अनुभव – प्रीतम
एखादी नवीन जागा, घर घेण्याआधी त्या बद्दल चौकशी करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण सगळ काही सुरळीत वाटत असल तरीही त्या बद्दल चा भूतकाळ काय असेल, त्यात काय दडून राहील असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जरी आपण एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेलो तरीही वस्तू शांती किंवा एखादी पूजा करणं खूप महत्त्वाचं असत. नाही तर असे काही भयानक अनुभव येतात जे आयुष्य भरासाठी शिकवण देऊन जातात. असाच हा एक भयाण अनुभव..
अनुभव २००५ साल चा आहे. मी तेव्हा कॉलेज मध्ये शिकत होतो. आम्ही गावातून ३ जण बी कॉम चे शिक्षण घेण्यासाठी शहरात राहायला आलो होतो. आमच्या सोबत तिथे आधी पासून राहणारे माझे मित्र ही होते. जे कंपनी मध्ये नोकरी करायचे. आम्ही सगळे जण एक रूम करून राहायचो. तो दिवस मला चांगलाच आठवतोय. माझा एक मित्र रूम वर खूप उशिरा आला. कंपनीतून निघाल्यावर तो ८-८.३० पर्यंत रूम वर यायचा. कधी उशीर झालाच तर ९. पण घा दिवशी तो खूप रात्री आला. जवळपास १२.३० ते १ च्या दरम्यान. आम्ही जागेच होतो..ती आल्यावर फ्रेश वैगरे झाला आणि निवांत विचार करत बसला. आमच्यापैकी एकाने विचारले की आज एवढा उशीर का झाला. त्यावर त्याने जे सांगायला सुरुवात केली तो प्रकार मी आज पर्यंत कधीही ऐकला नव्हता. खूप च भयानक प्रसंग होता तो. कंपनी मधून निघण्या आधी त्याला त्याच्या काकांचा फोन आला. त्यांनी याला भेटायला बोलवलं होत. त्यांनी नुकताच एक फ्लॅट विकत घेतला होता. आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी काका आणि काकू त्या फ्लॅट वर राहायला लागले होते. अचानक बोलाविण्याचे कारण त्याला कळले नाही आणि त्याने तसे काही फोन वर विचारले ही नाही. त्याला वाटले की नवीन फ्लॅट वर काही दिवस राहायला वैगरे बोलावत असतील. कंपनी मधून निघाल्यावर तो त्यांच्या घरी गेला. रात्रीचे ८ वाजून गेले होते. घरी पोहोचल्यावर काकांनी पाणी वैगरे दिले. पण मित्राला मात्र काही तरी वेगळं वाटत होत. जणू त्यांना काही सांगायचे आहे पण सुरुवात कुठून नी कशी करावी हे कळत नाहीये.
तो काही विचारणार तितक्यात काकांनी जास्त वेळ न घेत सगळं काही सविस्तर सांगायला सुरुवात केली. या गोष्टी कोणाला सांगू हे कळत नव्हतं पण वाटलं की तू इथे जवळच आहेस, तुला फोन करून बोलावून घेऊ आणि तुला सांगुन बघू. बरं झालं तो एक फोन वर आलास. तुला तर माहितीये की आम्ही या फ्लॅट वर शिफ्ट होऊन साधारण १ महिना व्हायला आलाय.. तुझी काकू यवतमाळ ला तिच्या गावी गेली आहे. त्यामुळे गेले काही दिवस मी या फ्लॅट वर एकटाच आहे सध्या. पण काल पासून जे काही घडतंय ते खूप भयानक आहे. मित्राने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दाटून आली होती.. त्याने काकांना सांगितले की तुम्ही सगळ काही सांगा मला, मी आहे सोबत तुमच्या. तसे त्यांनी एक दीर्घ श्वास घेऊन पुढे सांगायला सुरुवात केली. काल मी ऑफिस मधून उशिरा आलो आणि निघाल्यावर बाहेरच जेवण करून आलो होतो त्यामुळे आल्या आल्या लगेच झोपून गेलो.. थकल्यामुळे लगेच गाढ झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली होती आणि तितक्यात जोरात दार वाजवण्याचा आवाज आला. मी कसाबसा झोपेतून उठलो आणि बाहेरच्या खोलीत येऊन दार उघडल. पण बाहेर कोणीही नव्हत. विचार करू लागलो की दार वाजण्याचा भास झाला की खरंच दार वाजले. या वेळी कोणी थट्टा करेल असेही वाटत नाही. आणि या आधी अशी मस्करी कोणी केली नाही. लहान मूल आहेत शेजारी पण त्यांनी अशी मस्ती कधीच केली नाही. याच विचारात मी दरवाजा लाऊन घेतला आणि बेडरूम मध्ये जाऊ लागलो. बेडरूम मध्ये येत नाही तितक्यात पुन्हा दार जोरात वाजले. आता मात्र मी होतो तिथेच स्तब्ध झाले. हा भास नव्हता कारण मी जागा होता. मी पुन्हा मागे वळून दार उघडले पण या वेळी ही कोणीच दिसलं नाही.
आता मात्र माझी झोप पूर्ण उडाली होती. मी अगदी शांत पणे बेडरूम मध्ये येऊन बसलो आणि विचार करू लागले की हा काय प्रकार आहे. तितक्यात कसलीशी कुजबुज जाणवू लागली. स्वयंपाक घरातून जणू कोणाच्या बोलण्याचा आवाज येत होता. मी कानोसा घेऊन ऐकू लागलो तसे तो आवाज हळु हळू वाढू लागला. मी घरात ऐकटाच होतो कळत नव्हत की आवाज नक्की माझ्या फ्लॅट च्या किचन मधुन येतोय की बाहेरून. मी दबक्या पावलांनी त्या दिशेला चालत जाऊ लागलो. हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. प्रत्येक पावलासोबत तो आवाज वाढत जाऊ लागला आणि मला खात्री पटली की स्वयंपाक घरात नक्की कोणीतरी आहे. हळु हळु तो आवाज स्पष्ट होऊ लागला. एक पुरुष आणि एक स्त्री भांडत होते. जसे मी स्वयंपाक घरात गेलो तो आवाज एका एकी थांबला. मी झटकन लाईट लावला पण तिथे कोणीही नव्हते. मी प्रचंड घाबरलो होतो कारण मी घरात एकटाच होतो पण हा सगळा प्रकार सतत वाढत चालला होता. शेवटी मी पुन्हा बेडरूम मध्ये येऊन बसलो. भीतीमुळे झोप लागत नव्हती. काय करावे काही कळत नव्हते. इथे राहायला आल्यापासून मला कसलाच भास ही झाला नव्हता मग आज रात्री अचानक इतकं सगळ कस काय घडतंय. बराच वेळ बसून राहिल्या नंतर मला झोप येऊ लागली. पावणे ३ होऊन गेले होते. नकळत मी बेड वर पडलो आणि मला झोप लागली. साधारण १५ मिनिट झाली असतील. मला जाणवू लागलं की माझ्या पलंगावर कोणी तरी उभ आहे. अंगावर पांघरूण घेतल होत म्हणून मी अलगद ते सरकवून बाजूला पाहिलं आणि मला जबर झटकाच बसला. त्या बेड वरच्या गादीवर पायांचे ठसे उमटताना दिसू लागले.
जसे कोणी त्यावर चालत आहे. माझे शरीर भीतीने जणू थंड च पडत चालल होत. माझ्या डाव्या बाजूला खरंच कोणी तरी बेड वर चढल होत. आणि नुसत उभ नव्हत तर फेऱ्या मारत होत. या धक्यातून सावरत नाही तसे माझ्या उजव्या बाजूला ही तीच हालचाल जाणवू लागली. काहीच दिसत नव्हत पण तिथे कोणी तरी होत एवढं मात्र मी अगदी खात्री ने सांगू शकतो. ते ही एक नाही तर दोन जण. अर्धांग वायूचा झटका यावा तशी काहीशी अवस्था झाली होती. काही कळत ना कळत तोच बाथरूम मधला शोवर सुरू झाला आणि अचानक बेड वरून धपकन उडी मारल्याचा आवाज आला. माझ्या काळजाचे ठोके खूप वाढले होते. माझ्या अवती भोवती नक्की काय घडतंय तेच कळतं नव्हत. काही वेळा नंतर तो शॉवर चा आवाज हळु हळू होत बंद झाला. आणि पुन्हा बेडवर कोणी तरी चाढल्याचे जाणवले. या वेळेस पडणाऱ्या पायांच्या ठस्यांसोब त पाण्याचा ओलावा त्या गादीवर पसरू लागला. तो जीवघेणा प्रसंग मी कसा सहन केला माझे मलाच माहीत. काही वेळा साठी सगळ काही एकदम शांत झालं. आवाज होता तो रूम मधल्या गर गरणाऱ्या पाख्यांचा. सगळ काही पूर्ववत झालं असं वाटलच होत तितक्यात जोरात खटकन आवाज झाला आणि अचानक पंखा फिरायचा थांबला. त्या आवाजाने मला भानावर आणलं. मी सरळ उठून फ्लॅट च्या बाहेर आलो. एव्हाना ५ वाजत आले होते पण उजाडले नव्हते. एक दीड तास मी बाहेरच उभा होतो. कोणाला सांगायला ही कसं तरीच वाटत होत. वाटलं की अश्या गोष्टी अनोळखी व्यक्तीला , शेजाऱ्यांना सांगायला गेलो तर ते मला वेड्यात च काढतील. कारण नवीन राहायला आल्यामुळे शेजाऱ्यांची ही जास्त ओळख नव्हती झाली..
उजाडले तसे मी आत घरात गेलो. संपूर्ण दिवस तसाच विचारात घालवला. वाटलं की कोणाला तरी या गोष्टी सांगून मन मोकळं करावं म्हणून तुला बोलावलं. काय वाटतं तुला..? त्यांचे बोलणे ऐकून माझा मित्र जास्त काही बोलला नाही पण या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावायचा ठरवला. त्याने सांगितले की ज्या इस्टेट एजंट ने तुम्हाला हा फ्लॅट विकला त्याला फोन करा. माझ्या मित्राने त्याच्या पद्धतीने बोलणे केले आणि खरे काय ते सांगायला त्या एजंट ला भाग पाडले. तेव्हा बऱ्याच भयानक गोष्टी बाहेर आल्या. त्याने एका ब्रोकर चा नंबर दिला ज्याला या बद्दल सगळ काही माहीत होत. तो फ्लॅट काकांनी विकत घेण्याआधी तिथे एक नवीन लग्न झालेलं जोडप राहायचं. सगळ काही सुरळीत सुरू होत पण एके दिवशी शुल्लक कारणावरून त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. सोसायटी मध्ये तक्रार ही करण्यात आली कारण खूप आरडा ओरडा करून बराच वेळ त्यांचं भांडण सुरू होत. हळु हळु हा प्रकार वाढत जाऊ लागला. रोज काही ना काही कारणावरून वाद व्हायचा. खर कारण कोणाला ही माहीत नव्हतं. पण एके दिवशी बातमी आली की त्या बेडरूम मधल्या पंख्याला गळफास घेऊन त्या दोघांनी ही आत्महत्या केली. पोलिस तपास झाला पण त्यातून खर कारण बाहेर कळलं नाही. त्या नंतर तो फ्लॅट काही वर्ष तसाच पडून होता. जो नंतर काकांनी विकत घेतला. ज्या रात्री काकांना हा अनुभव आला त्याच रात्री काही वर्षांपूर्वी त्यांनी गळफास घेतला होता. त्यांनी तो फ्लॅट विकायला काढला आणि दुसरी कडे राहायला गेले. तो फ्लॅट अजूनही विकला गेला नाहीये बहुतेक.
आज ही तो फ्लॅट, ती बेडरूम आहे. आजही तिथे भांडणाचे आवाज ऐकू येतात, अधून मधून बाथरूम चा शॉवर सुरू होतो. जणू ते दोघं अजूनही तिथे च आहेत. त्याच फ्लॅट मध्ये त्यांचा आत्मा अडकून पडलाय.