशी कुजबुज..  त्याला काय वाटले काय माहीत त्याने मोबाईल चा फ्लॅश बाजूला मागच्या बाजूला वळवला आणि जागीच स्तब्ध झाला. 

त्या दोघी त्याच्या मागून त्याच्याच दिशेने येत होत्या. फरक फक्त इतकाच होता की त्या चालत नव्हत्या पण जणू तरंगत येत होत्या. तो प्रचंड घाबरला होता पण तरीही त्याने हिम्मत करून फ्लॅश लाईट त्यांच्या पायांजवळ नेला आणि त्याचा अंदाज खरा ठरला. त्या दोघी जमिनी पासून अर्धा एक फूट वर हवेत तरंगत त्यांच्या दिशेने सरकत पुढे येत होत्या. हा भयाण प्रकार पाहून त्याचे हात पाय लटपटू लागले. त्याने पळायचा प्रयत्न केला पण त्याची पाऊले जणू जागीच थिजली होती.

त्याच काळीज भीती ने धड धडू लागलं. त्या दोन्ही मुलींनी एका विचित्र आवाजात ओरडल्या तसे तो भानावर आला आणि त्याने जोर लाऊन त्याची पावले उचलली. थेट आपल्या घराच्या दिशेने धावत सुटला. धापा टाकतच घरात आला. आई जागी झाली आणि विचारू लागली की इतका दमून का आला आहेस, धावत आलास का..? त्याने घाबरतच सगळा प्रकार सांगितला. तिने त्याच्या हातात देवघरात असलेला एक धागा बांधला. या प्रकारानंतर त्याने गावात त्या दोन मुली बद्दल बरीच चौकशी केली पण अगदी आजतागायत त्याला समजल नाही की त्या मुली नक्की कोण होत्या आणि त्याच्या मागे का लागल्या होत्या. कदाचित त्यांचा फेरा असावा तिथे आणि दीपक त्यांच्या फेऱ्यात अडकला असावा. पण हे सगळे प्रश्न अगदी आजही अनुत्तरित आहेत.

Leave a Reply