अनुभव – अक्षय भारसाकळे

पूर्वी मी सिम कार्ड विकायचे काम करायचो. कामानिमित्त मला वेगवेगळ्या ठिकाणी, गावी जावे लागायचे. त्यामुळे अश्याच एका गावात जाण्याचा योग आला. मी आवर्जून गावाचे नाव गुपित ठेऊ इच्छितो. मी तिथे पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळे जास्त काही माहीत नव्हत. दिवसभर काम करून सुमारे रात्री आठ साडे आठ ला मी घरी जायची तयारी करू लागलो. निघताना मी तिथल्या एक दोघांना विचारून घेतले की गावातून बाहेर पडायला जवळचा रस्ता कोणता आहे. कारण येताना मला बरच वेळ लागला होता. तसे मला कळले की दोन रस्ते आहेत. एक कच्चा रस्ता जो शेताच्या मधून जातो फक्त ३० मिनिटांचा.. आणि एक मुख्य रस्ता जो गावाला काहीसा वळसा घालून जातो ज्याने तासभर तरी लागेल.

मी विचार केला की बाईक आहेच आपल्या बरोबर मग कच्च्या रस्त्याने लगेच जाऊ , वेळही वाचेल. जास्त विचार न करता मी बाईक घेऊन निघालो आणि त्या रस्त्याला लागलो. अगदी वळणा वळणाचा आणि खडकाळ रस्ता होता तो. कदाचित त्यामुळेच की काय माझी दिशाभूल झाली आणि मी रस्ता चुकलो. आणि रस्ता चुकल्याचे मला बराच वेळ कळलेच नाही. जो पर्यंत लक्षात आले तो पर्यंत रस्ता शोधण्यासाठी बाईक बराच वेळ फिरवून झाली होती आणि पेट्रोल ही संपायला आले होते. एके ठिकाणी बाईक स्टँड ला लाऊन २ मिनिट शांत झालो. मग मोबाईल काढून गुगल मॅप पाहिला तर कळले की मी तो कच्चा रस्ता सोडून भलतेच कुठे तरी आलोय. काय करावं कळत नव्हत म्हणून मग मित्राला फोन केला. त्याला मी जसे त्या गावचे नाव आणि कच्च्या रस्त्याबद्दल सांगितले तसे तो चिडून च म्हणाला की तुला कोणी जायला सांगितले होते तिथे..? मला काही कळले नाही.. मी त्याला काही विचारणार तितक्यात माझा फोन कट झाला आणि नेटवर्क ही गेलं. 

आता मात्र मी जरा विचारात पडलो. आजूबाजूला हिरवीगार शेतं दिसत होती पण एकही घर किंवा साधी एक झोपडी ही दिसत नव्हती. काय करावं, कुठल्या दिशेने जावे काहीच कळत नव्हत मला. मनात विचार आला की इथे रस्ता शोधत बसण्या पेक्षा आल्या मार्गे गावात परत जाऊ आणि मग बघू काय ते. मी वेळ पाहिली तर १ तास उलटून गेला होता. ९.३० वाजून गेले होते. मी बाईक वर बसलो आणि स्टार्टर मारणार तितक्यात मला एका बाईच्या रडण्याचा आवाज येऊ लागला.. तो आवाज ऐकून भीतीने अंगावर शहारे आले. कारण इतक्या वेळ मी त्या परिसरात फिरत होतो पण मला कोणीही व्यक्ती नजरेस पडली नव्हती.

मग आता अचानक हा आवाज. तो ही असा विचित्र रडण्याचा. मी त्या आवाजाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला पण तो आवाज नक्की कुठून येतोय तेच समजत नव्हत. जेव्हा लक्षात आले तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हृदयाची धडधड प्रचंड वाढली. कारण तो आवाज मी ज्या झाडाजवळ उभा होतो त्या झाडावरून येत होता. आता मात्र वर पहायची हिम्मत नव्हती. मी हळूच गाडीचा स्टार्टर मारला आणि त्या भागातून बाहेर पडू लागलो. मी त्या झाडापासून दूर जात असली तरीही तो रडण्याचा आवाज कमी होत नव्हता. पण जिथून आलो होतो तिथून पुन्हा त्याच गावात गेलो आणि त्या प्रवासात कधी तरी तो आवाज यायचा बंद झाला. गावातल्या एका माणसाला विनंती करून मी मित्राला फोन केला आणि मला घ्यायला बोलावले.

दीड पावणे दोन तासानंतर तो मला घ्यायला आला तेव्हा म्हणाला की त्या रस्त्याने कोणीही जात नाही कारण त्या रस्त्यात एक झाड लागते ज्या झाडाला लटकून गावातल्या बऱ्याच लोकांनी गळफास घेतलाय. मला कळून चुकले की मी ज्या झाडाखाली उभा होतो ते बहुतेक तेच झाड होते. माझे नशीब चांगले म्हणून मला तिथून लवकर निघायची बुद्धी सुचली. 

Leave a Reply