ही घटना साधारण १३ वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या आत्याकडे गावी गेलो होतो. गाव अगदी निसर्गरम्य होता. वस्ती ही तुरळक. सगळीकडे हिरवीगार शेती आणि ये जा करण्या साठी पायवाटा. त्या काळी गाव हवे तेवढे विकसित नव्हते. रस्त्यावर विजेचे खांब वैगरे काही नव्हते. त्यामुळे रात्री बाहेर पडताना कंदील घ्यावा लागायचा. 

गावाच्या वेशी बाहेर खाडी च्या पाण्याने भरलेले एक तळे होते. त्यामुळे त्यात भरपूर मासे असायचे. आम्ही ठरवले की दुपारी तिथे जाऊन मासे पकडायला जाळे टाकून यायचे. आणि रात्री ८-८.३० वाजता जेवण वैगरे उरकून जाळे काढायला जायचे. तोपर्यंत भरपूर मासे मिळतील. तसे आत्याचा मुलगा लगेच तयार झाला कारण तो म्हणाला की त्याच वेळी आपल्याला बरेच खेकडे ही मिळतील. ठरल्याप्रमाणे आम्ही दुपारी जाऊन जाळे टाकून आलो. 

त्या दिवशी रात्री जेवण व्हायला बराच उशीर झाला आणि तळ्यावर जायचे आहे हे ही पूर्ण विसरून गेलो. साधारण १० ला मला लक्षात आले तसे मी आत्त्याच्या मुलाला आठवण करून दिली. मी जेवायला केलेले मटण डब्यात भरले आणि त्याला म्हणालो की तिथे गेल्यावर मस्त निवांत बसून खाऊ. तसे आम्ही दोघे ही घाई गडबडीत कंदील, मासे भरायला एक पिशवी आणि सोबत देवीचा अंगारा घेऊन सायकल वर निघालो. मी मागे बसलो होतो आणि तो सायकल चालवत होता. काही वेळात आम्ही गावाची वेस ओलांडून बाहेर आलो. तो परिसर अगदी निर्मनुष्य होता आणि त्यात अगदी गडद अंधार पसरला होता. झाडांची सळसळ तितकीच काय ती ऐकू येत होती. 

आम्हाला तशी रात्री फिरायची सवय होती त्यामुळे नको ते विचार मनात येत नसत. मे महिना असल्यामुळे बरेच उकडत होते. साधारण १५ मिनिटांनी आम्ही खाडीचा पुल ओलांडून खालच्या बाजूला आलो. जेवायला आणलेले मटण बाजूला ठेवले आणि तळ्यात उतरून जाळे काढू लागलो. जाळ्याला भरपूर मासे लागले होते. आम्ही पटापट मासे काढून पिशवीत भरू लागलो. काही मिनिटात आम्ही सगळे आटोपून जायला निघालो तसे तो म्हणाला की आपले जेवण राहिले. तसे मी म्हणालो की आता जाऊदे इथे नको, आपण नारळाच्या बागेत जाऊ जेवायला.

आम्ही गावाच्या वाटेला लागलो. पुल ओलांडून खाडीच्या मधल्या रस्त्याला लागलो. दोन्ही बाजूला पाणी होते. काही वेळात वाऱ्याचा वेग वाढू लागला. वारा इतका जोरात वाहू लागला की आम्हाला सायकल चालवायला ही त्रास होऊ लागला. तितक्यात माझे लक्ष रस्त्याच्या कडेला गेले. तिथे कोणी तरी होत. साधारण माणसा इतकी उंची असावी. मी कंदील त्याच्या दिशेने फिरवला पण तो आमच्या पासून बराच लांब होता म्हणून त्याचा चेहरा काही नीट दिसत नव्हता. 

आम्ही जस जसे त्याच्या जवळ जाऊ लागलो तसे तो नीट दृष्टीस पडू लागला. मी पुन्हा कंदील त्याच्या बाजूने वळवला. कंदिलाच्या प्रकाशात दिसले की त्याचे अंग पूर्ण चिखलाने बरबटले आहे. आम्हाला वाटले की एखादा माणूस मासे पकडायला आला असेल त्यामुळे आत्याच्या मुलाने सायकल थांबवली आणि विचारले “मिळाली की मासळी”. तसे तो अतिशय किळसवाण्या आवाजात म्हणाला “असाच उभा रहा..”. आमच्या नजरे देखत वाऱ्याच्या वेगात तो आमच्या समोरून खाडीच्या पाण्याजवळ गेला आणि अतिशय वेगात खड्डा खणू लागला. आम्हाला काही क्षणासाठी कळलेच नाही काय घडतंय. 

माझ्या आत्याच्या मुलाने घाबरतच त्या माणसाच्या मागे बघण्यास मला खुणावले आणि मी नीट निरखून पाहू लागलो. तो आमच्या समोर काही फुटांवर पाठमोरा राहून खड्डा खण त होता. कंदिलाच्या जेमतेम पडणाऱ्या उजेडात मला असे काही दिसले की माझे काळीज भीती ने धडधडू लागले, हाता पायाला कंप सुटला आणि माझा जीव जातोय की काय असे वाटू लागले. तो साधा सुधा माणूस नव्हता, त्याला सापा सारखी लांब लचक शेपूट होती. त्याच्या हालचाली वरून आम्हाला कळून चुकले की आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत.  

आम्ही झटकन सायकल वर बसून तिथून निसटू लागलो. तितक्यात त्याला आमची चाहूल लागली तसे तो आमच्या मागे धावू लागला. अतिशय विचित्र आवाजात ओरडत, किंचाळत आमचा पाठलाग करू लागला. मी मागे बघतच नव्हतो पण मागून येणारा तो आवाज काळीज चिरत होता. तो आवाज जस जसा जवळ येत गेला तसे वाटू लागले की आता आपले काही खरे नाही. तितक्यात मला आठवले की आत्त्याने देवीचा अंगारा दिला होता. मी पिशवीत हात घातला आणि अंगारा काढून त्याच्या दिशेने भिरकावला तसे त्याचे अंग भाजू लागले आणि जागच्या जागी थांबून वेदनेने तडफडू लागला. 

आम्ही जीव मुठीत घेऊन अतिशय वेगात सायकल वरून त्याच्या पासून दूर जाण्या चा प्रयत्न करत होतो. मला वाटले की आपण थोडक्यात वाचलो आणि हिम्मत एकवटून मागे वळून पाहिले. तर पुन्हा तो आमच्या दिशेने वेगात पळत येत होता. आता मात्र होता नव्हता त्राण गळून पडला. माझ्या हातातली जेवणाची पिशवी ही खाली पडली. तसे पुढच्या क्षणी त्याने त्यावर झडप घेतली आणि पिशवी फाडून त्यातले मटण खात तिथेच थांबला.

आत्याचा मुलगा सायकल चालवून पूर्ण दमला होता कारण त्याने संपूर्ण ताकदीने सायकल चालवली होती. आम्ही त्याच्या पासून बरेच दूर आलो. घराजवळ पोहोचल्यावर सायकल आणि माष्यानी भरलेली पिशवी तशीच टाकून आम्ही धावत घरात शिरलो. आम्ही प्रचंड घाबरलो होतो. धावत आल्यामुळे आजी उठली आणि आम्हाला काय झाले विचारू लागली. तसे आम्ही सगळा प्रसंग सांगितला. आजी आम्हाला चिडूनच म्हणाली “तुम्हाला एवढ्या रात्री खाडी जवळ कोणी जायला सांगितले होते? आणि गेलात तर ठीक पण हे मटण वैगरे न्यायची काय गरज होती?”. 

आम्ही दोघं अगदी रडकुंडीला आलो होतो. तसे ती आम्हाला पाहून शांत होत समजावून सांगू लागली. तुम्ही तळ्या जवळ गेल्यावर मटण बाजूला काढून ठेवले होते ना? त्याच्याच वासावर गिऱ्या आला होता. गिर्या खाऱ्या पाण्याच्या जवळ राहतो असे म्हणतात. तो माणसाला सहजा सहजी मारू शकत नाही. जर आपण त्याच्या समोर एकाच स्थितीत उभे राहिलो तर तो आपल्या आकाराचा खड्डा खणून आपल्याला त्यात पुरतो. आपण जर जागा बदलत राहिलो तर तो पुन्हा दुसरा खड्डा खणा यला सुरुवात करतो आणि त्याचा प्रयत्न फसतो. 

आजीचे बोलणे ऐकल्यावर आम्ही निशब्द झालो होतो. काहीही न बोलता आम्ही अंथरुणात जाऊन पडलो. पण घडलेला प्रसंग इतका भयानक होता की नजरेसमोरून जातच नव्हता. साधारण तासा भरानंतर मला बाहेर कसला तरी विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. एखाद्या प्राण्याच्या गुर्गुरण्याचा. तसे मी खिडकी हलकीशी उघडून बाहेर काही दिसतंय का हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. बाहेरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोळ्यांवर माझा विश्र्वासच बसत नव्हता. कारण आमचा माग काढत गीर्या घरा पर्यंत आला होता. पण सायकल वरच्या माश्याच्या पिशवी मुळे तिथेच थांबून ते खात होता. मी दबक्या पावलांनी मागे फिरून अंथरुणात जाऊन झोपलो. ती रात्र कशी काढली माझे मलाच माहीत.

सकाळी आजीच्या बोलण्याने जाग आली तसे मी उठून बाहेर जाऊन पाहिले. तिथे फक्त सायकल आणि फाटलेल्या पिशवीचे तुकडे पडले होते. आज त्या जीवघेण्या प्रसंगाला कित्येक वर्ष उलटली असली तरी तो प्रसंग अजूनही माझ्या स्मरणात कायम आहे. देवाची कृपा म्हणून आम्ही या सगळ्यातून सुखरूप पणे बाहेर पडू शकलो.

Leave a Reply