अनुभव – सौरव महाडिक

आमच्या महाडिक परिवाराचा दर ३ वर्षांनी गोंधळ उत्सव असतो. माझे वडील गोंधळाचे प्रमुख असल्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्या वर असायची.. माझे गाव कोकणातले.. ते दरवेळी गोंधळाला न चुकता जायचे पण आम्ही मात्र मुंबई ला असायचो. एके दिवशी का माहीत माझ्या आई च्या मनात आले की आपण सगळ्यांनी या वर्षी गोंधळाला जायचे. बाबांना सांगून आई ने आम्हा चौघांची तिकीट बुक करायला सांगितली. मी, माझा भाऊ आणि माझे आई बाबा असे माझे संपूर्ण कुटुंब जाणार होते. मी बऱ्याच वर्षांनी गावी जाणार होतो त्यामुळे खुश होतो. आणि त्यात विशेष म्हणजे या वर्षी आमच्या परिवाराचा गोंधळ उत्सव बघायला मिळणार होता. या आधी बरीच वर्षे मी गावी जात असलो तरीही अजून इतक्या वर्षात आमच्या परिवाराचा गोंधळ उत्सव बघितला नव्हता. गावी पोहोचल्या वर कोकणचं सौंदर्य काय असतं ते मी अनुभवलं.. तेव्हा माझ्या मोठ्या काकांनी नवीन घर घेतलं होत. तिथेच ५ दिवस राहायचं असा आमचा बेत होता. प्रवासात इतके थकायला झाले की काकांच्या घरी पोहोचल्या पोहोचल्या झोप कधी लागली कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी माझे वडील सकाळी लवकर उठून गोंधळाच्या कामासाठी आमच्या मूळ गावी निघून गेले. अजुन काही दिवस बाकी होते पण सगळ्या तयारी साठी बाबा काही दिवस आधीच गेले होते. मी, आई आणि भाऊ आम्ही काही दिवस काकांच्या घरीच राहिलो. मी मात्र त्या दिवसाची वाट पाहत होतो आणि बघता बघता तो दिवस उजाडला. 

आम्ही तिघे आणि काकांचे संपूर्ण कुटुंब असे आम्ही आमच्या मूळ गावी जायला निघालो. बरेच जण असल्यामुळे आणि त्यात खास म्हणजे भावंडं खूप दिवसांनी असे एकत्र प्रवास करत असल्याने मजा मस्ती सुरू होती. त्यात मला मस्ती करायची खूप सवय होती. त्यामुळे तो प्रवास आम्हा कोणालाच जाणवला नाही आणि गप्पा गोष्टी करत कधी आमच्या मूळ गावी येऊन पोहोचलो कळले ही नाही. गोंधळी नी घरच्या देवाची पूजा करून गोंधळला सुरुवात केली. खूप छान अनुभव होता तो. कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे गोंधळाचे जेवण जेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. साहजिक च खूप रात्री निघालो होतो. माझ्या वडिलांना त्या गावाच्या वाटे वरचे किस्से माहीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला आधीच बजावले होते की कोणासाठी गाडी थांबवू नका आणि कोणाला आवाज ही देऊ नका. आमचा प्रवास सुरु झाला. त्या रात्री गावदेवी चे मंदिर गेल्यावर जे घडले ते माझ्या आज पर्यंत लक्षात आहे.  आहे. गावाचा परिसर असल्यामुळे रस्ता एकदम सामसूम झाला होता. एकही वाहन नजरेस पडत नव्हते. आम्ही गावदेवी च्या मंदिरापासून थोड लांब गेल्यावर मला रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली. सहज म्हणा किंवा खोड काढण्याच्या उद्देशाने मी त्या बाई ला बघून गाडीच्या काचेवर जोरात हात मारला. पण मी ती कृती का केली या गोष्टीचा पश्र्चाताप मला आजही होतोय. त्या क्षणी काही घडले नाही, आमची गाडी तिथून काही अंतर पुढे निघून गेली. त्यात बरीच रात्र झाल्याने मला झोप कधी कळली कळले ही नाही. 

पण तितक्यात कसल्याश्या आवाजाने झोपमोड झाली. गाडीच्या काचेवर कोणी तरी जोर जोरात हात मारत होत. मी वळून त्या दिशेला पाहिले आणि हृदय भीतीने धड धडू लागले. ती बाई गाडी सोबत पळत काचेवर जोर जोरात हात मारत होती. मी एकट्याने नाही तर गाडीतल्या सगळ्यांनी ते भयाण दृश्य पाहिले. ड्रायव्हर ने तिला साईड मिरर मधून नीट पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग च उडाला. खूप भयानक अवतार होता तिचा. विस्कटलेले केस जे संपूर्ण चेहऱ्यावर पसरले होते, हाताच्या बोटांची तीक्ष्ण नखे जणू कोणाचा ही सहज घात करतील.. ड्रायव्हर ने गाडीचा वेग वाढवला. माहीत नाही काय होते ते. एखादी वेड लागलेली बाई.. की अजुन काही.. पण गाडीच्या वेगाशी बरोबरी करत धावणे हे साधे सुधे नक्कीच नव्हते. आम्ही गाडीत बसून देवाचा धावा करू लागलो. ते जे काही होत ते बराच वेळ गाडी सोबत धावत राहिलं आणि नंतर एके क्षणी दिसेनासं झालं. आमचं लक्ष पुढे गेले तेव्हा कळले की समोर एक मंदिर आहे. ड्रायव्हर ने गाडी त्या मंदिराच्या आवारात घेतली. त्या आवाराचा गेट जरी उघडा असला तरीही मंदिराचा मुख्य दरवाजा बंद होता. आम्ही गाडी तिथेच लाऊन बाहेर आलो आणि दाराच्या पायऱ्यांवर बसून राहिलो. सकाळ झाल्यावर गावकऱ्यांनी आम्हाला मंदिरात बघून आमची विचारपूस केली. घडलेल सगळं गावकऱ्यांना सांगितलं.. देवाचे आभार मानून आम्ही घरी जायला निघालो. पण मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की जर मी अस केलं नसतं तर हा प्रकार झालाच नसता.

Leave a Reply