अनुभव – नितीन कांबळे

३१ डिसेंबर २०१७ ची गोष्ट आहे. मी कॉल सेंटर मध्ये जॉब करायचो. तिथे माझे मित्र ही झाले होते – सनी, राजू आणि सूरज. आम्ही ३१ पार्टी साठी खूप दिवसापासून प्लॅन करत होतो. तेव्हा सनी ने त्याच्या मित्रा चा फ्लॅट रिकामा असतो आणि आपण तिकडे जाऊ शकतो असे सुचवले. आम्ही लगेच तयार झालो. ३१ ला संध्याकाळी भेटायचे ठरवले. 

त्या दिवशी संध्याकाळी जवळपास ७ च्या सुमारास ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही कोणी त्या एरियात आधी कधी गेलो नव्हतो म्हणून आमच्या साठी तो एरिया अगदी नवीन होता. आम्ही पार्टी साठी लागणारे सगळे सामान सोबत घेतले होते. फक्त रात्री नॉन वेज कुठे मिळत नव्हते. ३१ डिसेंबर ची रात्र असल्यामुळे जवळपास सगळ्या दुकानात नॉन वेज संपले होते. शेवटी जे मिळेल ते घेऊन आम्ही मित्राच्या बिल्डिंग च्या दिशेने चालू लागलो. त्याचा फ्लॅट खूप पॉश एरिया मध्ये होता. गेट मधून आत शिरलो, बिल्डिंग बरीच मोठी होती. त्याचे घर तिसऱ्या मजल्यावर होते. 

आम्ही लिफ्ट मधून वर जात असताना सनी म्हणाला की त्याचे इतर मित्र ही घरी आहेत आणि ते सुद्धा आपल्या सोबत पार्टी करतील. आम्ही होकारार्थी माना हलविल्या. त्याच्या घरी आलो. आमची ओळख वैगरे झाली आणि गप्पा सुरू झाल्या. साधारण ११ वाजले तसे ड्रिंक वैगरे घेऊ लागलो. आमच्यातल्या राजू छान जेवण करायचा. त्यामुळे त्याला फ्रेंच टोस्ट वैगरे बनवायला लाऊन आमचा कार्यक्रम चालू होता. खूप दिवसांनी असा वेळ मिळाल्यामुळे वेळ कसा जात होता कळतच नव्हते. बघता बघता १२ वाजले तसे फटाके वाजल्याचा आवाज येऊ लागला आणि आम्ही एकमेकांना न्यू इअर साठी विश करू लागलो.

तितक्यात अजुन काही मित्र त्या फ्लॅट वर आले. त्यातल्या काही जणांनी प्रमाणाच्या बाहेर ड्रिंक केले होते. आल्यावर ओळख झाली पण त्यातल्या एकाने शुल्लक कारणावरून बाचा बाची सुरू केली. साधारण २ तास तेच चालू होते. आधीच धुंदीत असल्याने कोणी थांबायचे नाव घेत नव्हते. तसे मी सनी ला म्हणालो “आपण निघू इथून, उगाच भांडण होईल, एन्जॉय करायला आलोय आपण मारामारी करायला नाही”.

तसे सनी आणि आम्ही त्याच्या मित्राचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडलो. सनी ने आम्हा सगळ्या पेक्षा अगदी कमी ड्रिंक केले होते त्यामुळे आम्हाला सांभाळणारा तोच होता. आम्ही लिफ्ट जवळ येऊन थांबलो.. काही सेकंदात लिफ्ट आली तसे आम्ही आत शिरलो. मी लिफ्ट च्या दरवाज्याजवळ तोंड करून उभा होता. माझ्या मागे सनी, राजू आणि सूरज उभे होते. साधारण २.३० झाले असावेत. मी ग्राउंड फ्लोअर चे बटन दाबले आणि मित्रांना बोलू लागलो. बरे झाले आपण निघालो नाय तर सगळी नाईट खराब झाली असती. 

कोणी काही उत्तर देईल या आशेने मी मागे पाहिले तर मागे कोणीही नव्हते. त्या लिफ्ट मध्ये मी एकटाच होतो. मी स्वतःला मनात म्हंटले की आज आपल्याला खूप झाली आहे त्यामुळे कोणाला तरी फोन करून बोलवून घ्यावे. खिशातून फोन काढला तर नेटवर्क ही नव्हतं. म्हणून विचार केला की खाली पोहोचून लिफ्ट मधून बाहेर निघाल्यावर फोन करू. पण अचानक पहिल्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि लिफ्ट चा दरवाजा उघडला. समोर एक मुलगी उभी होती. मला वाटले की ३१स्त ची पार्टी वैगरे करून उशीर झाला असेल म्हणून घरी जात असेल असा विचार करून दुर्लक्ष केलं. ती मुलगी मान खाली घालूनच लिफ्ट मध्ये शिरली.

ग्राउंड फ्लोअर वर आल्यावर मी लिफ्ट मधून बाहेर पडलो आणि पार्किंग एरिया मधून चालू लागलो. तशी ती मुलगी माझ्या मागे मागे चालू लागली. मला जरा विचित्र च वाटले म्हणून मी मागे वळून पाहिले. पण काही कळण्या आधी त्या मुलीने मला मागून जोरात धक्का दिला. तो धक्का इतका अनपेक्षित होता की मी तोल जाऊन समोर आपटलो आणि अचानक मागे वळून पाहिले. ती मुलगी माझ्या डोळ्या समोर अक्षरशः नाहीशी झाली. घडलेला प्रकार पाहून एका क्षणात माझी संपूर्ण नशा उतरून गेली. मी पूर्ण शुद्धीवर आलो आणि उठून सरळ धाव घेतली. पण तिथून बाहेर निघण्याचा मार्गच सापडत नव्हता. 

खूप मोठे पार्किंग होते आणि त्यात मी जिवाच्या आकांताने सैरा वैरा पळत होतो. पण पुन्हा पुन्हा फिरून मी त्याच लिफ्ट जवळ येत होतो. त्या गडबडीत माझा फोन कुठे पडला काय माहीत. काय घडत होते काही कळत नव्हते. पण मी धावत राहिलो. काही वेळात मी बाहेर आलो. कसे आलो ते मला ही ठाऊक नाही. तिथे ४ वॉचमन शेकोटी करत बसले होते. मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तसे त्यांच्या ही चेहऱ्यावर भीती दाटून आली. बहुतेक त्यांना माहीत होते की माझ्यासोबत काय घडतेय. पण ते त्यावर काही बोलले नाही. 

तसे मी धावत जाऊन गेट बाहेर येऊन थांबलो आणि माझ्या मित्रांची वाट बघू लागलो. साधारण १० मिनिटांच्या अंतरावर एक एक जण धावत च येऊ लागला. आम्ही सगळे एकदाच म्हणालो “वाचलो यार मी”. जो अनुभव मला आला तसाच काहीसा अनुभव आमच्यातल्या प्रत्येकाला आला होता. राजू सांगू लागला की आपण चौघे लिफ्ट मध्ये गेलो पण माझ्या सोबत फक्त सूरज राहिला. सनी आणि तू दिसेनासा झाला. आणि मी पार्किंग मध्ये गेलो. सूरज ला याहून अजुन विचित्र अनुभव आला. तो म्हणाला की माझ्या सोबत लिफ्ट मध्ये फक्त राजू होता आणि तो जोरात हसत होता. मी ही पार्किंग मध्ये आलो आणि राजू दिसेनासा झाला. त्याला शोधायला लागलो. तितक्यात तो समोरून धावत आला माझ्या अंगावर झेप घेतली. माझ्या हाताला दुखापत झाली आणि माझे ब्रेसलेट ही कुठे तरी पडले. मी सूरज च्याच हाताकडे पाहिले तर तो अक्षरशः चिरला होता, एखाद्या भल्या मोठ्या हत्याराने वार होऊन चिरावा अगदी तसा. 

आम्ही रिक्षा ने आप आपल्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या ठिकाणी मोबाईल आणि ब्रेसलेट शोधायला आलो. आमच्यासोबत अजुन एक मित्र सागर ही आला होता. तो तसा निडर होता म्हणून च आम्ही मुद्दाम त्याला घेऊन आलो होतो. आम्ही त्या पार्किंग लॉट मध्ये जाऊन शोधू लागलो. तसे तिथला वॉचमन येऊन विचारू लागला. आम्ही त्याला घडलेला प्रकार सांगितला त्यावर तो म्हणाला की या विंग ची लिफ्ट पार्किंग लॉट मध्ये येतच नाही…

Leave a Reply