लेखक – अभिराम
हि घटना माझ्या लहानपणी घडली होती पण त्याचे पडसाद माझ्या जीवनात अनेक वर्षे उमटत राहिले. अजूनही कधी आठवण आली तरी अंगावर शहारा येतो. जणू काही कालचाच प्रसंग आहे. आम्ही सहकुटुंब आणि सोबत माझा मित्र परिवार एका सहलीला गेलो होतो. जंगल भागातली सफारी करायला. ते एक अभयारण्य होते पण तिथे बरेच माठे जंगल सुद्धा होते. त्या काळात तिकडे फक्त नक्षलवाद्यांची च नाही तर दरोडेखोरांची सुद्धा भीती असायची होती संध्याकाळ आणि रात्रीचा प्रवास सगळे टाळायचे.. त्या भागात अगदी कमी वस्तीची छोटी छोटी गावं असून खूप मागासलेला भाग होता. रस्ते खूप खराब आणि एक पदरी. आम्ही आमची २५ सीटर बस करून गेलो त्यात साधरण २१-२२ लोक होते. त्या ठिकाणचे सगळ्यांना एक कुतुहल होते की जागा कशी असेल, आस पास काय पाहायला मिळेल, कुठले जंगली प्राणी पहायला मिळतील असे विचार आणि अपेक्षा सगळ्यांनी च केली होती.
तिथे गेल्यावर एक छान सरकारी गेस्ट हाऊस मध्ये आमची रहायची व्यवस्था केली गेली होती. गेल्या गेल्या आम्ही मुलांनी तिथे खूप दंगा मस्ती केली आणि जवळचा सगळा परिसर हुडकून काढला. तिथे केअरटेकर आणि सिक्युरिटी गार्ड चे सुद्धा क्वार्टर होते. खूप फिरून, खेळून झाल्यावर मला आणि माझ्याच वयाच्या मित्राला अमित ला लघवी करायला जायचे होते. पण गेस्ट हाऊस मध्ये न जाता आम्ही जरा बाहेर झाडीत गेलो. सगळ्यांचे पालक ओरडत होते की इकडे तिकडे जाऊ नका इथेच खेळा पण तरीही त्यांची नजर चुकवून आम्ही मुद्दामून कुंपण ओलांडून आत झाडीत गेलो. चालत चालत बरेच आत आलो.
तितक्यात आम्हाला एक मुलगा दिसला जो बहुतेक तिथला स्थानिक वाटत होता. आमच्याच वयाचा असेल. एका मोठ्या झाडासमोर उभा राहून काही तरी बोलत होता. आम्हाला वाटले की काही मुलं खेळत असतील आणि एखादा मुलगा झाडावर चढून बसला असेल आणि त्याच्याशी बोलत असेल. म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो आणि झाडावर पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. त्यात आम्ही त्याच्या जवळ आल्याचे पाहून तो मुलगा तिथून पळून गेला. आम्ही त्याच्या कडे गेल्याचे त्याला आवडले नसावे बहुतेक. त्याला आवाज दिला पण तो थांबला नाही ना त्याने मागे वळून पाहिले.
आम्ही आमच्या गेस्ट हाऊस मध्ये परत आलो. रात्री सगळ्यांचे जेवण झाले आणि सगळे जण आप आपल्या खोलीत परतले. आमची खोली जवळच आहे असे घरच्यांना सांगून मी आणि अमित खाली आलो. दुपारी घडलेल्या त्या प्रसंगाबद्दल बोलू लागलो. तो मुलगा कोण होता, असा धावत का निघून गेला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो झाडाकडे पाहून कोणाशी बोलत होता. वाटले की इथल्या केअर टेकर किंवा गार्ड चा मुलगा असेल. तेवढ्यात लक्ष गेले की गेट जवळच्या कट्ट्यावर आमच्याच वयाची काही लहान मूल बसली आहेत. पटकन तिथे गेलो, त्यांना जवळून पाहिले पण तो मुलगा तिथे नव्हता. तितक्यात अमीर ची नजर बाहेर गेली आणि तो म्हणाला ” अरे तो बघ.. ” आम्ही त्याला आवाज दिला आणि त्याच्या मागे धावत गेलो. तो एका पायवाटेने पुढे जात होता. वातावरणात थंडी कमी असली तरी खूप धुक पसरलं होत. पुढे जाता जाता थंडीचा जोर वाढत जाऊ लागला. हुड हुडी भरू लागली.
मी अमित ला म्हणालो “अरे जाऊदे आपण मागे फिरू..” अमित ही दबक्या आवाजात म्हणाला ” हो चल.. ” आम्ही मागे वळून पाहिले आणि श्वासच थांबला. आमचे गेस्ट हाऊस जणू नाहीसे झाले होते. पसरलेल्या दाट धुक्यामुळे आम्हाला वाटच सापडत नव्हती. इतकेच काय तर दिशा भुल झाली होती. नक्की कोणत्या दिशेला गेस्ट हाऊस आहे ते सुद्धा कळत नव्हतं. आम्ही दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडुन घेतले आणि जाऊ या दिशेला अस म्हणून पुढे जाऊ लागलो. तितक्यात आम्हाला एक दिवा दिसला. धुक्यामुळे कळत नव्हत नक्की काय आहे. जस जसे आम्ही त्या दिव्याच्या दिशेने जाऊ लागलो तसे तो दिवा हळु हळु पुढे सरकू लागला. आम्ही विचार करत च होतो की हा काय प्रकार आहे पण तितक्यात तो दिवा, तो प्रकाश अचानक दिसेनासा झाला. आम्ही जागीच स्तब्ध झालो.
तितक्यात तो दिवा मागून आला आणि आम्ही जवळ जवळ हादरलोच. पाहतो तर तिचं मुलगा हातात कंदील घेऊन आमच्या मागे उभा होता. हृदयाचे ठोके इतके वाढले होते की तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याने काहीही न बोलता फक्त त्याच्या मागे येण्याचा इशारा केला. आम्ही निशब्द होऊन त्याच्या मागे चालत राहिलो. काही वेळा नंतर तो आम्हाला एका गुहे जवळ घेऊन आला. तिथे आम्ही जे पाहिले ते इतके भयंकर होते की आम्ही जोर जोरात ओरडू लागलो, रडू लागलो. दोघेही उलट दिशेने धावत सुटलो. वाट दिसेल तिथे पळू लागलो पण गडद अंधार असल्यामुळे जोरात ठेच लागून खाली पडलो. हळु हळु माझी शुद्ध हरपु लागली आणि मी बेशुद्ध पडलो. माहीत नाही किती वेळ उलटून गेला होता. डोळे उघडले पण अमित कुठेही दिसत नव्हता. मी त्याला आस पास शोध लागलो.
बऱ्याच प्रयत्नानंतर तो दिसला. अगदी एकटक एका झाडाच्या खोडाला पाहत बसला होता. त्याला असे पाहून माझ्या अंगावरून सर्रकन काटा येऊन गेला. तो त्या झाडाच्या खोडा कडे नक्की काय पाहतोय, काय असेल तिथे असा विचार करून त्याच्या जवळ जायचे ही धाडस होत नव्हते. तितक्यात अचानक एक टॉर्च चा प्रकाश दिसला आणि त्याच सोबत ४-५ लोकांचा आवाज आला. त्यात आम्हा दोघांचे वडील आणि सोबत २ गार्ड येताना दिसले. त्यांना पाहून माझ्या जीवात जीव आला. मी धावत जाऊन बाबांना घट्ट मिठी मारली आणि रडकुंडीला आलो. तसे अमित चे वडील म्हणाला ” अमित कुठे आहे..? ” मी काही न बोलता फक्त तिकडे बोट दाखवलं. तिथे टॉर्च चा लाईट मारला आणि सगळे स्तब्ध झाले. ते गार्ड तर घाबरून अक्षरशः दोन पावलं मागे सरकले.
त्याच्या वडिलांनी सरळ धाव घेतली आणि त्याला भानावर आणायचा प्रयत्न करू लागले ” अमित काय झालं..? इकडे बघ.. अमित माझ्या कडे बघ.. अरे हा असा काय शून्यात हरवून त्या झाडाकडे बघतोय.. वर काही दिसत नाहीये.. अमित काय झालं.. ” त्याला हात लावताच तो बेशुद्ध पडला. त्याला उचलून आम्ही सगळे गेस्ट हाऊस कडे परतलो. रात्री मला कोणीही काहीच बोलले नाहीत, सरळ झोपायला सांगितले. पण सकाळी उठल्यावर मात्र असंख्य प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. मी काय सांगू, कशी उत्तर देऊ काही समजत नव्हत पण तरीही जमेल तसे मी घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला. बाबा खूप चिडले होते, रागावले होते. आई ने मला खूप मारलं आणि नंतर स्वतःच रडत बसली. तितक्यात मला कळले की काल रात्री बेशुद्ध पडलेला अमित अजुन ही शुध्दीवर आला नाहीये.
सगळे काळजी करत होते. त्यात जवळपास कुठे ही डॉकटर मिळत नव्हता. त्यांचे अंग गरम होत होते. थंड पाण्याच्या पट्ट्या वैगरे ठेऊन झाल्या पण तरीही तो तापाने फणफणत होता. शेवटी निर्णय झाला, सहल रद्द करून आम्ही आमच्या गावी घरी परत जायला निघालो. घरी आल्यावर सगळ्यात आधी अमित ला इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना सगळा प्रकार सांगितला. मी माझ्या घरी परतलो. माझे दैनंदिन जीवन सुरू झाले.. शाळेत जाणे, मैदानावर क्रिकेट खेळायला जाणे. पण काही दिवसांनी बातमी आली की अमित वेड्या सारखा वागतोय, काहीच बोलत नाहीये आणि फक्त वेडे वाकडे हातवारे करतोय.. बोललाच तरीही असंबंध बडबड करतो. हे कळताच मी त्याला भेटायला त्याच्या घरी गेलो.
गेल्यावर सांगितले की तो आतल्या खोलीत बसला आहे. मी आत गेलो तर तो एका भिंतीकडे एक टक बघत होता. मी त्याच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला परंतु तो माझ्याकडे पाहत ही नव्हता. त्याच्या घरचे लोक काळजीने कासावीस होऊन गेले होते. दिवस पुढे सरकत होते पण अमित चे वागणे दिवसेंदिवस विभत्स होऊ लागले होते. काही महिने उलटले. त्या दिवशी अमित चे आई वडील माझ्या घरी आले. खूपच नैराश्येत गेले होते, हतबल वाटत होते. ते मला विचारू लागले की त्या रात्री नक्की काय झाले होते. अमित आणि तू नक्की कुठे गेला होतात. काय सांगावे कसे सांगावे याच विचारात असताना त्याच्या आईने मला दोन चित्र दाखवली आणि ती पाहून जणू विजेचा तीव्र झटकाच लागला. बेशुद्ध पडल्यामुळे मी पाहिलेल्या गोष्टी विसरून गेलो होतो ज्या मला त्या चित्रांमुळे आठवल्या होत्या. सगळे दृश्य डोळ्यांसमोर तरळू लागले.
मी अगदी स्तब्ध उभा होतो. मला त्या रात्री घडलेल्या भयाण गोष्टी आठवू लागल्या होत्या. त्या गुहेत पडलेले आमचे ते चुकीचं पाऊल.. अमितची आई माझा हात पकडुन सतत विचारत होती की अमित सारखे सारखे हेच चित्र का काढतोय.. सारखं म्हणतोय की तो येतो आहे झाडातून.. तो येतो आहे. तुम्ही नक्की काय पाहिलं होत त्या रात्री.. आठवणींच्या त्या कप्प्याला जणू मी नव्याने उघडले होते आणि विस्मरणात गेलेले भयाण प्रसंग मला पुन्हा आठवू लागले…
मी अगदी स्तब्ध उभा होतो. मला त्या रात्री घडलेल्या भयाण गोष्टी आठवू लागल्या होत्या. त्या गुहेत पडलेले आमचे ते चुकीचं पाऊल.. अमितची आई माझा हात पकडुन सतत विचारत होती की अमित सारखे सारखे हेच चित्र का काढतोय.. सारखं म्हणतोय की तो येतो आहे झाडातून.. तो येतो आहे. तुम्ही नक्की काय पाहिलं होत त्या रात्री.. आठवणींच्या त्या कप्प्याला जणू मी नव्याने उघडले होते आणि विस्मरणात गेलेले भयाण प्रसंग मला पुन्हा आठवू लागले. त्या गुहेत आम्ही एक भयाण आकृती पाहिली होती. ना मानव सदृश्य ना एखाद्या प्राण्या सारखी. ते काय होत मला माहित नाही पण एखाद्या राक्षसा सारखं रूप.. अतिशय विद्रूप आणि अनाकलनीय. इतकं भयानक दृश्य मी या आधी कधीही पाहिली नव्हत..
ते आमच्या दिशेने चालत येत होत. प्रत्येक क्षणी आजुबाजूच वातावरण अतिशय गूढ होत चाललं होत जणू ते जे काही होत त्याच्या वलयात आम्हाला ते ओढून घेतय. हे सगळं अनुभवत असताना अमित ने जोरात माझ्या खांद्याला धरून खेचले तसे मी भानावर आलो आणि आम्ही दोघे ही उलट दिशेने धावत सुटलो. या प्रसंगाचे जसेच्या तसे वर्णन करून मी अमित च्या आई वडिलांना सांगितले. ते मला काहीच बोलले नाहीत. त्यांच्या घरी निघून गेले. त्या नंतर बरीच वर्ष उलटली. अमित चा किंवा त्याच्या घरच्यांचा काहीच संपर्क नव्हता. मी पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला दुसऱ्या शहरात गेलो. काही गोष्टींचा विसर पडू लागला. हॉस्टेल मध्ये इतर मित्रांसोबत राहू लागलो. हॉस्टेल च्या मागचा परिसर मोकळा होता. तिथे जास्त वस्ती नव्हती. हॉस्टेल च्या कंपाऊंड मधल्या दोन मोठ्या लाईट मुळे तो परिसर स्पष्ट दिसायचा. सगळ काही सुरळीत सुरू झालं. पण त्या दिवशी रात्री अभ्यास करत बसलो होतो आणि सहज खिडकीतून मागच्या बाजूला लक्ष गेलं.
अचानक अमित उभा दिसला. त्याला पाहून मी आश्चर्य चकित झालो. नकळत त्याचे नाव निघाले ” अमित “. मी उठून पटकन खिडकी जवळ गेलो आणि पुन्हा एक हाक दिली ” अमित “. पण तो निर्विकार भाव घेऊन फक्त तिथे उभा होता. काही वेळ तसाच थांबून तो वळला आणि चालत निघून जाऊ लागला. मी पटकन रूम चा दरवाजा उघडून बाहेर आलो आणि तसाच धावत मागच्या बाजूला आलो. त्याचा पाठलाग केला पण तो कुठे निघून गेला कळलेच नाही. निराश होऊन मी पुन्हा रूम वर आलो. मनाची अवस्था खूप बिकट झाली होती. अगदी बैचेन.. अभ्यास बाजूला ठेऊन त्याचाच विचार करत बसलो. तितक्यात एक गोष्ट लक्षात आली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. कारण अमित तर दिसला होता पण तो १२-१३ वर्षांचा असताना चा.
माझे वय २१ वर्ष पण मग अमित. तो त्याच वयाचा कसा. जणू काळाच्या चक्रात अडकून पडल्या सारखा. भीतीने सर्वांग शहारले. माझा भास नक्कीच नव्हता कारण मी पूर्ण शुद्धीत होतो. ती रात्र जागून काढली पण २ दिवसात सुट्टी घेऊन मी सरळ माझ्या गावी परतलो. घरी न जाता थेट अमित कडे गेलो. त्याच घर बंद होत. मी शेजारी विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की इथे गेली बरीच वर्ष कोणी राहत नाही. पुन्हा जाताना त्या घराकडे पाहिले तर जाणवले की खरंच गेले ७-८ वर्ष इथे कोणी फिरकले ही नसावे. माझी घरी आलो, आई बाबांना विचारले अमित आणि त्याच्या घरचे कुठे दुसरी कडे राहायला गेले का..? तर आज चिडून च म्हणाली ” तू का गेलेला स तिथे..? कोणी सांगितले तुला जायला ?” तसे मी म्हणालो ” अग तो कसा आहे काय करतोय सध्या ते पाहायला म्हणून गेलो होतो.. त्यात एवढं चिडायला काय झाले?
बाबा आले आणि म्हणाले ” तू दमून आला आहेस, विश्रांती घे आणि जेऊन घे.. ” पण मी काही स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हतो म्हणून पुन्हा विचारू लागलो. त्यावर आई म्हणाली ” ते लोक आता इथे राहत नाही आणि जे घडले त्याच्यासाठी जबाबदार तुला समजतात..” मला राग अनावर झाला आणि मी म्हणालो ” यात मी काय केलं..? ती एक घटना होती जी नकळतपणे घडली आमच्या सोबत.. मी काही मुद्दामून नव्हते केले.. आणि नंतर मी त्या गोष्टीचा इतके वर्ष विचार ही केला नाही.. ते परवा रात्री फक्त.. ” मी बोलता बोलता थांबलो आणि माझ्या खोलीत निघून गेलो. रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो होतो. मन खूप अस्वस्थ झाले होते. गावात येऊन काहीच उपयोग झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळीच हॉस्टेल वर निघून आलो. पण काही केल्या तो विचार मनातून जात नव्हता. त्या रात्री अजुन एक घटना घडली. रात्री अभ्यास करत असताना पुन्हा मला एक मुलगा दिसला पण तो अमित नव्हता.
मी खिडकी जवळ जाऊन त्याला नीट निरखून पाहू लागलो.. सुरुवातीला कळले नाही पण नंतर लक्षात आले की हा तोच लहान मुलगा आहे जो आम्हाला त्या जंगलात दिसला होता. अमित प्रमाणे तो ही त्याच वयाचा होता जेव्हा त्याला आम्ही पहिल्यांदा ९-१० वर्षांपूर्वी पाहिले होते. भीतीने माझे हात पाय च गळून गेले. जागेवरून हलताही येत नव्हत. माहीत नाही किती वेळ किती तास मी खिडकीत तसाच उभा होतो. रात्री कधी तरी रूम पार्टनर ने मला भानावर आणले आणि विचारले की काय झालं..? खिडकीत काय पाहतोय. दोन अडीच तासापूर्वी तुला पाहिले होते, आणि आता पुन्हा लक्ष गेले तरीही तू तिथेच. पुन्हा उठलास की अडीच तासा पासून तसाच उभा आहेस. तो मस्करी च्या स्वरात म्हणाला पण मी खरंच गेला अडीच तास तसा च खिडकीत उभा होतो..
आता त्याला अश्या गोष्टी कशा सांगू म्हणून मी काहीच बोललो नाही. पण माझ्या मनात काय चालू आहे हे बहुतेक त्याने ओळखले आणि तो मला खोदून विचारू लागला की काय झाले, तुझ्या चेहऱ्यावर इतकी भीती का..? मला ही राहवले नाही म्हणून मी अगदी लहान पणापासून घडत असलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. तो इतका अस्वस्थ झाला आणि घाबरला की दुसऱ्याच दिवशी त्याने रूम बदलली आणि पुढच्या महिना भरात त्याने कॉलेज ही बदलले. त्या रात्री नंतर त्याने आज पर्यंत माझ्याशी कसलाच संपर्क केला नाही. हे सगळं घडत असताना मी मनाशी निर्धार केला की आता काहीही झाले तरी या गोष्टी च छडा लावायचा च. नाही तर तोच विचार करून करून माझ्या डोक्यावर वाईट परिणाम होईल असे वाटू लागले. परीक्षा होई पर्यंत मी वाट पहिली. परीक्षा झाली आणि सुट्टी लागली.
कोणाचीही मदत न घेता मी बाईक ने त्या जंगलात जायचे ठरवले जिथून या सगळ्याची सुरुवात झाली होती. मनात भीती बसली असली तरी या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा होता म्हणून मन खंबीर केलं. आणि निर्धार केला की आता जे होईल ते पाहून घेऊ पण हा प्रकार काय आहे हे शोधून मगच शांत बसायचे. बऱ्याच तासांच्या ड्राईव्ह नंतर मी त्या गावात येऊन पोहोचलो. इतक्या वर्षानंतर आल्यामुळे खूप बदल झाले होते. त्या गेस्ट हाऊस चे नाव लक्षात असल्यामुळे मी विचारपूस करून त्या रस्त्याला लागलो. पोहोचल्यावर कळले की ते गेस्ट हाऊस बरीच वर्ष झाले बंद पडले आहे. कोणीही फिरकत नसावे तिकडे. कारण सगळी कडे झाडे झुडपे वाढली होती. त्या गेस्ट हाऊस च्या भिंतींना ही गर्द वेलिंनी व्यापल होत. माझे शोध घेण्याचे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटले पण मी इतक्यावरच हार मानणारा नव्हतो. मी बराच वेळ तिथे बसून राहिलो.
साधारण २-३ तासा नंतर एक वृद्ध माणूस जाताना दिसला. मला वाटले की इथला स्थानिक असला तर याला कदाचित बरच काही माहीत असेल. म्हणून त्याला थांबवून विचारले. तर तो म्हणाला की या गेस्ट हाऊस मध्छे ५ वर्षांपूर्वी एका १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनतर उतरती कळा च लागली. पुढच्या काही महिन्यात लोकांनी येणं बंद केलं, खूप काही वाईट साईट गोष्टी पसरल्या आणि गेस्ट हाऊस बंद करावं लागलं. गेले ४-५ वर्ष कोणी फिरकत नाही इथे. साधी साफ सफाई करायला पण कोणी येत नाही. मला एव्हाना कळून चुकले होते की इथे नक्की काहीतरी विचित्र आणि अनाकलनीय घटना घडतात. आणि याचा संबंध किशोर वयातील मुलामुलींशी असावा. तिथून मी थेट त्या गावातल्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो. पण तिथून मला हवी तशी माहिती मिळू शकली नाही. शेवटी हताश होऊन मी बाहेर एका पारावर येऊन बसलो.
तेव्हा एक म्हातारा शिपाई माझ्या जवळ येऊन बसला आणि माझ्याकडे न बघताच म्हणाला ” आल्या पावली परत जा.. जीवाशी खेळ नको.. ” माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच व्यक्ती कडून मिळणार हे एका झटक्यात मी ओळखले. मी त्याला उत्तर देत म्हणालो ” मी आधीच ठरवून आलोय, जे होईल ते होऊ दे.. सगळ्या गोष्टींना सामोरे जाईन मी..” ते म्हणाले की त्या गेस्ट हाऊस च्या मागच्या बाजूला माझे घर आहे. रात्री माझ्या घरी ये, ड्युटी संपल्यावर मी ही घरी पोहोचतो. इतके सांगून तो तिथून निघून गेला. संध्याकाळ झाली होती. आल्यापासून मी काहीच खाल्ल नव्हत म्हणून एका टपरी वर चहा आणि वडापाव खाऊन घेतला. आठ साडे आठ च्या दरम्यान मी त्याच्या घरी गेलो. सुरुवातीला प्रश्न पडला होता की त्या भागात नक्की याचे घर कुठले असावे. पण तिथे गेल्यावर कळले की त्या गेस्ट हाऊस मागे फक्त एकच घर होते. त्याने मला बसायला सांगितले.
मी सगळा प्रकार सुरुवाती पासून सांगायला सुरुवात केली पण त्याने मला अर्ध्यातच थांबवत सांगितले ” मला सगळं काही माहीत आहे..” मी ऐकून आश्चर्य चकित झालो. त्याने सगळ उलगडून सांगायला सुरुवात केली आणि पाहिलं वाक्य म्हणाला ” तुला जो मुलगा दिसतो तो माझाच मुलगा.. ” ऐकून माझ्या अंगावर शहारे आले आणि जणू श्वास कोंडल्या सारखे झाले. त्या माणसाने माझा हात धरला आणि मला त्या किर्र जंगलात घेऊन जाऊ लागला आणि जाता जाता सगळ काही सांगू लागला जिथून या गोष्टीची सुरुवात झाली. बऱ्याच वर्षांपूर्वी या जंगलात एक बाई राहायची. वस्ती पासून दूर..
तिला काळी विद्या अवगत होती. तंत्र मंत्र करायची. त्याच काळात अचानक गावातली मुलं बेपत्ता होऊ लागली आणि शोधाशोध झाल्यावर कळले की ती बाई त्या लहान मुलांचा बळी देतेय. तिला गावकऱ्यांनी मारहाण करून बोलत केलं तेव्हा कळलं की किशोर वयातील मुलांचे बळी देऊन काळ्या विद्येने ती चिर तरुण व्हायची. तीच वय वढायचच नाही. तिला अर्धमेले सोडून दिले हीच चूक झाली. कारण त्या नंतर ती पुन्हा कधीच दिसली नाही पण गावातली सगळी लोक म्हणतात की ती याच जंगलात आहे. दुर्दैवाने पहिला बळी माझ्या मुलाचा होता. त्याच्या सारख्या अनेक निष्पाप जीवांचा तिने बळी घेतला.
पण मृत्यू नंतर ही ते चक्र सुरूच आहे. त्याच मुलांचा आभास निर्माण करून ती आजही नवीन सावज शोधते.. मी हे सगळे ऐकून फक्त एक प्रश्न विचारला ” या अभासातून कोणी वाचले तर नंतर त्याचे काय होते..? ” त्यावर तो व्यक्ती म्हणाला ” एक तर त्यांना वेड लागत किंवा भीती ने ते जीव सोडतात.. म्हणून तुला सांगतो की निघून जा इथून आणि पुन्हा कधीच येऊ नकोस इथे.. ” त्यावर मी म्हणालो ” इथे एक गुहा आहे ना.. तिथे मी.. ” तो माझे बोलणे थांबवत सांगू लागला ” ती गुहा कोणालाही दिसत नाही.. आणि ज्यांच्या सोबत काही वाईट घडणार असते ती फक्त त्यांनाच दिसते.. ”
अमित या जगात असण्याची आशाच मी सोडून दिली. डोळ्यात अश्रू तरळले. पण मनात भीती दाटून येऊ लागली. मी ही त्या भयानक प्रकाराला पाहिलं होत आणि मला ही ते दोघं अजूनही दिसतात. आता माझे पुढे काय होईल..?